धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक

जागु's picture
जागु in भटकंती
24 Jun 2014 - 12:36 am

ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला.

इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती. बर्फाचे डोंगर, बर्फात खेळणे, मस्त थंडी, झाडाला लागलेले सफरचंद, काश्मिरी ड्रेस अशा स्वप्नांचे तरंग वारंवार डोळ्यासमोर उमटून गारवा येत होता. काश्मिरला जायचे दिवस जवळ आले तसे नेण्यासाठी लागणार्‍या सामानाची जुळवा जुळव चालू झाली. सगळ्या ओळखीच्या लोकांकडून अनुभवी व बिनअनुभवी सल्ले येऊ लागले. कोणी म्हणे तिथे खुप थंडी असते तर कोणी म्हणे आपल्या सारखेच वातावरण असते. पण आम्ही थंडीच्या कपड्यांची जास्त जुळवाजुळव केली. आमची, दोन्ही मुलींची सगळ्या किरकोळ आजारांवरील आठवतील तशी औषधांची एक छोटी बॅग भरायला सुरुवात केली. पिल्लावळ तर खुपच उत्सुक झाली होती. दोन दिवस जायला बाकी होते आणि नेमकी छोट्या राधाला ताप यायला सुरुवात झाली. मन थोडे विचलीत झाले. इथे उन तर तिथे थंडी. तिथे हिला अजुन त्रास तर होणार नाही ना? प्लॅन कॅन्सल करावा का? माझ्या मनातला निसर्गमय कोपराही मधूनच डोकावत होता. त्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे औषधाने फरक पडत होता. मिस्टरांनी व इतर सगळ्यांनीच धीर दिला की इथल्या उष्णतेमुळे होणारा त्रास तिथल्या थंड वातावरणात कमी होईल. आदल्या दिवशी डॉक्टरांनीही ग्रीन सिग्नल दिला. रात्री १.५ वाजे पर्यंत उरले सुरले सामान बॅग मध्ये भरण्याचे काम चालूच होते. खरे तर राधाची काळजी व सकाळी लवकर जाण्याच्या विचारांनी झोपच लागत नव्हती.

इतर दिवशी ९ वाजता उठणार्‍या माझ्या मुली काश्मिरला जायचेय (राधासाठी बाहेर फिरायला जायचेय) ऐकताच पहाटे ४ वाजता उठल्या व उफाळून आलेल्या आनंदात भराभर तयारीही केली. राधा फ्रेश वाटतेय हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. सकाळी ९ ची फ्लाईट होती ७ वाजता एअर पोर्टवर पोहोचायचे होते त्यामुळे घरातून ५.३० ला घराला व घरातील मंडळींना टाटा करुन निघालो. एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही भा़ड्याची सुमो केली होती. त्यात सगळ्यांचे सामान बांधून गणपती बाप्पा मोरया चा नारा चढवून आम्ही एअरपोर्टवर बरोब्बर पावणेसातला पोहोचलो. विमानतळावर येणारी-जाणारी विमाने पाहण्यात श्रावणी-राधा गुंग होत्या. तिथले सगळे सोपस्कर पूर्ण करुन आम्ही विमानात बसलो व ९ वाजता आमचे विमान सुटले. विमान व्हाया अमृतसर होते. अमृतसरच्या विमानतळावर उतरत असताना कुठे सुवर्णमंदीर दिसते का ह्याचा शोध आम्हा सगळ्यांच्या सुप्त नजरा घेत होत्या.
अमृतसर वरून निघून साधारण २ वाजता आमचे विमान श्रीनगरला पोहोचले.

खाली उतरता उतरताच कोणीतरी ओरडल तो बघा बर्फाचा डोंगर. दूरवर बर्फाच्छदीत डोंगर चमकताना दिसत होता. तो पाहताच वॉव, आहाहा, मस्तच असे उद्गार सगळ्यांच्या तोंडी डोंगराप्रमाणेच उंचाऊ लागले. तिथे काळ्या ढगांनी आभाळ भरून आल होत. गार गार वारा हिंदोळे घेत होता. आमच्या स्वागतासाठी काश्मिरच्या गार वर्षाबिंदूंची बरसात होणार होती.

मुंबईच्या गरम वातावरणामुळे आम्ही साधे कपडे घालूनच गेलो होतो. पण श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्याबरोबर थंडीने कुडकुडू लागलो. राधाला मी लगेच शॉल मध्ये गुंडाळून घेतले. श्रावणीला मफ्लर गुंडाळून दिला. इझी गो ट्रॅव्हलचा ड्रायव्हर आमची वाट पाहत विमान तळावर थांबला होता. कुडकुडत्या थंडीतही मी तिथला निसर्ग न्याहाळत होते. गाडीत जाउन बसल्यावर जरा थंडी कमी जाणवू लागली.

आम्ही घेतलेल्या पॅकेजनुसार आम्ही पहिले दोन दिवस श्रीनगरमध्ये दल लेक मधील हाउसबोट मध्ये राहणार होतो. मुले तर फारच उत्साही होती हाउसबोट साठी. श्रीनगर विमानतळावरुन आम्ही दल लेकच्या दिशेने निघालो. तेंव्हा मला लगेच जाणवले आपल्या निसर्गापेक्षा कितीतरी वेगळा हा निसर्ग आहे. हवा, पाणी, दगड, झाडे सगळ्याचे दृष्टीने. महाराष्ट्रातून फिरताना जशी आपल्याला जागोजागी आंबा, फणस, काजू, चिंचेची झाडे दिसतात तशी इथे अ‍ॅप्पल, आक्रोडची झाडे होती. आपल्या महाराष्ट्रात जशी सोनमोहोर, पर्जन्य वृक्षाची झाडे दिसतात तशी इथे भले मोठे बुजुर्ग चिनार वृक्षाची झाडे दिसत होती. अर्थात ह्या दिवशी मला ह्या झाडांची नावे कळली नव्हती. ती पुढे हळू हळू कळली. महाराष्ट्रात जास्वंदीची झाडे जशी कुंपणाला फुललेली असतात तशी इथल्या घरांच्या समोर झुबक्यांनी आलेली गुलाबाची मोठ्ठी मोठ्ठी फुले दिमाखात आपल्या काश्मिरचे सौंदर्य दरवळवत होती. मध्ये मध्ये तर काही बारीक पिवळी फुलेही डुलत होती.

दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. गाडीतून उतरलो तेंव्हा जाणवले की विमानतळावरील थंडी अजून आनंदात उफाळून आमच्याबरोबर येऊन स्वतःचा आनंद द्विगुणीत करत आहे. बच्चे कंपनीने थंडीवर मात करत हौसेवर ताबा मिळवला. राधा पण शिकारातून हाऊसबोट पर्यंत जाताना मम मम करत आपला आनंद व्यक्त करत होती. शिकारा चालवणारे सकळेच कश्मिरी त्यांच्या गोड भाषा शैलीचा वापर करतात. अगदी आदराने आणि आपलेपणाने आपल्याशी बोलतात. त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य बसलेल असत ते आम्हाला मजेशीर वाटल. साब "कश्मिर का मौसम और बंबई का फॅशन का कुछ अंदाजा नही लगा सगते वज मिनटोमे बदल जाता है."

दल लेक

पाउस पडून गेल्याने तापमान खुपच थंड झाले होते. वातावरणही ढगाळच होते. कुडकुडत आम्ही हाउसबोट मध्ये जाऊन हाउसबोटमधल्या रुमचा ताबा घेतला.

हाऊसबोट

हाउसबोट मध्ये गेल्यावरही राधा सारखी तळे दाखवायला बाहेर न्यायला लावत होती. पण प्रचंड गारवा होता. आम्ही सगळ्यांनी आमचे उबदार कपडे घातले आणि जेवायला गेलो. जेवणाची सोय हाउस बोटच्याच बाजूच्या मागच्या आवारात होती. जेवणा दरम्यान परत पाउस चालू झाला आणि पुन्हा थंडीची लाट अधीक जाणवू लागली. आम्ही जेवण आटोपताच आपाअपल्या रुम मध्ये जाऊन राधाला औषधाचा डोस देउन ब्लॅकेंट्स वगैरे घेउन आराम करायला बसलो. रुम मध्ये २४ तास गरम पाणी होते हे एखाद्या वाळवंटात पाण्याचा खड्डा पाहण्यासारखे सुखद होते.

एखाद तास आराम करुन मग शिकार्‍यातून दल लेक मधील मार्केट पहायला जाण्याचा पुढचा प्लॅन होता. पण प्रचंड न सहन होणार्‍या थंडीमुळे राधाला अधिक त्रास होऊ नये म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनी हा प्लॅन रद्द केला. श्रावणी मात्र तिच्या काका-काकींबरोबर मज्जा करायला निघून गेली. गरमा गरम कबाब वगैरे खाउन ते सगळे परत आले आणि आम्ही खुप काही मिस केल करुन आम्हाला टुक टुक माकड केलं. :हाहा: ती संध्याकाळ पुर्ण काळोखी होती. आता असेच वातावरण राहीले तर आपण कसे काश्मिर पहायचे हा प्रश्न आमच्यापुढे होता.

दुसरा दिवस उजाडला तो उन्हाची किरणे पसरत. त्यामुळे खुप हायसे वाटले. बाहेर गेलो तेंव्हा स्वच्छ तळे सभोवतारी हिरव्यागार डोंगरांच्या रांगा, त्यावर आलेले काहिसे ढग, तलावात फिरणार्‍या शिकारा दिसू लागल्या.

दल लेक मधील शिकारा सफर

तिथे मला एका शिकारावर ही चिमणी दिसली.

सकाळी येथे बरेच व्यापारी येतात. हे व्यापारी पण गोड बोलीच्या शैलीचेच असतात. एक केसर विकणारा व्यापारी आला होता. त्याने केसरचे फुलही आणले होते. हे पाहताना फार कुतुहल वाटत होते.

काही वेळाने एक फुलांनी भरलेली शिकारा दिसली. माझ्या आनंद त्या गगनचुंबी पर्वतरांगांप्रमाणे फुलला होता. वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन त्या शिकार्‍यातील व्यापारी त्या फुलांचे कंद विकण्यासाठी घेउन आले होते.

त्या व्यापार्‍याने सगळ्या फुलांचे अलबम, बिया व कंद दाखवली. त्यात हिरवे तसेच इतर गुलाब अजुन वेगवेगळ्या फुलांचे फोटो दाखवले. त्यात आपल्याकडे असणारे मे फ्लॉवर, वेगवेगळ्या लिलिही होत्या. ही फुले आपल्याइथे होतील की नाही याची मी त्याला शंका विचारली तेंव्हा त्याने ३० ते ३५ डिग्री पर्यंत हवामानात ही फुले येतात असे त्याने सांगितल्याने मी काही कंद त्याच्याकडून घेतले. शिकारामधील एक त्याच्या भाषेतील न्युईन गुलाब नामक फुल आणले. हे फुल गुलाबासारखेच व गावठी गुलाबाचा वास असणारे होते.

ह्या निसर्ग सौंदर्याने, फुलांनी आदल्या दिवशीचा ताण कुठल्या कुठे पळून गेला.

दल लेकच्या मागे दिसणारा हरीसिंग पॅलेस.

पुढे पसरलेला दल लेक

दल लेक मध्ये दूरवर जागोजागी कारंजेही बसवलेले आहेत.

आमच्या ड्रायव्हरने माहीती दिली की थंडीत येथ बर्फ होऊन त्यावर मुले फुटबॉल खेळतात. एकदा एका पुढार्‍याने आत बर्फावरून गाडी पण नेली होती.

दुसर्‍या दिवशी सूर्यप्रकाशातील वातावरणातून शिकारातून जाताना तलावातील स्वच्छ पाणी , आत मध्ये काही वेली व छोटे छोटे मासे पाहताना मन प्रसन्न झाल होत.

प्रतिक्रिया

एस's picture

24 Jun 2014 - 12:43 am | एस

वा सुरेख!
छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही झकास आहेत!

आयुर्हित's picture

24 Jun 2014 - 1:24 am | आयुर्हित

निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी आणि रंगांची उधळण पहायची असेल तर काश्मिरला जायलाच हवे!
खुप छान लेख आणि फोटो!

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2014 - 2:40 am | प्रभाकर पेठकर

१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत.
लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती.

>>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो.
श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा?

लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.

वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन.

विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

सुहास..'s picture

27 Jun 2014 - 11:59 am | सुहास..

फोटो छान आलेत ग !!

हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2014 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर

जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे.
तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

शिकारे आवडले. हाऊसबोटसचा अनुभव वेगळाच वाटतोय.

रेवतीताई तुझाही अनुभव वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

24 Jun 2014 - 9:13 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.
छायाचित्रेही छान.

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 12:57 pm | दिपक.कुवेत

आणि त्याला साजेसं वर्णन. पण क्रमशः टाकायचं राहिलं आहे का?

+१... असेच म्हणतो.

पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2014 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

+ २

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 4:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

+३ मस्त फोटो आणि वर्णन

सखी's picture

24 Jun 2014 - 5:43 pm | सखी

+४ मस्त फोटो आणि वर्णन.
तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 1:57 pm | प्यारे१

+५ मस्त फोटो...

>>क्रमशः टाकायचं राहिलं आहे का?

असेच म्हणतो.

अनिता ठाकूर's picture

24 Jun 2014 - 5:52 pm | अनिता ठाकूर

सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

किसन शिंदे's picture

24 Jun 2014 - 8:22 pm | किसन शिंदे

सफरीचे वर्णन आणि फोटो आवडले जागूतै.

या लेखाच्या निमित्ताने मृत्यूंजयने लिहीलेली झक्कास लेखमाला आठवली.

मृत्युन्जय's picture

25 Jun 2014 - 12:57 pm | मृत्युन्जय

वाह, सुंदरच. काश्मीरसारखे सौंदर्य अजुन तरी पाहण्यात नाही आले. माझ्या सफरीच्या आठवणीही या निमित्ताने ताज्या झाल्या.

कवितानागेश's picture

25 Jun 2014 - 1:26 pm | कवितानागेश

मस्त फोटो.

चौकटराजा's picture

25 Jun 2014 - 3:11 pm | चौकटराजा

बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते.
कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर .
काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women !
गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली.
पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा.
काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.)
लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले.
दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा.
श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

केदार-मिसळपाव's picture

27 Jun 2014 - 12:56 pm | केदार-मिसळपाव

सुरेख

इशा१२३'s picture

27 Jun 2014 - 1:54 pm | इशा१२३

सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!

पैसा's picture

29 Jun 2014 - 9:08 pm | पैसा

लेख आणि फोटो फार आवडले.