ऐलमा पैलमा

अनाहिता's picture
अनाहिता in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:37 am

(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. मधुरा देशपांडे हिची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!)

ऐलमा पैलमा

लेखिका: अनाहिता
__________________________
थोड्याच वेळात आपण मुंबईच्या छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू अशी वैमानिकाने सूचना केली. पहाटेची वेळ होती. अजून सूर्योदय व्हायचा होता. दिव्यांनी मुंबई लखलखत होती. माईआजी मायदेशी उतरण्यास आतुर झाली होती. अनेक आठवणी दाटून आल्या होत्या. साधारण पन्नास वर्षांपूर्वी लग्न होऊन माईआजी अमेरिकेत गेली. त्याकाळी अमेरिकेचे प्रचंड अप्रूप होते. पुढे मुलांचे जन्म, संसार यात रमली आणि तिथेच स्थायिक झाली. नातलगांना भेटण्यासाठी अनेकदा भारतात येणे जाणे होतेच पण जशी मुले मोठी झाली, त्यांचे शिक्षण, लग्न असे एकेक सुरूच होते, आजी आजोबा दोघांचेही वय झाले होते आणि भारतात सहजासहजी येणे जमत नव्हते. आता तर नातवंडे चांगली उच्चशिक्षण घेत होती. आणि अशातच काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. आजीचा आधारच हरवला होता. मायभूमीची ओढ अजूनच जाणवू लागली. तिला जरा बदल व्हावा म्हणून मुलेही भारतात पाठवायला तयार झाली. मग सोबत कुणीतरी हवे म्हणून तिची नात जुई येणार होती. अर्धवट झोपेत तीही अनेक वर्षांपूर्वीची भारतभेट आठवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या लहानपणी एकदाच तिचे भारतात येणे झाले होते. त्यानंतर आता अमेरिकेत असणारी ओळखीची भारतीय लोक, आजीकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी, काही नातलगांशी फेसबुक किंवा तत्सम माध्यमातून होणारा संपर्क एवढेच काय ते दुवे. सध्याच्या भारतातल्या परिस्थितीबद्दल तिने जे काही वाचले होते त्यावरून थोडीशी निरिच्छेनेच पण आजीसाठी म्हणून ती येत होती. विचारांच्या तंद्रीतच दोघी सामान घेऊन बाहेर आल्या. मुंबईत राहणारी आजीची बहीण आणि तिची जुई एवढीच नात मंजू या दोघी त्यांना घ्यायला विमानतळावर आली होती. माई आजी आणि बहिणीची भेट झाली आणि चौघीही घरी जायला निघाल्या.

गाडी विमानतळाच्या बाहेर पडताच जुईचे डोळे भिरीभिरी फिरू लागले.. अन काही क्षणात ते आश्चर्याने भरून देखिल गेले. सगळीकडे गर्दीच गर्दी माणसांची, गाड्यांची, घरांची, दुकानांची ही! जसं की काही घडलंय, घडणार आहे आणि त्यासाठी हे लोक गोळा झालेत. जिथे नजर टाकावी तिथे जिवंत गजबज. प्रत्येकाचं काहीतरी चाललंय. गर्दीतल्या इतरांशी सुसंगत किंवा विसंगत कसंही! गाड्याचे आवाज, लोकांचं बोलणं, ओरडणं, हसणं, भांडणं.. कुठेतरी मधेच गाणी वाजतायत. या सगळ्याचा मिळून एक आवाज तयार झाल्यासारखा वाटतोय.. आजीला ज्या भारताची ओढ लागलीय तिथला हा आवाज!! आणि ओ गॉड हे इतके हॉर्न!!! हे सगळं डोक्यात चालु असतानाच रस्त्यावरच्या एका गाईने खिडकीतुन आत डोकावुन जुईचे ' स्वागत' केले.. जुई आ वासून बघत राहीली.. भयचकित होऊन तिने अविश्वासाने आजीकडे पाहीले, तर आजी कौतुकाने हळवी होऊन त्या भरगच्च गर्दीकडे पाहत होती. बहुतेक जुन्या काही खुणा सापडतायत का शोधत होती!

घरी पोचताच दारात टॉम्याने भुंकून स्वागत केले. मात्र मंजू बरोबर असल्याने त्याने शेपूट हलवत जरा आवाज केला इतकेच. जुई दारात असा गोणपाटावर बसलेला कुत्रा पाहून गोंधळली. ती कुत्र्यांना घाबरत नव्हती, खरं तर तिचाही एक पग होताच की घरी! मात्र अनोळखी कुत्रा म्हणून सावध राहिलेले बरे असाच विचार करून जरा थबकलीच ती.

"त्याला बेड वगैरे नाही का?"
"नाही. असाच राखण करत असतो तो इथे बसून. रात्रीचा कंपाउंडमधे मोकळा फिरतो."
"ओह. मग पॉटी वगैरे?"
"बाहेर एवढी जागा आणि झाडे आहेत की! जातोय बाहेर!" मंजूची आई नंदिनी बाहेर येत म्हणाली.
"ये बाळा, सगळ्यांची ओळख करून घे. नंतर बोलू सावकाशीने."
जुई आत जाऊन सगळ्यांशी जरा अवघडत हसून दोन दोन वाक्ये बोलली. आजीने शिकवल्यासारखा सगळ्यांना नमस्कार करायला मात्र विसरली नाही. माईआजीच्या चेहर्‍यावर अगदी समाधान पसरलं.
"चल जुई, फ्रेश हो. काय घेतेस? चहा की कॉफी?" मंजूने तिची गर्दीतून सुटका केली.
"आलेच मी फ्रेश होऊन. वॉशरूम दाखव मला. चहाची सवय नाही ग. आणि खरे तर झोपायचं आहे चिक्कार!"
ती काहीशी जुन्या पद्धतीची बाथरूम, भारतीय पद्धतीचे टॉयलेट सगळे नवीनच वाटत होते!

फ्रेश होऊन आल्यावर जुई भर दिवसाच गाढ झोपून गेली. तिच्या देशात अमेरिकेत तिकडे सगळ्यांची रात्र आताच झाली होती!

जाग आल्यावर जुई आवरुन बाहेर आली. माई आज्जी आणि मंजूसोबत गप्पा मारु लागली. सहज जुई मनात विचार करु लागली की तिचे शाळेचे शि़क्षण झाल्यावर पुढील शि़क्षणासाठी तिला जरी त्याच शहरातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तेव्हा ती पहिले एक वर्ष वसतिगृहात राहिली होती. त्यानंतर तिने पुढील वर्षापासुन त्याच शहरात भाड्याचे घर घेउन शिक्षण पूर्ण केले होते. जरी आजीने भारतातील कुटुंब व्यवस्थेविषयी तिला सर्व कल्पना देऊन ठेवली असली तरी आता तिला जरा निराळे वाटत होते. जुईची विचारांची तंद्री भंगली कारण मंजू तिला म्हणाली चल जरा बाहेर फिरुन येऊ.

मंजू सगळ्या कुटुंबासोबत मजेत रहात असलेली पाहून जुईला जरा आश्चर्य वाटलंच. तिला मंजूला अशा रहाण्याबद्दल कितीतरी प्रश्न विचारायचे होते. पण त्यासाठी तिने जरा वाट बघायचं ठरवलं. जुईला प्रवासाचा शीण असल्याने दोघीजणी जवळच्या बागेत गेल्या. बागेच्या दाराजवळ भेळपुरीच्या गाड्या, फूटपाथवर बसलेले विक्रेते, रस्त्यातच पार्क केलेल्या गाड्या याबद्दल जुईला कल्पना असली तरी नवल वाटत होतं आणि रस्त्यातल्या गर्दीतून वाट काढताना त्रासही होत होता.

बागेत पोहचत असताना वाहनांची गर्दी त्याचा येणारा अखंड आवाज आणि चालत येणारे लोकांचे लोंढे पाहुन जुई हबकली होती. तिची ती घालमेल पाहून मंजूही ओशाळली. बागेत पोचल्यावर एक फेरफटका मारुन झाल्यावर त्या दोघी एका बाकावर गप्पा मारत बसल्या. बाकावरची धूळ बघून पहिले जुई अस्वस्थ होती, पण मंजू बसली म्हणून मग तिनेही काही न बोलता बसून घेतले. मंजूला अजून जुईच्या स्वभावाचा अंदाज येत नव्हता आणि जुई आजुबाजुल चिक्कार माणसं बघून गांगरून गेली होती. नेमके काय बोलायचे याचे दोघीनाही थोडे दडपण होते. पण हळूहळू दोघेही बोलत्या झाल्या.

जुई: "What a Lovely place place and lot's of greenery around the garden!!!"
मंजू: "I too like this garden very much. जमेल तेव्हा मी इथे येत असते."
जुई: "तुझी युनिव्हर्सिटी इथे जवळच आहे का? तू रोज कशी जातेस तिकडे?"
मंजू: " अगं माझं कॉलेज तसं जवळच आहे. म्हणजे आमच्या मुंबईच्या मानाने. मी बस किंवा ट्रेन ने जाते. अर्ध्या तासात पोचते"
जुई: "मला तुझे कॉलेज बघायला आवडेल"
मंजू: "मी तुला नक्की माझे कॉलेज बघायला घेऊन जाइन. इतरही ठिकाणी फिरुयात आपण"

थोड्याफार गप्पा मारून दोघी परत घरी जायला निघाल्या. आतापर्यंत आलेल्या अनुभवांनी दोघीही विचारात पडल्या होत्या. त्यामुळे घरी पोहचेपर्यंत विशेष असे काही बोलणे झाले नाही.

दोघी घरात येताच तिला अजून एक सदस्य भेटला मंजूचा छोटा भाऊ आदित्य. आजीने आणि जुईने त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून स्वारी खुशीत होती. आदि काहीसा लाजत जुईशी ओळख करून हसला. जुईने त्याचे फोटो पाहिले होतेच. तिला आदि आवडला. सख्खं असं भावंड नव्हतंच तिला.

छोट्याश्या कुटंबात राहिलेल्या आणि आजवर सगळीकडे तेच पाहिलेल्या जुईला नवल वाटु लागले. आजुबाजूला इतकी माणसं एकाच घरात वावरताना तिला गंमत वाटत होती. मंजू, मंजूचे आईबाबा, आजी आणि आदि. मंजूचे बाबा कामानिमित्त बाहेरगावीच जास्त असायचे, ते आठ-पंधरा दिवसातून यायचे. आणि नंदिनीकाकू सकाळी उठल्यापासून सतत कामात असायची. सतत काही ना काही करत. बराचसा वेळ स्वयंपाकघरात असायची ती. दिवसातून ४ वेळा चहा, खाणं, जेवणं, काही ना काही चालूच. मात्र तरीही सतत हसतमुख.

एवढे माणसं असलेले छान कुटुंब पाहून तिला अमेरिकेतील कुटुंबं आठवू लागली. तिथे कुटुंबं अशी होतीच कितीशी. बरीचशी विभागलेली. एकाकी पालकत्व असलेली. आणि तिचे स्वतःचे कुटुंब ते तरी एकत्र होते का? कुटुंब म्हटल्यावर तिला तिचे सतत कामात मग्न असणारे आईबाबा आठवले. त्यांच्यात असणारे तणावही. आजी होती म्हणून जरातरी घरी जावसं वाटायचं नाहीतर एकटेपणाच बरा वाटायचा. एकएक विचार मनात येत होते. नकळत तुलना सुरु झाली होती. तेवढ्यात कांदेपोह्यांचा मस्त वास आला. मंजुने तिच्या हातात डीश सरकवली, खोबऱ्याची वडीही होती त्यात. जुईला असे खास आपले पदार्थ आवडायचे. आजी कधीकधी असा खाऊ करायची. अनेक वर्ष तिचे कुटुंब अमेरिकेत राहिल्याने हे असे पदार्थ मागे पडले होते. आईच्या बिझी कामातून वेळ मिळून काही खास कधीतरीच व्हायचे. तिला तर काहीच नीट येत नव्हते. आणि मंजू तिला म्हणत होती की अमेरिकन छान काहीतरी पदार्थ शिकव. ती कसंनुसं हसली. पोहे तिला मनापासून आवडले होते आणि वडीचा गोडवा जिभेवर उतरला होता.

जेवणं झाल्यावर मुलांच्या बेडरूममधे आदित्य त्याचा अभ्यास घेऊन बसला होता. जुई आणि मंजू येऊन मंजूच्या बेडवर बसल्या.

"तुम्ही दोघं एक बेडरूम शेअर करता गं?"
"हो नं!" मंजू उत्तरली. "अगं, माझ्या काही काही मैत्रिणींना तर स्वतंत्र रूमसुद्धा नाही माहिती आहे! दोघीजणी तर दोन खोल्यांच्या घरात रहातात."

"बापरे! कसं काय मॅनेज करता गं?"
"अगं, सगळ्यांना सवय असते. त्यात काय एवढं?"
"आणि तुला कुणाबरोबर चॅट करायला प्रायव्हसी नाही लागत?"
"असं कोणाबरोबर चॅट करणार मी? कॉलेजातली मित्रमंडळी नाहीतर आपलेच कझिन्स."
"म्हणजे, अजून तुला बॉयफ्रेण्ड्स नाही?"
"नाही गं! म्हणजे माझ्या काही मैत्रिणींना आहेत तसे, पण मी तरी अजून त्या फंदात नही पडले. म्हणजे अजून कुणी तसा नाही आवडला. तुझं काय?"

"आमच्याकडे अल्मोस्ट सगळ्यांनाच असतात बॉयफ्रेण्डस. माझाही होता. सध्या मात्र मी सिंगल आहे. ब्रेक अप झाला आमचा. म्हणून तर आजीबरोबर काही दिवस इकडे यायचं ठरवलं मी." म्हणत जुईने नि:श्वास सोडला.

मंजूने त्या विषयावर तिला जास्त छेडलं नाही. पण जुईच म्हणाली, "मंजू, मग कोणाच्या प्रेमात पडल्याशिवाय लग्न कसं करशील तू?"

"अग, इथे बर्‍याचशा मुली असंच करतात. आपल्या डोक्याला कटकट नाही बघ! आईबाबा बघतील तेव्हाचं तेव्हा!"

आदित्य ते सगळं ऐकत अभ्यास करत होता. मधेच त्याचे डोळे मोठे व्हायचे. जुईने त्याच्या डोक्यात लाडाने एक टप्पल दिली. "काय रे अ‍ॅडी, सगळा वेळ अभ्यास करतोस का?"

"हो, मग? अकरावीला आहे मी. पुढच्या वर्षी मला चांगले मार्क्स मिळाले तर काहीतरी करता येईल. नाहीतर बोंब आहे. बाबा काही डोनेशन वगैरे देणार नाहीत."

जुईला हे सगळं कळण्यापलिकडचं होतं. "म्हणजे? शिकण्यासाठी आपल्याला सगळा खर्च करावा लागतो? आणि तुला काही पार्ट टाईम जॉब वगैरे नाही करायचा? म्हणजे आपले पैसे आपण मिळवले की बरं ना!"
"अग तायडे, मीच काय. मंजुळाबाई सुद्धा नोकरी बिकरी करत नाहीत."
"अरे मग पॉकेटमनीचं काय?"
"बाबा देतात ना!"

सगळं ऐकता ऐकता जुईला एकेक सांस्कृतिक धक्का बसत होता. तिला मनातून इतकं निर्भेळ मजेचं आणि काळजीमुक्त आयुष्य जगणार्‍या आदित्य आणि मंजूचा सूक्ष्म हेवा वाटल्याशिवाय राहिला नाही.

मंजूही नवख्या पाहुणीसोबत जरा बुजलीच होती. जुई येणार हे ठरल्यावर दोघींच्या आंतरजालावरून जरी भरपूर गप्पा झाल्या होत्या तरी प्रत्यक्षात ती घरी येऊन पोचल्यावर मंजूच्या भावना जरा संमिश्र होत्या. तिच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमधे अगदी चित्रविचित्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या. "आता काय ब्वा, तुझी मज्जा आहे. चॉकलेटं, टॉप्स काय काय आणेल तुला ती." "एक आयफोन तरी तिकडचा आणायला सांगायचास." इथपासून ते "इकडे कशाला येतात हे एबीसीडी?" इथला गोंधळ बघून पळून नाय गेली ८ दिवसांत तर नाव दुसरं!" इथपर्यंत. एकजण तर हेही बोलला होता. "हे लोक इथे टुरिस्ट म्हणून येतात आणि मग तिकडे जाऊन इथल्या दारिद्र्य आणि घाणीचं फोटोतून प्रदर्शन मांडतात. खरं तर त्यांनी तिकडेच रहावं सुखात."

जुई स्वतःशीच विचार करत बसली, " नक्की का आलेय बरं मी इथे? अशी uninvited असून! हे खरंय की आजीला सोबत म्हणून आलेय. पण मलादेखील चेन्ज हवाच होता. उगीच एकटीनी कुठेतरी जाण्यापेक्षा हा चेन्ज निदान सुरक्षित वाटतोय. शिवाय कित्तीतरी दिवसांनी सलग आजीसोबत रहायला मिळतंय. पण खरं कारण हेच आहे, की आजीची भारताबद्दलची अगम्य ओढ बघून मलापण फार उत्सुकता वाटतेय. आजीनी तिचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य अमेरिकेत काढलंय. पण ती मनानी कायम इथेच असते. तीने तर नायगरा बघतानादेखील त्या नदीला मनोभावे नमस्कार केला होता आणि अख्ख्या भारतातल्या सगळ्या नद्यांना हाका मारुन झाल्या होत्या. हे एकीकडे खूप फनी वाटतं, पण तीचे खरोखरच फार प्रेम आहे या देशावर. आणि तेच तर शोधायला मी इथे आलेय! .... पण हे सगळ्यांना कुठे समजावत बसणार?'

माईआजी मात्र आपल्या बहिणीसोबत मनमोकळ्या गप्पा मारून, जुन्या आठवणी काढत, कधी मोकळेपणाने अश्रूंना वाट करून देत होती. जुईला मंजूची सोबत छान झाली होती. हळूहळू जुईच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळत होती. एक दिवस दोन्ही आज्यांसोबत मंजू आणि जुई दोघी मिळून जवळच्याच मंदिरात गेल्या. आज्या आपापल्या गप्पांमध्ये गुंग झाल्या. सोबतीला आजूबाजूला राहणाऱ्या इतरही आज्या होत्या. आजी आपल्या लोकांमध्ये येउन खुश आहे याचे समाधान जेवढे आजीला होते तेवढेच जुईला पण होते. मंजू आणि जुई दर्शन घेऊन बाहेर आल्या आणि जवळपास चक्कर मारू लागल्या.

मंदिरात आतली अस्वच्छता पाहून जुई थोडी निराश झाली होती. एकीकडे पर्समधले सॅनिटायझर हाताला चोळत ती मंजुला म्हणाली "सगळीकडे हे असेच आहे का? यापूर्वी मी अमेरिकेत बरेचदा मंदिरात गेले आहे पण असे पाहिले नाही. बाहेर भीक मागणारे भिकारी बसलेत आणि आतमध्ये लोक दुधाचा अभिषेक करत आहेत हे मला समजतही नाही आणि पटत तर नाहीच. इथे शांत किंवा प्रसन्न वाटत नाही." मंजू विचारात पडली. तिच्या मनातलेच जुई बोलत होती. अमेरिकेत असणाऱ्या स्वच्छतेविषयी मंजूने ऐकले होतेच. आणि इथल्या या अस्वच्छतेचा तिलाही मनातून तिटकाराच होता. मंजू म्हणाली, "अगं आम्हालाही त्रास होतोच या सगळ्याचा. पण काय करणार. लोकांनाच काहीतरी वाटलं पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. आणि टाकलाच, तर सरकारी सिस्टीम्स हव्यात की त्यांना दंड होईल. पण दोन्हीकडून आनंद आहे. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करायचा" "हो ना गं, तुमच्या घरात सगळीकडे केवढं स्वच्छ आहे. तुमच्या घरातून बाहेर आलो की मग मात्र हे दिसतंच आणि सवय नसल्यामुळे मला त्याचा जास्तच त्रास होतो. मी इकडे येताना मला माझ्या मित्र मैत्रिणीनी हजारो सूचना दिल्या होत्या. आजारी पडू नकोस, कुठलेही पाणी पिऊ नकोस, बाहेरचे खाऊ नकोस. आणि हे पाहून मलाही भीतीच वाटत होती. टच वूड. काही होऊ नये. तशी तुम्ही खूपच काळजी घेत आहात त्यामुळे काही वाटत नाही" मंजू म्हणाली, "हो गं, ते समजू शकतो आम्ही की तुझ्यासाठी खूप वेगळं आहे हे सगळं. नको काळजी करूस."

दुसऱ्या दिवशी मंजू जुईला घेऊन एका मॉल मध्ये गेली. "आमच्या अमेरिकेत मोठमोठाले मॉल्स असतात. पण इकडे पण झालेत म्हणे हल्ली. मागच्या वर्षी तिकडे शिकायला असलेला गोरेंचा नातू आला होता ना घरी. तो सांगत होता" "अगं, आजकाल सगळीकडे दिसतात. इथे जवळपास चार मोट्ठे मॉल्स झालेत. तू बऱ्याच वर्षांनी आलीस. झपाट्याने बदलतंय सगळं", इति मंजूची आजी. आजीकडून जुईने ऐकलेल्या अनेक गोष्टी या अशाच होत्या. आणि इथे तिला काही वेगळेच बघायला मिळत होते. एवढ्या झटपट सगळं बदलतंय हे आजीलाही कळत नव्हतं. त्यामुळे जुईच्या मनातले काही प्रश्न अजूनच वाढत होते.

बाहेर कुठेही जाताना गर्दीचा होणारा त्रास, आजूबाजूच्या लोकांची विचित्र नजर हे सगळे जुईला त्रासदायक होत होते. भारतात मुली खूपच असुरक्षित आहेत असे तिचे ठाम मत होते. बाहेर जाताना मंजूशिवाय जाण्याची तिची हिम्मत नव्हती. पण मंजू मात्र बिनधास्त सगळीकडे फिरते याचे तिला नवल वाटत होते. बाहेर जाताना माझा हात सोडू नकोस हे मात्र मंजूने तिला बजावून ठेवले होते. दोन तीन वेळा जेव्हा काही लोकांनी उगीचच तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा क्षणभर तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण मंजूने लगेच सांभाळून घेतले.

मंजूच्या कॉलेजमध्ये जेव्हा ती गेली, तेव्हा तिच्या काही मैत्रिणींचे अनुभव ऐकून ती भारावून गेली होती. सगळ्यांनी जुईशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. "अमेरिकेत ती काय शिकते", "कुठे राहते", किंवा "माझा भाऊ पण नुकताच मास्टर्स करायला गेलाय तिकडे" असे प्रत्येकाचे वेगळे प्रश्न. तिच्या एक दोन मैत्रिणी रोज घरी आईला मदत करून मग कॉलेजला येतात, दोन खोल्यांच्या घरात राहतात हे सगळे ऐकून जुई चाट पडली होती. किती धडपड करून त्या शिक्षण घेत होत्या हे तिकडे जाऊन आपल्या मित्रमैत्रीणीना सांगायचे तिने पक्के केले होते.

मंजूच्या इमारतीत राहणाऱ्या मित्र मैत्रीणीना पण जुई भेटली. यातलीच एक मैत्रीण तिला म्हणाली, "जुई, कित्ती छान गं तू तिकडे मस्त एकटी राहतेस, तुला हवे तसे कपडे घालता येत असतील नं? यु अरे सो लकी" आता माझा हा कोर्स झाला की मी पण तिकडेच येणार आहे. कुठलाही कोर्स मिळाला तरी चालेल पण मला बाहेर पडायचं आहे इथून." एक मैत्रीण घरचे लग्नाच्या मागे लागलेत म्हणून कंटाळली होती. जुई तिला म्हणाली, "जर तुला लग्न करायचे नाही तर तू सांगत का नाहीस आई बाबांना, की आधी मला शिक्षण घ्यायचे आहे." एवढे सोपे नसते गं असे म्हणून ती मैत्रीण गप्प झाली. तिला आजीने सांगितलेले आठवले की तिचे लग्न ठरले तेव्हा तिने आजोबांना पाहिले पण नव्हते.

अशा वेळी मात्र तिला आपली अमेरिका बरी असेही राहून राहून वाटत होते. मंजूची खास मैत्रीण तिच्या या परदेशी बहिणीला भेटायला खास पुण्याहून आली होती. मंजूने ओळख करून दिली, "ही दीपा. माझी बेस्ट फ्रेंड. पुण्याला होस्टेलला असते." गप्पा सुरु होत्या तेव्हा मंजू म्हणाली, "तू या गर्दीतून येतेस खास घरच्यांना भेटायला दर आठवड्याला. किती त्रास होत असेल." हसून दीपा म्हणाली, त्रास होतोच गं. पण दोन दिवस घरचं खायला मिळतं यासारखं सुख नाही. आणि आई बाबांना भेटण्यासाठी याचं काही वाटत नाही. परीक्षा आल्या की मग नाही येता येणार सहज." जुई विचार करू लागली, "खरंच या सगळ्या जणी म्हणतात तशी मी लकी आहे का? हो काही बाबतीत नक्कीच आहे. माझे निर्णय घेऊ शकते. स्वतः पैसा कमावते आणि पाहिजे तसा खर्च करते. पण कधीकधी वाटतं या सगळ्यांना यांचे आई बाबा आहेत आधार द्यायला. मी आजारी पडले तर दूर राहणाऱ्या आई बाबा किंवा आजीकडे सहज जाता पण येत नाही. सगळंच सापेक्ष."

८/१० दिवस जरा स्थिरस्थावर झाल्यानंतर माईआजी म्हणाली, "आता आम्ही २ दिवसांत कोरगावाला जाऊन येतो. बरीच वर्षं झाली जाऊन. तिथलं घर, देऊळ पाहून यावंसं वाटतंय."

मंजूचे बाबा म्हणाले, "बरं मावशी. जवळ ३ तासावर तर आहे. या जाऊन. मंजू येईल तुमच्याबरोबर. म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही."

मंजूचे बाबा आपली गाडी न्या एक ड्रायव्हर बघून देतो म्हणत होते, पण माईआजी म्हणाली, "नको. आम्ही जाताना रेल्वेने जाऊ आणि येताना रेल्वे एस्टी काय मिळेल ते. त्या निमित्ताने जुईला एसटी बघायला मिळेल!"

दुसर्‍या दिवशी २ दिवसांचे कपडे, शेजारच्या मुलांसाठी खाऊ, थोडी चॉकलेट्स असं घेऊन तिघीजणी पॅसेंजरने निघाल्या. तिकीट काढून फलाटावर येताना मंजूने जुईला सावध रहायला सांगितलं. कोण कधी पर्स मारील काय भरवसा! पॅसेंजरला नेहमीसारखीच गर्दी होती. पण महिलांसाठीच्या डब्यात तिघींना निदान बसण्यापुरती जागा मिळाली. जुई कुतुहलाने सगळं टिपत होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर बकाल वस्त्या, रुळाजवळ पत्र्याच्या झोपड्या आणि स्टेशनवरचा एकूण कळकट प्रकार बघून तिला आपण कुठे येऊन पडलो असं वाटायला लागलं होतं. मंजू मात्र आत्मविश्वासाने त्या सगळ्यातून वाट काढत आणि सगळीकडे लक्ष ठेवत दोघींनाही सांभाळत होती!

पुढच्या २ स्टेशनांवर फेरीवाल्या बाया, केळी विकणार्‍या, चहावाले सगळ्यांनी डब्यावर हल्लाबोल केला. घाईघाईने चहाच्या डब्यासकट डब्यात चढणारे चहावाले बघून जुईचा थरकाप झाला. धावत्या ट्रेनमधे चढता उतरताना यातला कोणी पडला तर? फेरीवाल्या बायांनी त्यांच्याजवळच्या वस्तू पॅसेंजर बायकांना वाटायला सुरुवात केली. कानातले, पुस्तकं, कीचेन्स, रुमाल, टिकल्या काय नी काय! कोणी कोणी कायकाय विकत घेत होत्या. मधेच एक मुलगी आपल्याजवळच्या औषधांवर भाषण करायला लागली. तिच्या दोघी साथीदारणी इतर बायांना पत्रकं वाटायला लागल्या. जुईला या सगळ्याच प्रकारांचे गंमत वाटत होती. माईआजीने त्या दोघींसाठी इअर रिंगचे बरेच जोड विकत घेतले. "तेवढीच या गरीब बापड्यांना संसाराला मदत!" म्हणाली. जुईचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. या एवढ्या पैशांवर यांचं घर चालतं? असं दिवसाला काय मिळत असेल यांना. ती बरीच अंतर्मुख झाली. एवढ्यात कोरगाव स्टेशन आलं.

मंजूच्या बाबांनी फोन करून कळवल्यामुळे स्टेशनवर शेजारचे शिंदेकाका बैलगाडी घेऊन त्यांना न्यायला आले होते.
आता मात्र जुई आणि मंजूने बाकी सगळं विसरून ते एन्जॉय करायला सुरुवात केली. शिंदेकाकांची बरीच शेती होती. घरात ट्रॅक्टर, पंप होता, पण शेतीच्या कामासाठी बैलही होते. त्याच दोन मोठ्या बैलांची गाडी घेऊन ते स्टेशनवर या तिघींना न्यायला आले होते. घरी पोचताच हंबरण्याचा आवाज आला. जुई घराजवळ आली तर आधी तिला आला भयंकर वास! सहनच होईना तिला. उमाश्यावर उमासे यायला लागले. तिला काही सांगताही येइना. आजीला आश्चर्य वाटलं, की बैलगाडी कशी काय लागेल हिला? ही तर मोठ्यामोठ्या चक्रात आवडीनी राईड्स घेणारी मुलगी. कसंबसं जुईनेच विचारलं, 'हा वास कसला?' तेवढ्यात तिचंच लक्ष गोठ्याकडे गेलं. मंजूनी पतकन तिच्या पर्समधल्या रुमालावर थोडी फेसपावडर टाकून तो तिला नाकावर धरायला दिला. आता जुई थोडा श्वास घेउन आजूबाजूला पाहू शकली. जुईने पाहिले तर त्या बाजूला गोठा होता. गायी म्हशी होत्या. भरलेला गोठा होता. या प्रकारचे बैल, गायी म्हशी जुई पहिल्यांदाच प्रत्यक्ष पहात होती. त्यातही शेतीच्या कामाला बैल कसे मदत करतात हे तिला बघायचंच होतं.

त्यांना दारात पाहून शिंदे काकू हसत पुढे आल्या. त्यांचं मोठं कपाळभर कुंकू, डोक्यावरचा पदर आणि नऊवारी लुगडं बघून जुईचे डोळे विस्फारले. अशी घरात नऊवारी लुगडे नेसलेली बाई ती प्रथमच पहात होती. एव्हाना तिला शेणाच्या वासाची जरा सवय झाली होती. शेणाने सारवलेलं अंगण, जुन्या पद्धतीचं घर ती सगळ्याचे फोटो काढायला धावली. तेवढ्या काकूंनी घरच्या दुधाचा दाट चहा आणून दिला. फुलपात्रातून चहा कसा प्यावा हे जुईला कळेना. मग आजीकडे पाहून तिने तो दाट गोड चहा प्यायला. तोपर्यंत काकांनी त्यांच्या वाड्याच्या दाराचे कुलूप काढून ठेवले होते. तिघीजणी तिकडे वळल्या. त्या येणार असल्याची बातमी लागताच काकांनी जमेल तितकी झाडझूड करून घेतल्याने वाडा बरेच दिवस बंद असला तरी ऊठबस करण्याइतपत स्वच्छ झाला होता.

जुना दगडी बांधणीचा चौसोपी वाडा, मधे राजांगण, वृंदावन सगळं पाहून जुई थक्क झाली. अगदी लहान असताना ती इथे आली होती पण तिला काही आठवत नव्हतं. माईआजी मात्र लग्न होऊन नवी नवरी म्हणून या वाड्यात आलेली. जुन्या आठवणींनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. इथून गेल्या वेळी परत जाताना आजोबा सोबत होते. आता मात्र ती एकटीच आली होती! जुईने तिच्या खांद्याभोवती हात लपेटून तिला जरा थोपटल्यासारखं केलं. आजीही मग सावरली.

मग तिघींनीही वाड्याच्या सगळ्या खोल्या तपासायची मोहीम हाती घेतली. आजीचे दीर दिल्लीला स्थायिक झाले होते. त्यांच्याशी कित्येक वर्षात गाठभेट नसली तरी तेही संपर्क ठेवून होते. कित्येक वर्षं वाड्यात कोणी रहात नसलं तरी कारणाने कधीतरी कोणीतरी असंच येऊन जायचं. त्यामुले अधून मधून का होईना माणसांचा राबता होता. एकूण अवस्था ठीकठाक होती. मग तिघींनी विचार करून एक दिवस तिथेच रहायचा निर्णय घेतला. शिंदेकाकू म्हणाल्या, एक दिवस तिथे रहा-वावरायला, आंघोळीला, झोपायला. पण जेवणखाण कुठं करत बसाल. मी करते. आणि ४ भाकर्‍या मला काही जड नाहीत करायला.

जरा वेळ पडवीत झोपाळ्यावर बसून मग जुई आणि मंजू आजीला घेऊन शिंदेकाकांच्या शेतावर जायला निघाल्या. वाटेत भेटणार्‍यांनी आजीला ओळखलंच, पण या दोघी तुमच्या नाती ना, तुमच्या वळणावर आहेत अगदी असं म्हटलं तेव्हा दोघींनाही मजा वाटली. आजूबाजूचे सगळे लोक तिच्याकडे जणू काही एखादी सेलिब्रेटी आहे अशा नजरेने बघत होते. काही लहान मुले तर खास जुईसोबत फोटो काढायला म्हणून आली होती. जुईला प्रश्न पडला होता की, अनेक वर्षे आजी इथे नाहीये. तरीही हे सगळे आठवण ठेवून कसे आलेत. आणि रोज भेटतात अशा गप्पा मारत आहेत. आजी ना फेसबुक वापरत ना इथले लोक. आजीच्या लग्नात पाचशे लोक होते याचे फोटो तिने पाहिले होते. आता तिचा विश्वास बसत होता की असे काही खरंच असू शकते.

शेतावर शेतघर, बांधावर झाडी अन हिरवंगार शेत. एका बाजूला बैल चारा खात खुंटावर बांधून उभे होते. जुईला किती फोटो काढू अन किती नको असं होऊन गेलं. मुंबईच्या गर्दी अन गोंधळापेक्षा हे गावचं वातावरण निवांत वाटत होतं. मात्र मंजू म्हणाली, "अग इथे २ दिवस छान वाटतं. नंतर कंटाळा येतो. धड लाईट्स नसतात, टीव्ही नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम. सगळ्या जगापासून अगदी तुटल्यासारखं वाटतं एकेकदा!" जुईला ते पटलं.

रात्री जेवणही साधं पण रुचकर. पालेभाजी, डाळ-भात ठेचा, दही, जाड आणि मऊ गरम भाकर्‍या. जुई अगदी भरपूर जेवली. कॅलर्‍यांची तर आठवणही आली नाही! रात्री कोणताही आवाज नव्हता. शांत स्वस्थ झोप लागली. सकाळी आपोआप लवकर जाग आली आणि सगळं आवरून तिघीजणी गावच्या देवीच्या देवळात जाऊन आल्या. भेटणारे सगळ्या चौकशा करत होते ते पाहून मंजूच्याही कपाळावर एक आठी उमटत होती. मात्र इथले लोक भोचक वाटले तरी मुंबईतल्या बुभुक्षित नजरा, बकालपणा हे कुठेही नसल्याने तिकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं होतं. गावचं देऊळ एकदम साधं कौलारू छपराचं. देवळात कोणीच नव्हतं. आणि एक साधा खण नेसवलेली देवी पण कडीकुलपात नव्हती. आरामात दर्शन घेऊन त्यांनी मग बाजूच्या तळ्यावर एक फेरफटका मारला आणि देवळाच्या दगडी पटांगणात जरा वेळ बसून परत घरची वाट धरली.

दुपारी परत जायला निघायचं होतं. घराला कुलूप लावून निघताना माईआजीचा पाय अगदी जड झाला होता. आता परत कधी येते, मुळात येईन का नाही देव जाणे! शिंदेकाका काकूंनाही ते जाणवलं. म्हणाले, माई, या पुढच्या वर्षी परत. शेतावर हुरडा करू! आल्यासारख्या चाराठ दिवस रहा तेव्हा! कधी न पाहिलेल्या मंडळींचं अकृत्रिम प्रेम बघून जुई भारावून गेली. एस्टीची वेळ होताच जवळच असलेल्या एसटी स्टँडवर तिघीही पोचल्या. व्यवस्थित जागा मिळाली आणि एस्टी वेळेत सुटली. हा जुईला आणखी एक वेगळाच अनुभव होता! लाल रंगाची जुनाट दिसणारी आणि खिडक्या धडाधड खाली पडणारी एस्टी बघून ही मुंबईला पोचेल तरी का अशी शंका आली पण जोरजोरात आवाज करत आणि थांबत थांबत एकदाची पोचली परत मुंबईला. वाटेत परत सगळे हिरवेगार बघून जुई हरखली. सगळे नवे अनुभव ती मनात साठवून घेत होती आणि जमेल तेवढे तिच्या कॅमेर्‍यातही. गेल्यावर तिच्या मित्रमैत्रिणींना हा सगळा वेगळाच इंडिया दाखवायचा होता ना!

बघता बघता पंधरा दिवस भुर्रकन उडून गेले. जुईला घरी परतायची ओढ लागली होती. जुई बॅग भरत होती तेव्हा सगळी मंडळी सभोवताली बसली होती. सगळ्यांनी तिच्यासाठी छान छान भेटवस्तू आणल्या होत्या. तिने पण मनसोक्त खरेदी केली होती. सगळेच जुईला इकडे कसे वाटले हे ऐकायला उत्सुक होते. कुणी काही विचारणार तेवढ्यात जुईच म्हणाली, "मी इकडे आले तेव्हा मी एक्साईट होते खूप वर्षांनी भारतात येणार म्हणून. पण भीती पण खूप वाटत होती. इतक्या लोकांच्या गर्दीत आपण कसे राहणार असे वाटत होते. पण तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं."

जुई पुढे म्हणाली, "बापरे काय काय नाही पाहीलं या २०-२५ दिवसात..भयाण वाहतूक, खड्ड्यांचे रस्ते, कर्कश्य हॉर्न, रस्त्यावर फिरणारे प्राणी, अजून कितीतरी अजब गोष्टी, पण एक मात्र नक्की मान्य केलं पाहीजे की त्या सगळ्यात कुठेतरी एक समतोल सुद्धा होताच की! लोकांनी स्वतःला किती अ‍ॅड्जस्ट केलंय सगळ्याशी, 'लेट इट गो' ची वृत्ती यांच्या किती अंगवळणी पडलेय. इथले लोक आहे त्या परिस्थितीत मार्ग काढणारे आहेत. पण इथलं गव्हर्नमेंट मात्र तितकंच बेजबाबदार आहे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे लोकांच्यात लेट गो वृत्ती आली आहे की यांच्या अशा वृत्तीमुळे सरकार असं बनलंय देव जाणे! हो पण स्वच्छतेच्या बाबतीतला हलगर्जीपणा किंवा धक्काबुक्की करणारे लोक मला नाही आवडले." मंजू म्हणाली "हो, परवाच एका रस्त्यात कचरा फेकणाऱ्या मुलीची शाळा घेतली हिने." सगळेच हसले. जुई म्हणाली की "हो. तुम्ही पण बोलत जा अशांना. नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा?" सगळ्यांनीच होकारार्थी माना डोलावल्या.

"आम्ही मात्र यात झिरो आहोत, अशी परिस्थिती जर माझ्या समोर आली तर काही करुच शकणार नाही, जागीच खिळून जाऊ, माझ्या मित्र मैत्रिणींना तर हे असं काही असतं हेच मुळात खरं वाटणार नाही. हरिकेन्स मुळे जेव्हा पॉवर कट होते तेव्हा किती पॅनिक होतो आम्ही. एखादा दिवस इंटरेनेट डाऊन होतं, आम्ही वेडे व्हायचे बाकी असतो. "लेट इट गो वृत्ती अजिबात नसणं हा आमचा मायनस पॉईंट आहे, अन तो खूप जास्त असणे हा भारतीयांचा दोष असेल कदाचित!!"

"इथली माणसं तरी कशी अजब आहेत. आजी निघताना म्हणाली, की आता परत येते की नाही काय माहीत तेव्हा तिथे असलेल्या सगळ्यांनाच गलबलून आलं होतं, अन ते भावनाविवश होणं कितीतरी खरंखुरं होतं.. आणि किती जपलं आम्हाला त्यांनी इतके दिवस. आणि त्यातही फॉर्मॅलिटीपेक्षा आपलेपणा जास्त होता. निरोप देताना डोळ्यातून पाणी आलं होतं सगळ्याच्या!! असा निरोप आजपर्यंत आपल्याला कधीच मिळाला नव्हता.. उगीच नको ते प्रश्न विचारण्याचा भोचकपणा ही इथलाच आणि कमालीचा आपलेपणा ही इथलाच.. दोन्हीही कल्पनेच्या बाहेरचे!!" हे सगळे जुई बोलत असतानाच मंजू, नंदिनीकाकू, दोघी आज्या सगळ्या भावनाविवश झाल्या होत्या हे तिला जाणवले. "मंजूच्या घरातल्या नळाचं पाणी कधी जाईल याची जशी खात्री नसते तशी लोकांच्या डोळ्यात कशाने पाणी येईल याची ही खात्री नसते." असे मनातल्या मनात म्हणत जुई स्वतःशीच हसली.

इथे येण्याआधी मी फक्त इथल्या मुली किती असुरक्षित आहेत हे ऐकलं होतं. बलात्कार, मुलींना विकणं, त्यांना गर्भात असतानाच मारणं, असे किळसवाणे प्रकार समजले होते. इथे आल्यावर ते अगदीच खोटे नाहीत हे मनोमन पटलं. घराबाहेर पडल्यापासून अंगावर पडणाऱ्या त्या विचित्र नजरा. कुठलीही स्त्री समाजात सुरक्षितपणे राहू शकत नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याबाबतीत आम्ही नशिबवान निघालो. निदान मुलगी म्हणुन जन्मलो म्हणुन कुठल्या गोष्टीला मुकावं लागत नाही. पण घराच्या आत मात्र या मुली खुप सुरक्षित आहेत एका वेगळ्या असपेक्ट मधून! तुम्ही सगळे मंजूची किती काळजी घेता ! तिला अडचणीमध्ये साथ द्यायला, तिची सुख दुख:, भावभावना ऐकून घ्यायला कोणी ना कोणी तरी असणारच घरात, पुढे मागे जर तिला तिच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल आयुष्यात काही छोटे- मोठे प्रॉब्लेम आले तर तिला सावरायला अनेकजण असतील." अँटीडिप्रेसंट गोळ्या घेणारे तिच्या ओळखीतले अनेक चेहरे जुईच्या डोळ्यासमोरुन चमकून गेले. या अशा कुटुंबातल्या मुलांचं आयुष्य ह्या अर्थाने कितीतरी सुरक्षितच होतं.

"आता मात्र मला परत घरी जायची ओढ लागली आहे. मला एकदम एवढ्या सगळ्यांमध्ये राहायची सवय नाही. त्यामुळे मधेच कधी एकदा घरी जाऊन मस्त एकटी आराम करेन, पुस्तक वाचत बसेन असे पण होते. माझ्या तिकडच्या मित्र मैत्रिणी, माझा पग सगळ्यांनाच आता भेटावं वाटतंय लवकर." नंदिनीकाकू म्हणाली, "हो गं, ते स्वाभाविक आहे. आता आम्ही इथे मुंबईत राहतो. उद्या एकदम छोट्या खेड्यात जाऊन राहायची वेळ आली तर नाहीच जमणार पटकन. लगेच इथे कशा सगळ्या सोयी आहेत हे आठवायला लागतं. आपल्याला सवय झालेली असते सगळ्याची. आम्हालाही वाटत होतं की तिकडे राहिलेली तू इकडे या आमच्या घरात कशी राहू शकशील, तुला हे पदार्थ आवडतील का? पण छान वाटलं तुम्ही दोघी आलात ते."

"इथे मी जे काही पाहिले, अनुभवले ते सगळे मी आता माझ्या मित्र मैत्रिणींना सांगेन. केवढे फोटो काढले आहेत मी. दरवेळी आजी भारतातून आली की आम्ही म्हणायचो, "काय गं तुझं भारत पुराण सुरु आपलं सारखं. तिकडे असं नि तिकडे तसं." यावेळी बहुतेक माझे फ्रेंड्स मला हेच म्हणतील." सगळे हसले. "माझी आजी खूष झाली याचा पण मला खूप खूप आनंद झाला. तुम्हाला पण वाटत असेल की आम्ही तिकडे सगळे दूरदूर राहतो, पण जशी मंजू आणि आदित्यची ही आजी आहे, तशीच माझी आजी पण माझी डीअरेस्ट आहे. आम्ही रोज सोबत राहत नसलो तरीही मिस करतोच सगळे. प्रत्यक्ष भेटता येत नाही तरीही संपर्कात असतोच. आणि तुम्हा सगळ्यांना खूप मिस करेन मी. पण आपण फेसबुक, जीमेल वरून संपर्कात राहूच." "हो, आणि मी परत कधीतरी येईन नक्की. काय आदित्य, फिरवणार ना तू मला त्यावेळी. यावेळी तुझ्या क्लासेस आणि कॉलेज मुळे जमले नाही तेवढे. तोपर्यंत मी बाईक वर बसण्याची पण हिम्मत करेन." आदित्यने अगदी जागच्या जागी उडी मारून होकार दिला. "म्हणजे काय, मंजुताई पेक्षा अजून काय काय ठिकाणं दाखवेन मी तुला. डन."

निघेपर्यंत गप्पा सुरूच राहिल्या. जुई आणि आजी परत जायला निघाल्या, मात्र जुईच्या मनाने आता परत कधीतरी यायचे नक्की केले होते. रात्री स्वप्नात तिला तिचा बॉयफ्रेंड तिला पुढच्या भारतभेटीत भेटणार आहे असेही दिसले. ती अजूनच एक्साईट झाली होती. आजीलाही सगळ्यांना भेटून बर वाटलं होतं. मंजूच्या आजीने दोघींच्या हातावर दही साखर दिली. गाडी विमानतळाकडे निघाली. अनेक सुखद आठवणी घेऊन जुई आणि माईआजीने सगळ्यांना बाय केले. दोघी बहिणींचे डोळे भरून आले होते. जुई तिने अनुभवलेला भारत परत परत आठवणीत साठवत होती. विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावलं होतं.

शेजारी बसलेल्या आजीचा हात हळुवार हातात घेऊन जुई म्हणाली.. "आजी, तुझ्या भारताच्या ओढीमागची कारणं आज मला कळतायत. Because your soul belongs to this beautiful land of loving people." यावर आजी मनापासून हसली. आणि नकळत त्यांच्या हातांची पकड घट्ट होत गेली.

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 10:55 am | चौकटराजा

मी माझ्या मुलीला नेहमी सांगत असतो ." आपल्या भोवती चांगल्या, खुल्या मनांचा राबता ही सर्वात मोठी संपती आहे !"
मायामी मधे स्थायिक झालेल्या माझ्या एक सहकारी महिलेने माझ्याशी आपणहून फेसबुक वर मैत्री आरंभली कारण तिला तिथ वाटणारे एकाकीपण ! टीपटाप रस्ता हवा , मॉल हवा पण त्यापेक्षाही यांत्रिकपणाला शरण न गेलेला माणूस फार महत्वाचा !
एरवी खोडकर, मिश्किल असणारीने ही तशी गंभीर कथा लिहलीय ! सुरेख !

वेगळ्या वळणाने जाणारी ओढाळ कथा.
विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य !

सखी's picture

24 Oct 2014 - 5:59 pm | सखी

वेगळ्या वळणाने जाणारी ओढाळ कथा.
विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य - हे आणि असेच म्हणते.

प्रभाकर पेठकर's picture

24 Oct 2014 - 10:27 am | प्रभाकर पेठकर

अत्यंत समतोल, हृदयस्पर्शी, बरंचसं वास्तव लेखन आणि सूक्ष्म निरिक्षणांनी भरलेली कथा ही कथा न राहता सर्वांचाच कधी न कधी घेतलेला स्वानुभव आहे. त्यामुळे कथेशी मनाने जुळणे नैसर्गिकपणे झाले आहे.
मधे मधे जरा पाल्हाळीक आणि भारतातल्या नकारात्मक गोष्टींमध्येच अडकल्यासारखी वाटली पण पुढे पुढे ही भावना विरळ होत गेली आणि सर्वाथाने.....

कथा भावली.

...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा?

हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.

पैसा's picture

24 Oct 2014 - 11:27 am | पैसा

...नाहीतर तुमचा भारत स्वच्छ होणार कसा?

हे वाक्य बाकी अस्वस्थ करून गेलं.

खरं आहे. वाचताना पटकन बोचतं, पण नंतर लक्षात आलं की लिहिणारीने ते अमेरिकेत जन्माला आलेल्या अमेरिकन मुलीच्या भूमिकेतून नीट, जाणीवपूर्वक लिहिलं आहे. भले या कथानायिकेचे आईवडील, नातेवाईक भारतीय आहेत पण तिचा देश भारत नाहीये. USA च आहे!

बोका-ए-आझम's picture

24 Oct 2014 - 6:17 pm | बोका-ए-आझम

छान! कथेपेक्षा हा विषय कादंबरीला जास्त साजेसा आहे. त्यामुळे मी क्रमश: हा शब्द शोधत होतो.

भाते's picture

24 Oct 2014 - 8:39 pm | भाते

किमान १० वेळा कथा/लेखन वाचल्यावर प्रतिक्रिया देत आहे.
वाचताना बऱ्याचदा अस्वथ व्हायला झाले. अनाहितांकडुन असे आणि यापेक्षा आणखी सुंदर लेखन वाचायला नक्की आवडेल.

अनाहिता संपादक मंडळ,
२०१५ चा पहिला 'अनाहिता दिवाळी अंक' समस्त मिपाकरांना वाचण्यास द्यावा हि नम्र विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Oct 2014 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांचं मनोगत शब्दात बरोबर पकडलं आहे. मात्र हे कमीतकमी दीर्घकथेचे कथाबीज नक्कीच आहे, त्यामुळे एकाच लेखात असलेली ही कथा भराभर पुढे जाते. हा प्रयोग पुढच्या वेळेस जास्त वेळ घेऊन केल्यास नक्कीच एखादी सुंदर लेखमाला तयार होईल.

या अनवट प्रकारच्या भविष्यातल्या लेखनाला अनेकानेक शुभेच्छा !

विशेषतः लेखनाची पद्धत पाहून इतकी यशस्वी कथानिर्मिती झालीय हे आश्चर्य !
+१०००, हे दोनदोनदा सांगितलेले नसते तर विश्वास बसणे कठीण होते !

काय मस्त वाटतंय ही कथा इथे वाचायला! ही कथा साहित्य घेण्यापासुन, बांधुन तयार होईपर्यंत आणि अाता ताटात घालुन इथे, सर्वजणींनी मिळुनमिसळुन केलेला प्रयत्न,छान जमुन आलाय.
अनाहिता विशेषांक येणारच!!

ऋषिकेश's picture

27 Oct 2014 - 1:12 pm | ऋषिकेश

कथा लांबली आहे, पण या प्रकाराच्या कथाप्रकारात हे स्वाभाविकही आहे म्हणा!

चांगला प्रयत्न.

सुचवणी: पुढिल कथा अमेरिकेतील भारतात स्थायिक झालेल्या आज्जीला व तिच्या भारतातच जन्मलेल्या नातीला अमेरिकावारी करवून आणा. (नॉस्टॅल्जिआ, ओढ आदी) भावना सेम फक्त स्थळसापेक्ष निरिक्षणं वेगळी आहेत हे लगेच जाणवेल

श्रीरंग_जोशी's picture

27 Oct 2014 - 11:30 pm | श्रीरंग_जोशी

कथा वाचून असे वाटलेच नाही की ती (केवळ) एका व्यक्तीने लिहिलेली नाहीये.

ऋषिकेश यांच्या सुचवणीस अनुमोदन.

बादवे 'ऐलमा पैलमा' या शब्दांबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.

कपिलमुनी's picture

28 Oct 2014 - 12:39 pm | कपिलमुनी

मस्त वर्णन !
आणि योग्य शेवट ( मेलोड्रॅमिक शेवट न ठेवल्याबद्दल अभिणंदन )
थोडा थोडा स्वदेस आठवला

अनन्न्या's picture

28 Oct 2014 - 6:36 pm | अनन्न्या

प्रतिक्रिया वाचून छान वाटले.

मधुरा देशपांडे's picture

2 Nov 2014 - 2:28 pm | मधुरा देशपांडे

आम्हा अनाहितांतर्फी सर्वांचे आभार. :)
@चौकटराजा काका, ही सगळ्यांनी मिळुन लिहिलेली कथा आहे. त्यामुळे ते सगळ्यांचे श्रेय आहे.
@पेठकर काका, "तुमचा भारत" लिहिण्यामागची पार्श्वभुमी पैसाताई म्हणाली तशीच. प्रोत्सहनासाठी धन्यवाद.
@बोका-ए-आझम, क्रमश: वाचायला आवडणार असेल तर लिहु की पुढचा भाग. हाकानाका.
@ऋषिकेश, तुमच्या सुचवणीबद्दल विचार करु. धन्यवाद.
@इए काका, भाते, श्रीरंग जोशी, कपिलमुनी अनेक धन्यवाद. अजुन नक्कीच अशा प्रकारचे लेखन करु.
@अजयाताई, स्नेहाताई, सखी, अनन्याताई, तुमचे प्रोत्साहन होतेच नेहमी. आता कथा इथे आल्यावर अजुनच मस्त वाटतंय. :)

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2014 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर

मधुरा,

पटलेलं नसलं तरी स्पष्टीकरणाचा स्विकार केला आहे.
दखल घेऊन भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.

दिवाळीच्या गडबडीत फक्त नजर टाकून गेलेले ...आज संपूर्ण वाचून मस्त वाटले ....नाव शोभतेय कथेला ...

सानिकास्वप्निल's picture

3 Nov 2014 - 1:12 pm | सानिकास्वप्निल

आज कथा वाचली आणि खूप आवडली.
मस्तं जमली आहे :)

इशा१२३'s picture

5 Nov 2014 - 4:17 pm | इशा१२३

कथा परत वाचली.सगळ्या अनाहितांनी आनंद घेत हि कथा पुढेपुढे नेली.लिहिताना मजा आली.इथे वाचुन अजुन आनंद झाला.

मोहनराव's picture

5 Nov 2014 - 5:48 pm | मोहनराव

कथा छान आहे.