भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १)

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in भटकंती
6 May 2014 - 11:57 pm

भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर (भाग १).

कोणत्याही कारणाने (किंवा कारणाशिवायही) कट्टा करायचा आणि मिपावर त्याचा वृत्तान्त टाकायचा (आणि इतर मिपाकरांनी त्या धाग्यावर मनसोक्त धुडगूस घालायचा) हा तर मिपाकरांचा मिपासिद्ध हक्कच आहे. (आम्ही तर असंही ऐकलं आहे की काही जण आधी वृत्तान्त तयार करतात आणि मग कट्टा करतात. पण ते असो.) या हक्काला जागून अनेक कट्टे झाले. काही अनाहिता कट्टेही जोरदार झाले (असंही आम्ही ऐकलं आहे. पण तेही असो). गप्पा आणि खादाडी याबरोबरच कट्ट्याचा काहीतरी उद्देश असावा, या विचाराने ओरिगामी कट्टा, जिजामाता उद्यान कट्टा, पुण्याच्या वल्लींसह घारापुरी लेणी कट्टा, रामदासकाकांसह फोर्ट कट्टा असे काही ‘सहेतुक’ कौटुंबिक कट्टेही पार पडले. याच्याच एक पाऊल पुढे टाकून दोन-तीन दिवसांचा सहकुटुंब ‘बाहेरख्याली कट्टा’ (म्हणजे मुंबईच्या बाहेर सहकुटुंब सहल) करावा, असा विचार आला. आमचं आख्खं कुटुंब जंगली. त्यामुळे जंगलात जायचं नक्की केलं. सौ व श्री भटक्या खेडवाला, त्यांची एक गिर्यारोहक (ट्रेकर) मैत्रीण अनघा, सौ. मुक्तविहारी (सौ मुवि), निहार (ज्यु. मुवि) आणि आम्ही तिघं (सुधांशुनूलकर, मोक्षदा आणि स्वानंदी) अशा आठ निसर्गप्रेमींचा कंपू जमला. ११-१२-१३ एप्रिलला भीमाशंकरला जायचा बेत ठरला.

११ तारखेला सकाळी निघालो. दोन आठवड्यांपूर्वीच स्वानंदी आणि निहार या दोघांची दहावीची परीक्षा संपली होती.
त्यामुळे ते दोघं आणि आम्ही ‘दहावीग्रस्त’ पालकही फुल्टू फ्रीकाउट मूडमध्ये होतो. सौ व श्री भटक्या खेडवालांच्या गावचा उत्सव आटोपून ते दोघं आदल्या दिवशीच परतले होते आणि लगेच भीमाशंकरला यायला तयार झाले होते. त्यांनी गावाहून आणलेल्या घरच्या ओल्या काजूंनी खादाडीला सुरुवात झाली. त्यांचा (काजूंचा) फोटो काढण्यापूर्वीच डबाभर काजू संपले. मग न्याहारीसाठी आणलेल्या सामग्रीचा यथासांग फन्ना उडवण्यात आला. तोपर्यंत गाडी माळशेज घाटात गाडी शिरली होती. माळशेज घाटात रांगड्या सह्याद्रीचं दर्शन झाल्यावर 'केवळ माझा सह्यकडा' या ओळी आपोआप ओठावर आल्या.

sahyadri1 sahyadri2

माझ्या वनअधिकारी मित्राला भेटण्यासाठी जुन्नरला वाट वाकडी केली. त्याच्या घरी जाताना रस्त्यापासून जरा दूर अंतरावर भरगच्च फुललेला नीलमोहर दिसला.जिजामाता उद्यानात याच्या फुलांचा फक्त एक छोटासा झुपका दिसला होता. मित्राच्या घरी पोहोचलो आणि अहो आश्चर्यम्! तो नीलमोहर त्याच्याच अंगणातला होता. मग सर्व बाजूंनी त्याचे मनसोक्त फोटो काढता आले.

nilmohar1 nilmohar3
nilmohar2

आता जेवायची वेळ झाली होती. मित्रानेच सुचवल्यानुसार नारायणगावजवळ एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि खरं सांगतो, तिथल्या मराठमोळ्या जेवणाने समस्त मिपाकरांच्या आठवणीने आम्हा सर्वांना ठसका लागला, इतकं सुंदर जेवण! मुंबईला परत जाताना याच ठिकाणी जेवायचं असं सर्वानुमते ठरवून पुढे निघालो. (मिपा प्रथेप्रमाणे जेवणाचं वर्णन आणि फोटो टाकायचे असतात. ते शेवटी भाग २मध्ये टाकले आहेत.)

प्रवासाला निघण्यापूर्वी नारायणगावच्या रेडिओ दुर्बिणीसंबंधी (जीएमआरटीसंबंधी) ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी २००८मध्ये मिपावर लिहिलेला लेख वाचला होता. त्या प्रकल्पालाही भेट द्यावी, यासाठी (आदल्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी) परवानगी मिळवली होती. त्यामुळे मग गाडी त्या जीएमआरटी प्रकल्पाकडे वळवली आणि ही एक छान संस्मरणीय भेट ठरली. काही वर्षांपूर्वी मिपाकर अदिती इथे संशोधन करत होत्या, त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला. मिपाकर कुठेकुठे पोहोचले आहेत...

at gmrt gate
जीएमआरटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
भटक्या खेडवाला, सुधांशुनूलकर, निहार (ज्यु. मुवि), अनघा, मोक्षदा, स्वानंदी, सौ मुवि, सौ भ.खे.

gmrt1 gmrt2
जीएमआरटीच्या तीस टेलिस्कोपपैकी एक

मग दीडेक तासाच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोहोचलो. पूर्वी इथे एमटीडीसीचं रिसॉर्ट होतं, ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने वनविभागाने चालवायला घेतलं आहे. तिथे राहायचं आरक्षण केलं होतं.

mtdc

स्वयंपाक तयार झाल्यावर सर्वांनी जेवणावर आडवा हात मारला आणि मग मस्तपैकी ताणून दिली.

jewatanamtdc jewan2mtdc

भीमाशंकर... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. पुणे-नाशिक रस्त्यावर, समुद्रसपाटीपासून अंदाजे ९०० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीतलं एक निसर्गरम्य स्थळ. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं असून नाना फडणवीसांनी अठराव्या शतकात याचा जीर्णोद्धार केला, अशी माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात मराठ्यांच्या पराक्रमाचा एक ऐतिहासिक दस्तावेज पाहायला मिळतो. चिमाजीअप्पांनी वसई मोहीम फत्ते केली, तेव्हा तिथल्या पाच चर्चवरच्या लोखंडी ओतीव घंटा काढून आणल्या. त्यातली एक घंटा इथे त्या पराक्रमाची आठवण जागवत आहे. या घंटेवर क्रॉस, चर्च इमारत आणि १७२७ (बनवल्याचं वर्ष) स्पष्ट दिसत आहे.

mandir ghanta

पर्यावरणाच्या दृष्टीने भीमाशंकरचं महत्त्व आणि वनभटकंती भाग २मध्ये
क्रमशः

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2014 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा

अंsssssssssssss :-/ असं काय ते?????????? :-/

वरण भातातच..पहिला भाग अवरला!

सुधांशुनूलकर's picture

7 May 2014 - 9:55 am | सुधांशुनूलकर

अभयारण्यात गेलो होतो ना! मग प्राणिहत्या कशी करणार? म्हणून फक्त वरणभातच. भाग २मध्ये तर पिठलं येणार आहे...
दुसरा भाग जरा विस्तॄत आहे. दुसरा भाग वाचून तुम्ही तॄप्त व्हाल, याची खातरी बाळगा.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2014 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा

@मग प्राणिहत्या कशी करणार?>>> अवो सायेब.. म्या वेज/नानवेज मदी नै गेलू! जेवान सुरु जालं..आनी होतं नै कुटं..तर पयल्या वरानभातालाच आवारलं...असं म्हंन्तोय मी! *acute*

सुधांशुनूलकर's picture

7 May 2014 - 6:57 pm | सुधांशुनूलकर

मीसुद्धा थोडी गंमत केली हो!

दुसर्‍या भागात वनभटकंती आणि खादाडी यासारख्या 'झणझणीत' गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे, म्हणून पहिला भाग थोडक्यात आटोपला.

त्यात काही दम नाही, असे वैयक्तिक मत आहे. बाकी भिमाशंकर अतिशय आवडता स्पॉट आहे बरंच काही स्पॉट करायला.

महा०टुरिझमचे हॉटेल पुन्हा सुरू झाले ते एक चांगले झाले .किती घेतात ?आणि कुठे होते आरक्षण ?वृत्तांत आवडला .

शिवतीर्थ रेस्टॉरंट (जुने एम.टी.डी.सी.) निसर्ग परिचय केंद्र

आरक्षणासाठी
८२७५४६४११०, ९४२२६६६८०७, युवराज ९४०३६६१२८०
वनविभागाच्या पुण्याच्या मुख्य कार्यालयातही आरक्षण करता येतं.

८ जणांसाठी डॉरमिट्री - प्रत्येकी २०० रु.
२ जणांसाठी खोली - ८००-९०० रु., ४०० रु. अतिरिक्त खाटेसाठी

जेवण : १०० रु., न्याहरी २५ रु., चहा १० रु.
जेवणासाठी जवळच इतरही पर्याय उपलब्ध आहेत.

धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल .

स्पंदना's picture

7 May 2014 - 6:33 am | स्पंदना

नीलमोहोर!!
किती सुरेख दिसतात फुले ती.
बाके वर्णन आवडले.
सौ .मुवि, व चि. मुवि *dance4*

प्रचेतस's picture

7 May 2014 - 9:04 am | प्रचेतस

सुरेख सुरुवात.
भीमाशंकर आवडत्या ठिकाणांपैकी एक.

सौंदाळा's picture

7 May 2014 - 10:02 am | सौंदाळा

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2014 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

+२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2014 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय पुढील भागाच्या प्रतिक्षेत. भिमाशंकर मलाही आवडतं. पावसळ्यात गेलेलो खूप मजा आली होती.

-दिलीप बिरुटे

फार पूर्वी येथेच भिमाशंकरवर खरडले होते.
http://www.misalpav.com/node/16540
http://www.misalpav.com/node/16582

दिपक.कुवेत's picture

7 May 2014 - 11:16 am | दिपक.कुवेत

पुढल्या वेळेस आस्मादिक येतील तेव्हा असचं नक्कि प्लॅन करुयात.

मुक्त विहारि's picture

7 May 2014 - 3:13 pm | मुक्त विहारि

व्हाय नॉट? शुअर...

युवर ऑर्डर इज ऑन अवर हेड-आइज.

दिपक.कुवेत's picture

7 May 2014 - 3:29 pm | दिपक.कुवेत

हेड-आइज हे बाकि आवडलं

प्रमोद देर्देकर's picture

7 May 2014 - 12:36 pm | प्रमोद देर्देकर

खुप चा छान पुभाप्र.

ह्म्म्म !! पुढल्या भागातली वनभटकंती वाचायला आवडेल. बाकी कधी न्हवे ते भटजींशी सहमत व्हावं लागतंय, हा भाग जरा जास्तच आटोपशीर झाला.

अजया's picture

7 May 2014 - 3:31 pm | अजया

एकतर ट्रीपला यायला जमले नाही,आता फोटो आणि वृत्तांत वाचुन जळून घेते !! नीलमोहोर बघायला न मिळाल्याने हळहळायला झाले.

पिलीयन रायडर's picture

7 May 2014 - 3:50 pm | पिलीयन रायडर

हाय रे कर्मा.. मला इथेही फोटो दिसत नाहीत..

पिकासा मधुन टाकत जा मिपाकरांनो फोटोज..

*fool* आता कसं व्हायचं माझं?

भाते's picture

7 May 2014 - 6:00 pm | भाते

भीमाशंकर दौऱ्याचा वृत्तांत आणि फोटो आवडले. नीलमोहर तर केवळ अप्रतिम.
पुभाप्र.

वाचताना सहलीत सहभागी झाले आहे.

सुधांशुनूलकर's picture

8 May 2014 - 11:15 am | सुधांशुनूलकर

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
आता भाग २ टाकतो आहे.

पैसा's picture

8 May 2014 - 11:18 am | पैसा

एकदम माहितीपूर्ण खुसखुशीत लिखाण आणि मस्त फोटो! खास आहे!

मोक्षदा's picture

8 May 2014 - 7:17 pm | मोक्षदा

पुढच्या भटकंतीत जास्तीत जास्त मिपकार पुढच्या ट्रीपला सामील झाले तर जास्त मज्जा येईल

ऋतु हिरवा's picture

11 May 2014 - 7:06 pm | ऋतु हिरवा

संस्मरणीय सहल. या निमित्ताने नूलकर कुटुंबियांची ओळख़ झाली फोटो तर अप्रतिम आले आहेत.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 May 2014 - 6:11 pm | भ ट क्या खे ड वा ला

दोन तीन वेळा पुढे पुढे ढकललेला कार्यक्रम ११,१२,१३ एप्रिल ला संपन्न झाला.त्याची हि गोष्ट. जिजामाता कट्टा संपन्न झाल्यापासून सुधांशू आणि मी दोन तीन वेळा भ्रमण ध्वनी वर या विषयावर चर्चा करत होतो. सर्व पुढाकार सुधांशू यांचा होता. त्यात GMRT विषयी मिपावर आलेल्या एका लेखामुळे पाहिले पाहिजे असे आणखी एक ठिकाण वाढले. ११ एप्रिल हि तारीख नक्की झाली. ठरल्याप्रमाणे सुधांशू ,मोक्षदा ,स्वानंदी ,सौ.मु वि. ज्यू .मुवि उर्फ निहार ,माझी सौ स्मिता आणि आमची एक मैत्रीण सौ अनघा आणि मी असे आठ जण एका सुहान्या सफरीला निघालो. सुधांशू आणि कुटुंबीय कुर्ला येथून वेळेवर निघाले. बाकीची मंडळी डोंबिवली (या मध्यवर्ती ठिकाणी) येथे वेळेवर हजर झाली. डोंबिवली येथे जमलेल्या सर्वांचा परिचय होतोय तोवर गाडी डोंबिवली येथे आली. पुन्हा एकदा परीचय कार्यक्रम झाला.सुधांशू यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. या चमू मधील अनघा हि "मिपा" बद्दल पूर्ण अनभिज्ञ होती. स्मिता, स्वानंदी ,निहार हे मिपाचे सदस्य नसले तरी मिपा हि काय चीज आहे ते जाणून होते. कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताच आमचा सारथी दिनेश याने गाडीला वेग दिला.मोक्षदा आणि मनीषा यांनी नाश्त्यासाठी आणलेल्या इडली ,ठेपले यांचा समाचार घेत प्रवास सुरु ठेवला. कालच खेड हून आलो तेव्हा ओले काजूगर आणले होते ,त्यातील काही काजू स्मिताने सोलून आणले होते,त्यांचा पण फन्ना उडवला. आता गाडी माळशेज घाटातून जाऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोहाची झाडे आपला नवा पर्णसंभार लेऊन स्वागत करत होती. मधूनच कुम्भ्याचे वृक्ष आपली शुभ्र फुले मिरवत होते. झाडे ,फुले, पक्षी, कीटक, या विषयात गाडीतील सर्वांनाच आवड असल्याने गप्पांना खंड पडत नव्हता. परत येताना घाटात थांबून फोटो काढायचे ठरवले आणि घाटात न थांबता प्रवास सुरु ठेवला.
सुधांशू मधूनच भ्रमण ध्वनी वरून त्यांच्या मित्राशी संपर्क साधत होते. जुन्नर येथे आपटे साहेब (सुधांशू यांचे मित्र ) आमची वाट पहात होते. त्यांनी केलेल्या सूचने नुसार गाडी मार्गक्रमणा करत होती.
इतक्यात एका वळणावर गाडी वळत असताना कोणाला तरी एक पूर्ण बहरलेला नीलमोहर दिसला.
आणि गम्मत म्हणजे आपटे साहेबांच्या बंगल्याजवळ आम्ही पोहोचलो होतो. हा नीलमोहोर बंगल्याच्या कुंपणाला लागुनच उभा होता. गाडीतून उतरताच सर्वजण निलमोहर बघायला धावलो.
झाडाच्या पायथ्याशी पडलेली फुले आणि वरच्या फुलांमधून झिरपणारे उन या मुळे झाडाखाली एक अनोख्या रंगाची रांगोळी काढल्यासारखे वाटत होते.
बंगल्याच्या आवारात इतरही अनेक झाडे होती. आपटे साहेब झाडांची माहिती देत होते. आम्ही लहान मुलांसारखे झाडांखाली बागडत होतो. वावळ्याच्या झाडाखाली पडलेल्या पापड्या सोलून खल्य्या,बकुळीची फुले फांदीवरून हातानी काढली, पूर्ण पिकलेल्या चिंचा वेचल्या, परस बागेतील भाजीपाला पाहिला,चंदनाची झाडे पाहिली आणि व्हरांड्यात मांडलेल्या खुर्च्यात विसावलो. साहेबांचा मदतनीस एका ताटलीत केळ्यांचा फणा घेऊन आला. या केळ्यांचा रंग थोडासा विटकर होता. पण चव ,आहाहा ssss ,पूर्णपणे नैसर्गिक पणे पिकलेली अत्यंत मधुर अशी चव, मला आणखी एक केळे खाण्याचा मोह आवरला नाही. दुसरे केळे जिभेवर घोळवत घोळवत फस्त केले. माझे अनुकरण आणखी एक दोघांनी केले. इतक्यात मदतनीस मधुर चवीचे कोकम सरबत घेऊन आला. एकंदर सहलीची सुरवात मधुर झाली होती. आपटे साहेबांनी खूपच प्रेमाने आमचे स्वागत ,आदरातिथ्य केले होते. पुढील रस्त्याची माहिती घेऊन आम्ही आपटे साहेबांचा निरोप घेतला. पोट पूजा करून आम्हाला ०३.१५ पर्यंत GMRT गाठायची होती. साहेबांनी सुचवलेल्या "श्री हरी पांडुरंग'' या हॉटेल चा फलक कुठे दिसतोय हे बघत आमचा प्रवास सुरु होता. फलक दिसताच गाडी तिकडे वळवली. अस्सल मराठी चवीचे उत्तम जेवण आमची वाट पाहत होते. (या हॉटेल विषयी अधिक माहिती लेखाच्या पुढील भागात ) रसना आणि पोट यांना तृप्त करून खिसा अजिबात खाली न होता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. हि सर्व आपटे साहेबांची योजना होती.आणि त्यासाठीच ते या हॉटेल चा पत्ता अगदी बारकाव्यांसकट सुधान्शुना देत होते.
दुरूनच महाकाय दुर्बिणी दिसू लागल्या आणि थोड्याच वेळात आम्ही GMRT च्या प्रवेश द्वारात दाखल झालो. प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून एका झाडाच्या पारावर विसावलो. GMRT वरील लेखाच्या प्रती सुधांशू यांनी आणल्या होत्या त्या वाचायला घेतल्या. अजून एक गट दुर्बिणी पाहायला यायचा होता तो आल्यावर सर्वाना एकदम माहिती देण्यात येईल अशी माहिती गेट वर मिळाली. प्रवेश द्वारावरील अधिकार्यांनी प्रवेशद्वाराच्या आतील परिसरात फिरण्याची परवानगी दिली, मिपाकर लगेच कमळाच्या तळ्याशेजारी विसावले. बराच वेळ झाला तरी पुण्याहून येणारा गट काही आला नाही,शेवटी मार्गदर्शकाने आम्हाला चला असा इशारा केला आणि आम्ही महाकाय दुर्बिणी पाहायला निघालो.
निहार आणि स्वानंदी यांनी बरेच फोटो काढले,सर्वांनी लक्षपूर्वक माहिती ऐकली,जिज्ञासूनी प्रश्न विचारले. भारतीय संशोधकांची अचाट कामगिरी पाहून खूप आनंद झाला.
वाटेत एका ठिकाणी चहा पिउन भीमाशंकरच्या रस्त्याला लागलो. भीमाशंकरच्या सहलीचे वर्णन पुढील भागात.
(नूलकर साहेबांनी मला वृत्तांत लिहायला सांगितला होता पण माझ्याने काही लिहून झाला नाही.
शेवटी वाट पाहून त्यांनी सुंदर वृत्तांत लिहिला.)

आत्मशून्य's picture

19 May 2014 - 4:18 pm | आत्मशून्य

धन्यवाद...

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 7:52 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

ऋतु हिरवा's picture

26 Mar 2017 - 10:23 pm | ऋतु हिरवा

नीलमोहोर मस्तच. आणि डोंगर कोणते ते शोधले पाहिजेत