आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
17 Apr 2015 - 4:38 pm

आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २

http://www.misalpav.com/node/31021 - भाग-१
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम

अखेर ३० नोव्हेंबर, १९९१ च्या मध्यरात्री किरण अडफडकर, सुभाष पांडीयन, पुंडलिक तळेकर, दत्ता शिंदे, अनिल दगडे, नंदू भोसले, नरेंद्र माळी, महेंद्र साटम, आनंद नाकती, मिलिंद आपटे आणि कुट्टी असे १२/१३ जण डोंबिवलीहून निघालो. कल्याण-आसनगाव-शहापूर-डोळखांब-साकुर्ली-डेहणे असा प्रवास करत पहाटे ५.०० वाजता आजोबाच्या पायथ्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचलो. पुढे टेम्पो जाणे शक्य नव्हते. तेथेच टेम्पो रिकामा केला व नंतर उतरवलेले सर्व सामान प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार घेऊन आश्रमाच्या दिशेने निघालो. दोन फेऱ्यांमध्ये सर्व सामान वाल्मिकी आश्रमात पोहोचवायला दुपारचे २.०० वाजले. गोण्याच त्या, त्यांना धरायला ना शेंडा ना बुडखा. एकतर डोक्यावर घ्या नाहीतर एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर फिरवत कसरत करा.

प्रत्येकजण सामान वाहून दमला होता. आश्रमात पोहोचताच प्रथम चहाचे सामान काढून किटलीत चहा टाकला व अनिल इमारतेने मिळवून दिलेली ब्रोकन बिस्कीट व चहा प्रत्येकाने यथेच्छ पोटात ढकलला. वाल्मिकी आश्रमातच गेलो ४० वर्षे वास्तव्य असलेले वृद्ध रामेश्वरबाबा व त्यांच्या सहकाऱ्यानांही चहापाणी दिले. अशाप्रकारे ताजेतवाने झाल्यानंतर आम्ही तंबू लावण्यासाठी जागेच्या शोधत निघालो. आश्रमाच्या शेजारी इतक घनदाट अरण्य आहे की दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. आश्रमाच्या जवळच सपाट जागी प्रथम सगळ्यात मोठा तंबू उभारला. सर्व सामान त्यात क्रमवार वर्गीकरण करून लावले व नंतर किरणने स्वतःच शिवलेला दुसरा तंबू उभारायला घेतला. या तंबूच्या तळाला ब्रासचे आईलेट ठोकायचे राहिले होते. हा नवीन त्रिकोणी आकाराचा तंबू छानच दिसत होता. याच्या दाराला दोन्ही बाजूनी चेन लावल्यामुळे साध्या मुंगीला सुद्धा शिरण्यास वाव नव्हता. तंबू लावेस्तोवर संध्याकाळी ७.०० वाजले.

From Aajoba 1991

तेव्हढ्यात आश्रामाशेजारील असलेल्या एका मोठ्या घराच्या (धर्मशाळा) कोपऱ्यात नंदू व अनिलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मातीने लिंपून दोन चुली बनवल्या व तेथेच भांडीकुंडी व्यवस्थित रचून आमची किचन रूम बनवली.

From Aajoba 1991

आता ते रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. काहीजण कुऱ्हाड / कोयता घेऊन लाकडे आणण्यास गेले. आजोबाच्या डोंगररांगांमध्ये शाई नदीचे उगमस्थान आहे. त्यामुळे इथे पायथ्याशी वर्षभर झऱ्याचे मुबलक पाणी असते. हेच पाणी एका मोठ्या हौदामध्ये जमवून आंघोळीची सोय होते. मोहिमेविषयीच्या माहितीबद्दल बनवलेले बॅनर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आणि एक तंबूजवळ लावला. सर्व कामे करता करता रात्रीचे ९.३० वाजले होते, त्यामुळे रामेश्वरबाबांनासुद्धा बरोबर घेऊन जेवण उरकून घेतलं. त्याना आम्ही सांगूनच ठेवलं होत, जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत तुम्ही जेवण बनवायचं नाही.

जेवण झाल्याबरोबर उद्याच्या तयारीसाठी परत कॅमेरा चेक करून ठेवले. एक होता मिनोलटा नॉर्मल वाइड अंगल झूमलेन्स आणि दुसरा झेनीत ७०-२०० मिमी झूमलेन्स सहित.

From Aajoba 1991

सोमवारी सकाळी लवकर जाग आली. प्रत्येकजण आपले प्रातर्विधी आटोपून तयार झाला. आता सर्व प्रथम आम्ही ठरवलेल्या चढाई मार्गाच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. आम्ही आमचा चढाईमार्ग पायथ्यापासून ठरवला होता, प्रत्यक्षात तिथे गेलो नव्हतो आणि आमचा बेसकॅंप पायथ्यापासून हजारभर फुट उंचावर वाल्मिकी आश्रमाजवळ होता. आजोबाच्या पायथ्याशी एक टेकडी आहे, त्या टेकडीवरच आश्रम आहे आणि टेकडीच्या मागील बाजूस चिंचपाडा-डेह्णे गाव. त्यामुळे नियोजित मार्गाने चढाई सुरु करण्यासाठी परत पायथ्याला डेहणे-चिंचपाडा गावांच्या दिशेने खाली उतरणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर किरण, सुभाष, पुंडलिक, दत्ता, मिलिंद, महेंद्र व नरेंद्र ठीक ११ वाजता निघालो. पाण्याच्या हौदाला वळसा घालून पायवाटेने आम्ही सर्वजण पुढे सरकत होतो. वाटेत एक धबधबा लागला, पण तो कड्याच्या म्हणजेच आमच्या चढाईच्या नियोजित मार्गाच्या सरळ रेषेत नव्हता म्हणून पुढे सरकलो. पुन्हा थोड्यावेळाने दुसरा धबधबा लागला, हा धबधबा योग्य होता. प्रथम धबधब्यातून डेहणे-चिंचपाडा गावाच्या दिशेने खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत गावातली गुरे चरताना दिसली. आता यापुढे खाली उतरण्यात अर्थ नव्हता, म्हणून तेथूनच आम्ही आजोबा कड्याच्या दिशेत वरवर चढण्यास (म्हणजे आमच्या मोहिमेस) सुरुवात केली.

आम्ही सर्वजण भराभर धबधब्यातून वर सरकू लागलो, त्याच वेळी क्लाइम्बिंग व फोटोग्राफी अशी दुहेरी भूमिका किरण पार पाडत होता. या मोहिमेस यावेळी मार्गदर्शन, फोटोग्राफी व क्लाइम्बिंग अशी तिहेरी भूमिका किरणला सोपवण्यात आली होती तर सुभाष आणि दत्ताला संयुक्तपणे मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. आम्ही सर्वजण धबधब्यातून वाट काढत एका ५०-६० फुटी कड्याच्या पायथ्याशी पोहोचलो, इथून पुढे आता प्रस्तरारोहण करावे लागणार होते. पुंडलिकने कंबरेला हार्नेस बांधला, दत्ता व सुभाष बिले देत होते.

हळूहळू पुंडलिक फ्री-क्लाइम्बिंग तंत्राचा उपयोग करीत वरवर सरकू लागला. साधारण ४० फुट वर गेल्यावर त्याने एका कपारीमध्ये पिटॉन (Piton) ठोकला व मदतीसाठी सुभाषला वर घेतले. सुभाष त्याच्यापाशी पोहोचल्यावर पुंडलिक पुन्हा वर सरकू लागला. किरण त्याच्या कुवतीनुसार मिळेल त्या कोनातून फोटो काढत होता. ५०-६० फुट फ्री-मूव्ह करत पुंडलिक आता एका बऱ्यापैकी लेजवर पोहोचला. लागलीच त्याने तिथेच एका कपारीतून उगवलेल्या झाडाला व खडकाला संयुक्तपणे दोर बांधला. आता उरलेली टीम भरभर प्रथम सुभाषपर्यंत व तेथून पुढे पुंडलिकपर्यंत पोहोचली. इथे बसण्यास ऎसपैस जागा होती. इथे बसून सर्वांनी पाणी पिऊन बाटलीचे वजन कमी केले. पुढील ४०-५० फुट चढाई करण्यासाठी मिलिंद सरसावला. सुमारे २० फुट गेल्यावर त्याने महेंद्रला मदतीला बोलावून घेतले व त्यानंतर भरभर वर सरकत मिलिंद दिसेनासा झाला. एक मोठ्या कपारीमधून मिलिंदने हि मूव्ह पूर्ण केली. इथून वर सरकायला पुन्हा मागचाच धबधबा वाटेत आडवा आला. भरपूर वर सरकत सुभाष, दत्ता पाठोपाठ आम्ही सर्वजण बरोबर ४ वाजता वर पोहोचलो. इथून वर पुढे खरी चढाई सुरु होणार होती. आम्ही ज्या लेजवर आता पोहोचलो होतो, तीच लेज उजव्या हाताने बऱ्याच दूर सरकत गेली होती व टोकाला सीतेच्या पाळण्यापाशी संपून एका धबधब्याच्या रूपाने खाली उतरत वाल्मिकी आश्रमापर्यंत गेली होती. म्हणजे तो धबधबा स्लीपर हायकर्स / ईगल मौण्टेनिअर्स यांनी घेतलेल्या क्लाइंबिंग रूटच्या अगदी सरळ रेषेत होता.

(लेज - डोंगरकड्यातून फळीसारखा बाहेर आलेला कमी-जास्त रुंदी असलेला भाग)

From Aajoba 1991

From Aajoba 1991

आज पहिल्याच दिवशी चढाई साधारण असल्याने आम्ही डेहणे गावापासून सुमारे १८०० फुट तर वाल्मिकी आश्रमापासून सुमारे ८०० फुट उंचीवर पोहोचलो होतो. संध्याकाळ होत आल्यामुळे बेसकॅंपवर परत जाण्यासाठी आम्ही सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो, सकाळीच आमच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे (आम्ही सर्वांनी असे ठरवले होते कि प्रथम आमच्या चढाईच्या नियोजित मार्गानेच चढाई करीत लेजपर्यंत जायचे व नंतर सीतेच्या पाळण्याच्या वाटेने खाली वाल्मिकी आश्रमात म्हणजेच आमच्या बेसकॅंपवर जायचे व त्यानंतरच पुढील दिवसात सीतेच्या पाळण्याच्या वाटेचा उपयोग करायचा) ठीक ५.३० वाजता आम्ही लेज वरून उजवीकडे निघालो. वरच्या बाजूला सुमारे २२०० फुट उंचीचा कडा तर खाली सुमारे ८०० फुट खोल दरी. डोळ्यात तेल घालून सर्वजण लगबगीने पुढे सरकत होतो. ६ वाजले तरी सीतेचा पाळणा येण्याचे लक्षण दिसेना. आता अंधार पडू लागला होता. शेवटी आम्ही निर्णय घेतला कि आहोत तेथूनच ८०० फुट खोलीची दरी उतरायला सुरुवात करायची.

हीच ती लेज- कोपऱ्यात सीतेचा पाळणा सुळका आणि आश्रमाच्या दिशेने खाली उतरणारा धबधबा
From Aajoba 1991

आम्ही लेजवरून निघाल्यापासून दगडावर मिळेल तिथे खुणा करीतच पुढे सरकत होतो. सर्व प्रथम पुंडलिक, सुभाष, दत्ता, महेंद्र, मिलिंद व शेवटी किरण असा क्रम होता. अतिशय भयानक अवघड वाटेने आम्ही खाली उतरत होतो. कारण पायाखाली कधी दगड गोटे तर कधी माती व त्यातच भरभर पसरत जाणाऱ्या अंधारच भय. करता करता शेवटी एका कड्याच्या टोकाला पोहोचलो. पुंडलिकने डावी-उजवीकडे सरकून दुसरी वाट दिसते का ते पाहिले पण छे, त्या कड्यावरून सरळ रेषेत खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रस्तरारोहणातील (Rock Climbing) मधील सर्व कौशल्य पणाला लावून पुंडलिक खाली सरकू लागला.

From Aajoba 1991

वर चढण्यापेक्षा खाली उतरणं कठीण. कारण खाली काय असेल याची पुसटशी कल्पनाही नसते व तशात अंधार! पण अंधार एका अर्थी फायद्याचा झाला कारण दरीची खोली किंवा अवघडपणा समजत नव्हता. शेवटी एकदाचे तो सुमारे ५०-६० फुट रॉकपॅच उतरून खाली प्रचंड उतारावर पोहोचलो. आता तर आम्हाला जेमतेम दिसत होत, तशातच पुंडलिक हिंमतीने वाट काढीत त्या उतारावरून सरकत होता. एव्हढा प्रचंड उतार होता कि धड बसूनही पुढे सरकता येत नव्हत. तो उतार संपला व आम्हाला एक धबधबा लागला आणि सर्वानीच सुटकेचा निःश्वास टाकला. आता आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी पद्धतीने खाली उतरू लागलो कारण पूर्ण अंधार पसरला होता. कित्येकदा पडणं –धडपडणं चालू होत. जवळ जवळ प्रत्येकाने एक-दोन वेळा साष्टांग नमस्कार घालून झाले होते. आता आम्ही बेसकॅंपवरील सहकाऱ्यांच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली व तिकडून प्रत्युत्तरही आले. पण आम्हाला दोघानाही एकमेकांची जागा मिळेना. कारण आवाजावरून त्या घनदाट जंगलात कोण कुठे आहे हे समजण कठीणच होत. फक्त आपण पोचलोय हीच समाधानाची बाब. शेवटी एकदाचे ठेचकाळत कसेबसे रात्री ७.३० वाजता तब्बल अडीच तासांनी आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो.

बेसकॅंपवर पोहोचताच, हौदाच्या पाण्यात दिवसभराचा शिणवटा घालवून मने परत प्रफुल्लीत झाली. काल तंबू उभारताना एक साप फिरता फिरता तिथे आला होता म्हणून आज सकाळी रामेश्वरबाबांनी तंबूच्या आसपासचे गवत संपूर्णपणे कापून-जाळून टाकले होते व भोवतालचा परिसर अतिशय स्वच्छ दिसत होता.

रात्री जेवण झाल्यावर रामेश्वरबाबांच्या झोपडीत गप्पाटप्पाना उत आला होता. किरण आणि सहकारी तंबूमध्ये काहीतरी काम करत होते, किचन ते तंबू यामधील भागात संपूर्ण अंधार होता. काही सहकारी किचनमध्ये होते, त्यांनी चहा करण्यासाठी टॉर्च पेटवली आणि मिलिंद एकदम 'साप-साप' म्हणून ओरडला. हाक ऐकताच चटकन किरण, सुभाष व कुट्टी तंबूच्याबाहेर मिलिंदकडे पळाले. नरेंद्रने टॉर्चच्या प्रकाशाचा झोत सापावरच मारून ठेवला होता. एक काळ्या रंगाचा साधारण दीड फुट लांबीचा साप होता. त्याच स्थानिक नाव खरड्या नाग! हे नाव रामेश्वर बाबांकडून कळल. चटकन किरण व सुभाष पुढे सरसावले. हळुवार हाताने सावधपणे किरणने त्याची मान पकडली. गॅसबत्तीच्या उजेडात त्याच निरीक्षणं केल, काळ्या शरीरावर पिवळे ठिपके होते. नंतर त्याला एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवला, जेणेकरून त्याला सकाळी तंबूपासून दूर सोडता येईल.

रात्रीचे अकरा वाजले होते, साप तंबूच्या जवळच सापडल्याने परत एखादा साप तंबूमध्ये घुसण्याची शक्यता होती. परत एकदा सामान हलवून छानणी केली. नंतर तंबूच्या परिघाभोवती वर्तुळाकार चर खणला व त्यात कीटकनाशक फवारले. हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत रात्रीचे साडेतीन वाजले.

रात्रीच्या जागरणाने सकाळी खूप उशिरा जाग आली. आमची धावपळ चालू असताना शहापूरवरून काही मंडळी, डेहणे गावचे सरपंच व मुंबई सकाळचे उपसंपादक श्री. नार्वेकर इत्यादी वाल्मिकी आश्रमात येऊन थडकले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता व इतर माहिती देताना ११ वाजले. १२ वाजता आश्रमातून किरण, दत्ता, नंदू व पुंडलिक, आजोबाचा कडा व सीतेचा पाळणा यांच्यामधल्या घळीतून धबधब्याच्या वाटेने सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो (काल आम्ही याच वाटेने खाली येणार होतो, पण अंधार पसरल्यामुळे आम्हाला मधूनच भलत्याच मार्गाने यावे लागले होते). तासभर वर चढल्यानंतर सीतेचा पाळणा नावाचा जो सुळका आहे त्याच्या पायथ्याला पोहोचलो, तेथून डाव्या हाताला वाट वळली होती, ती कड्याच्या पायथ्याने पुढे सरकत आमच्या चढाईच्या मार्गापर्यंत पोहोचत होती व तेथून अजूनही बरीच पुढे जात खिंडीला जाऊन मिळत होती. हि काही रहदारीची पायवाट नव्हती. एकूण अंतर किती असेल कोण जाणे पण दिसायला खूपच दूर म्हणजे जवळजवळ एक दिवस तरी गेला असता. कड्याच्या पायथ्याच्या अतिशय अरुंद वाटेने आम्ही हळूहळू पुढे सरकायला सुरुवात केली. तस पाहिलं तर ती वाट नव्हतीच, अतिशय अरुंद आणि अवघड मार्ग होता.

कारण उजवीकडे उभा कडा तर डावीकडे सरळ रेषेत खोल दरी. पुन्हा भरीस भर पायाखालून दोन सापही वळवळत गेले. इथे आजोबाला साप-विंचवांचा फारच सुळसुळाट आहे. दुपारी १२ वाजता निघालेलो, आम्ही ३.३० वाजता आमच्या नियोजित मार्गापाशी पोहोचलो, यावरूनच सदर मार्ग किती अवघड असेल याची सहज कल्पना येईल. रोज ये-जा करून हि वेळ अर्थात कमी होणार होती. काल इथेच आम्ही चढाई करत पोहोचलो होतो. वर सुमारे २००० फुटी कडा आम्हाला आव्हान देत उभा होता. सुरुवातीसच फ्री-मूव्ह करण्यास वाव असल्याने सुरुवात पुंडलिकने केली. हळूहळू त्याने वरवर सरकायला सुरुवात केली व किरण ते क्षण कॅमेऱ्यात टिपायला लागला. सुमारे १७५ फुट फ्री-मूव्ह करून पुंडलिक थांबला, तो एका ३५० फुटी ओव्हरहॅन्गच्या पायथ्याशी एका लेज वर पोहोचला होता. खालून किरण, दत्ता व नंदू दोराच्या साहाय्याने पुंडलिकपर्यंत पोहोचले. इथे वावरण्यासाठी चांगली जागा होती म्हणून इथेच आम्ही कॅंप क्र. १ ची स्थापना केली.

(लेज- डोंगरकड्यातून बाहेर आलेला कमीजास्त रुंदी असलेला फळीसारखा भाग. अशा लेजचा उपयोग म्हणजे अस्थायी कॅंप उभारण्यासाठी होतो, जेणेकरून मुख्य बेसकॅंपपर्यंत जाण्या-येण्याचे श्रम वाचतात. थकलेला लीड क्लाईम्बर पुढची चढाई सेकंडमॅनकडे सोपवताना होणाऱ्या अद्लाबदलीसही अशी लेज उपयोगी पडते. काही लेजेसवर फक्त उभे राहण्यास जागा असते, काही ठिकाणी आरामात झोपण्यासही जागा मिळते.)

From Aajoba 1991

आता वरील भागात चेन बोल्टिंग करावे लागणार होते, कारण कडाच तसा ताशीव होता. बोल्टिंगचा शुभारंभ नंदूने केला. त्याने अर्धवट मारलेले छिद्र पुंडलिकने पूर्ण केले व पहिला एक्सपान्शन बोल्ट (Expansion Bolt) आजोबाच्या कड्यावर ठोकला गेला. त्यानंतर दत्ताने आणखी एक बोल्ट ठोकला. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. दुपारचा वर येतानाचा अनुभव लक्षात असल्यामुळे निदान ७ वाजेपर्यंत म्हणजे अंधार पडायच्या आत बेसकॅंपवर पोहोचता आले पाहिजे या हिशोबाने आम्ही आजच्या दिवसाची चढाई थांबवून परतीच्या वाटेस लागलो. कारण एकतर वाट नवीनच होती, शिवाय वाटेत सापांचा सूळसुळाटही होता.

नेमक परत उतरताना नंदूच्या पायाखालील दगडातून एक साप अचानक बाहेर पडून खालील उतारावर सरपटत दिसेनासा झाला. नशिबानेच नंदू बचावला. सावधपणे भरभर पुढे सरकत आम्ही ७ वाजेपर्यंत बेसकॅंपवर आश्रमात पोचलो. आजोबाला सापांचा सूळसुळाट इतका आहे कि १०/१२ दगड उलट सुलट करा एक तरी साप दर्शन देऊन जाईल.

इकडे बेसकॅंपवर आज सुभाष-नरेंद्रचा सुट्टीचा दिवस होता. टेन्टवरील कामे करता-करताच सहकारी दुपारी कड्यावर चाललेल्या चढाईचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करीत होते. पाच वाजता आम्ही चढाई थांबवली व परतायला आम्हाला उशीर होणार हे गृहीत धरूनच कुट्टी, सुभाष, नरेंद्र व महेंद्र गॅसबत्ती पेटवून आम्हाला घ्यायला निघाले. वाटेत आमची भेट झाली. टेन्टवर पोहोचताच चहा वगैरे घेऊन आम्ही चौघे अंघोळीस निघालो तर उरलेली मंडळी जेवणाच्या तयारीस लागली. आज बेसकॅम्प टीमने मोठे ओंडके फोडून भरपूर सरपण तयार करून ठेवले होते. जेवणानंतर रात्री एक मिटिंग घेण्यात आली. कारण रोज सकाळी व संध्याकाळी मिळून चार तास तरी जाण्या-येण्यात खर्च होत होते. त्यामुळे नरेंद्र व सुभाष यांनी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी निघून चढाईला सुरुवात करायची तर कुट्टी व किरणने सीतेच्या पाळण्यापाशी पाण्याची सोय आहे का, ते पाहायचे असे ठरले.

पहिल्या दिवशी चढाईच्या ठिकाणावरून उतरताना आम्ही तयार केलेला शॉर्ट्कट मार्ग खूपच अवघड व धोकादायक असूनही वेळ वाचवण्याकरीता त्याच मार्गाचा अवलंब करायचे आम्ही ठरवले, कारण त्यामुळे आमचे दिवसातले दोन ते अडीच तास वाचणार होते.

पहाटे नरेंद्र व सुभाष ठरल्याप्रमाणे लवकर उठले, सोबत पुंडलिकही होता. चहा, नाश्ता करण्यात बेसकॅंपवरून निघायला सकाळचे नऊ वाजलेच. शॉर्ट्कटच्या वाटेने साधारण तासाभरात ते सगळे चढाईच्या ठिकाणावर पोहोचले. अकरा वाजता नरेंद्रने बोल्टिंगला सुरुवात केली आणि सुभाष व पुंडलिक त्याचे मदतनीस झाले.

दुपारी १ वाजता बेसकॅंपवरून किरण, अनिल, दत्ता, महेंद्र व कुट्टी सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघाले. तेथे एक सुळका आहे, तेथे पाणी भरून घेतले व तेथून डाव्या हाताने लेजवरून सर्वजण कॅंप-१ च्या दिशेने निघाले. सीतेच्या पाळण्याची वाट खूप लांबची असल्याने आम्ही कॅंप-१ वरून परत बेसकॅंपवर येण्यासाठी शॉर्ट्कट मार्ग शोधला होता, पण तो मार्ग खुपच धोकादायक व अवघड होता. तेंव्हा दोर बांधून सुरक्षित करण्याचं काम या चौकडीकडे होते.

वाटेत परत एकदा एक साप अनिलच्या पायाखालून वळवळत गेला. मजल दरमजल करत ३ वाजता आम्ही कॅंप-१ वर पोचलो. कॅंप-१ च्या खालील रॉकपॅचवर दोर बांधून खाली उतरण्यासाठी अनिलने एक बोल्ट मारला. एव्हाना नरेंद्र वरील बाजूस चार बोल्ट ठोकून वर सरकला होता. आज पूर्ण दिवस तोच चढाई करणार होता. किरण, नरेंद्र, सुभाष, दत्ता, पुंडलिक, शेखर असे सगळेच जण दिवसभर चढाई करण्यात तरबेज होते. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नरेंद्रने १४ बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली. चढाईचे सर्व सामान शेवटच्या बोल्टला अडकवून तो परत पायथ्याला कॅंप-१ वर उतरला.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

पुंडलिकने तयार केलेल्या शॉर्ट्कटच्या वाटेने बेसकॅंपवर जाण्यास निघाले. सापांनी तर आमची अडवणूकच केली होती. खाली उतरताना परत अनिलला संध्याकाळच्या संधीप्रकाशात एका दगडावर काहीतरी वळवळत असलेलं जाणवलं म्हणून त्याने सुभाषला जवळ बोलावले, सुभाषने तो मण्यार जातीचा साप असल्याच बरोबर ओळखलं. अनिल सापांना खूपच घाबरत असल्याने सुभाषने त्याला तिथे काहीच नाही म्हणून खोटेच सांगितले. एकतर सर्वजण एका कड्यावर उभे होते, खाली सरळ खोल दरी होती व उताराची वाट अवघड होती. त्यामुळे आम्ही सापाला पकडायचं नाही अस ठरवलं. पण अनिलला पक्की खात्री होती कि त्याने सापच पाहिलाय, तेंव्हा त्याने आणखी घाबरू नये म्हणून उलट आम्ही सगळ्यांनी मिळून त्यालाच खोट पाडलं आणि साप नसल्याची बतावणी केली.

एव्हाना अंधारायला सुरुवात झाली होती. सोबत एकच विजेरी (Torch) होती त्यामुळे आठ माणसांना उतरताना खूपच वेळ लागत होता. थोडसं पुढे गेल्यावर एका सपाटीवर महेंद्रचा आवाज आला 'किरण-साप'. किरणने धावत जाऊन विजेरीच्या प्रकाशात न्याहाळून पाहिले तर खरंच हिरव्या रंगाचा घोणस (Pit Viper) तिथे होता. त्याला तिथेच सोडण धोक्याच होत कारण आम्ही आता रोजच या वाटेवरून ये-जा करणार होतो. किरणने त्याला पकडून आपल्या सोबत घेतलं आणि सर्वजण परत पुढच्या वाटेला लागले. अंधाराने आपली तीव्रता आणखीनच वाढवली होती. प्रत्येकाच्या मनात सापाचा धसका होताच कारण हात लावताना किंवा पाय टाकताना प्रथम तोच विचार मनात येई, मध्येच कुठे तरी सळसळ, सरसर ऐकू येई व वातावरणाची भयाणता अधिकच वाढे. मार्ग नीट सापडतच नव्हता, कधी उड्या मारीत, कधी सरपटत, ठेचकाळत एकदाचे बेसकॅंपवर पोचलो. तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला. बेसकॅंपवर पोहोचताच प्रथम त्या धरून आणलेल्या सापाला एका बाटलीत ठेवले, जेणेकरून सकाळी उठल्यावर बेसकॅंपपासून दूर सोडून देता येईल हा विचार मनात होता.

दरम्यान . बेसकॅंपवर दुपारी मुलुंडवरून शैलेश, बालाजी व आनंद आले होते. त्यामुळे . बेसकॅंप टीमला थोडी बळकटी मिळाली होती. संध्याकाळी हौदावर आंघोळ करताना चढाईविषयी गप्पा चालू होत्या. विषय होता, बेसकॅंपपासून चढाईच्या ठिकाणावर (कॅंप-१) जाण्यास लागणाऱ्या वेळेबद्दल. जाण्या-येण्यात ३-४ तास जात होते. तेंव्हा असे ठरविण्यात आले कि, दिवसा चढाई करण्याऱ्या टीमने रात्री तिथेच राहायचे आणि त्यांना जेवण-पाणी पुरविण्याच काम दुसऱ्या दिवशी चढाई करणाऱ्या टीमने संध्याकाळी करायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन टीम सकाळी लवकर चढाई सुरु करेल आणि काल थांबलेली टीम परत बेसकॅंपवर निघून येईल. जेणेकरून चढाई सतत चालू राहील.

जेवण तयार झाले होते. पुंडलिक तर रामेश्वरबाबांसोबत पार गप्पांमध्ये रंगून गेला होता. उद्यापासून सर्व टीम एकत्र भेटणार नसल्याने कॅंपफायर करून रात्री एक वाजेपर्यंत सर्वानीच दंगा केला. अनिलच्या खड्या आवाजातल्या गाण्यांनी आणि सोबत माउथ ऑर्गनच्या सुमधुर संगीताने कॅंपफायरला वेगळीच मजा आणली.

आज मोहिमेचा चवथा दिवस होता. किरण, शैलेश, महेंद्र, आनंद, मिलिंद बेसकॅंपवरून, कॅंप-१ च्या दिशेने निघाले. काल नरेंद्रने चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून पुढे चढाई सुरु करायला आनंदला ११ वाजले. संपूर्ण कडा ताशीव गुळगुळीत असल्याने फ्री मूव्ह करण्यास वाव नव्हता तेंव्हा आजही चेन बोल्टिंगच करावी लागणार होती. एक एक करत त्याने लागोपाठ पाच बोल्ट ठोकले व खाली उतरला, त्याची जागा घेतली महेंद्रने. एक छान फ्री-मूव्ह करीत तो २५ फुट वर पोहोचला व तेथेच एका कपारीत बसून त्याने एक बोल्ट ठोकला व मिलिंदला मदतीला वर बोलावून घेतले, नंतर आणखी दोन बोल्ट ठोकून पुढच्या चढाईची सूत्रे मिलिंदकडे सोपवली. संध्याकाळचे पाच वाजले होते. काल परतीचा अनुभव लक्षात घेऊन किरण व आनंद परत बेसकॅंपवर जाण्यास निघाले. मिलिंदने चढाई सुरूच ठेवली होती. मिलिंद व महेंद्र आज इथेच मुक्काम करणार होते. दरम्यान संध्याकाळी सुभाष आणि मंडळी मुक्कामासाठी जेवण पाण्यासाहित बेसकॅंपवरून कॅंप-१ वर येण्यास निघाले. मध्येच किरण व आनंद परतत असतांना त्यांना वाटेत सुभाष आणि मंडळी भेटली, आवश्यक निरोप, सूचना करून सर्व मंडळी आपपल्या वाटेने निघून गेली. आज किरण आणि आनंद काळोख पडायच्या आतच बेसकॅंपवर पोहोचले. त्याचप्रमाणे सुभाष आणि मंडळी काळोख पडता पडता कॅम्प-१ वर पोहोचली. दरम्यान मिलिंदने चार बोल्ट आणि एका पिटॉनच्या साहाय्याने बऱ्यापैकी उंची गाठून दिवसभराची चढाई थांबवून परत पायथ्याला आला. आज रात्रीचा हा मोहिमेतला पहिलाच उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.

From Aajoba 1991

दरम्यान आनंद व किरण बेसकॅंपवर पोहोचल्यावर, सुभाष व मंडळी पुरेसं अंथरूण, पांघरूण न घेता गेल्याचे कळले आणि जीव कळवळला. कारण गारठलेल्या आसमंतात त्यांना उघड्यावरच अंथरायला दगडांची गादी व पांघरायला फक्त घोंगडी होती. त्यातच बेसकॅंपवर असलेल्या अनिलला ताप भरून आला, त्याचे विव्हळणे आम्हाला ऐकवत नव्हते. कशीतरी रात्र सरली.

येत्या दोन/तीन दिवसात आम्ही कॅंप १ च्या वर सुमारे ४००-५०० फुटांवर पोहोचणार होतो, त्यामुळे आता वर कॅंप-२ ची स्थापना करावी लागणार होती. तसेच चढाईची साधने व इतर आवश्यक सामग्री खालून वर न्यावी लागणार होती. जसजसे वर पोहोचू तसतसे बेसकॅंपवरून प्रत्येक गोष्ट वर पोहोचवणे अवघड होणार होते. आमच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा, सध्या तरी आम्ही बेसकॅंपवरूनच पाणी पुरवीत होतो. वरच्या भागात पाणी जवळपास आढळले, तरच आमचे सर्व प्रश्न सुटणार होते. त्यामुळे आज किरण, नरेंद्र व कुट्टी यांची एक टीम वरच्या भागात पाणी मिळतं का याचा शोध घेणार होते. तसे सीतेच्या पाळण्यापाशी पाणी होते, पण तेथून चढाईच्या ठिकाणापर्यंत पाणी आणण्यास व बेसकॅंपवरून पाणी आणण्यास जवळपास दोन-अडीच तास लागत. त्यामुळे काही उपयोग नव्हता. आम्ही सर्व तयारी करून निघणारच होतो इतक्यात कॅंप-१ वरून मिलिंद व महेंद्र परतले. मग मिलिंदने सांगितल्याप्रमाणे आश्रमातून डावीकडे वरच्या भागात नजर टाकली तर तिथे कड्याच्या उतरत्या बाजूस (सोंडेवर) एक नेढ दिसतं. त्याच्या आसपास भरपूर कडीपत्ता आहे व तो आणावयास गावातली बरीच मंडळी जातात. तो भाग आम्हाला सुरुवातीपासूनच खूप हिरवागार दिसत होता, त्यामुळे मिलिंदच्या खात्रीपूर्वक बोलण्याने आमच्या विचाराला दुजोराच मिळाला. आता आम्ही त्या नेढ्यापाशीच जाऊन पाण्याचा शोध घेण्याचे ठरवले.

हि ती उतरती बाजू चिंचपाडा गावातून
From Aajoba 1991

काल रात्री सुभाष व मंडळीनी चढाईच्या ठिकाणावरच मुक्काम केलेला असल्याने सकाळी लवकरच ९ वाजता चढाई सुरु केली. त्याच दरम्यान किरण व मंडळी सकाळी १० वाजता पाण्याच्या शोधात बेसकॅंपवरून नेढ्याच्या दिशेने निघाले. नेढ्याच्या आसपास अथवा वरच्या भागात पाणी आढळलं तर ते खूपच फायदेशीर होणार होत, कारण तो परिसर आमच्या चढाईच्या ठिकाणापासून वरच्या भागात होता.

त्यामुळे आमचा बराच वेळ वाचला असता. दरम्यान किरण, नरेंद्र व कुट्टी नेढ असलेल्या सोंडेच्या पायथ्याशी (सुमारे १००० फुट खाली) पोहोचले. तेथून एका आडव्या गेलेल्या वाटेचा वापर करत ते पुढे सरकू लागले. मिलिंदने दिलेल्या माहितीनुसार सोंडेच्या पुढे पहिल्याच घळीतून नेढ्याकडे जायला वाट होती. त्यामुळे ते सुद्धा पहिल्याच घळीतून वर सरकू लागले. वाट काढीत ते झपाट्याने पुढे सरकत होते. तस पाहिलं तर वाट अशी नव्हतीच, पण ते तिघेही प्रस्तरारोहक असल्याने नेढ डोळ्यासमोर ठेऊन दोराशिवायाच प्रस्तरारोहण करीतच वरवर सरकत होते. चढताना मध्येच दगडधोंडे लागून अंग खरचटत होत, तर कधी काट्याकुट्यातून जाताना काटे टोचत होते. एव्हढ सर्व करून सुद्धा एका टप्प्यावर आल्यावर आमच्या समोर एक उंच कडा दत्त म्हणून उभा राहिला. आता इथून उजवीकडे नेढ्याच्या दिशेने जाणे अशक्यच होते. थोड थोड पाणी पिऊन मिलिंदच्या नावाने शिव्या घालत आम्ही कड्याच्या डाव्या बाजूला सरकू लागलो. अचानक खाली जंगलातून रानातील श्वापदांचे गुरगुरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबत माकडे, पक्षी यांच्या कलकल्याने आसमंत दुमदुमून गेला. आमच्यापैकी कुट्टी या क्षेत्रात अनुभवी, त्याने सदर गुरगुरणे वाघाचे असल्याचे ओळखले, पण आम्ही त्या आवाजापासून जवळपास १००० फुट उंचावर असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

बरेच डावीकडे गेल्यावर रांगत-रांगत आम्ही वरच्या दिशेने वर-वर सरकू लागलो. नेढ्याचा तर पत्ताच नव्हता, परंतु तरी त्यांचा निश्चय पक्का होता. थोडं वर गेल्यावर आजोबा व कात्राबाईच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसू लागली. त्यांचा गिर्यारोहणातील अनुभव त्या खिंडीतूनच मार्ग असल्याचे सांगत होता. खिंडीकडे जायला वरूनच शक्य होणार होते. कारवी आणि गवतातून वाट काढीत शेवटी एकदाचे ते त्या खिंडीत पोहोचले. घड्याळ पाहिले तर दुपारचे २ वाजले होते. अजूनही पाण्याचा कोठेही मागमूस नव्हता. पोटाची आग जाळण्यासाठी जवळ ठेवलेला सुकामेवा व पाणी पिऊन शरीराची गरज भागवली. सकाळी १० ते २ सतत चार तास पायपीट केल्यानंतर प्रथमच आम्ही ढुंगणाला आराम दिला होता. बसल्या बसल्याच आम्ही एकमेकांशी चर्चा केली व परत फिरण्याचा निर्णय घेतला. नेढ्यापर्यंत पोहोचायला आणखी २-३ तास लागले असते. आम्ही बसलो होतो त्या ठिकाणापासून वर चढत जायचे व तेथून जंगलातून वाट तुडवत उजवीकडे नेढ्याच्या दिशेने घुसायचे. बरे तेथपर्यंत पोहोचून पाणी मिळेल किंवा नाही हे हि माहित नव्हते. शिवाय पाणी मिळूनही त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नव्हता. कारण त्या नेढ्याला जाणारी वाट खूपच जिकिरीची आणि संपूर्ण डोंगर फिरवून आणणारी होती. त्यामुळे पाणी आणण्यात एव्हढा वेळ घालवणे शक्यच नव्हते.

म्हणून आम्ही तिघांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही बेसकॅंपवरून निघालो होतो पण आता बेसकॅंपवर न जाता सुभाष व मंडळीना निरोप देण्यासाठी चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅम्प-१ वर जायचे होते, त्यामुळे परत वाट वाकडी करून आम्ही कॅंप-१ च्या दिशेने अंदाजाने निघालो. बरेच खाली आल्यावर मार्गात आता सुमारे २०० फुट कडा आडवा आला, त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरत गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात गेलेली दिसली. वरील बाजूस सोंडेचा अंदाज घेऊन आम्ही त्याच वाटेने पुढे सरकू लागलो. चालताना अचानक सकाळचे गुरगुरणे आठवले….....… अक्षरशः जीव मुठीत घेऊनच वाट काढीत होतो. कसेबसे अंदाजानेच खिंडीत पोहोचलो कारण तो परिसरच इतका भयानक होता की वर्णन करणे शक्य नाही. एखाद्या कैद्याला शिक्षा करण्याऐवजी त्या भागात जिवंत सोडून दिलं तर तो सुद्धा काही दिवसात एकतर वेडा होईल किंवा प्राणास तरी मुकेल. सर्वत्र मोठमोठे कडे त्यांच्या पायथ्याशी घनदाट रान, दरड कोसळून होणारा गडगडाट, जंगली श्वापदांचे गुरगुरणे, किंचाळणे, भरीस भर म्हणून पायाखालून कधीही सरपटत जाणारे साप, त्या जंगलाची भयानकता अधिकच वाढवीत होते.

इतक्यात आमची तंद्री भंगली ती सकाळचीच वाट सापडल्यामुळे, आम्ही योग्य ठिकाणी आहोत हे पाहून जीव थाऱ्यावर आला. घड्याळात पाहिले तर ४ वाजून गेले होते. भरभर पुढे सरकताना कॅंप-१ वर चढाईच्या ठिकाणावरून हातोडीचे आवाज ऐकू येऊ लागले पण कुणीही नजरेस पडत नव्हते. झपाझप पावले उचलत आम्ही अजून पुढे सरकलो. सुभाष व चढाई करणाऱ्या मंडळीना आम्ही कॅंप-१ वर न येता थेट बेसकॅंप वर जात आहोत हा निरोप देणे गरजेच होत. आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही नव्हते. संध्याकाळ झाल्यामुळे आता सुभाष व चढाई करणाऱ्या टीमला परत बेसकॅंपवर निघण्याचा निरोप मिळणे आवश्यक होते, अन्यथा ते आमची वाट पाहत तेथेच राहिले असते. आणखी थोडे पुढे गेल्यावर आम्हाला आता कॅंप-१ अस्पष्ट दिसू लागला होता, किरणने सुभाषला हाका मारायला सुरुवात केली, ५-६ वेळेला हाक दिल्यानंतर सुभाषने प्रतिसाद दिला. दोघांमधील अंतर जास्त असल्याने किरणने एका एका शब्दावर जोर देऊन निरोप सुभाषकडे पोचवला. ''सुssभाssष, आssम्ही, राssत्री येssत नाssही.तुssम्ही साssमाssन पॅssक कssरूssन बेssसssकॅssम्प वssर पssरssत जा''. नशिबाने सुभाषला निरोप कळला.

सुभाषचा ओके सिग्नल मिळाल्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे बेसकॅंपच्या वाटेला लागलो. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतरही आम्हाला पाण्याचा शोध काही लागला नव्हता. साधारण साडेपाच वाजता आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो, पण समोर आमचे डोंबिवलीहून आलेले नवीन सहकारी अशोक, दिनेश, राजू दिसताच राग आवरता घेतला. चहाचे घुटके घेत घेतच सदर घटनेचे स्पष्टीकरण विचारताच, मिलिंद कुमशेतहून परतताना त्याच खिंडीतून तो खाली उतरल्याचे स्पष्ट झाले पण नेढ्याबद्दल त्याने सांगितलेली माहिती गावकऱ्यांकडून कळलेली ऐकीव माहिती होती. तो स्वतः त्या नेढ्यात गेलाच नव्हता, त्यामुळे गफलत झाली होती. सकाळीच जर त्याने हि माहिती आम्हाला दिली असती तर आमचे दिवसभराचे परिश्रम फुकट गेले नसते.

अशोक, राजू, दिनेश यांच्याशी गप्पा चालू असतानाच आज चढाई करणारी टीम रात्रीच्या मुक्कामाकरीता परत बेसकॅंपवर आली. मग त्यांनी आजच्या दिवसभराच्या चढाईची माहिती दिली. सकाळी सुभाषने चढाईला सुरुवात केली, लागोपाठ पाच बोल्ट मारल्यावर त्याला एके ठिकाणी फ्री मूव्हसाठी वाव असल्याच जाणवलं. म्हणून त्याने दत्ता आणि पुंडलिक जे कॅंप-१ वर सुभाषच्या मदतीसाठी होते, त्यांना हाक मारायला सुरुवात केली. पण दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळून सुभाषने आवश्यक तेव्हढा दोर खेचून घेऊन त्यानेच मारलेल्या शेवटच्या बोल्टला बांधून टाकला. त्याने आता 'बिलेशिवायच' फ्री मूव्ह केली आणि एका टप्प्यावर थांबून परत एक बोल्ट मारला. या मारलेल्या बोल्टला दोर बांधून सुभाष दोराला धरून (कमांडो पद्धतीने) परत खालच्या बोल्ट वर आला आणि त्याला बांधलेला दोर सोडून मुक्त केला. दोर खालच्या बोल्टपासून मुक्त होताच तो परत दोराला धरून (कमांडो पद्धतीने) वरच्या बोल्टपर्यंत पोहोचला. त्यापुढे आता परत बोल्टिंग करायची होती. सुभाष जेंव्हा दत्ता आणि पुंडलिकला मदतीसाठी हाका मारत होता तेंव्हा ते चक्क कुंभकर्णासारखे झोपले होते. सुभाषने दिवसभरात एकट्यानेच एकूण २० बोल्टच्या साहाय्याने ८० फुटांची चढाई केली होती.

From Aajoba 1991

आज सगळेच बेसकॅंपवर होते. शिवाय उद्यापासून किरण, नरेंद्र व इतर चढाईला जाणार होते व उंचीही बरीच वाढली होती. उद्यापासून कदाचित कड्यावरच राहावे लागणार होते, त्यामुळे पुन्हा एकदा बेसकॅंपवर कॅंपफायर करून 'मानसिक बेटरी' चार्ज करून घेतली.

सकाळी नेहमीप्रमाणे उठून नित्यकर्मे आटोपून सर्व साहित्यानिशी बेसकॅंपवरून ठीक ९.३० वाजता किरण, नरेंद्र, दिनेश व आंनंद चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप १ वर जाण्यासाठी निघाले. शॉर्टकटच्या अवघड वाटेने जाताना नेमके जंगलात वाट चुकले. पुन्हा बेसकॅंपवर हाका मारून मिलिंद व महेंद्रला बोलावून घेतले व त्यांनी या चौघांना बरोबर ११ वाजता कॅंप-१ वर नेउन सोडलं आणि ते दोघे परत बेसकॅंपवर आले. वाटेत येताना ५ लिटरचा पाण्याचा कॅन हातातून सटकून खाली घरंगळत गेला आणि सगळ पाणी सांडल. त्यामुळे आता दिवसभर पाण्याची बोंब होणार होती. आता पर्यंत कॅंप-१ पासून ४७ बोल्ट्स आणि फ्री-मूव्ह करून १७५ फुटांची उंची गाठली होती. त्यांच्यापाशी झुमार नसल्याने कमांडो पद्धतीने दोर पकडूनच काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जाणे भाग होते (जे कामचलाऊ जुमार बनवले होते ते तकलादू निघाले). फ्री-मूव्ह करण्याची संधी दिसत होती. किरण, पुंडलिक आणि शेखर यापैकी कुणीही तिथे असला कि तो जास्तीत जास्त फ्री-मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. किरण शेवटच्या बोल्टवर पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ४० फुट वर सरकला, सेकंड मॅन व त्याच्यामधील अंतर वाढल्यामुळे सुरक्षेसाठी तिथेच एक बोल्ट ठोकून त्यातून दोर पास करून आणखी जवळपास ५० फुटांची फ्री-मूव्ह करत वर सरकला. आता अंतर बरेच वाढल्यामुळे सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकुन त्यात दोर पास करून पुढे आणखी वीस फुटांची फ्री-मूव्ह केली व सपाट कातळ असल्यामुळे लागोपाठ २ बोल्ट ठोकले. आता तो एका ओव्हरहॅन्गच्या मुळास पोहोचला होता.

त्यामुळे इथून पुढे परत चेन बोल्टिंग करावी लागणार होती. म्हणून किरणने नरेंद्रला वर बोलावून घेतले व पुढची सूत्रे त्याच्या हातात दिली. इथे नरेंद्रने लागोपाठ दोन बोल्ट ठोकले व पुढे फ्री-मूव्हची संधी दिसल्याने त्याने आता किरणला संधी दिली. त्या ओव्हरहॅन्गवर एक सुंदर मूव्ह करत किरणने जवळपास चाळीस फुटांची उंची गाठली आणि नेमका बिलेचा दोर संपला त्यामुळे किरणने समोर असलेल्या एका कपारीत एक पिटोन ठोकून स्वतःला त्यात अडकवून सुरक्षित केले व नरेंद्रकडून दुसरा दोर वर खेचून घेतला आणि त्याच्या साहाय्याने नरेंद्र किरण पर्यंत पोचला. नरेंद्र जवळ पोहोचताच किरण ने परत संधी पाहून फ्री-मूव्ह करत जवळपास आणखी ६० फुटांची उंची गाठत एका लेजवर पोचला. किरणने दोर तेथील एका मोठ्या खडकाला बांधून त्याच्या आधारे नरेंद्रला आपल्यापर्यंत खेचून घेतले. आता कॅंप-१ पासून इथवर खूप उंचावर असल्याने, पुढील चढाईच्या सोयीसाठी नरेंद्रने त्या लेजवरच एक बोल्ट ठोकून कॅंप-२ ची स्थापना केली.

थोडा वेळ आराम करून किरणने परत चाचपणी सुरु केली. त्याच्या अगदी नाकासमोर चाळीसेक फुटांचा सरळसोट रॉकपॅच होता आणि त्याच रेषेत जर चढाई करावी म्हटलं तर आणखी ४-५ बोल्ट ठोकावे लागले असते. ते टाळण्यासाठी किरणला उजव्या बाजूस चढाईसाठी योग्य संधी दिसली. सुमारे ३०-४० फुट उजवीकडे सरकून वर जात पुन्हा डावीकडे ३०-४० फुट याव लागणार होत. एका अरुंद लेजच्या साहाय्याने थोडी कसरत करावी लागणार होती, या गडबडीत काही चूक झाली तर ४० फुटांचा फॉल (Fall) ठरलेलाच, पण तरीही ४-५ बोल्ट ठोकण्याचा वेळ वाचवण्यासाठी धोका पत्करायच ठरवलं व उजवीकडे हळूहळू वर सरकू लागला.

तब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यावर किरण वर जाण्यात यशस्वी झाला. चढाईच्या सरळ रेषेत येण्यासाठी आता परत डावीकडे ३०-४० फुट यावे लागणार होते. लेज खूपच अरुंद म्हणजे ४-५ इंच ते १ इंचापर्यंत रुंद होती. वाटेत दिसणारे गवत, त्यांचे बुंधे इ. पकडत हातापायांचा सावधपणे उपयोग करीत सुमारे २५ मिनिटात किरण परत चढाईच्या सरळ रेषेत आला. इथे त्याला सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकावाच लागणार होता. कारण वर मूव्ह करणे खूप धोक्याचे होते. त्या अरुंद लेज वर स्वतःचा तोल सावरत बोल्ट ठोकायला तब्बल अर्धा तास गेला. बोल्ट ठोकल्यावर त्यात स्वतःला अडकवून घेऊन किरणने स्वतःला सुरक्षित करून घेतलं आणि हे कळताच खाली नरेंद्रने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते त्यामुळे दिवसभराची चढाई थांबवून किरण खाली आताच स्थापन केलेल्या कॅंप-२ वर नरेंद्रपाशी पोहोचला. कॅंप-१ पासून जवळपास ४०० फुट उंचीवर कॅंप-२ ची स्थापना करण्यात आली होती. हे सर्व होईस्तोवर सात वाजले व अंधार पडला होता. खाली आश्रमाजवळ बेसकॅंपवर जावं तर पुरेसा अवधी नव्हता. त्यात ४०० फुट खाली कॅंप-१ वर उतरण्यासाठी पुरेसा दोरही त्यांच्यापाशी नव्हता. तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप-२ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

क्रमशः

प्रतिक्रिया

एस's picture

17 Apr 2015 - 4:56 pm | एस

वाचतोय.

वेल्लाभट's picture

17 Apr 2015 - 5:21 pm | वेल्लाभट

वाचतानाही दम लागतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2015 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

यशोधरा's picture

17 Apr 2015 - 9:45 pm | यशोधरा

खरंच दम लागला वाचताना!
सापांना कुठे सोडलेत? वाघोबा होता खरंच? दिसला का?

सतीश कुडतरकर's picture

18 Apr 2015 - 10:25 am | सतीश कुडतरकर

वाघोबा दिसला नाही पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. २४ वर्षांपूर्वीच्या त्या काळात तिथे बिबटे होते आता तेव्हढे सर्रास नाहीत. बिबटे सहसा एकट्यादुकट्यावर हल्ला करतात. अन्यथा लांबूनच निघून जातात.

१२ वर्षांपूर्वी सिद्धगडावर बिबट्याचा अगदी जवळून अनुभव घेतलेला होता. सकाळी उठलो तेंव्हा तंबूच्या दारात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले होते.