मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान

लाल टोपी's picture
लाल टोपी in राजकारण
17 Mar 2014 - 11:15 pm

सोळाव्या लोकसभेचा बिगूल वाजला आहे. कार्यक्रमाची घोषणाही झाली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकाशाहीतल्या सर्वात मोठ्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. भारतीय राजकारणाला दिशा देणा-या या निवडणुकांचा इतिहास रोचक आहे. या निवडणुकांचे बदलते स्वरूप, मुद्दे, नेते यांचा या लेखमालेत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

२६ जानेवारी १९५० या दिवशी सार्वभौम राष्ट्र झाल्यावर याच वेळी अस्तित्वात आलेल्या घटनेप्रमाणे भारतात १९५१ या वर्षी पहिल्या लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले. मुळातच भारताकडे निवडणूक घेण्यासाठी यंत्रणाच नव्हती. भारताच्या घटनेत असलेल्या तरतुदीप्रमाणे घटना अस्तित्वात येण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २५ जानेवारी, १९५० या दिवशी 'निवडणुक आयोगाची' स्थापना करण्यात आली. नव्यानेच प्रजासत्ताक राष्ट्र म्हणुन उदयाला येणा-या भारतात वेगेवेगळ्या स्तरावर स्वतंत्र आणि नि:पक्षपाती निवडणुका घेणे हेच या आयोगाचे काम होते . याच कारणामुळे सुरुवाती पासूनच या आयोगाला पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले.
ls1

अनेकजण भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन सरकार स्थापनेचा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत साशंक होते. भारताचा खंडप्राय आकार, विविध जातीपाती, धर्म, प्रांत, भाषा, यामध्ये विखुरलेला, कमालीचा अशिक्षित, गरीब बहुतांश खेड्यात राहणारा मतदार कितपत प्रगल्भपणे मतदान करेल याबाबत घेतलेल्या शंका तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता अवास्तव देखील नव्हत्या.

भारताच्या पहिल्या सरकार बद्दल बरेच काही लिहिले गेले आहे परंतु पहिल्या निवडणूक आयुक्तांबद्दल फारसे लिहिले गेल्याचे दिसून येत नाही.

las2

प्रचंड आकारमानाच्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात नि:पक्षपाती निवडणुकीची प्रक्रिया राबवणे देखील आव्हानात्मक होते. मतदान करण्याची पात्रता असणा-या २१ वर्षावरील सुमारे साडेसतरा कोटी व्यक्तीची नोंदणी करून मतदार यादी बनवणे हे पहिले आव्हान होते. या मतदारांपैकी ८५ टक्के व्यक्ती अशिक्षीत होत्या. साधी अक्षरओळखही नसलेल्या या मतदारांना मतदार यादी तयार करण्यापासून प्रतिनिधी निवडण्यापर्यंतच्या या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडचणी होत्या.मतदार याद्या बनवण्यासाठी आणि अचूक नोंदणी करण्यासाठी सरकारी कर्मचारी घरोघरी गेले. निवडणुक आयोगाकडे स्वत:चे कर्मचारी नव्हते. अशिक्षित मतदारांना गुप्त मतदानाचा अधिकार विनासायास बजावता यावा म्हणून प्रत्येक पक्षासाठी निवडणूक चिन्ह तयार करणे, मोठ्या संख्येने असलेल्या अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करणे. हे करतांना सर्वांना मान्य होतील अशी चिन्हे निवडणे हे एक जिकीरीचे काम होते. पहिल्या निवडणुकीत मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे चिन्हाचे चित्र असणारा भाग फाडून त्या उमेदवारासाठी ठेवलेल्या मतपेटीत टाकायचा होता.
ls3
पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणारी महिला

विविध राजकीय पक्षांची राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर नोंदणी करणे दुर्गम डोंगराळ प्रदेश, वाळवंटी भाग, त्रिपुरा आसाम सारख्या जंगलांनी व्यापलेले भाग, सागरी टापू अशा भौगोलिक विविधता असलेल्या भूभागात निवडणुक यंत्रणा उभारणे, आव्हानात्मक काम होते.

निवडणुकांत मतदानासाठी प्रत्येक उमेदवारासाठी वेगळी मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या लोकसभा आणि २६ राज्यांत विधानसभा निवडणुका या साठी २५ लाख मतपेट्या तयार करून घेण्यात आल्या होत्या.
ls4

मतपत्रिका, मतपेट्या यांची वाहतूक करणे हे मोठेच आव्हान होते ते लीलया पेलले ते पहिले निवडणुक आयुक्त सुकुमार सेन यांनीघटनात्मक तरतुदिंप्रमाणे निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींचे सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरुंचा दबाव होता. त्यामुळेच युद्धपातळीवर पहिल्या निवडणुकांची तयारी सुकुमार सेन करून घेत होते. सुप्रसिध्द इतिहास तज्ञ रामचंद्र गुहा यांनी 'दि हिंदू' मध्ये लिहिले आहे,"नेहरूंची निवडणुका लवकर घेण्याची घाई समजण्यासारखी होती. परंतु या ऐतिहासिक निवडणुका ज्या माणसामुळे यशस्वीपणे पार पडल्या तो मात्र पडद्यामागेच राहिला. आज दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. १८९९ मध्ये कोलकता येथे जन्मलेले सेन यांचे शिक्षण कोलकात्याच्या प्रेसेडेन्सी कॉलेज' आणि लंडन विद्यापीठात झाले होते. १९४७ मध्ये ते पश्चिम बंगालचे मुख्य सचिव नियुक्त झाले. याच पदावर कार्यरत असतांना १९५० मध्ये निवडणुक आयुक्त म्हणुन नेमणुक झाली. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकी बरोबरच भारतातील सर्व राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात येणार होत्या त्यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना बरोबर घेऊन सेन यांना काम करायचे होते. हे अधिकारी देखील सेन यांच्याप्रमाणेच भारतीय प्रशासनिक सेवेतील होते. ही सर्व आव्हाने यशस्वीपणे पार पाडत सेन यांनी पहिल्या निवडणुकांचे शिवधनुष्य पेलले. हे काम इतके चपखल होते की १९५३ मध्ये सुदान आणि पुढे नेपाळ या देशांत देखील निवडणुक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सेन यांना आमंत्रीत करण्यात आले. पुढे दुस-या लोकसभेच्या निवडणुका देखील सेन यांच्याच कारकिर्दीत पार पडल्या.

सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार..
पुढील भागात पहिल्या निवडणुकांचा आढावा..

-क्रमशः

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..२ पहिल्या लोकसभा निवडणुका- १९५१-५२.

प्रतिक्रिया

विकास's picture

18 Mar 2014 - 1:21 am | विकास

लेख आणि छायाचित्रे दोन्ही मस्त आहेत! माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

अर्धवटराव's picture

18 Mar 2014 - 1:29 am | अर्धवटराव

खरच.. कधि विचारच केला नाहि या बहाद्दराचा.
धन्यवाद लिनक्स :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2014 - 7:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

क्लिंटन's picture

19 Mar 2014 - 9:39 pm | क्लिंटन

लेख आवडला. सुकुमार सेन हे भारतातील एक 'अनसंग हिरो' होते. रामचंद्र गुहांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' मध्ये त्यांच्याविषयी खूपच चांगले लिहिले आहे.

या निमित्ताने पहिल्या लोकसभा निवडणुकांविषयी कधीतरी कुठेतरी वाचलेले मुद्दे लिहितो:

१. या निवडणुकांसाठीचे मतदान ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ असे तब्बल चार महिने चालू होते.मतदान ऑक्टोबर १९५१ मध्ये हिमाचल प्रदेशात सुरू झाले कारण नंतरच्या काळात तिथे बर्फ पडतो.
२. अनेक ठिकाणी जुन्या वळणाच्या लोकांमध्ये स्त्रिया स्वतःची ओळख "अमक्यातमक्याची आई" म्हणून देत असत. काही ठिकाणी मतदारयाद्यांमध्ये गावांमध्ये स्त्रियांची नावे त्याच पध्दतीने गेली होती.
३. पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काही मतदारसंघ एक सदस्यीय होते तर काही मतदारसंघ द्विसदस्यीय होते. म्हणजे दोन सदस्य असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदार दोन मते देत असत आणि दोन खासदार निवडले जात असत. हे दोन्ही खासदार एकाच वेळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असत. १९५२ मध्ये पंडित नेहरू निवडून गेले त्या मतदारसंघात (अलाहाबाद पूर्व) त्यांच्याबरोबरच काँग्रेसचे मसुरिया दिन नावाचे खासदारही निवडून गेले होते.

विअर्ड विक्स's picture

19 Mar 2014 - 11:23 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला ...

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2014 - 11:37 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्यामुळे या विषयावर प्रथम वाचण्यास मिळाले.

या लेखामुळे एक प्रेरणादायी वाक्य आठवले - Journey of thousand miles begins with a single step.

सहा दशकांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासाने अनेक खडतर आव्हाने पार करत देशाला नव्या उंचीवर पोचवले आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

31 Mar 2014 - 11:34 pm | पैसा

हा भाग वाचला नव्हता! सुरेख चित्रे आणि मनोरंजक माहिती. पण एक प्रश्न अजूनही आहे. चुकीच्या माणसाच्या मतपेटीत मत टाकले गेल्यास ते बाद ठरत असे किंवा कसे?

सुकुमार सेन यांचे निदान नाव तरी आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद!

या बाबत काही माहिती मिळू शकली नाही. क्लिंटन यांनी सुध्दा अ सेच मत या लेख मलिकेच्या दुस-या भागात नोंदवले आहे.

या पध्दतीमध्ये किती गुंतागुंत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे मला समजा गाढव हे चिन्ह असलेल्या उमेदवाराला मत द्यायचे आहे पण मी ते फाडून समजा हत्ती हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या पेटीत टाकले तर असे मत अवैध समजले जात होते की ते गाढव या चिन्हाच्या उमेदवाराला दिले असे समजले जात असे याची कल्पना नाही. तसेच या पध्दतीत मताची गोपनीयताही ठेवणे थोडे कठिणच होते. एखादा मतदार एखाद्या मतपेटीजवळ गेला याचा अर्थ तो मतदार त्या उमेदवाराला मत देत आहे हे उघडच होणार. अशा परिस्थितीत मताची गोपनीयता कशी ठेवणार?
ऋषिकेश's picture

1 Apr 2014 - 9:22 am | ऋषिकेश

माहितीपूर्ण लेखन. आभार!

अनुप ढेरे's picture

1 Apr 2014 - 1:23 pm | अनुप ढेरे

आवडला लेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2014 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती. अशी महत्वाची कामगिरी बर्‍याचदा दुर्लक्षित केली जाते. ती सांगितल्याबद्दल खास धन्यवाद !

यशोधरा's picture

2 Apr 2014 - 2:21 am | यशोधरा

मस्त लेख.