मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स - भाग १‏

सखी's picture
सखी in भटकंती
12 Jul 2014 - 8:48 pm

बरेच दिवस घरातील सर्वांनाच कुठेतरी बाहेर जायचं होतं, कुठं ते नक्की ठरत नव्हतं. जुनच्या दुस-या/तिस-या आठवड्यापासुन इथं अमेरीकेत शाळांना सुट्ट्या लागतात, या वर्षी ४ जुलै अमेरीकेचा स्वातंत्र्यदिन शुक्रवारीच आला त्यामुळे बहुतेक कार्यालयांना एक सुट्टी मिळतेच, या सुट्टीचं विशेष म्हणजे हा दिवस ज्या दिवशी येईल त्याच दिवशी सुट्टी दिली जाते. बाकी सगळ्या सुट्ट्या या आठवड्याच्या अधेमधे आल्या तरी सोमवारी नाहीतर शुक्रवारी दिल्या जातात, उद्देश हा की लोकांना सलग ३ दिवसांचा मोठा विकांत मिळावा. त्यामुळे महीनाभर आधी प्लॅनिंग सुरु झाले आणि मिशिगन राज्यात इतकी वर्षे राहुन दरवेळेस मॅकीनॉ आयलंड (Mackinac दुसरा c चा उच्चार silent आहे) अजुन बघितलं नसल्याची खंत उफाळुन बाहेर आली. याच ठिकाणावर बहुमत झालं आणि हॉटलचे बुकींग एकदाचे झाले. तिकडे जास्त खाण्यापिण्याची विविधता किंवा पर्याय नाही हे मित्रमंडळींकडुन ऐकलं होतं त्यामुळे घरातुनच मेथीचे पराठे-चटणी-दही, तिखटमिठाच्या पु-या, आणि दुकानातुन गोळ्या, चिक्की, शेव असं काहीतरी तोंड हलवायला बरोबर बांधुन आम्ही गपपती बाप्पा मोरया करत निघालो.
मॅकीनॉ आयलंड हे हुरॉन (lake Huron) नावाच्या तळ्यावर वसलेलं आहे, हे तळं इतक मोठं आहे की त्याला समुद्रच म्हणता येईल. खाली नकाशात A जिथे दिसतयं ते मॅकीनॉ आयलंड आहे आणि उजवीकडे आहे ते हुरॉन तळं. मिशिगन राज्याची ऊत्तरकडेची बाजु ग्रेट लेक्स या नावाने ओळखली जाते कारण ती तीन मोठ्या तळ्यांनी वेढलेली आहे.

*

या बेटाचे वैशिष्ठ्य असे की या बेटावर १८९८ पासुन मोटर गाड्यांना परवानगी नाही. एका जागेहुन दुसरीकडे जायला साधने फक्त सायकल, घोडागाडी, लहान मुलांची बाबागाडी (stroller) आणि चक्क पायी चालणे. अपंग लोकांच्या व्हीलचेअर, आणि अँब्युलन्स, अग्निशामक दलाच्या गाड्या यांना अर्थातच परवानगी आहे. बेटावरपण एक मोठं हॉटेल आहे, आता सुट्टीमुळे सगळीकडचेच दर जास्त होते. हे ग्रॅन्ड हॉटेल प्रसिद्द तर आहेच आणि यावर हा सिनेमा पण आला होता. परत लेकव्ह्यु, सुट्ट्या वगैरे वगैरे मुळे खिशाला भोक नाही भगदाडच पडायचं त्यामुळे आम्ही दुसरीकडे हॉटेल बुक केले. आमच्या घरापासुन जवळपास पाच तास आम्हाला लागले मॅकीनॉ सिटीत पोचायला. हे शहर बेटाच्या अलिकडे आहे तिथे एका हॉटेलात उतरलो, बॅगा टाकल्या, हॉटेलच्या समोरच झाडांखाली पिकनिकसाठी बाकं (बेंचेस) होती, तिथेच मस्तपैकी जेवण केले.
बेटावर जाणारी बोट पकडण्यासाठी फेअरी स्टॅण्डवर ५-७ मिनिटे चालतच गेलो. बरेच हॉटेल्स शटलची सोयही ठेवतात की जी तुम्हाला फेअरी स्टॅण्डवर नेते पण आम्ही सगळे कारमध्ये बसुन कंटाळलोच होतो आणि हे फारसे लांबही नव्हते. बोटीचे तिकीट काढुन ५-१० मिनिटातच नंबर लागुन बोटीत चढलोसुद्धा, सुट्टी असल्याने सगळीकडे गर्दी जाणवत होती. काही लोकांनी त्यांच्या सायकली पण बोटीत चढवल्या या खरतरं तासावर बेटावर भाड्याने पण मिळतात. पण बरेच लोक त्यांच्या कारच्या मागे, टपावर चढवुन आणत होते, यासाठी बोटीवर वेगळे भाडं पण भरावं लागतं मला त्यांच्या या सगळ्या खटाटोपीचं कौतुक वाटलं. बेटावर सगळ्या गोष्टी महाग आहे हेही कारण असेल आणि कदाचित काही लोकांच्या खास प्रकारच्या सायकली असतात त्यावर त्यांचा जीव असावा असे दुहेरी कारण असावे. दिवस एकदम छान होता, मस्त ऊन पडलं होतं, बोटीला दोन मजले होते, आम्ही लगेच वरच्या मजल्यावर बसुन घेतलं की जिथुन पाण्याचा नजारा नीट दिसेल. बोटीत बसल्यावर आता सगळीकडे जाणवत होती ती पाण्याची आणि आकाशाची निळाई! जणुकाही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती मी तुझ्यापेक्षा अधिक निळा आहे याची.

बा.भ. बोरकरांची ही कविता आठवलीच, (माफ करा पण पूर्ण कविता देण्याचा मोह आवरत नाही).
एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा
दूर डोंगरातला एक जरा, त्याच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा, एक मखमली निळा
इंद्र निळा, त्याला एक गोड, राजबिंडा निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
असे नानागुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे
ज्यांच्यामुळे नित्य नवे घडे, तुझे माझे डोळे
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
अशा कालिंदीच्या काठी, एक इंदिवर निळा
आपणही होऊ निळ्या, करू त्याच्याशी रंग संग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे, रंग खेळतो श्रीरंग

*

बोटीने लांबुनच मॅकीनॉ पुलाचेपण दर्शन दिले.
*

१५ मिनिटात बोट मॅकीनॉ आयलंडला पोचली सुद्दा आणि हा प्रवास इतका लवकर का संपला असा प्रश्न पडला.

बेटावर पोचल्यावर लगेच डाउनटाउन लागतं तिथ बरीचं दुकानं आहेत, खुपशी सायकली भाड्याने घेण्यासाठी आणि जो इथला प्रसिद्ध चॉकलेट फज (Fudge) मिळतो त्याची आहेत, आम्हाला कुणाला फज फारसा आवडत नाही कारण जास्त गोड आणि एकदम मऊ वाटतो, शेवटी पसंद अपनी अपनी, कोण रे ते म्हणतयं गाढवाला गुळाची...
*.*

मग सगळ्यांनी मस्तपैकी आईसक्रिम घेतले, माझ्या लहान मुलाने (वयवर्षे जेमतेम ३) सांगुन टाकले त्याला आईसक्रिम अज्जिबात आवडलं नाही...कारण ते खूपच गार होतं :). तरीही स्ट्रॉबेरीच्या गुलाबी आणि पिस्ता आईसक्रिमच्या पिस्ता रंगाला भुलुन त्याने अर्धेमुर्धे खाल्लेच. तिथेच कॅरमल पॉपकॉर्नपण मिळत होते तेही घेतले बरोबर न्यायला.

*

अजुनही बरेच वेगवेगळ्या रंगाचे पॉपकॉर्न होते ते बघायला छान वाटत होते.

*

वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली ज्या भाड्याने मिळतात. यात छोट्या मुलाची सायकल वडीलांच्या सायकलशी जोडलेली आहे आणि आईच्या मागच्या बग्गीसारख्या गाडीत छोटे बाळही आहे, त्याला वरुन जाड जाळीचा पडदाही असतो.

*

घोडागाडीची रपेट मारता येते, पण गेल्यागेल्या मी पाहीलं, फक्त दोनच घोडे तगडे असले तरी काय झालं जवळजवळ २०-२५ लोकांना एका चढावर घेऊन चालले होते, माझ्याच पोटात ढवळल्यासारखं झालं आणि ही रपेट नकोच असं वाटलं.

*

गावात एक चक्कर मारुन आल्यावर एका छोट्या टेकडीवर लोक चटई टाकुन निवांत बसले होते, कोणी झोपले होते, आईसक्रिम न आवडणा-यानेपण तासभर झोपुन घेतलं. आम्हीही जरावेळ बसुन तो निवांतपणा अनुभवला. पूर्ण बेटाच्या कडेकडेने चालायला एक वेगळा फुटपाथ आणि सायकली आणि घोडागाडी यांना मुख्य रस्ता आहे म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक जरी केलं तरी तुम्हाला बहुतेक सर्व बाजुच्या पाण्याचं दर्शन होतं.

*

नंतर बीचकडे गेलो, इथे पोहायला बंदी होती, फक्त कडेला जाऊन बघु शकता, आणि कितीही वेळ बसु शकता. तिथे बरेच लहान खडे होते त्यात खुपश्या मुलांचा आणि मोठ्यांचाही खेळ चालु होता. मागे परत काही बेंचेस होते आम्ही आता इथेच थांबायचे ठरवले कारण सात वाजले होते आणि ४ जुलैची फटाक्यांची आतषबाजी (फायरवर्क्स) बघायची होतीच. ही एकच अशी मोकळी जागा दिसली जिथे नीट दिसेल. पाण्याचा आवाज फार सुखावह होता, लाटा एकावर एक येत होत्या. इथे दोन बाजुने लाटा आलेल्या लक्षात आल्या, कधीकधी त्यांचा काटकोन होउन जायचा, त्याचा फोटो नीट आलाच नाही.
आम्ही संध्याकाळचं जेवणही तिथेच पिझा/बर्गर एका छोट्या हॉटेलातुन आणुन घेतलं सध्या इथे उन्हाळा असल्याने सुर्यास्त रात्री नऊ-सव्वानऊच्या सुमारास होतो. छान संध्याकाळ होती तरी आता वेध लागले होते ते फायरवर्क्सचे! त्यासाठी जरातरी अंधार पाहीजे, आमच्या आजुबाजुला आता भरपुर गर्दी झाली होती, लोकांनी सगळे बेंचेस भरुन गेले होते, लोक चटई, ब्लॅकेंट्स टाकुन गप्पा मारत होते, खात होते, पित होते. मुलं इकडंतिकडं बागडत होती, काहींकडे फुलबाज्या होत्या. मधेच एकदा एक छोटी मिरवणुक मागच्या रस्त्यावरुन गेली त्यात सैन्यात असलेले काही लोक होते त्यांनी दोन्ही बाजुने अमेरीकेचा मोठा झेंडा आडवा धरला होता आणि त्यांच्यामागे अग्निशामक दलाचा ट्रक हळुहळु येत होता. ब-याच लोकांनी उभं राहुन टाळ्या, शिट्या वाजवुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दहा वाजुन गेले तसा आमच्यातला ब-याचजणांचा धीर सुटु लागला, शेवटची बोट अकरा वाजता सुटणार होती, माझ्या सासुबाईपण आमच्याबरोबर होत्या त्यांना टेंशन होते की इतक्या लोकांना पुरेल इतक्या बोटी नसतील तर आपल्याला परत जायला जागा मिळेल काय? मी मात्र अजुन पाच मिनिटं वाट बघु करुन थांबवुन ठेवत होते कारण इतका वेळ वाट बघुन गेल्यावर नंतर तेच लक्षात राहील, नशिब यावेळेस नव-याचही हेच मत असावं. शेवटी निर्णायक सांगितलं साडेदहाला नाही झाले सुरु तर आपण जाऊया परत, आणि १०:२८ ला धाड धाड धाड आवाज आला, पहील्या काही सेंकदातच डोळ्यांच पारणं फिटलं, माझी लेकही म्हणाली बरं झालो थांबलो इट वॉज वर्थ वेंटींग!

*
*

ही आतषबाजी बघताना मला फक्त तेच आवडतं असं नाही तर ते सगळं वातावरणच छान असतं, इतक्या गर्दीने लोकं रात्रीची उशिरापर्यंत बाहेर असणं, उन्हाळाच्या मुलांना सुट्ट्या त्यामुळे नकळत एक ताण सैल झालेला असतो, दुर्मिळीने मिळणारी दिवसभराची गरम हवा किंवा अशा रात्री किंचीतच असणारी थंडी, लोकांनी लपेटुन घेतलेली ब्लॅकेंटस, आणि एक एक आतषबाजी बघतानाचे निघणारे आ$$$ असे कोरस उद़्गार, सगळचं विलोभनीय. दहा मिनिटे हे बघुन समाधानाने आम्ही बोटीच्या दिशेने निघालो अजुन थोडावेळ आतषबाजी चालु रहाणार होती, पण बोटीवर चढायला फार लांब रांगेत उभं रहायला नको या हेतुने आम्ही निघालो.

रात्रीचे पाणी निळे दिसले नाही तरी तेही देखणे होते आणि पुलही दिमाखपणे उभा होता.

*

बोटीने फेअरी स्टेशनवर सोडल्यावर आम्ही चालतच हॉटेलकडे निघालो. सगळेच दमले होते, रुमवर गेल्यावर कपडे बदलुन सगळेजणच झोपेच्या अधीन झाले उद्या ताहकीमेननचे धबधबे आणि पिक्चर्ड रॉक्स कसे असतील याची स्वप्नं बघत.
तळ टीपा:
१. यातले निळ्या पाण्याचे आणि आतषबाजीचे फोटो आम्ही काढले होते, इतर मी जालावरुन घेतले आहेत.
२. या लेखासाठी मधुरा देशपांडेने मला चांगल्या सूचना केल्या, माझ्या अनेक प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यामुळे औपचारीकता म्हणुन नाही तर कृतज्ञता व्यक्त करायची म्हणुन मी तिची खूप आभारी आहे.

प्रतिक्रिया

एस's picture

12 Jul 2014 - 8:52 pm | एस

मस्त फोटो आणि तितकेच छान वर्णन...

मधुरा देशपांडे's picture

12 Jul 2014 - 9:06 pm | मधुरा देशपांडे

छान लिहिले आहेस. मुख्य सगळं तूच लिहिलंस आणि. एक दोन शब्दांपलीकडे माझं काही नाही त्यात. तेव्हा आभार वगैरे कसले त्यात.. फोटो पण मस्तच.

यशोधरा's picture

12 Jul 2014 - 9:10 pm | यशोधरा

अशा कालिंदीच्या काठी, एक इंदिवर निळा >> क्या बात! :)
मस्त लिहिले आहेस! एकदम आवडले. :)

थॅंक्स यशो, खरतर तुझ्या 'लिही' या प्रतिसादानेही पाठबळ दिलं लिहायचं. :)
हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले. :)

खटपट्या's picture

12 Jul 2014 - 10:31 pm | खटपट्या

छान फोटो आणि वर्णन !!!

अरे वा!! तुमच्याकडे ४ जुलै साजरा झाला म्हणायचा! फोटो आणि वर्णन छान आहे.
आमच्याकडे पावसामुळे आतषबाजी बघायला मिळाली नाही. ३ तारखेला काही ठिकाणी केली असे ऐकले.

वाह सुंदर ! कविता तर अप्रतिम …

इकडच्या भटकंतीत जागा किती सुंदर आणि स्वच्छ हे तू म्हणालीस तसं सगळ्यांना नवीन वाटणार नाही . पण अशा ठिकाणी आलो आणि आजू बाजूचा सौंदर्य बघून चटकन एखादी कविता आठवते , एखादं जुनं गाणं पिछा सोडत नाही. मला वाटतं हे फिलिंग तू सुंदर मांडलंस .

सखी, आवडली तुझी भटकंती !और भी आने दो !!

मदनबाण's picture

13 Jul 2014 - 9:39 am | मदनबाण

आवडेश ! :) भाग २ ची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*

दिपक.कुवेत's picture

13 Jul 2014 - 11:53 am | दिपक.कुवेत

छोटासा, आटोपशीर सहलीचा वृत्तांत फोटोसहित आवडला. दिव्यांनी झगमगणार्‍या पुलाचा फोटो तर विशेष आवडुन गेलाय. अजुन अशीच भटकंती येउदे.

स्वाती दिनेश's picture

13 Jul 2014 - 2:02 pm | स्वाती दिनेश

छान वर्णन, आणि फोटो!
भाग २ च्या प्रतिक्षेत,
स्वाती

मितान's picture

13 Jul 2014 - 4:25 pm | मितान

वा वा ! काय मस्त वाटलं हे वाचून ! निळाईने डोळे निवले ते वेगळंच ! फ्रेश झाले एकदम. :)
अजून लिही.

मराठे's picture

13 Jul 2014 - 9:15 pm | मराठे

सुंदर! पुढचा भाग कधी?

मस्तच!निळे निळे फोटो विषेश आवडले!!

सूड's picture

14 Jul 2014 - 10:25 am | सूड

मस्तच!!

स्वॅप्स, मधुरा, यशोधरा, खटपट्या, रेवती, स्रुजा, अजया, मदणबाण, अ.आ., दिपक.कुवेत, स्वाती, मितान, मराठे, इशा१२३, सूड तुम्हा सर्वांचेच आभार!
पुढचा भाग टाकनेच लवकर :)

रायनची आई's picture

14 Jul 2014 - 5:06 pm | रायनची आई

खुप छान लिहिलय्..निळाई चे फोटो बघून तर डोळे निवले..अस वाटल की आपल्या देशात पण लहान मुलाना घेउन जायला शहराच्या जवळपास अशी एखादी प्रदूषणमुक्त , निवांत जागा का नाही? जिथे गाड्यांच्या भीती शिवाय मुले साइकल चलवू शकतील, धावू पळु शकतील, बागड्तील...

पिलीयन रायडर's picture

14 Jul 2014 - 5:39 pm | पिलीयन रायडर

छान लिहीलय.. फोटो सुद्धा छान! पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

माझीही शॅम्पेन's picture

14 Jul 2014 - 7:17 pm | माझीही शॅम्पेन

वाह छान तुमचा मुक्काम डेट्रॉइट मध्ये का ?
तस असेल बरेच वेळा मी भारतातून डेट्रॉइटल येतो , कधीतरी सर्व मराठी जनाचा कट्टा करता येईल

माझीही शॅम्पेन's picture

14 Jul 2014 - 7:18 pm | माझीही शॅम्पेन

वाह छान तुमचा मुक्काम डेट्रॉइट मध्ये का ?
तस असेल बरेच वेळा मी भारतातून डेट्रॉइटल येतो , कधीतरी सर्व मराठी जनाचा कट्टा करता येईल

प्यारे१'s picture

14 Jul 2014 - 7:54 pm | प्यारे१

छान लिहीलंय!

'प्रोसेस्ड' निळाई तर नाही ना असा प्रश्न पडलाय!

मस्तानी's picture

14 Jul 2014 - 8:05 pm | मस्तानी

सखी … तू म्हणालीस कि "हे वर्णन अमेरिकतल्या लोकांना कदाचित विशेष वाटणार नाही, पण इतरांना थोडेफार वाटेल असे वाटुन (जर जास्तच?) लिहीले गेले." … अगं, तू खरच खूप छान लिहिलं आहेस. या दोन्ही जागा पाहिल्या असल्याने बोरकरांची कविता किती चपखल आहे त्या निळाईचे वर्णन करायला हे मनापासून पटलं.

पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे, त्याबद्दल तू लिहिलेलं वाचायला आवडेल. (मी केला होता एकदा छोटासा प्रयत्न :)

पुनःश्च धन्यवाद रा.आई, पिरा, माझीही शॅम्पेन, प्रशांत आवले.

रा.आई - अगदी भावना पोचल्या, मागे एकदा चीनमधल्या प्रदुषणाबद्दल एक बातमी वाचली होती, ती आठवली.
माझीही शॅम्पेन - येस! यु गेस्ड इट राईट! खरचं एकदा जंगी कट्टा करायला हवा, या पुण्या-मुंबई-जर्मनी लोकांची कट्टावर्णन ऐकुन इनो तरी किती घ्यायचा माणसानं. तुम्ही पुढच्या वेळी कधी येणार ते कळवा फक्त.

प्रशांत आवले - नाही हो निळाई अजिबात प्रोसेस्ड नाही त्यामुळे अगदी वेडावलं मन तिथं गेल्यावर.

माझीही शॅम्पेन's picture

14 Jul 2014 - 9:25 pm | माझीही शॅम्पेन

हो नक्कीच मी काही दिवस ट्रॉय आणि काही दिवस आबर्न हिल्स होतो ,

सध्या ब्रज़िल >> भारत >> इटली >> अमेरिका (आबर्न हिल्स) असा क्रम आहे :)

अरे वा! म्हणजे खूप लांब नाही, तुमचं जागतिक भ्रमण झालं की कळवा :)

मस्तानी - धन्यवाद गं, आपले दोघींचे प्रतिसाद एका वेळेस पडल्याचे दिसतयं त्यामुळे तुझा प्रतिसाद आधी वाचला नव्हता. पिक्चर्ड रॉक्स चं निसर्गसौंदर्य वेगळंच आहे - हे अगदी खरयं, तुझाही प्रयत्न आवडला.

प्रचेतस's picture

15 Jul 2014 - 1:42 pm | प्रचेतस

मस्त फोटो आणि वर्णन.

सखी's picture

15 Jul 2014 - 11:03 pm | सखी

धन्यवाद वल्ली.

रामपुरी's picture

15 Jul 2014 - 10:45 pm | रामपुरी

"त्या" सदरासाठी चपखल लेख. मनोरंजक प्रतिक्रियांचा नुस्ता खच

"त्या" सदरासाठी चपखल लेख. मनोरंजक प्रतिक्रियांचा नुस्ता खच -- म्हणजे काय? का गल्ली चुकलं हे प्रतिसाद?

मुक्तपीठीय लेख म्हणायचं असावं.
द्या की सोSSSडून म्हणतो मी!

रामपुरी's picture

16 Jul 2014 - 2:33 am | रामपुरी

तुमीच नाव सांगूSSन टाकलं नाही काय ते :D

सखी's picture

16 Jul 2014 - 2:44 am | सखी

धन्यवाद प्यारे खुलाश्याबद्दल.
सोडूsssनच दिलं होतं की वो म्हणताना आलाच ना ते तीट लावायला.