Skip to main content

आंबा कलाकंद

लेखक तळ्यात मळ्यात यांनी सोमवार, 20/07/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

आंबा कलाकंद

आंबा कलाकंद आंब्याचा सिझन संपून गेलाय खरा, पण हल्ली मँगो पल्प तर वर्षभर मिळतो आणि मिपावरची माझी पहिली रेसिपी गोड असावी म्हणून आजचा मान आंब्याला! हे हलवाई कशा बाई एवढ्या सुंदर बर्फी तयार करतात असं लहानपणी वाटायचं. पण स्वैपाकघरात वावर रोजचा सुरु झाला आणि रेसिपी कमी पडू लागल्या. नेहेमीचीच पक्वान्नं करण्यापेक्षा असे वेगळे प्रयोग सुरु झाले. हे अशक्य वाटणारे पदार्थ यशस्वी झाल्याचा केवढा आनंद असतो नाही का! तर आता ह्या सोप्प्या रेसिपीकडे वळते. साहित्यः
  • १ १/२ वाटी पनीर
  • १/२ - ३/४ वाटी साखर
  • १ वाटी आंब्याचा पल्प
  • १/४ वाटी साय
  • केशर
  • बदाम पिस्त्याचे काप
  • तूप
कृती: पनीर शक्यतो घरीच करा. छान मऊ आणि ताजं पनीर असलं की बर्फीही मऊसुत होते. १ लीटर दुधाला २ चमचे लिंबू रस असं प्रमाण मी पनीर करण्यासाठी घेते. छानपैकी बांधून, पाणी काढलेलं पनीर हलकं मळून, मोकळं करुन घ्या. कढईमध्ये २ चमचे तूप तापवून पनीर आणि आंब्याचा रस परतायला घ्या. साखर आणि साय घाला आणि जरा घट्टपणा येईपर्यंत कमी आचेवर परता. कलाकंद जरा मऊच असतो त्यामुळे खूप वेळ परतू नका नाहीतर पनीर होईल चिवट आणि बर्फीच्या टेक्स्चरची बोंब! आता चौकोनी ट्रेमध्ये गरम मिश्रण थापून घ्या. थोडं गार झालं की वड्या पाडा. बदाम पिस्त्याचे काप आणि केशर लाऊन सजवा. अलगद डब्यात भरा आणि रेफ्रिजरेट करा. आंबा कलाकंद मलई कलाकंद असाच करू शकता. फक्त आंब्याचा रस वगळा आणि साखर १ ते १ १/४ वाटी घ्या रेसिपी गोड करुन घ्या आणि चूकभूल माफ करा हो मंडळी! :)

वाचने 20268
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

आंबा घातलेलं सर्वच आवडत असल्याने ही पाकृ अधिकच आवडली. कृती वाचायला एकदम सुटसुटीत वाटली :-) . फोटो आणि सादरीकरण आवडले. मिपावर एकदम चवदार सुरुवात झाली आहे लेखनाची. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

फोटो मस्त आहे, रेसिपी पण करण्याजोगी. माझ्याकडे थोडा आंब्याचा पल्प उरलाय फ्रीझ केलेला. करुन पाहीन.

सोपी पाकृ. नक्किच करून बघणार. सहज म्हणून विचारतोय आंब्याऐवजी रोज, चॉकोलेट, वॅनिला इसेंस वापरूनसुद्धा ही बर्फी करता येइल काय?

In reply to by अमृत

नेहमीच्या मलई कलाकंदमध्ये रोझ इसेन्स वापरतात बऱ्याच वेळा. वॅनिलाही चांगला वाटेल. चॉकलेट बद्दल साशंक आहे. तुम्हीच प्रयोग करुन का नाही सांगत ;)

असे फटू बघून कायम वाटतं - टेक्नोलॉजी अजून थोडी पुढे जाऊन, जसा काही सेकंदात पैसे ऑनलाईन ट्रांसफर करण्याचा ऑप्शन आहे, तसा जे आता फोटोत दिसतंय ते ट्रांसफर करण्याचा ऑप्शन आला पाहिजे. दिसलं कि १ सेकंदात खायला मिळालं पाहिजे :)

In reply to by नाव आडनाव

अगदी अगदी. मलाही लोकांनी टाकलेले फोटो बघून असं वाटतं!

मिपा पाककृती विभागात स्वागत. नाव आडनाव यांच्याशी सहमत. अतिशय सुरेख दिसतेय बर्फी.सांगण्याची पद्धतही आवडली.

फोटोमधूनच बर्फी उचलून खाविशी वाटत आहे! पहिलेच लेखन इतके छान आणि शुद्ध लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद!

मीच माझी पाठ थोपटून घेतली बरं! सगळ्यांचे एकत्रित आभार मानते :‍‌D

खूप छान! नक्की करून पाहीन. म्हणजे आता मस्त मस्त पाककृतींचा अजून एक खजिना खुला होतोय तर... शुभेच्छा!

मिपावर जोरदार एन्ट्री केलीत की . पहिल्याच चेंडूवर सिक्सर . हार्दिक स्वागत … छान दिसतेय कलाकंद …! मस्तच एकदम .

तोंडाला पाणी सुटले. आंबा आणि पनीर दोन्ही प्रचंड आवडतं. नक्की करून बघेन.