ड्रेस्डेन - प्राग - ४ (अंतिम)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
5 Jul 2014 - 2:56 pm

ड्रेस्डेन - प्राग - १
ड्रेस्डेन - प्राग - २
ड्रेस्डेन - प्राग - ३

सहलीचा शेवटचा दिवस उगवला. सॅक्सॉन स्वित्झर्लंड हा ड्रेस्डेन पासून अंदाजे पाउण तासावर असणारा परिसर. एल्बं नदी, आजूबाजूचे डोंगर, आणि वर्षानुवर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून, झीज होऊन तयार झालेले उंचच उंच खडक असा हा परिसर. अठराव्या शतकात स्वित्झर्लंड मधले दोन कलाकार त्यांच्या काही कामासाठी जेव्हा या भागात आले, तेव्हा त्यांना दूरवर हे डोंगर दिसले. हा निसर्ग आणि हे डोंगर त्यांना त्यांच्या मायभूमीशी साधर्म्य साधणारे वाटले. म्हणून त्यांनी या परिसराला आधी जर्मन स्वित्झर्लंड नाव दिले. कालांतराने त्याची ओळख सॅक्सॉनी हे या राज्याच्या नावावरून सॅक्सॉन स्वित्झर्लंड अशी झाली. या परिसरातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे बास्टाय (Bastei). हजारो वर्षांपूर्वी झीज होऊन तयार झालेली ही उंचच उंच अशा खडकांची रांग. येथील अद्भुत निसर्गाने अनेक चित्रकारांना आपल्याकडे आकर्षित केले. त्याचबरोबर अनेक साहसी लोकांसाठी रॉक क्लाइम्बिंग करता हा परिसर प्रसिद्ध होता. राथेन (Rathen) हे या ठिकाणच्या पायथ्याचे गाव. नदीच्या एक काठावर हे गाव आणि दुसऱ्या काठावर बास्टाय. गाडीने या ठिकाणी पोहोचलो. इथपर्यंत येण्यासाठी ड्रेस्डेन हून ट्रेन देखील आहेत. ट्रेन किंवा गाडीने येउन पुढे नदीच्या पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी फेरी आहे.
राथेन चा पायथा आणि फेरीतून दिसणारा परिसर.

https://lh4.googleusercontent.com/-erG0yxSeomQ/U7e_wI3gDiI/AAAAAAAADPk/AwaEMlWGy7o/w866-h577-no/DSC_0186.JPG

इथे नदीचे पात्र फार मोठे नाही. लगेचच दुसऱ्या बाजूला पोहोचलो. पुढे वरपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहेत. एक पायऱ्यांचा मार्ग आहे, काही वेगवेगळ्या अंतराचे चढत जाण्याचे मार्ग आहेत. याविषयीची सगळी माहिती लिहिलेले फलक आहेत. आम्हाला वेळेचा अंदाज घेता पायऱ्यांचा मार्ग सोयीचा होता. त्याप्रमाणे निघालो.
सकाळी लवकरची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती. एकीकडे वाहत जाणारी एल्बं नदी, तिच्या तीरावर वसलेली कौलारू घरे, दूरवरची शेतं आणि एका बाजूला उंचच उंच खडक. थोड्या थोड्या अंतरावर आजूबाजूचे बघण्यासाठी जागा केलेली आहे. मधेच एखादा उंच खडक. त्यावर पुन्हा चढून जाण्यासाठी पंधरा वीस पायऱ्या, अरुंद वाट आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य. त्यात भर म्हणून दूरवर दिसणारी रेपसीड ची शेते आणि वरून मधूनच डोकावून जाणारा सुर्य. आजूबाजूला सगळी जर्मन वानप्रस्थाश्रमी मंडळी, काहींच्या सोबत त्यांची नातवंडे, काही आज्यांचा ग्रुप, त्यांची चालणारी खुसुर फ़ुसुर आणि या सगळ्यांचा उत्साह बघून आनंदित झालेलो आम्ही. मधेच अशा दुसऱ्या ठिकाणाहून दिसणारे पर्यटक. अशा अनेक जागांवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळून परत पुढचा मार्ग सुरु.

https://lh5.googleusercontent.com/-2KpX0B7a1tg/U7e_xI1B2nI/AAAAAAAADPw/LPDuRaFBtnM/w866-h577-no/DSC_0198.JPG

https://lh5.googleusercontent.com/-nWtr-Q44ejs/U7e_-bAQbuI/AAAAAAAADP4/kgmxlcUQJBI/w866-h577-no/DSC_0214.JPG

राथेन स्थानकाहून नुकतीच निघालेली ट्रेन. ड्रेस्डेन प्राग हा लोहमार्ग या भागातून जातो.

https://lh6.googleusercontent.com/-fai_JURXzPA/U7fACceVLlI/AAAAAAAADQA/LnIcqRJoZWU/w866-h577-no/DSC_0222.JPG

हळूहळू हे खडक अधिकाधिक दिसू लागतात. जवळ दिसू लागतात. चढत चढत वर पोहोचलो की वर लागतो तो हा बास्टाय पूल. अशा अनेक खडकांना एकत्र बांधण्यासाठी आधी येथे लाकडी पूल बांधला गेला. १८५१ साली हा पूल पुन्हा ने नवीन बांधण्यात आला.
पुलाची सुरुवात.

https://lh4.googleusercontent.com/-HPDUfWev0Qk/U7fAD78FVtI/AAAAAAAADQI/mMuJqabgxlk/w385-h577-no/DSC_0226.JPG

पुलावरून दिसणारे दृश्य आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे पर्यटक.

https://lh3.googleusercontent.com/-ZcIY_Nn-3G8/U7fAK7rk1II/AAAAAAAADQQ/MrDMHrYeHjw/w866-h577-no/DSC_0238.JPG

https://lh5.googleusercontent.com/-Q4X5tQRCuTY/U7fAS4rKwvI/AAAAAAAADQY/W6JJWJDZ3TY/w866-h577-no/DSC_0240.JPG

इथेच एक किल्ला होता जो नामशेष झाला. तिथून अजून वेगळा नजारा दिसतो म्हणून या एवढ्या भागात जाण्यासाठी नाममात्र तिकीट आहे. उर्वरीत संपूर्ण परिसरातला प्रवेश विनामूल्य आहे. इथे काही छोटे पूल बांधले आहेत.

https://lh6.googleusercontent.com/--i4a-XY3Sns/U7fA1N3yf9I/AAAAAAAADRQ/KMvu2ea3KCg/w866-h577-no/DSC_0285.JPG

किल्ल्याच्या बाजूने दिसणारा बास्टाय पूल.

https://lh3.googleusercontent.com/-cyKkswtpDzY/U7fA1mqFyLI/AAAAAAAADRY/Y2F5a4q_Kng/w866-h577-no/DSC_0291.JPG

अंधश्रद्धा जगात सगळीकडे आहेत हे पुन्हा बघायला मिळाले. पुलावर उभे राहून दोन फुट पलीकडे असणाऱ्या या कपारीत पैसे गेले तर इच्छा पूर्ण होते म्हणून अनेक लोक नशीब आजमावत होते. बाकी ठिकाणी पै पै चा हिशोब ठेवणारे जर्मन्स, इथे मात्र सढळ हस्ते दान करीत होते. आमच्या समोर तरी कुणाचेही पैसे तिथे पडले नाहीत.

https://lh4.googleusercontent.com/-N91c8XCu7nU/U7fAnLWoFfI/AAAAAAAADQ4/-EeLhn2P8l0/w866-h577-no/DSC_0278.JPG

पुलावरून पुढे गेलो की पुन्हा प्रत्येक बाजूने वेगळे खडक आणि या पुलाचा वेगवेगळ्या उंचीवरून देखावा दिसतो.

https://lh3.googleusercontent.com/-d27rEJ9LDYo/U7fAYCkzJcI/AAAAAAAADQg/8gMM7b3rf6c/w866-h577-no/DSC_0263.JPG

https://lh3.googleusercontent.com/-4KQldCtKnh0/U7fAaFAHV3I/AAAAAAAADQo/6E6mIAOe9Po/w866-h577-no/DSC_0266.JPG

वेगवेगळ्या बाजूने सगळा परिसर बघून झाला. आता घरी परतण्याची वेळ झाली होती. इथपर्यंत चढून मग परत उतरायला सुरुवात केली.

https://lh6.googleusercontent.com/-LUU_FeXudJ8/U7fAjsZAGTI/AAAAAAAADQw/CvelMcAMv7s/w866-h577-no/DSC_0271.JPG

खाली उतरलो आणि फेरीने नदीच्या अल्याड येउन गाडीने परत घराचा रस्ता धरला.

खास युरोपीयन पर्यटन स्थळांमध्ये तेवढे नाव नसलेले पण भावून टाकणारे ऐतिहासिक ड्रेस्डेन, अतिप्रसिद्ध पण थोडी निराशा करणारे प्राग आणि विदेशी पर्यटकांसाठी अगदीच अनभिज्ञ असा बास्टाय परिसर बघून परतीचा प्रवास सुरु झाला. चार दिवसांच्या सुट्ट्यांचा शेवटचा दिवस म्हणून रस्त्यांवर गाड्यांची जत्रा भरली होती. एकीकडे रेपसीड ची शेते आणि पवनचक्क्या सोबतीला होत्या. एक आठवणीत राहील अशी सफर संपली आणि सोबतच ही लेखमाला सुद्धा...

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Jul 2014 - 3:02 pm | यशोधरा

किती देखणा आहे बास्टाय परिसर! फोटो फार सुरेख आलेत आणि लिहिलेसही मस्त.
ह्या लेखमालिकेसाठी आभार. पुन्हा अशीच कोणती नवी एखादी लेखमाला घेऊन येशीलच. :)

दिपक.कुवेत's picture

5 Jul 2014 - 8:52 pm | दिपक.कुवेत

परत अशीच एखादि मस्त लेखमाला येउदे.

स्वाती दिनेश's picture

5 Jul 2014 - 5:42 pm | स्वाती दिनेश

छान परिसर, चित्रे आणि लेखनही..
अवांतर- ड्रेस्डेनची खासियत असलेला ड्रेस्डनर ष्टोलन मिळाला का? अर्थात आत्ता सिझन नाहीये म्हणा..पण ख्रिसमसच्या सुमारास तो जर्मनीभर मिळतो.जरुर खा.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2014 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम मस्त झाली लेखमाला... या लेखतलं बास्ताय विशेष आवडलं !

पुलेप्र.

छानच आहे हे बास्टाय. फोटो आणि वर्णन नेहेमीसारखच मस्त .

सुरेख फोटू व लेखन. नजर हलू नये असा देखावा म्हणजे चित्र क्र. २. याचे ग्रिटींग कार्ड बनवलेत तर मस्त दिसेल. या भागातील सर्व फोटूंना १०० पैकी १०० गुण! लेखमालेसाठी धन्यवाद!

चौकटराजा's picture

6 Jul 2014 - 7:17 am | चौकटराजा

सवडीने नॉर्वे ही पहा तिथे Preikestolen हा स्पॉट असाच काहीसा आहे. चारशे फुटावरून नदीत उडी मारायची सोय (?) आहे .

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 1:19 pm | प्यारे१

आटोपशीर सहल नि फोटो आवडले.

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 5:43 pm | मुक्त विहारि

चारही भाग एका दमात वाचून काढले.

छान लिहिले आहे.

अद्भुतरम्य निसर्गाची करामत!
एवढी स्वच्छ नदि, काठावरची हिरवळ व घनदाट झाडी पाहून फार फार कौतुकच वाटते जर्मन लोकांचे.
आमची एवढि छान सहल घडवून आणल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

6 Jul 2014 - 11:59 pm | चित्रगुप्त

एकदम झकास.

खटपट्या's picture

7 Jul 2014 - 5:17 am | खटपट्या

फोटो अतिशय सुन्दर !!!

मदनबाण's picture

7 Jul 2014 - 6:26 am | मदनबाण

सुरेख लेखमाला... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2

मधुरा देशपांडे's picture

9 Jul 2014 - 3:14 pm | मधुरा देशपांडे

यशो, दिपक, स्वातीताई, रेवाक्का, इस्पीकचा एक्का काका, अजया, चौकटराजा, मुवि काका, चित्रगुप्त काका, प्रशांत आवले, खटपट्या, मदनबाण, आयुर्हित, सगळ्यांना धन्यवाद.
यशो आणि दिपक, हो अगदी चारच दिवसांची सहल होती. जमेल तसे लिहीन नक्की इतर ठिकाणांविषयी.
स्वाती ताई, ड्रेस्डनर ष्टोलन नाही मिळाला. :(
रेवाक्का, फोटो सगळे नवऱ्याने काढलेत. :)

सूड's picture

9 Jul 2014 - 3:21 pm | सूड

आवडला हाही भाग !! :)

सखी's picture

9 Jul 2014 - 11:09 pm | सखी

हा भाग आणि लेखमाला आवडली असेच म्हणते, फोटो खरचं खूप देखणे आलेत या भागातले.

मधुरा देशपांडे's picture

9 Jul 2014 - 11:39 pm | मधुरा देशपांडे

सूड आणि सखी, धन्यवाद.

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:06 pm | पैसा

मस्त लिखाण आणि फोटोज!