थोडी सागरनिळाई.. थोडे शंख नि शिंपले...!!

Primary tabs

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
29 Oct 2015 - 5:40 pm

.
.
सेशल्समध्ये पहिल्यांदाच कार चालवणार्‍यासाठी बरेच लोक बर्‍याच सूचना देतात. शंभर वर्षं जगलेला मनुष्य जसा आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य म्हणून दही, दोरीच्या उड्या किंवा ब्रह्मचर्य यांपैकी काहीही सर्टिफाय करू शकतो, तसं सेशल्समधे राहत असल्याच्या अनुभवावर कोणतीही सूचना ही एकदम कमांडमेंट ठरते.

पण पण पण.. त्यातली पहिली सूचना असते की "नारळाच्या झाडाखाली तुमची कार पार्क करू नका"..

ही सूचना केवळ लाजवाब आहे. का, ते सेशल्समध्ये पोहोचल्यावरच कळतं. सेशल्समधले नारळ हे मुळात नारिकेलवंशवृद्धीसाठी वगैरे बनलेले नसून खास कारकाचभंगासाठीच जणू दणदणीत आकाराचे घडलेले असतात.

सेल्फ ड्राईव्ह कार भाड्याने घेताना त्यासोबत कितीही इन्शुरन्सेस घेतले, तरी सरासरी १००० युरो (गुणाकार सोपा, पण घाम फोडणारा आहे..), एक हजार युरो अक्षरी मात्र, इतक्या रकमेपर्यंतच्या नुकसानभरपाईची जबाबदारी कार भाड्याने घेणार्‍यावर असते आणि ते हजारभर युरो आधीच डिपॉझिटरूपात ठेवून घेतलेले असतात. त्यामुळे साला एक नारियल आदमी को...

आणखीही एक सूचना असते.. सेशल्सचं अंतरंग किंवा अत्रंगपण दाखवणारी सूचना. ती अशी, की समजा तुम्ही सेशल्समधल्या बहुतांश सिंगललेन रस्त्यांवर कार ड्राईव्ह करताहात. बायदवे.. सेशल्समधे बहुतेक सर्वच रस्ते एकलेनीय असतात. दोन गाड्या एकत्र जाऊ शकतील अशा क्वचित्संभव रस्त्यांना ते हायवे म्हणतात. तर, समजा अशा चिमुरड्या रस्त्यावरून तुम्ही तुमची मिनिमोक किंवा पिकॅन्टो गाडी चालवत निघालेले आहात. आता नेमक्या त्याच वेळी त्या बेटावरच्या अनेक महाकाय अल्डाब्रा कासवांपैकी एखाद्याला तुमच्या समोरून रस्ता ओलांडण्याची इच्छा होऊ शकते. 'सेशल्स आयलंड टाईम' ही काळाची एक वेगळी गती आहे. ते जडशीळ कासव त्या आयलंड टाईमचं ब्रँड अँबेसिडर आहे.

त्याचं असं आहे ना की आपल्याला - म्हणजे मर्त्य मानवांना ही ट्रिपबीप आणि एकूण आयुष्य साठसत्तर वर्षात संपवून मरायची घाई असते. पण दीडदोनशे वर्षं सहजच जगणार्‍या त्या अल्डब्रा कासवांना तशी काहीच घाई नाही. त्यामुळे ती रस्ता संथपणे सानंद क्रॉस करत असतात. अशा वेळी तुम्ही एकतर गप बसून त्याचा रॅम्पवॉक बघा किंवा इंजीन बंद करून गाडीतून उतरा आणि शांतपणे कुठेतरी एक पायीपायी चक्कर मारून या. पण जर तुम्ही वैतागलात आणि मुंबैपुण्याच्या हिशोबाने हॉर्नबीर्न वाजवलात किंवा कोल्हापूर सातार्‍याच्या हिशोबाने जवळ जाऊन हॅक हिर्रर्र वगैरे केलंत, तर ते शांतपणे आपल्या पाठीवरच्या अवाढव्य ढालीत लुप्त होईल आणि रस्त्यात टेकाड बनून बसकण मारेल. मग ते पुन्हा बाहेर येईस्तोवर बसा बोंबलत. आणि ती कासवरूपी शिळा आपण स्वतःच गणपतीबाप्पा पद्धतीने 'जोर लगाके हैशा' करून रस्त्याकडेला उचलून ठेवू असं वाटत असेल, तर केवळ ऑल द बेस्ट.

g

पण हे असं नको. म्हणजे गोल गोल घुमवून मूळ विषयाकडे नको. ललित नको. डायरेक्ट सेशल्स बेटांवर का आणि कसं जायचं ते सांगतो.

एक म्हणजे सेशल्स सग्ग्ळ्या सग्ग्ळ्या जगापासून खूप खूप दूर भर महासागरात असलेलं एक टिंबवत् बेट आहे. सगळ्या जगाला बारा गडगड्यांच्या विहिरीत घालून थोडे दिवस कुठेतरी दडी मारायची असेल, तर असं ठिकाण परफेक्ट. समुद्राच्या इतकं कुशीत की विमान रनवेवर उतरल्यावर अगदी बाजूला चिकटून तो समुद्रच असतो.

A

झालंस्तर साधारणपणे मेनस्ट्रीम पर्यटकांचं डेस्टिनेशन सहसा सेशल्स नसतं. ते थायलंड, मलेशिया, सिंगापूर, युरोप आणि यासम कुठेतरी जातात. त्यामुळे सेशल्समध्ये पर्यटकांचा महापूर नसतो.

हे सर्व दुय्यम ठरेल असं एक खास व्यक्तिमत्त्व या बेटांवरच्या लोकांना आहे.. आणि त्यामुळे या बेटांना स्वतःचा ठसठशीत चेहरा आहे. तो आधी खडूस दिसतो, पण प्रत्यक्षात चक्क लोभस आहे.

पाल्हाळ तातडीने बंद.

काहीतरी किमान माहिती सांगणं भाग आहे. तरच पुढे काहीतरी बोलता येईल.

सेशल्समधे शंभरहून जास्त छोटीछोटी बेटं आहेत. पण 'माहे' हे मुख्य बेट सगळ्यात मोठं आहे. त्याच बेटावर 'व्हिक्टोरिया' ही सेशल्सची राजधानी आहे.

व्हिक्टोरिया शहरः

C

प्रासलिन हे आकाराने नंबर दोनचं बेट. ला दिगू हे तिसर्‍या नंबरचं. बाकी टिल्लूपिल्लू अगणित.

माहे ते प्रासलिन जाण्यासाठी पंखावालं बुर्बुरविमान आणि कॅटकोको नावाच्या मोटरबोटी सतत चालू असतात. 'दिगू'रावांना भेटायला मात्र फक्त बोटच.

चलन म्हणजे 'सेशल्स रुपया'. सध्याचा चलनाचा दर साधारणपणे एक सेशल्स रुपया म्हणजे पाच भारतीय रुपये. युरो आवडीने आणि जास्त सुहास्य वदनाने स्वीकारले जातात.

टिपः पेट्रोल पंप (१५ ते २० सेशल्स रुपये प्रतिलीटर पेट्रोलचा दर = ७५ ते १०० भारतीय रुपये प्रतिलीटर), सुपरमार्केट्स, लोकल रेस्टॉरंट्स अशा काही ठिकाणी सेशल्स रुपयेच घेतले जातात. रेंटल कार, टॅक्सी, उंची हॉटेल्स अशा जागी युरो घेतले जातात. त्यामुळे दोन्ही चलनं जवळ ठेवावीत. शिवाय युरो घेणारे सर्व जण सुट्टे पैसे परत देताना सेशल्स रुपयांतच देतात हेही नोंदवून ठेवावं. यू नो इट नाऊ.

भारतातून सेशल्ससाठी ट्रॅव्हल कंपनीच्या गायडेड ग्रुप टूर्स जवळजवळ नाहीतच. काही कंपन्या तुमच्या सोयीप्रमाणे हॉटेल-विमान वगैरे बुकिंगची मोट बांधून देतात. ते बरंच महाग पडतं.

पण त्या कारणाने हे ठिकाण टाळण्याची गरज नाही. आपण स्वतःच आपली सोय लावून लैच झकासपैकी सेशल्सला जाऊन येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असलेली मुख्य गोष्ट म्हणजे जास्तीतजास्त पुढच्याच्या ठेचा ऐकायला मिळणं.

मग मागचा जास्तजास्त शहाणा होतोच.

मुंबईहून सेशल्सला जायला श्रीलंकन, केनिया, एतिहाद, जेट अशा अनेक कंपन्यांच्या फ्लाईटस् आहेत. त्यातल्या एक वगळता सर्व इनडायरेक्ट आहेत. म्हणजे अबुधाबी, नैरोबी, कोलंबो वगैरेला जाऊन मोठा वळसा घेऊन वीसबावीस तास खाणार्‍या टप्पेखोर फ्लाईट्स. एकच थेट फ्लाईट आहे ती म्हणजे एअर सेशल्सची. साडेचार तासात सेशल्सला चरणस्पर्श घडवणारी.

टिपः हीच फ्लाईट 'कोडशेअर पार्टनर' वगैरे नावांखाली एतिहाद आणि जेटतर्फेही दिली जाते आणि थेट एअर सेशल्सपेक्षा त्यांचं तिकीट पंधरावीस हजार रुपये जास्त असतं. यू नो इट नाऊ.

सेशल्समधे पूर्ण बेटंच्या बेटं आणि त्यांचा प्रत्येक कानाकोपरा फिरून पाहण्यासारखा आहे. पूर्ण आयलंड हाच एक मोठा बीच असल्याने ठिकठिकाणी खास आपल्यासाठीच ठेवलेले असावेत असे रिकामे स्वर्गीय किनारे आपल्याला सापडतात.

D

इथे महाबळेश्वर माथेरानसारखे सनराईज पॉईंट, प्रिन्सेस पॉईंट, बाकडा पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फलाणा पॉईंट, भेळ पॉईंट, घोडदौड पॉईंट, सनसेट पॉईंट असा बिंदूंनी जोडलेला सिक्वेन्शियल फेरा नाही. तसं म्हटलं, तर सेशल्समध्ये पोटापाण्यासाठी लोकल टूर अरेंज करणार्‍या कंपन्यांना काही 'प्रेक्षणीय' ठिकाणांची नावं यादीस्वरूपात टूरिस्टना दाखवावी लागतात. पण ते काही खरं नव्हे. या अरेंज्ड टूर्स भयंकर महाग असतात आणि त्याहून वाईट म्हणजे त्या सहा किंवा आठ तासात गरागरा घुमवून ठिकठिकाणी आपलं केवळ डोकं टेकवून आणतात. या सहा तासांच्या एका साईटसीईंग टूरची किंमत दीडशे ते दोनशे युरो प्रतिमाणशी असते. इथल्या किरकोळ टॅक्सीजही उदाहरणार्थ १० किलोमीटर अंतरासाठी चाळीस ते पन्नास युरो घेतात.

एअरपोर्ट ते हॉटेल इतक्या अंतराची एकवेळेची टॅक्सी ज्या किंमतीत येते, त्या किंमतीत पूर्ण चोवीस तासासाठी सेल्फ ड्राईव्ह कार इथे मिळते. दिवसाला पस्तीस युरोपासून अत्यंत भारी आणि महागड्या कार्सही दिवसाला शंभर युरोच्या आत येतात. बार्गेन करण्याचीही भरपूर संधी असते. तेव्हा सेल्फ ड्राईव्ह कार हा सर्वात किफायतशीर प्रवासाचा मार्ग आहे. सेशल्सचा आयकॉन बनलेली 'मिनी मोक', ह्युंदई, किया, निसान, सुझुकी या कंपन्यांच्या भरपूर वेगवेगळ्या कार्स सेल्फ ड्राईव्हसाठी मिळतात. मोठ्या ग्रूपसाठी आठ सीटर सुझुकी एपीव्ही, टोयोटा अवान्झा आणि तत्सम व्हॅन्सही जरा जास्त दरात मिळतात.

मिनी मोकः

H

या गाड्या पुरवणार्‍या बर्‍याच एजन्सीज आहेत, पण काही मुद्दे सर्वांना कॉमन आहेत, ते इथे टोचून ठेवतो.

१. भारत किंवा कोणत्याही देशाचं रोमन इंग्लिश अक्षरांमध्ये इश्यू केलेलं चालू ड्रायव्हिंग लायसन्स सेशल्समधे तीन महिन्यांपर्यंत चालतं.
२. बर्‍याच कंपन्यांना किमान तीन वर्ष जुनं लायसेन्स हवं असतं. पण हा नियम कडक नाही. कंपनीनुसार तो बदलतो. किमान एक वर्ष जुनं लायसेन्स मात्र हवंच.
३. २३ वर्ष ते ६० वर्षं या वयोगटातल्या ड्रायव्हरला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. त्याहून तरुण किंवा म्हातार्‍या ड्रायव्हरला सेल्फ ड्राईव्ह कार मिळणं कठीण जातं किंवा सरचार्ज लागतो.
४. किमान पाचशे, सरासरी हजार आणि जास्तीतजास्त कितीही डिपॉझिट कार घेण्याआगोदर कॅशमध्ये घेतलं जातं किंवा त्याहूनही जास्त प्रमाणात क्रेडिट कार्डवर ब्लॉक केलं जातं. इन्शुरन्स घेऊनही किमान १००० युरो उत्तरदायित्व ड्रायव्हरकडे राहात असल्याने ही रक्कम आधी घेतली जाते. कारला नुकसान न करता ती परत केली की हे डिपॉझिट परत मिळतं किंवा क्रेडिट कार्डवरचा ब्लॉक काढला जातो.
५. कारचा दर हा लहान कारसाठी ३५ ते ५० युरो प्रतिदिवस असतो. जास्त दिवसांसाठी कार घेतली तर तो आणखी कमी होतो. किमान ३ दिवस कार घ्यावी अशी बहुतांश कंपन्यांची अपेक्षा असते. पण नियम नव्हे.
६. कारला जर ड्रायव्हरच्या चुकीमुळे डॅमेज झालं तर नुकसानाची पूर्ण रक्कम ड्रायव्हरला भरावी लागते. यात मुख्यत: दारू पिऊन ड्रायव्हिंग, राँग साईडने ड्रायव्हिंग वगैरे येतात. अन्य केसेसमध्ये कितीही नुकसान झालं तरी १००० युरोंच्या वर भरपाई घेतली जात नाही.
७. जनरली कार एअरपोर्टवरून पिकअप करता येते किंवा बेटावर मुख्य ठिकाणांपैकी कुठेही फ्री डिलिव्हरी दिली जाते. कार परत करतानाही तेच.

आता टर्म्स अँड कंडिशन्स बास.

टिपः एअरपोर्टसमोरच पहिलं फ्युएल स्टेशन आहे. तिथे कारची टाकी किमान अर्धी भरुन घ्या. जेवढं पेट्रोल कार घेताना होतं, तेवढी लेव्हल परत करताना ठेवणं असं सर्वमान्य तत्त्व आहे. यू नो इट नाऊ..

A

..बेटावर ड्रायव्हिंग सुरु करावं आणि हे विषुववृत्तीय घनदाट अरण्य विंचरून काढावं.

सेल्फ ड्राईव्हचा मुख्य प्रॉब्लेम असा की तुम्ही रस्ता चुकता. एखाददुसरी कार रेंटल कंपनी सोडली, तर कोणीही जीपीएस नॅव्हिगेशन सिस्टीम देत नाहीत. कागदी मॅप घेतला तर रस्त्यांची स्पॅघेटी बघताबघता पाचेक मिनिटांत त्याची सुरळी करून कारच्या मागच्या भागात फेकली जाते. पण माझ्यावर विश्वास ठेवा.. मला सेशल्समध्ये जी सर्वात जास्त सुंदर ठिकाणं सापडली, ती केवळ चुकलेल्या रस्त्यांवरच. रुळलेल्या रस्त्यांवर मी आणखी एक पर्यटक म्हणून जाऊन आलोही असतो, पण या रस्ता चुकण्याचे सर्वाधिक आभार मानले आहेत मी पुष्कळ वेळा मनात. सेशल्स इज द बेस्ट प्लेस टु गेट लॉस्ट.

J

माहे बेट एकूण पूर्ण फेरा धरूनही ऐंशी ते शंभर किलोमीटरच्या टप्प्याच्या आतच आहे. तेव्हा कितीही चुकलात तरी त्या स्वर्गभूमीत फेरफटका मारत मारत तुम्ही दिवसाअखेरीला तुमच्या हॉटेलच्या बारच्या स्टुलावर बूड टेकायला सुखरूप पोहोचणार याची खात्री ठेवा. बारच्या बाजूला बाजूला गोडशी सेशल्सवासी मुलगी आणि तिचा म्युझिकल बँड एकाचढ एक रमवणारी गाणी गात असतील. बारमन तुमच्याकडे "आलात बेटभर उंडारून? आता बसा वाईच आणि घ्या टकमक रम घोटभर.." अशा नजरेने बघेल.

टकमक. किंवा टकामका... जे काही असेल ते. हो. टकामका बे हा या बेटावरचा एक सुंदर भाग. घनदाट जंगलाच्या सोबत अतीव सुखदायक बीचेस असलेला. वाळू म्हणजे शुभ्र बर्फच जसा काही. आणि पाणी म्हणजे नितळ हिरवानिळा अनलिमिटेड पूल. समुद्राचा तळ तर दिसतोच, पण पाणी स्थिर असलं तर होडीची सावलीही समुद्राच्या तळावर दिसते. टकामका बे हा एरिया तिथल्या रम डिस्टिलरीसाठी प्रसिद्ध आहे. खास सेशल्सच्या मातीतली रम तिथे बनते. नुसत्या बर्फात घालूनही छान. डार्क रम, कोको रम, ओव्हरप्रूफ रम (७२%) आणि इतरही बर्‍याच व्हरायटीज आहेत. इथे डिस्टिलरीची टूर आणि त्यातच तिथे जेवण विथ अर्थातच रम असा प्लॅनही एन्जॉयेबल.

e

टिपः टकामका डिस्टिलरी टूरमध्ये तिथेच रम प्यालात, तर ड्रायव्हिंग करणं बेकायदेशीर ठरेल. यू नो इट नाऊ.

ड्रायव्हिंग करत करत बेटाला प्रदक्षिणा घालताना एक लक्षात येतं की पूर्ण बेटाला मध्यावर विभागणारा एक उंच प्रचंड पर्वत आहे आणि तो कोणत्याही ठिकाणाहून दिसतच राहतो. या पर्वताच्या शिखरांवर कायमचे ढग चिकटलेले असतात आणि सर्वच वातावरण एकूण पावसाळी असतं. बेहद्द खूश करणारं वातावरण. मला आधी वाटायचं की मुद्दाम त्या पर्वतांचे पावसाळ्यातले फोटो काढून इंटरनेट आदि ठिकाणी चढवतात. सुंदर दिसावं म्हणून. पण तिथे गेल्यावर कळलं की सदोदित कोणत्याही काळात तिथे कमीजास्त पाऊस असतोच. पर्वतशिखरावर सदैव वातावरण असंच धुक्याचं आणि पावसाळी असतं. त्याहून सुखद धक्का तेव्हा बसला, जेव्हा मी अशाच एका 'रस्ता चुकण्याच्या' नादात त्यातल्या दोन वेगवेगळ्या शिखरांच्या टोकांवर कार ड्राईव्ह करत करत जाऊन पोहोचलो. समुद्राच्या काठावरचं ते खास 'सनी बीच अ‍ॅटमॉस्फियर' आणि या पर्वतशिखरांवरचं विषुववृत्तीय दाट जंगलातलं हे पावसाळी धुकट धीरगंभीर वातावरण. थंड. एकाच बेटावर एका तासाहून कमी प्रवासात हे दोन्ही अनुभवता येतं हा चमत्कार आहेच.

सेशल्स जवळजवळ विषुववृत्तावर आहे. म्हणजे सहा ते दहा डिग्री दक्षिण गोलार्धात. त्यामुळे तिथली जंगलं हा वेगळाच अनुभव आहे. जमिनीपर्यंत उजेड पोहोचू न देणारे शेकडो फूट उंच फोफावलेले घनदाट वृक्ष. कधीही न पाहिलेल्या झाडामाडांच्या जातीमध्ये अचानक आपल्या ओळखीचीही खूप झाडं दिसून एकदम घरच्यासारखं वाटतं. चाफा, जास्वंद, आंबा आणि चक्क कोंकणातल्यासारख्या काजविणी वगैरे दिसतात.

K

E

प्राणी आणि पक्षीही इथे स्वतंत्रपणे डेव्हलप झालेले आहेत. अल्डब्रा कासव जगातलं सर्वात मोठं कासव आणि सर्वात जास्त जगणारं. ही कासवं दोनशे वर्षांहून जास्त जगल्याचीही उदाहरणं आहेत. सेशल्समधूनच आणलेलं १७५०च्या सुमाराला जन्मलेलं अद्वैत नावाचं अल्डब्रा कासव कोलकात्यामधे २००६ सालापर्यंत जिवंत होतं. २५५ वर्षं आयुष्य पाहिलेलं कासव.

पक्ष्यांच्या काही जाती फक्त इथेच सापडतात आणि अन्य ठिकाणच्या मुख्य जातींच्या खास सेशल्स आवृत्त्या इथे आहेत. एखादं जगावेगळं वैशिष्ट्य, रंग असा बदल असलेली मूळ पक्षीजातीची उपजात इथे दिसते. भारतातली साळुंकी मात्र इथे जशीच्यातशी उपलब्ध आहे. एका पिसाचाही फरक नाही. एकंदरीत सर्वच पक्षी धीट आहेत. जेवणाच्या टेबलखुर्चीवर आपल्यासमोर येऊन बसतात.

सेशल्समधे खाणंपिणं हा एकूण महागडा प्रकार आहे. बीच रिसॉर्ट्स आणि रमाडेमेरिडियनादिंमधे खाणं काही जणांच्या खिशाला भगदाड पाडू शकतं. पण रोडसाईट ईटरीज आणि लोकल रेस्टॉरंट्समधे अत्यंत चविष्ट क्रिओल पदार्थ मिळतात आणि बिलाचंही दिलावर लोड येत नाही. काझ क्रिओल (अ‍ॅन्से रोयाल), पायरेट्स आर्म (व्हिक्टोरिया शहरातील मार्केट), मारी अंटोनेट (सेंट लुईस) ही रेस्टॉरंट्स क्रिओल उर्फ स्थानिक क्विझिनसाठी प्रसिद्ध आहेत. खिशालाही तुलनेत कमी जड आहेत. सेब्रू ही सेशल्समध्ये बनणारी बियर आणि टकमक रमचे वेगवेगळे प्रकार हे लोकल मद्यांचे प्रकार न चुकवण्यासारखे. बरेच पर्यटक हातात सेब्रू घेऊनच वावरत असतात. क्रिओल खाद्यपद्धतीत भरपूर मसाले आणि खोबरं वापरलं जात असल्याने ते पदार्थ म्हणजे आपल्या कोंकणी गोवन पदार्थांची एक वेगळी आवृत्ती वाटते. कोंबडी किंवा माशांची क्रिओल करी आणि राईस हा मेन कोर्स.

L

c

g

लाडोब हा गोड पदार्थ इथला स्थानिक आहे. त्याचं लाडूशी साम्य नसून दर्शनी केळ्याच्या शिकरणीशी साम्य आहे. सेशल्समधले लोक एकमेकांना "करा चैन.. खा लेको, रोज लाडोब खा.." म्हणत असतील. अर्थात केळ्याखेरीज अन्य घटक पदार्थ वापरूनही लाडोबच्या काही व्हर्शन्स बनतात म्हणा.

राहण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची इथे कमी नाही. ब्रँडेड मोठमोठ्या फाईव्ह स्टार्सपासून ते अगदी लहान सेल्फ केटरिंग गेस्ट हाऊसेसपर्यंत खूप ऑप्शन्स आहेत. कित्येक बंगले गेस्ट हाऊसच्या स्वरूपात खूप कमी भाड्यामध्ये मिळू शकतात. काहींची लोकेशन्स तर अक्षरशः स्वप्नातलीच असतात. एखाद्या डोंगरउतारावर सुंदर बंगला आणि समोर थेट निळाशार समुद्र विथ पॅनोरमिक व्ह्यू. सेल्फ केटरिंग हॉटेलांमध्ये किंवा बंगल्यांमध्ये स्वतःच स्वयंपाक करायचा असल्याने तेवढा उत्साह, आवड आणि वेळ असला तरच तो ऑप्शन घ्यावा. सेशल्समध्ये सगळीकडे छोटीछोटी 'सुपरमार्केट्स' आहेत. कनु सुपरमार्केट, राजेश खन्ना सुपरमार्केट, मुरुगन सुपरमार्केट, स्वामी सुपरमार्केट अशा छापाची नावं असलेली ही सुपरमार्केट्स नव्वद टक्के तामिळ मालकांची असल्याचं दिसतं. अगदी कपाळावर भस्माच्या पट्ट्या ओढलेले मालक गल्ल्यावर बसलेले असतात. गप्पाही मारतात. अनेक पिढ्यांपूर्वी इथे आलेल्या तामिळतंबींनी इथे या व्यापारात दणकट बैठक मारली आहे. या दुकानांमध्ये स्वयंपाकोपयोगी पदार्थ, तयार सेमीतयार, फ्रोझन खाद्यपदार्थ, पाणी आणि इतर आनंदपेयं हे सर्व मिळतं. तयार कॉकटेल्सच्या बाटल्या मिळतात. हे सर्व अत्यंत स्वस्त मिळत असल्याने सुपरमार्केटमध्ये खरेदी करून सेल्फ केटरिंग घरात आपलाआपण स्वयंपाक करणार्‍यांचे दिवसाला प्रतिमाणशी शंभरेक युरो तरी वाचावेत.

टिपः सेशल्स इमिग्रेशन ऑफिस जरी सहसा फार कडक नसलं, तरी तिथले ऑफिसर्स कधीकधी त्यांना संशय आला तर आपल्या राहण्याच्या जागेची म्हणजे हॉटेलची किंवा गेस्ट हाऊसची फोन लावून चौकशी करू शकतात. जर आपण अशा सेल्फ केटरिंग घरगुती गेस्ट हाऊसेसपैकी एखादं घेतलं असेल आणि ते अधिकृत पर्यटक निवासांच्या यादीत नसेल, तर तुम्हाला ऑन अरायव्हल परमिट नाकारलं जाऊ शकतं किंवा दुसर्‍या मान्यताप्राप्त हॉटेलात नव्याने बुकिंग करायला लावलं जाऊ शकतं. तेव्हा खर्च झाला तरी चालेल, पण उंची हॉटेलांपैकी एखाद्याला पसंती द्या. यू नो इट नाऊ..

उपरोक्त भटकंती, शिखरांवर चढणं, सुपरमार्केटमधली खरेदी, तारांकित हॉटेल्समधून जेवायला लोकल रेस्टॉरंटमध्ये जाणं आणि अन्य सर्व कारवायांसाठी स्वतःच्या हाताशी कार असणं मस्ट. या बेटांवर बाईक्स भाड्याने देणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे रेंटल सेल्फ ड्राईव्ह का॑र हा पर्याय शक्य आणि सर्वात सुखद आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट ठीकठाक आहे, पण एका बसने एका टप्प्यात आपल्याला हवं त्या ठिकाणी जाणं कठीण. दोनतीनदा बस बदलावी लागते. टॅक्सींचे दर विचारक्षितिजाच्या पलीकडले आहेत. इथे खास नोंद अशी की सेशल्सच्या सरकारी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सर्व बसेस चक्क आपल्या भारताकडून मागवलेल्या 'टाटा' आणि 'अशोक लेलँड'च्या आहेत. बस ड्रायव्हरही इथून ट्रेनिंग घेऊन गेलेले असावेत, कारण त्या टीचभर घाटरस्त्यांवरून ते बसेस शूमाकरप्रमाणे अक्षरशः उडवत असतात.

ड्रायव्हिंग भारतातल्या (किंवा यूकेप्रमाणे यू नो..) रस्त्याच्या डाव्या बाजूने असतं आणि स्टियरिंग व्हील गाडीच्या उजव्या बाजूला असतं. त्यामुळे भारतीय ड्रायव्हरला वेगळं काही लक्षात ठेवावं लागत नाही.

o

टिपः सेशल्सचे जवळजवळ सर्व रस्ते कटिंग एज टेक्नॉलॉजीने बनलेले आहेत. आय मीन रस्त्याच्या दोन्ही कडांना शार्प आणि खोलवर कट्स आहेत. घाटही अत्यंत खडा चढ आणि तीव्र वळणांचे आहेत. इथे फोटोंमधे दिसणार्‍या कठड्यांवरुन मत करुन घेऊ नका. कठडा असलेल्या एखाददुसर्‍या रस्त्याला तिथे "मेन हायवे" म्हणत असावेत. बाकी आपल्या फिरण्याच्या ठिकाणी डोंगरदर्‍यांतले सर्व रस्ते बिनकठड्याचेच आहेत. अशा साहसपूर्ण रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडा किंवा रस्त्यावर दिवे लावणं सेशल्स सरकारच्या मते भ्याडपणाचं लक्षण असणार. तेव्हा विशेषतः रात्री ड्रायव्हिंग करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण एक शेरदिल ड्रायव्हर असल्याची खात्री करुन घ्या. अनेकदा आपण कार ड्रायव्हर आहोत की दोरीवरून तोल सांभाळत चाललेले डोंबारी आहोत असं वाटू शकतं. यू नो इट नाऊ..

l

सेशल्सला जाण्यासाठी कोणत्याही देशाच्या नागरिकांना व्हिसा लागत नाही. ऑन अरायव्हल एअरपोर्टवर मर्यादित काळासाठी व्हिजिटर परमिटचा कुल्ल्यांच्या शेपचा शिक्का मिळतो. हे कुल्ले म्हणजे खरोखरचे कुल्ले नसून कोको दि मर (समुद्रनारळ) या नावाने प्रसिद्ध असलेलं महाजंबो आकाराचं फळ आहे. हा जगातला सर्वात मोठा नारळ आणि सर्वात वजनदार बी आहे. हे सेशल्सच्या आयकॉन्सपैकी एक आहे. गात फक्त दोन ठिकाणी हे प्रचंड नारळ अस्तित्वात आहेत. मालदीव्जमधला काही थोडा भाग आणि सेशल्सचं प्रासलिन बेट ही दोनच ठिकाणं. हे फळ अत्यंत जड आणि घन असल्यामुळे समुद्रात पडून वाहात दुसर्‍या बेटांवर रुजण्यासाठी जाऊ शकत नाही. ते बुडून जातं. त्याचं चित्र मी इथे टाकत नाही. का, ते तुम्ही खुद्द चित्र शोधून पाहिल्यावर तुमच्या लक्षात येऊ शकेल.

आता बरंच बडबडून झाल्यावर थोड्या ओळी सेशल्समध्ये करण्यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजबद्दल.

साईटसीईंग: पूर्ण बेटंच एकेक सुंदर साईट आहेत. तरीही माहे बेटाच्या परिघावरून जाणार्‍या रस्त्याने रस्ता नेईल तिथे मनमुराद जात राहणं यात एक दिवस घालवा.

n

m

प्रासलिन बेटावर वेगळी कार घ्यावी लागेल. त्याचं पुन्हा हजार युरो डिपॉझिट होईल. त्यापेक्षा माहे बेट सेल्फ ड्राईव्ह आणि प्रासलिन - ला दिगू गायडेड टूर घ्या. प्रासलिनला वली दी माई (उच्चाराकरिता कोपिनेश्वर मला क्षमा करो..!!) नावाचं अभयारण्य आहे. त्याची चालत चालत टूर करता येते. तिथे सेशल्स पॅरेडाईज फ्लायकॅचरसारखे अद्भुत पक्षी आणि ते प्रसिद्ध कोको दि मर फळ, माडांसहित बघता येतं.

माहे बेटांच्या सफरीमध्ये बोटॅनिकल गार्डन, व्हिक्टोरियाचं मार्केट, पोर्ट लुने बीच, टकमक बीच, मिशन लॉज, टी फॅक्टरी, नॉर्थ पॉईंट, अ‍ॅन्से रोयाल, अ‍ॅन्से फोरबान्स, अ‍ॅन्से पेटिट, ब्यू व्हॅलॉन हे पॉईंट्स लक्षात ठेवून ते पाहण्याच्या अनुषंगाने आजूबाजूचं सर्वच पाहावं.

ब्यू व्हॅलॉनचा एक भागः

m

n

मिशन लॉज हे उंच शिखरावर असलेले जुन्या मिशन स्कूलचे भग्नावशेष आहेत. १८३५मध्ये त्या वेळी सेशल्सवर राज्य करणार्‍या ब्रिटिशांनी गुलामगिरी संपवली. १८६० साली त्यांच्या नेव्हीने आफ्रिकन गुलामांना वाहून नेणार्‍या अरबी बोटी पकडल्या आणि माहे बेटावर २४०९ गुलामांना मुक्त सोडून दिलं. त्या गुलामांची पोरंबाळं नुसती भटकत राहताहेत आणि त्यांना काही भवितव्य नाही हे लक्षात घेऊन खूप प्रयत्नांनी १८७६ साली या नितांतसुंदर ठिकाणी त्यांच्यासाठी शाळा बांधली गेली. ती नऊ वर्षांतच दुर्दैवाने बंद पडली. आर्थिक मदत नसल्यामुळे. या ठिकाणचे थोडेसेच उरलेले भग्न अवशेष आणि जुनी पेंटिंग्ज बघताना त्या अल्पजीवी शाळेचा वर्ग भरलेला आपल्याला दिसायला लागतो. घनदाट जंगलाच्या मध्ये आणि समोर अफाट समुद्राचं दर्शन घडवणारी ही जागा कधीच विसरता येणार नाही, याची गॅरंटी.

मिशन लॉजच्या "वर्गा"तून" दिसणारं दृश्य..

F

डायव्हिंग, स्नॉर्केलिंगः अनेक ठिकाणी डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, सर्फिंग या सर्वांची पॅकेजेस आणि सोय आहे. ब्यू व्हॅलोंन हा सर्वात प्रसिद्ध आणि नितळ लांबलचक असा नितांतसुंदर बीच आहे. याच्या काठी अनेक हॉटेल्स आहेत आणि लोकल मार्केटही आहे. बुधवारी तिथे बाजार भरतो. तोही रोचक असतो. ब्यू व्हॅलोन बीचवर ऐन वेळीही अनेक विक्रेते तुम्हाला बोट टूर्स, स्नॉर्केलिंग आणि डायव्हिंगची पॅकेजेस देतील. सेशल्स ही ग्रॅनाईटने बनलेली बेटं आहेत. त्या ग्रॅनाईटचे सुळके समुद्रातून आणि डोंगरातून उगवलेले दिसतात. आजूबाजूला समुद्रतळाशी कोरल्सही भरपूर आहेत. पण मुख्य सौंदर्य समुद्राच्या निळाईहिरवाईचंच.

डीप सी डायव्हिंग या प्रकारासाठी सेशल्स प्रसिद्ध आहे. ब्यू व्हॅलॉन बीचवरच मोठं डायव्हिंग सेंटर आहे. तिथे अजिबात अनुभव नसलेल्यांसाठी प्राथमिक अनुभव देण्यापासून ते प्रोफेशनल डायव्हर्ससाठी असे मोठ्या रेंजचे पाणबुडे कोर्सेस अरेंज केले जातात. एक दिवस ते काही आठवड्यांपर्यंतही.

r

a

फिशिंग टूर्स: खास मस्त्यप्रेमींसाठी मी हा प्रकार रेकमेंड करतो. ब्यू व्हॅलॉनवरुन फिशिंग बोटवर तुम्हाला चढवून अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसांच्या मासेमारी कम आयलंड हॉपिंग टूर्स असतात. मासेमारीचे गळ तुम्हाला प्रत्येकाला देऊन आणि मोठाले मासे पकडण्याच्या युक्त्या शिकवून हे लोक तुम्हाला खुद्दच स्वतःच्या खाण्यासाठी मासे पकडू देतात. मग ते मासे घेऊन एका निवांत बेटावर जायचं. तिथे ते तुम्ही पकडलेले मासे ग्रिल, फ्राय वगैरे करुन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पेश केले जातात. मग बेटावर फेरफटका आणि पाण्यात खेळणं आहेच.

m

सेशल्समधे खूप वेगवेगळ्या जातीचे आणि आकाराचे खाण्यायोग्य मासे मिळतात. त्यातले बरेच रंगीबेरंगी एक्झॉटिक दिसणारेही असतात. ऑक्टोपससुद्धा कोळणींच्या पाटीत सहज पहुडलेला दिसतो.

नेचर ट्रेकिंग : खूप ठिकाणी पर्वतावर चढणार्‍या, जंगलात भटकणार्‍या, किनार्‍यांवरून चालणार्‍या आणि वेगवेगळी बेटं तुडवणार्‍या नेचर ट्रेल्स गाईडसह करता येतात. तिथला निसर्ग अत्यंत जवळून बघण्याचा सर्वात चांगला मार्ग.. अर्थात सब्जेक्ट टु फिटनेस. ला दिगू आणि बर्‍याच लहान बेटांवर बहुतांश प्रवास पायी किंवा सायकलने केला जातो. तिथे पक्के रस्तेही फार थोडे आहेत.

आफ्रिका, फ्रान्स आणि ब्रिटन या भागातल्या लोकांच्या संयोगाने निर्माण झालेला एक वेगळाच मनुष्यसमूह सेशल्स बेटांवर मेजॉरिटीमध्ये आहे. चापूनचोपून केस मागे बांधल्याने टकलू वाटणार्‍या, टीशर्ट आणि स्कर्ट असा जवळजवळ युनिफॉर्म म्हणता येईल इतका एकाच प्रकारचा ड्रेस घालणार्‍या पण तरतरीत गोड चेहर्‍याच्या पोरी आणि अत्यंत बारीक केस असलेले हाफ पँटी घालणारे सावळे पोरगे असा पाहताक्षणीच ओळखू येणारा सेशल्सवासींचा प्रकार आहे.

सेशल्सचा रंगीबेरंगी आत्मा आपल्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रांमध्ये पकडणारा लई भारी माणूस जेरार्ड डेवुड (फ्रेंच+सेशलोईस असल्यामुळे याच्या नावातलं नेमकं सायलेंट काय आहे याचा पत्ता लागणं कठीण आहे) हा मला अशाच एका रस्ता चुकलेल्या भ्रमंतीत भेटला. रस्ता चुकून एक निबिड अरण्य पार करताना मला एका डोंगरावर एक जुनी प्रशस्त हवेली दिसली. तिचं गेट सताड उघडं होतं आणि एका चित्रकाराचा तो स्टुडिओ असल्याचं त्याच्या गेटवर लिहिलं होतं. उत्सुकतेपोटी त्या बंगल्याच्या पोर्चमध्ये कार पार्क करून आत गेलो. शेकडो मोठ्यामोठ्या पेंटिंगच्या गर्दीत जेरार्ड खुद्दच बसला होता. एका स्पीकरवर सेशल्समधलं खणखणणारं हलकं संगीत लागलं होतं आणि हा ब्रह्मानंदी टाळी लागून एका पेंटिगवर ब्रश मारत होता. त्या दालनात मी जितके रंग पाहिले तितके एका वेळी एका जागी या आयुष्यात कधी पाहिलेले नाहीत. खूप खूप रंग वापरून सेशल्सच्या झोपड्या, झाडमाड, जंगलं, वेली, समुद्र, आकाश, धबधबे, पर्वत हे सगळं एका वेगळ्याच जगात नेऊन ठेवलं होतं. जेरार्डची तंद्री भंगली आणि तो स्वागताला येऊन गप्पा मारायला लागला. तासभर तो इतका मनसोक्त बोलत होता की जणू वर्षानुवर्षं बोलायचं बाकी असावं. तो त्या दोन पिढ्यांपासूनच्या वडिलोपार्जित हवेलीत एकटाच राहतो. बॅचलर आहे. बर्‍यापैकी वय झालंय, पण मी लग्नबिग्न काही नाही बुवा केलेलं.. सेशल्समधलीच गर्लफ्रेंड आहे माझी, ती येते अधूनमधून.. असं मला डोळा मारत सांगितलंन.

q

घराचा एकूण माहोल बघता तो दिवसरात्र पेंटिंग्जच करत असावा असं वाटतं. त्याचा निरोप घेताना लई म्हणजे लईच हेवा वाटला, आणि उगीच जरा भरून आल्यासारखंही झालं.

नंतर कधीतरी जेव्हा वेळ आली, तेव्हा सेशल्सचा निरोप घेताना जेरार्डचा निरोप परत एकदा घेतोय असं वाटलं. आणि ब्लू मूड म्हणजे नेमकं काय असतं ते कळलं..

...
...
...

b


.

दिवाळी अंक २०१५प्रवासवर्णन

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 7:48 am | नूतन सावंत

येस,इ नो इट नाऊ,हाऊ टू विझिट सेशल्स.
लेख,माहिती,प्रकाशचित्रे अप्रतिम.

सतिश गावडे's picture

10 Nov 2015 - 8:19 am | सतिश गावडे

अप्रतिम !!!

आतापर्यंत वाचलेल्या सर्व प्रवास वर्णनांतलं उत्तम आणि तेसुद्धा मराठीत!!!!!
पावला पावला मिपा दिवाळी अंक पावला आइ नो इट नाऊ.

सुहास झेले's picture

10 Nov 2015 - 8:28 am | सुहास झेले

अगदी अगदी... मजा आ गया :) :)

चाणक्य's picture

14 Nov 2015 - 9:09 pm | चाणक्य

असेच म्हणतो.

सोत्रि's picture

10 Nov 2015 - 1:55 pm | सोत्रि

झक्कास हो गवि!

पुढच्या महिन्यातल्या 'कौला लंपूर - फुकेट' रोड ट्रीपसाठी उर्जा ठरणार हे प्रवासवर्णन!!

- (भटक्या) सोकाजी

मी चुकून "कौलालंपूर फुकट रोड ट्रीप" असं वाचलं.
म्हटलं सोकाजीनानांची मजाय.

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 2:44 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच ...

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 7:38 pm | बोका-ए-आझम

कोणत्याही पर्यटकांना व्हिसा लागत नाही? नाचो!

..फक्त दोनतीन इबोलापीडित आफ्रिकन देशांतून येणार असल्यास व्हिसा लागतो.

मनिमौ's picture

10 Nov 2015 - 7:50 pm | मनिमौ

तुम्ही लिहिलेले वर्णन वाचून सेशल्स बेटे पहायची ऊत्सुकता वाढली आहे.

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 8:35 pm | स्वाती दिनेश

सेशेल्स बेटांवर जावेसे वाटू लागले आहे.
वर्णन सुरेखच!
स्वाती

आतिवास's picture

11 Nov 2015 - 9:55 am | आतिवास

सुरेख वर्णन.
बसल्याजागी 'सेशल्सला जाऊन आल्यासारखं' वाटतंय आत्ता.

एस's picture

11 Nov 2015 - 10:33 am | एस

माझ्या कॅमेर्‍याने हट्ट धरला आहे सेशेल्सला जायचं म्हणून!

बादवे, सेशेल्स हनिमूनसाठी कसंय? म्हणजे सेकंड-थर्ड-फोर्थ-फिफ्थ वगैरे. हनिमून हो. ;-)

हनिमूनला बाहेर फिरणार असल्यास सेशल्स उत्तम.अन्यथा इनडोअरच बेत असल्यास म.बळेश्वरनेही काम पुरेपूर भागावे. ;-)

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2015 - 3:36 pm | टवाळ कार्टा

बेत औट्डोर असेल तर?? ;)

चाणक्य's picture

14 Nov 2015 - 9:39 pm | चाणक्य

टेंट नेलेला उत्तम.

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2015 - 10:18 pm | टवाळ कार्टा

नै ओ...शीतल चांदणे....मौमौ वाळू....समुद्राची गाज...रिकामा समुद्र किनारा....आणि ;)
भन्नाट

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

बशिवलास तंबूत??? =)) =))

मर्द सिनेमातलं एक गाणं उगीच आठवून दिलंत तुम्ही लोकांनी. ष्षी..!!

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 3:51 pm | बॅटमॅन

कुठलं ओ कुठलं ते गाणं?

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 5:55 pm | टवाळ कार्टा

कोण्त कोण्त?

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 5:55 pm | टवाळ कार्टा

"तंबूत बसणे" कि "तंबू बसवणे" ... नक्की क्काय अपेक्षित आहे ;)

नंदन's picture

17 Nov 2015 - 6:20 am | नंदन

विषयच 'टेन्टे'टिव्ह असल्याने या प्रश्नाचे उत्तरही संदिग्ध असणे स्वाभाविक आहे ;)

गवि's picture

17 Nov 2015 - 7:52 am | गवि

कडक कोटी आहे हो नंदनशेट..

देश's picture

11 Nov 2015 - 10:34 am | देश

गावि,

आधिच तुमचे लेख म्हणजे मेजवानी आणि हे प्रवासवर्णन तर कळसोध्यायच! एकदम खास गावि स्टाईल!

त्या फळाचा फोटो बघुन फुटलो..अशक्य प्रकार आहे !!

देश

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 10:40 am | प्रीत-मोहर

येस आय नो इट नाउ!!!

नंदन's picture

11 Nov 2015 - 11:23 am | नंदन

खास गवि-शैलीतलं प्रवासवर्णन आवडलं.

मितान's picture

11 Nov 2015 - 11:40 am | मितान

सह्ही !!!
सेशल्स भेटींच्या यादीत टाकले !

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2015 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते

गवि... भाऊ, एक काम करा... लोनली प्लॅनेट सारखं काही तरी सुरू करा. च्यायला, कैच्याकै भन्नाट लिहिलंय. वा!

(सेशेलॉइस : Seychellois या शब्दाचा उच्चार सेशेल्वा असा असावा. फ्रेंचमध्ये शेवटी lois असेल तर त्याचा उच्चार ल्वा असा होतो. खरं खोटं जंतु किंवा नंदनच जाणे.)

अनुप ढेरे's picture

11 Nov 2015 - 10:10 pm | अनुप ढेरे

सेशेल्वा

हे फ्रेंच कमी आणि बिहारी जास्तं वाटतय.

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

नंदन's picture

12 Nov 2015 - 1:04 pm | नंदन

>>> फ्रेंचमध्ये शेवटी lois असेल तर त्याचा उच्चार ल्वा असा होतो.
+१

(मात्र एखाद्या सेशेलकरणीचा उल्लेख करायचा असेल तर Seychelloise शेवटचा उच्चार 'ज'रूरी आहे :))

मात्र एखाद्या सेशेलकरणीचा उल्लेख करायचा असेल तर

काश...!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2015 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट सफर झालीया... फोटो आहेत साक्षीला :)

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 6:49 pm | टवाळ कार्टा

भन्नाट आहे....इथे जाणारच्च :)
हा लेख गाईडसारखा वापरता येईल इतका डिट्टेल आहे

पैसा's picture

11 Nov 2015 - 9:59 pm | पैसा

छान लिहिलंय आणि फोटोही छान!

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 11:32 pm | अभ्या..

मस्तच ओ गवि. नाऊ वी नो एवरीथिंग.
ती छोटी गाडी अन आर्टिस्टचे पेंटिंग भारीय.

कविता१९७८'s picture

12 Nov 2015 - 11:13 am | कविता१९७८

छान लिहिलंय आणि फोटोही छान!

गविस्टाईल तूफ़ान सुंदर वर्णन.

मदनबाण's picture

12 Nov 2015 - 8:48 pm | मदनबाण

ज ब रा ट ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2015 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गविसेठ, भन्नाट प्रवासवर्णन. टकामका रम आणि त्याचं नाव आवडलं. छायाचित्र जी डोळ्यांना आनंद देणारी आहेत आणि जळजळ करायला लावणारी आहेत. वर्णन तर झकासच. लेखनासाठी मग ते काहीही असो, बस सीर्फ गवि नाम काफी है. :)

-दिलीप बिरुटे

इशा१२३'s picture

13 Nov 2015 - 12:44 am | इशा१२३

सुरेख फोटो , सुरेख वर्णन !
सेशल्स आवडल.

कवितानागेश's picture

14 Nov 2015 - 11:08 am | कवितानागेश

मस्त वर्णन . तिथे फिरून आल्यासारखे वाटले.

पद्मावति's picture

14 Nov 2015 - 4:55 pm | पद्मावति

अप्रतिम वर्णन आणि फोटो. मजा आली वाचायला.
तिथे फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा आहे? का कार रेंट करणे जरूरी आहे? रस्ते आणि ड्राइविंग जरा तिथलं खतरनाक वाटतंय.

चाणक्य's picture

14 Nov 2015 - 9:41 pm | चाणक्य

लईच भारीये राव गवि.

जव्हेरगंज's picture

15 Nov 2015 - 11:04 am | जव्हेरगंज

wow!

नाखु's picture

16 Nov 2015 - 12:04 pm | नाखु

सोत्ता गाडी चालवित नसेल तर निव्वळ टॅक्श्या/(गेला बाजार गोव्या सारख्या दुचाक्या तरी) मिळतात का घुमवायला !!

प्रचिंनी डोळे निवळले आणि वर्णनाने आत्मा !!!!

सर्वांना पुन्हा थँक्स.

पद्मावती, नाखुशेट, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांविषयी आधीच लेखात सांगितलं आहे बघा. ट्रान्सपोर्टचे मार्ग, पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस, टॅक्सीचे साधारण दर, महागाई, बोटी, विमान सर्व आहे बघा. बाईक्स भाड्याने देणं बेकायदेशीर वगैरेही लिहीलंय.

..लेख लांबलचक झालाय हे मान्य.. ;-)

चांदणे संदीप's picture

16 Nov 2015 - 3:37 pm | चांदणे संदीप

मी वाचला आहे बरका! यू नो इट नाऊ...
;-))