काळजी

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
10 Jan 2015 - 5:30 am

तसं म्हणायला गेलं तर काळजी प्रत्येकच पालकांना असते. परंतू जेव्हा तुमचे मूल स्वमग्न असते तेव्हा ती काळजी फारच आक्राळविक्राळ रूप धारण करते. पूर्ण आयुष्य हे एक मोठी काळजी अथवा चिंता होऊन बसते.
सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे फिअर ऑफ अननोन. न्युरोटीपिकल मुलांच्या आई वडीलांनाही मुलांच्या भविष्याची काळजी असतेच. पण ती फारफार तर आपला मुलगा इंजिनिअर होईल की डॉक्टर. किंवा साईंटीस्टही चालेल. डॉक्टर आईबाप असतील तर आपला मुलगा डॉक्टर झाला तर बरे असे वाटेल. परंतू या सर्वामध्ये एक बेसिक गृहितक असते की तो काहीतरी होणार आहे. इंजिनिअर नाही झाला तर बीसीए, एम्सीए करेल. एम्बीबीएस नाही झाला तर बीएएमएस करेल. बाकी त्या मुलाच्या आयुष्यात शिक्षण, प्रेम, लग्न, मुलं बाळं सगळं यथास्थित येतेच.

ऑटीझम घरात येतो तेव्हा पालकांच्या काळज्या बदलतात. आपला मुलगा कधी बोलेल का? तो कधी आपल्यातून पलिकडे आपले शरीर पारदर्शक असल्यासारखे न बघता, आपल्याकडे 'बघेल' का? तो कधी पॉटी ट्रेन्ड होईल का? आपल्या मुलाला दात घासल्यावर चूळ भरायची ती कशी शिकवायची? हा कधी बार्बरच्या दुकानात बसून नीट केस कापून घेईल का? की नेहेमीच टॅंट्रम्स? पोळीचा तुकडा तोडून भाजीशी लावून खायचा हे त्याला फिजिकली कधी करायला जमेल का? मुळात तो कधी आपल्यासारखे जेवेल का? की आयुष्यभर ४-५च पदार्थ खाणार ब्रेकफास्ट्/लंच्/डिनर म्हणून? हा मेनस्ट्रीम शाळेत कधी जाईल का? ऑटीझमचे लेबल आयुष्यभर मागे लागेल का याच्या? बरं, ते लेबल गेलं निघून - याच्यात जरा सुधारणा झाली तरी आजूबाजूच्या लोकांची नजर बदलेल का? त्याला जिवाभावाचे मित्र कधी मिळतील का? त्यांना जीवाला जीव देणं, दुसर्‍यासाठी काहीतरी करणं या भावना त्याला कळतील का? त्याला विविध भावभावना कळतील का? त्याला स्वतःलाच मार लागलेला, बाऊ झालेला कळत नाही .. शाळेतून एक बोट काळंनीळं घेऊन आला त्या दिवशी.. शाळेत कोणाला माहीत नाही, हा कधी सांगू शकणार नाही. कसं कळायचे मला, त्याला काय झाले? स्वतःलाच होत असलेला त्रास त्याला कळत नाही, त्याला कधी समोरच्या व्यक्तीची pain समजेल का? त्याच्या बायकोला तो समजून घेईल का कधी? मूळात त्याचे लग्न कधी होऊ शकेल का? लग्न होण्यासाठी प्रेम ही भावना कशी कळेल त्याला? आणि आईपणाचा इगो काठोकाठ भरलेला प्रश्न : माझ्यानंतर काय? नंतर याच्यकडे कोण बघेल? याला इतकं कोण समजून घेईल? नुस्तं त्याच्याकडे बघूनच मला कळतं त्याला काय हवंय, नकोय, काय होतंय का.. अर्थात नेहेमी नाही कळत..

चिंता.. चिंता.. चिंता...

शाळेत सुभाषित शिकलो होतो, चिता मेलेल्या माणसाला जाळते तर चिंता जिवंत. इतकं या मुलाच्या काळजीने घेरून टाकले आहे आयुष्य, की आजकाल रडू देखील येत नाही. एव्हढं आभाळाइतकं काम समोर पडलेले दिसत असताना रडण्यात वेळ नाही घालवता येत. मग खर्‍या अर्थाने स्लीपलेस नाईट्स सुरू होतात. आख्खा दिवस मुलाला समजून घेण्यात खर्ची घालवला की तो झोपल्यानंतरचा वेळ या डिसॉर्डरला समजून घेण्यात जाऊ लागतो. जितकं वाचू तितकं कमी. जितकं अ‍ॅनालाईझ करू लेकराचे बिहेविअर, तितकं कमी. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्याचे स्पेशल डाएट मेंटेन करा, त्यासाठी आठवणीने स्पेशल दुकाना ग्रोसरीला जा, स्पेशल दुकानातून स्पेशल पझल्स, खेळणी आणा, मागे टोचणारे टॅग नसलेले स्पेशल शर्ट्स आणा.. सगळं आयुष्य स्पेशल!

कधीकधी गंमत वाटते. देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.

समाजविचार

प्रतिक्रिया

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

10 Jan 2015 - 5:31 am | स्वमग्नता एकलकोंडेकर

मी मध्यंतरी ही लेखमालिका अपडेट करायचे विसरूनच गेले. वेबसाइटवर बरंच लिहिले परंतू इथे अपडेट करायचे राहीले.
आधीच्या लेखांना नंबरही देते, म्हण्जे क्रमाने वाचता येतील.

सखी's picture

10 Jan 2015 - 7:16 am | सखी

नतमस्तक तुमच्या जिद्दीपुढे आणि सहनशक्ती पुढे! असेच बळ तुम्हाला आणि कुटुंबियानाही कायम मिळो.
पूर्ण मालिका सलग मागे सलग वाचली होती आणि कायम लक्षात राहील.

अजया's picture

10 Jan 2015 - 7:52 am | अजया

वाचलीये मालिका.लक्षात आहेच.शेवटच्या दोन ओळी मनाला भिडल्या...

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2015 - 9:45 am | अत्रन्गि पाउस

तुमचा लेख वाचून (शेवटच्या २ ओळी वाचून तर) माझी अवस्था "काही भावना शब्दात सांगता येत नाहीत ..." अशी झालीये

सुबोध खरे's picture

10 Jan 2015 - 10:03 am | सुबोध खरे

अशी बरीच मुले माझ्या व्यवसायाच्या ओघात मला पहायला मिळतात पण नेमक्या शब्दात आई बापाचं मन तुम्हीं इतकं उत्तम मांडलं आहे कि ते सरळ काळजास जाउन भिडतं.

इरसाल's picture

10 Jan 2015 - 10:11 am | इरसाल

जीवनाकडे पहाण्याचा तुमचा दृष्टीकोन अतिशयच भावला.
शेवटच्या दोन ओळींबद्द्ल तुमचं कौतुक करावे की तुमच्यावर आलेल्या जबाबदारीबद्द्ल विचार करुन अंतर्मुख व्हावे ?
समजत नाही. देव तुम्हाला बळ देवो.

पिंपातला उंदीर's picture

10 Jan 2015 - 10:18 am | पिंपातला उंदीर

सलाम तुम्हाला.

स्पंदना's picture

10 Jan 2015 - 11:25 am | स्पंदना

:(

जेपी's picture

10 Jan 2015 - 12:09 pm | जेपी

तुमचा पुर्वीचा एक लेख बुकमार्क केलता.
नविन भाग कधी येतात याची वाट पहातच होतो.

पुभाप्र

मित्रहो's picture

10 Jan 2015 - 12:16 pm | मित्रहो

तुमचे कौतुक आणि सलाम
या आधीचे लेख मी पूर्वी वाचले होते तेही माहीतीपूर्ण होते हा मात्र भावस्पर्शी आहे. ऑटीझम हा मुलांपेक्षा पालकाला फार मोठा धक्का असतो. मुलाला बिचाऱ्याला फार काही कळत नसते परंतु पालकाला हे स्वीकारायला फार जड जाते. काही दिवसापूर्वी एक विडीओ बघण्यात आला त्यात Why you force us to be normal असा मार्मिक प्रश्न त्यात विचारला होता.
तुम्हाला परत एकदा सलाम.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

10 Jan 2015 - 12:58 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

सर्वांचे खूप आभार! हे असं डीप, डार्क, निगेटीव्ह, काळजीयुक्त कधीच कोणाशी बोलले नव्हते. अनॉनिमिटीच्या पडद्यामागून का होईना हे असे विचार एक्स्प्रेस करू शकले हा माझ्यासाठीच एक मोठा स्ट्रेसबस्टर एक्स्पिरिअंस होता.

विशाखा पाटील's picture

10 Jan 2015 - 2:04 pm | विशाखा पाटील

काय लिहावं तेच कळत नाहीये...खोलवर पोहोचण्याएवढं छान लिहिलंय असं मात्र म्हणेन. अच्युत गोडबोलेंच्या 'मुसाफिर'मध्ये यावर वाचलं होतं. तुमचे इतरही लेख जरूर वाचेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2015 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य मनोगत ! तुमच्या आणि कुटुंबियांच्या लढाऊ स्वभावाची तारीफ करावी तितकी कमी आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ __/\__

तुम्हाला आणि तुमच्या प्रयत्नाला सलाम.

पैसा's picture

11 Jan 2015 - 9:04 pm | पैसा

बरेच दिवस तुमचा लेख आला नाही तेव्हा जरा काळजीच वाटली होती. थांबू नका. तुमच्या लढ्याची कल्पना आहे, पण हे सगळं वाचून कधी अशा एखाद्या खास मुलाला आणि त्याच्या आईबाबांना आमच्याकडून मदत होईल, न होईल; काही त्रास होणार नाही इतकी माहिती मिळते आहे. खूप धन्यवाद आणि मनापासून शुभेच्छा!

हे सगळं वाचून कधी अशा एखाद्या खास मुलाला आणि त्याच्या आईबाबांना आमच्याकडून मदत होईल, न होईल; काही त्रास होणार नाही इतकी माहिती मिळते आहे.

+१

अंतु बर्वा's picture

12 Jan 2015 - 8:33 pm | अंतु बर्वा

निशःब्द! ज्या देवाने ही जबाबदारी दिली तोच तुम्हाला यात खंबीरपणे उभं राहण्याचं बळ देवो हीच प्रार्थना...

कारण या किंवा तत्सम अवघड आजरांमध्ये पालकांना एकमेकांचा आधार हा महत्वपूर्ण ठरेल असे वाटते.

सस्नेह's picture

12 Jan 2015 - 9:18 pm | सस्नेह

तुमच्या प्रयत्नांचं मूल्यमापन करायला.
शेवटच्या दोन ओळींबद्दल इतकंच म्हणते की देव तुमच्याबद्दल विश्वास बाळगो न बाळगो; तुम्ही स्वतः जरूर बाळगा !
...शुभेच्छा तुमच्या पिल्लूला मिपातर्फे !

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2015 - 9:21 pm | पिलीयन रायडर

तुमचे लेख वाचुन स्वतःच्या मुला सोबत खेळताना / बोलताना अजुन जास्त पेशन्सनी वागतेय.. "माझ्या नंतर काय" ही काळजी आम्हाला एवढी वाटते तर तुम्हाला त्याचा किती त्रास होत असेल हे समजु शकते.. पण विश्वास ठेवा.. सगळं काही नीट होईल..

तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!!