ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१

तिमा's picture
तिमा in भटकंती
21 Nov 2013 - 12:27 pm

अरुणाचल प्रदेश हा खूपच मोठा आहे. अजून त्यातील सर्वच भागांत टुरिझम साठी व्यवस्था नाही, सध्या तेथील तेजपूर्,भालुकपाँग, बोमदिला,दिरांग, तवांग या भागात हॉटेल्स वगैरे दिसतात. आमचा ड्रायव्हर सांगत होता की संपूर्ण अरुणाचल प्रदेश बघण्यासाठी तो एका जर्मन ग्रुपला घेऊन दोन महिने फिरत होता.तेंव्हा, सध्यातरी एक सेव्हन सिस्टर्स ही १८ दिवसांची वा आम्ही केलेली थ्री सिस्टर्सची सहल हे पर्याय उपलब्ध आहेत. त्याहून जास्त माहिती त्यांच्या टुरिझम कडून मिळू शकेल. अरुणाचल मधले रस्ते अजून खराब आहेत. आपले बीआरओ तिथे सतत रस्ते करत असते.(मिलिटरीची एक डिव्हिजन). चीनचा डोळा असल्याने तिथे आपल्या लष्कराचा वावर व कंट्रोल भरपूर आहे. तिथल्या स्थानिक लोकांना मात्र चीनविषयी आत्मीयता नाही. ते काश्मिरींपेक्षा वेगळे आणि स्वतःला भारतीयच मानणारे आहेत.
टूर ठरली तेंव्हा लोकरी हातमोज्यांपासून सर्व गरम कपड्यांचा बंदोबस्त केला. सॅक घेतली. ११ दिवस पुरतील एवढे कपडे(जास्त करुन अंडरवेअर्स) घेतले. धोबीघाट घरी आल्यावर करायचा असे ठरवले. दिवाळी नुकतीच संपली असल्याने उरलेला फराळ घेतला. बाकी टॉर्च, चाकू वगैरे नित्याच्या वस्तुही घेतल्या. औषधे घेऊन ठेवली. तोंडाला चाळा म्हणून गोळ्या,आवळेपाक, वगैरे वगैरे तोंडीलावणी घेतलीच.
सकाळी ५ वाजता विमानतळ गाठायचा म्हणून ५-६ रेडिओ टॅक्सी वाल्यांना दोन दिवस आधी फोन लावले. पण आमचे रहाण्याचे ठिकाण कळताच सर्वांनी गाडी नाही ,या सबबीखाली आम्हाला टाळले. आम्ही विमानतळापासून फक्त दोन सिग्नल्सवर रहातो.शेवटी एकाच्या प्रायव्हेट कारमधूनच विमानतळ गाठला. बरोब्बर ६ वाजता आम्ही, जेट एअरवेज मधे, उडान भरनेके लिये तय्यार होऊन, रनवेवर रांग लावली. ९ वाजता आम्ही कलकत्त्याला उतरलो,(म्हणजे विमानातच बसून राहिलो). ९.३० वाजता पुन्हा उड्डाण आणि १०.४५ ला गुवाहातीला उतरलो. मायबाप जेटने खायला प्यायला भरपूर दिले. बाहेर तापमान होते २८ डिग्री.सें. बाहेर आल्यावर सर्व बोर्ड पुन्हा पुन्हा पाहिले, पण आमच्या टूरचा कोणी नव्हताच. मोबाईलवर ड्रायव्हरचा नंबर घेऊन ठेवला होता. दोघे ड्रायव्हर पार्किंग लॉटमधेच बसले होते. ते एकदाचे आले. आमच्या पाठोपाठ दुसरा चार जणांचा ग्रुप इंडियन एयरलाइन्स ने आला.
११.३० वाजता काझीरंगाचा प्रवास (२००किमी) सुरु झाला. वाटेत जेवायला थांबलो पण सर्व्हिस इतकी स्लो की जेवणात दीड तास गेला. रस्ता हायवे असल्यामुळे चांगला होता. ४.३० -५.० च्या सुमारास सूर्य मावळला आणि आम्ही काझीरंगा पार्कच्या जवळच्या हॉटेलात पोचलो. रुम्स उत्तम होत्या. पण जेवायची सगळीकडे आधी ऑर्डर द्यावी लागते. रात्री जेवण झाल्यावर सगळेजण (८) गाण्याच्या भेंड्या खेळलो, त्यांत मी एक चांगला गायक होऊ शकलो असतो असे सर्वांचे एकमत झाले.

१. काझीरंगातले हॉटेल

दुसर्‍या दिवशी सकाळी ५.३० वाजता निघून हत्ती सफारीला पोचलो. आम्हाला वेगवेगळ्या एलिफंट स्टेशनवर उभे करण्यात आले. थोड्या वेळाने आधीच्या राईडचे हत्ती येऊ लागले.

मग आमच्याही खाशा सवार्‍या निघाल्या. हत्तीच्या काटकोनात बसल्यामुळे आणि हत्ती एकदम खाचखळग्यांच्या जंगलात घुसल्यामुळे कॅमेरा सांभाळणे अवघड झाले. त्या स्थितीत गेंड्याचे फोटो काढले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी. एक तासात हत्ती सफारी संपली. गेंड्याने सफारी सूट घातला आहे हा आमचा विनोद कुटुंबाला हंसवु शकला नाही. कारण ती स्वतःचा तोल सांभाळण्याच्या खटापटीत असावी.
२. आईच्या मागेमागे

सकाळची हत्ती सफारी झाल्यावर दुपारी २ वाजता जीप राईड होती. त्यासाठी दुसर्‍याच पॉईंटला जावे लागले. जाताना रस्त्याच्या डावीकडे गेंडे दिसत होते.
३.डावीकडचे गेंडे

काझीरंगात म्हणे, १७०० गेंडे आहेत. आपला मुंबईचा 'शिवा' त्यांतच असणार. १०३ वाघ आहेत. आणि बरेच प्राणी व पक्षी. जीप राईड मधे गेंडे, रानम्हशी, गरुड आणि इतर पक्षी दिसले. ती २ तासांची होती. परत येताना तिन्हीसांजेला पाण्याशी हरणे दिसली भरपूर! दिवेलागणीला हॉटेलवर परत आलो.
तिसर्‍या दिवशी बोमदिलाला जायचे म्हणून लवकर आवरले. सर्व ग्रुप वेळाच्या बाबतीत काटेकोर निघाला, दुपारचे जेवण कसे मिळेल याची शाश्वती नसल्याने सगळीकडे हेवी ब्रेकफास्ट, पॅक्ड लंच हे धोरण अंमलात आणले. सकाळी ८.३० वाजता निघाल्यावर थोड्याच वेळांत खराब रस्ता सुरु झाला. भालुकपाँग या सीमेवरच्या गावांशी जायलाच दोन वाजले. तिथे इंटर्-स्टेट चेक पोस्ट आहे. आमची परमिटे व्यवस्थित होती. पण एका ड्रायव्हरचे परमिट संपले होते. झाले, तिथेच एक तास गेला. शेवटी ड्रायव्हरने आमच्याकडूनच पैसे घेऊन पोलिसांना लांच देऊन ते प्रकरण मिटवले. प्रचंड उशीर झाला होता. दोन्ही ड्रायव्हरांनी तुफान वेगाने गाड्या पळवायला सुरवात केली. पण आमच्या सुदैवाने पुढे रस्ताच इतका खराब होता की त्यांना तीस्-चाळीस वेगानेच गाडी चालवावी लागली. सुरवातीच्या डोंगरांवर उंच बांबूची आणि केळीची झाडे दिसली. अशी झाडे असलेले डोंगर, मी याआधी कुठेही पाहिले नाहीयेत. अंधार पडला. थंडी सुरु झाली होती. दर दोन तासांनी टॉयलेटसाठी थांबावेच लागत होते. पण ग्रुप चांगला होता. कुणीही चिडचिड करत नव्हते. शेवटी रात्री ८ वाजता बोमदिलाच्या हॉटेलात पोचलो. अंतर होते १९९ किमी. लई भारी थंडी वाजत होती.! रुममधे हिटर ऑन केल्यावर जरा कमी झाली. ऑर्डर देऊन जेवेपर्यंत १०.३० वाजले.
सक्काळी लवकर उठून तवांगला निघणे जरुर होते कारण तो रस्ता आणखी खराब आहे असे ड्रायव्हरचे म्हणणे होते. पण सकाळी ब्रेकफास्टला तिथल्या वेटरने ऑर्डर्स घेतल्या आणि आंत नीट दिल्याच नाहीत. त्यामुळे मागितले एक आणि समोर आले भलतेच, अशी अवस्था झाली. या प्रकारांत दीड तास गेला. तरीही साडेआठ वाजता निघालो. आज वाटेत बघण्याचे पॉईंटस होते. प्रथम बघितले ते न्युकमाडाँग वॉर मेमोरियल.सुंदर ठिकाणी बसवले आहे. सर्व मेमोरियल्सची धाटणी मोनॅस्ट्रींसारखीच वाटली.मिलिटरीचे लोक होतेच तिथे. लांबून आलेल्या प्रवाशांविषयी त्यांना कौतुक होते. प्रत्येक ठिकाणी टॉयलेटस ची सोय असल्यामुळे आमच्यासारख्या म्हातार्‍यांना, 'व्हॉट अ रिलिफ' चे फिलिंग यायचे. पुढे सेला पास लागला.

४. सेला मेमोरियल (पताकाच फार आहेत)
 )

सेला की (शीला ?) नांवाची एक मुलगी होती. चायना युद्धाच्या वेळेस तिचे जसवंतसिंह या सैनिकावर प्रेम बसले. युद्धात अतुलनीय शौर्य गाजवून जसवंतसिंह धारातीर्थी पडला. चिन्यांच्या हाती पडू नये म्हणून सेलाने आत्महत्या केली. तर कुणी म्हणतात की जसवंतसिंहाच्या बरोबरीने लढताना ती मेली. मला १९६२ चा हकीगत सिनेमा आठवला. तो बहुतेक याच सत्यकथेवरुन घेतला असावा. सेला पासलाच पॅराडाइज लेक होते. त्याला जोडूनच आणखीही एक लेक होते.
५. पॅराडाईज लेक

६. आणखी एक जुळे लेक

पण तिथे उतरुन फोटो काढेपर्यंत विरळ हवेमुळे डोक्यांत घण पडू लागले. थंडी तर मरणाची होती. उंची होती १३७०० फुट! तिथले अविस्मरणीय दृश्य पाहून पुढे जाण्याची इच्छाच होत नव्हती. सेला पासच्या थोडे पुढे गेल्यावर जसवंतगढ होता.
७. जसवंतगढ

त्या वीरपुरुषाचा तो यथोचित सन्मान वाटला. तिथे मिलिटरीवाले चहा फुकट देत होते. अंधार पडल्यावर तवांगला पोचलो. (उंची ११००० फुट) कारच्या बाहेर आलो तर थंडीने हुडहुडी भरली, तेही जॅकेट, ग्लोव्ह्ज सर्व असताना. तिथे दिवसा ८-१० आणि रात्री शून्याच्या आसपास तापमान असते. रुममधे हिटर मस्ट! आश्चर्य म्हणजे बोमदिलाला बंद पडलेले आमचे एअरटेल जिवंत झाले, त्यामुळे घरी फोन झाला.
सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट चापल्यावर सेंग्ये त्सारला जायला निघालो. प्रचंड उंचीवर गेल्यावर प्रथम दिसले ते पँगगाँग त्सो म्हणजेच ८. पी.टी. त्सो. लेक.

३६० अंशात विखुरले होते नि:खळ सृष्टीसौंदर्य. तिथून पुढे गेल्यावर लागला वाय पॉईंट. दोन रस्ते फुटत होते. एक रस्ता १३ किमी वरच्या चायना बॉर्डरकडे जाणारा. तिथे जायला तवांगमधून डीसीची परमिशन लागते. आमच्या ड्रायव्हरने ती आदल्या दिवशी घेतली नसल्याने आम्ही सेंग्येस्त्सार उर्फ माधुरी लेकचा रस्ता धरला. पुन्हा बराच चढउतार! माधुरी लेकशी पोचल्यावरही थंडी होतीच! नुसत्या माधुरी नांवाने ती थोडीच पळणार आहे ? तिथले वातावरण इतके रम्य होते की, किती फोटो काढु, असे झाले.
९.सेंग्येत्सार लेक

आपले जवान तिथे क्रिकेट खेळत होते. काहीजण व्हॉलीबॉल खेळत होते. एकाने मारलेली सिक्सर तर थेट तळ्यांत गेली. लगेच गुडघ्यापर्यंत पँट वर घेऊन एका उमद्या जवानाने बॉल आणला सुद्धा! त्यांनी आमच्याशी भरपूर गप्पा मारल्या, आमच्याबरोबर फोटो काढले, आम्हालाही काढू दिले.
लेकपाशी जेवणाची चांगली सोय नव्हती. म्हणून आम्ही कारजवळ उभ्या उभ्याच बरोबर आणलेल्या फराळ आणि ड्राय फ्रुटसवर ताव मारला. परतीच्या प्रवासात पुन्हा वाय पॉईंट आणि पी.टी.त्सोचे डोळे भरुन दर्शन घेतले आणि संध्याकाळी
चारच्या सुमारास मार्केट प्लेसला आलो. ड्रायव्हर जेवणाच्या नांवाखाली गायब झाले. बायकांनी शॉपिंगचा प्रयत्न केला, पण किंमती फारच जास्त वाटल्याने बाहेरच्या कलत्या उन्हात उभे राहिलो. बरोब्बर एक तासाने ड्रायव्हर उगवले. त्यांनी आम्हाला तिथल्या मोनॅस्ट्रीमधे नेलं. पण आम्हाला त्यांत बघण्यासारखे विशेष काहीच वाटले नाही. स्वच्छताही बेताचीच होती. वरुन चांगला व्ह्यूही नव्हता. याबाजुला भूतान आणि त्या बाजुला चीन, असे स्थानिक मंडळी सांगत होती. पण ते दोन्ही देश त्या त्या बाजूच्या डोंगरांपलिकडे होते. उजेड कमी होता त्यामुळे फोटो येणेही शक्य वाटत नव्हते. थंडी वाढू लागली होती. आम्ही पुन्हा हॉटेलकडे परतलो. जेवणाची ऑर्डर देऊन रुममधे हिटरच्या उबेत वेळ काढला.
सकाळी हेवी ब्रेकफास्ट केला. मला आश्चर्य हे वाटत होते की मुंबईत एवढा ब्रेकफास्ट आपण कधी खाऊ शकणार नाही आणि इथे सगळे हजम होत होते. साडेआठला निघालो आणि प्रथम वॉर मेमोरियल पाहिले.
१०. वॉर मेमोरियल

इथे चीनबरोबरच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या २२४० हून अधिक शूर सैनिकांची नांवे लिहिली होती. त्यांचे स्मारकही होते आणि त्या युद्धात आपल्या सैनिकांना कशी माघार घ्यावी लागली त्याचा आराखडाही होता. माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो. अपुरी शस्त्रे, अपुरे सैन्य, असल्या हलगर्जी धोरणांमुळे आपला पराभव झाला, असे त्यावेळी माझे वडील आणि शेजारचे दामलेतात्या यांचे मत होते. ते नेहमी संरक्षण मंत्री कृष्णमेनन आणि नेहरुंच्या धोरणावर कोरडे ओढायचे. पेपरांतही तेंव्हा असेच सर्व लिहून यायचे. हे सर्व शूर सैनिक राज्यकर्त्यांच्या गलथानपणामुळे मेले, असे मनांत येऊन तेंव्हाच्या राज्यकर्त्यांबद्दल मनांत चीड उत्पन्न झाली. तवांग पूर्णपणे चिनी सैन्याच्या हाती पडले होते. एवढेच काय बोमदिलापर्यंत ते आले होते. नंतर ते परत गेले हे आपले नशीब! असो.

तळटीपः लेख दुसर्‍या भागात समाप्त होईल. दुसर्‍या भागाच्या शेवटी सर्व फोटोंची लिंक देण्यात येईल. तसेच टूरच्या डिटेल्स देण्यात येतील.

क्रमशः

प्रतिक्रिया

देवांग's picture

21 Nov 2013 - 12:30 pm | देवांग

छान

दिपक.कुवेत's picture

21 Nov 2013 - 1:09 pm | दिपक.कुवेत

एकदा आवडले. अजुन फोटो आणि टुर डिटेल्स ची वाट पहात आहे.

अनिरुद्ध प's picture

21 Nov 2013 - 1:26 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

मेघा देसाई's picture

21 Nov 2013 - 1:27 pm | मेघा देसाई

जायला पहिजे एकदा अरुनाचला

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 1:37 pm | प्यारे१

खल्लास!
डोळे निवले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Nov 2013 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा वा ! आता मस्त लिहिलेय ! आणि फोटोही झकास !! पुभाप्र.

यशोधरा's picture

21 Nov 2013 - 5:08 pm | यशोधरा

आवडले..

सस्नेह's picture

21 Nov 2013 - 5:34 pm | सस्नेह

गेंडा हा प्राणी इतका सुंदर दिसतो हे आजच समजले.
वर्णन आवडले.

सौंदाळा's picture

21 Nov 2013 - 5:43 pm | सौंदाळा

मस्तच,
अजुन एक सुंदर प्रवासवर्णन. (जिभल्या चाटणारी स्मायली)

प्रचेतस's picture

21 Nov 2013 - 5:59 pm | प्रचेतस

जे ब्बात...!!!!!

हरिप्रिया_'s picture

21 Nov 2013 - 6:09 pm | हरिप्रिया_

मस्तच!!!