देरसूचा निरोप..........भाग १ - निशाचर !

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Oct 2013 - 7:26 pm


निशाचर
१९०२ साली माझ्यावर एका अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा प्रदेश अत्यंत दुर्दम्य आणि मानवी वस्ती नसल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे नकाशे उपलब्ध नव्हते हे सांगायला नकोच. या प्रदेशाच्या पश्चिमेला आमुर व युसुरी या दोन अवखळ वाहणाऱ्या नद्या आहेत तर पूर्वेला जपानचा समुद्र आहे. व्लाडिओस्टॉकच्या उत्तरेला असलेल्या या प्रदेशाचा इंग्लिश नकाशांमधे ‘ मॅरीटाईम प्रॉव्हीन्स ’ असा उल्लेख आढळतो पण खुद्द या प्रदेशात त्याला युसुरिया म्हणूनच ओळखले जाते, ते युसुरी नदीमुळे. या नद्यांच्या खोऱ्यांचा व त्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रांचा प्राथमिक अभ्यास करणे याबरोबर सिहोटे-अलिन पर्वतरांगांचा अभ्यास करणेही या जबाबदारीत अंतर्भूत होते. या प्रदेशातील वन्यप्राण्यांचा, वनस्पतींचा व स्थानिक मानव समूहांचा अभ्यास करणे हेही माझ्या आदेशात नमूद केले होते. थोडक्यात या भागाचा पूर्ण अभ्यास करण्याचा मला आदेश होता. यासाठी माझ्याबरोबर सायबेरियन रायफल्सची एक तुकडी व सामान वाहतूकीसाठी खेचरांची व घोड्यांची एक तुकडीही देण्यात आली.

अशाच एका संध्याकाळी या जंगलात सूर्य अस्ताला जात असताना अंधार पडण्याआधी आम्ही मुक्काम करायचे ठरवले. आमच्या घोड्यांसाठी व सैनिकांसाठी पाणी शोधणे हे अत्यंत महत्वाचे होते कारण आमच्याकडील पाण्याचा साठा संपत आला होता. मुक्कामाची जागा शोधत असतानाच जंगल अधिक दाट होऊ लागले व उतारही तीव्र झाला. घोडेही घसरु लागल्यावर त्यांच्या पाठीवरील सामान त्यांच्या डोक्यावरुन खाली उड्या मारु लागले. त्यांच्या बांधलेल्या दोऱ्यांनी त्या सामानाने कशीबशी त्यांची जागा धरुन ठेवली होती. त्या डोंगराच्या सोंडेला वळसा घालून शेवटी आम्ही एकदम एका घळीत उतरलो.

ही जागा खरोखरच भयाण होती. अस्ताव्यस्त पसरलेल्या मोठमोठ्या शिळा, उखडून पडलेल्या झाडांचे अवाढव्य बुंधे, त्यावर पसरलेले दाट मातकट हिरव्या रंगाचे शेवाळे.... एखाद्या भयपटाची आठवण होईल असेच चित्र होते ते ! एवढा भयप्रद नजारा कुठल्याही चित्रपटात कल्पना करुनही घालता आला नसता.

जंगले, झाडे व निसर्ग खरे तर मनाला किती आनंद देऊन जातात पण त्यावेळी मात्र ते निसर्गचित्र बघून माझ्याच नाही तर पलटणीतील सर्वांच्याच मनात पाल चुकचुकली हे मात्र खरे. अभद्रच वाटत होते ते सगळे बघून. मी असला अनुभव जंगलातच काय इतर अनेक ठिकाणी घेतला आहे. काही ठिकाणी आपल्याला अमंगल शक्तींचा वास असल्याचे जाणवते, आपले मन बेचैन होते हे सगळ्यांनीच अनुभवले असेल.

माझ्या माणसांनी घोडे थांबवले व मुक्कामाची तयारी चालू केली. त्यांच्या कुदळींचा व हास्यविनोदांच्या आवाजाने त्या जंगलाच्या निरव शांततेचा भंग झाला व ते उदास वातावरण जरा दूर झाले. सैनिकांनी घोड्यावरील सामान उतरवले व घोड्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. बिचारे घोडे! त्या खडतर मार्गावर सगळ्यात जास्त हाल झाले असतील तर त्यांचेच. या असल्या जागेवर त्यांना चरायलाही जागा मिळेल तर शप्पत. त्यांची चरण्याची सोय उद्या कुठेतरी केलीच पाहिजे असे मनात ठरवून मीही माझे सामान उतरावयाला लागलो.
जंगलात अंधार तसा लवकरच पडतो. झाडांच्या फांद्यातून दिसणार्या आकाशांच्या निळ्या तुकड्यांचा रंग आता हळूहळू बदलायला लागला होता पण जमिनीवर मात्र सावल्या खुपच गडद झाल्या व येणाऱ्या रात्रीची सुचना देत होत्या. मधे पेटवलेल्या शेकोटीच्या नाचणारऱ्या ज्वाळांच्या प्रकाशात झाडाचे ओंडके व त्या शिळा हलत आहेत असा भास होत होता. त्यामागे असलेल्या गडद अंधारात प्रकाश हरवून जात होता व प्रकाशाची मर्यादा लक्षात येत होती. होणाऱ्या आवाजाने अस्वस्थ होत एका जंगली खार एक कर्णकर्कश चिरकली. तिचे डोळे एकदाच लुकलुकले व ती त्या अंधारात नाहिशी झाली.

थोडासा गोंधळ झाला खरा पण लवकरच आमची पलटण स्थिरस्थावर झाली व जरा शांतता पसरली. चहाचा व जेवायचा कार्यक्रम झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या वाटणीचे काम करण्यात गुंतून गेला प्रत्येकाला काहीतरी काम दिलेले होतेच. एक जण त्याची रायफल साफ करत होता तर एक जण त्याचे खोगीर दुरुस्त करत होता. काही जण झोपण्याची तयारी करत होते तर काही जण फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होते. हळूहळू एकएक जण अंथरुणावर पाय पसरु लागले. उबेसाठी त्यांनी त्यांची अंथरुणे जवळजवळ घातली. सगळ्यांनीच आपले लांब कोट चढविले व कानावर टोप्या ओढून घेतल्या. दिवसभरातील श्रमाने थोड्याच वेळात सगळे मुडद्यांसारखे ठार झोपले. चरायला न मिळाल्यामुळे मोकळे सोडलेले घोडेही आमच्या जवळ येऊन उबेला पेंगत होते. मी व ऑलेन्टीएव्ह मात्र अजून जागेच होतो. मी दिवसभराच्या रस्त्याचे वर्णन माझ्या रोजनिशीमधे लिहित होतो तर तो त्याच्या बुटाची दुरुस्ती करत होता. काय झाले होते त्याच्या बुटाला कोण जाणे ! दहा वाजता मी अंथरुणावर पडलो व मळके पांघरुण ओढले. ज्या फरच्या झाडाखाली आम्ही मुक्काम टाकला होता त्याच्या फांद्या त्या पिवळ्या प्रकाशात हलत होत्या. त्या फांद्या हलल्यावर आकाशातीला एखादी चांदणी दिसे व परत अदृष्य होई. माझेही डोळे आता मिटण्याचा हट्ट करु लागले होते. पडल्या पडल्या आम्ही गप्पा मारु लागलो.

अचानक घोड्यांनी कान टवकारले व माना उंचावल्या. दुसर्याच क्षणी तेही शांत झाले. त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही बोलत होतो. माझ्या एका प्रश्नाला उत्तर आले नाही म्हणून मी कूस बदलून त्याच्याकडे बघितले तर ऑलेन्टीएव्ह डोळ्यावर हात धरून अंधारात डोळे फाडून बघायचा प्रयत्न करत होता.
‘काय झाले रे ? मी विचारले.
‘वरुन काहीतरी येतंय’ तो म्हणाला.
आम्ही दोघेही नीट लक्ष देऊन ऐकू लागलो पण शांततेखेरीज काहीही ऐकू येत नव्हते. असे म्हणतात जंगलात शांतताही ऐकू येते. तेवढ्यात दगड गोटे घसरल्याचा आवाज ऐकू आला. कोणीतरी प्राणी घसरला असावा.
‘ अस्वल असेल’ असे म्हणून ऑलेन्टीएव्हने आपली रायफल लोड केली.
‘बंदूक नको...मी माणूस’ असे समोरुन ओरडून उत्तर आल्यावर आम्ही दचकलोच. काही क्षणातच त्या अंधारातून एका माणसाने प्रकाशात पाऊल टाकले.

त्याच्या अंगावर हरणाच्या कातड्याचे जॅकेट होते व खाली त्याच कातड्याची विजार होती. त्याच्या डोईला त्याने कसलेतरी फडके गुंडाळले होते व पायात कुठल्यातरी प्राण्याच्या कातड्याचे जोडे घातले होते (बहुदा काळवीट). पाठीवर झाडांच्या वल्कलांचा पिट्टू अडकवला होता. त्याने हातात एक बर्डिआंका बनावटीची जुनाट रशियन रायफल धरली होती व दुसऱ्या हातात नेम धरण्यासाठी उपयोगी असलेली बेचक्याची काठी ज्याला या भागात ‘सोश्की’ म्हणतात.

‘मॉर्नींग...कपितान’ तो म्हणाला. या भागात स्थानिक जनता सर्व गणवेषधारी माणसांना असेच अभिवादन करतात. त्याने माझा हुद्दा ओळखला असेल असे तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा. त्याने मग शांतपणे आपली रायफल एका झाडाच्या बुंध्याला टेकवून उभी केली व आपल्या पाठीवरचा पिट्टू काढला. आपल्या मळकट बाहीने चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने त्या शेकोटीजवळ बसकण मारली. त्या शेकोटीच्या प्रकाशात मला त्या माणसाला नीट बघता आले.

आमच्या या आगंतुक पाहूण्याचे वय आदमासे पंचेचाळीस असावे. त्याला तसा बुटकाच म्हटले पाहिजे पण त्याचा बांधा मजबूत दिसत होता व त्याची ताकद त्याच्या राकट आडव्या खांद्यातून डोकावत होती. त्याचे दंड व स्नायू कणखर दिसत होते पण पाय थोडेसे बाहेरच्या बाजूस वाकलेले दिसत होते. उन, पाऊस व थंडीने रापलेला चेहरा त्याचा चेहरा त्या प्रदेशातील आदिवासींसारखाच होता. वर आलेली गालफाडे, छोटेसे नाक, मिचमिचे डोळे व मंगोल वंशाच्या पुरुषांच्या पापण्यांवर पडते तशी एक घडीही त्याच्या भुवईखाली पडलेली दिसत होती. रुंद जिवणी व त्यातून डोकावणारे मजबूत मोठे दात त्या वंशाची खात्री देत होते. लालसर रंगाची छोटी मिशी व त्याच रंगाची हनवुटीवरची छोटीशी खुरटी दाढी, त्यात एवढे काही विशेष नव्हते पण त्याच्याकडे पाहिल्या पाहिल्या चटकन लक्षात येत होते ते त्याचे डोळे. काळेभोर डोळे व नितळ दृष्टी हे त्याचे वैशिष्ट्य लक्षात राहील असेच होते. आत्यंतिक प्रामाणिकपणा, ठामपणा, सभ्यपणा व जगावरचा विश्वास त्या नजरेतून डोकावत होता.

तो आल्या आल्या जसे आम्ही त्याचे स्वागत केले तसे आमच्या पाहुण्याने आम्हाला स्वीकारले दिसले नाही. त्याने शांतपणे आमच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या छातीवरील खिशातून तंबाखूचा बटवा काढला, स्वत:चा पाईप भरला व शांतपणे तो त्यातून धूर काढू लागला. तो कोण आहे, कुठून आला आहे असली फालतू चौकशी न करता मी त्याला जेवणाबद्दल विचारले. टाईगामधे तशीच पद्धत आहे.
‘धन्यवाद ! खाणार ! मी.. दिवसभर जेवण नाही’ त्याने स्वत:कडे बोट दाखवत म्हटले.
तो जेवत असताना मी परत एकदा त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याच्या कमरेला शिकारी चाकू लटकवलेला होता व त्याचे हात राकट व व्रणांनी भरलेले होते. तशाच जखमांचे व्रण त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होते. भुवईवरचा व कानाखालचा व्रण तर बराच मोठा दिसत होता. त्याने त्याच्या डोक्यावरचे फडके काढल्यावर त्याच्या लाल रंगाच्या केसांच्या अस्ताव्यस्त जटा माझ्या दृष्टीस पडल्या. ‘केसांना बरेच महिने कात्री लागलेली दिसत नाही’ मी मनाशी पुटपुटलो.
आत्तापर्यंत या माणसाने तोंडातून एकही शब्द काढला नव्हता. न राहवून ऑलेन्टीएव्हने विचारले,
‘तू चिनी आहेस का कोरियन?’
‘ मी गोल्डी आहे’. तो म्हणाला.
मला या अस्तंगत होत जाणाऱ्या आदिवासी जमातीच्या एखाद्या माणसाला भेटण्याची इच्छा होतीच. ही जमात मांचू आणि टुंगुस जमातींच्या जवळची होती. या जमातीची रशियातील लोकसंख्या आता पाच हजाराहून कमी राहिली होती व फार थोडे चिनी हद्दीत असतील. या लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार व मासेमारी करणे हाच आहे. त्यांच्या संस्कृतीवर चिनचा प्रभाव मोठा आहे. त्यातील काही जण बौद्ध आहेत तर काही जणांना धर्म म्हणजे काय याची कल्पनाच नसावी.
‘तू शिकारी दिसतोस ! बरोबर ना ?’ मी त्याला विचारले.
‘हो ! मी फक्त शिकार ! दिवसभर. मी मासे नाही, काही नाही. फक्त शिकार !’ त्याची बोलण्याची पद्धत मला मजेशीर वाटली. जणू त्याला फक्त अर्थाशीच मतलब असावा.
‘कुठे राहतोस तू ?’ ऑलेन्टीएव्हने विचारले.
‘मला घर नाही ! चालतो. शेकोटी, झोपडी जेवण. सारखी शिकार. घर नाही’
मग त्याने दिवसभर काय झाले ते सांगितले. तो एका काळविटाच्या मागावर होता. त्याने त्याला जखमी केले होते. त्याच्या खुरांचा माग काढत तो येथपर्यंत पोहोचला होता. अंधारात त्याला शेकोटीचा उजेड दिसल्यावर तो सरळ आमच्याकडे आला होता..
‘मी जाणार होतो. म्हटले दूर कोण आले, ते बघू. कपितान व सैनिक! मी सरळ इकडेच आलो.’
‘नाव काय तुझे?’ मी विचारले.
‘देरसू ! देरसू उझाला’.

या माणसात मला अचानक रस वाटू लागला. त्याच्यात काहीतरी विशेष होते हे निश्चित. त्याची भाषा सरळ होती व त्याचा स्वर मृदू पण ठाम होता. मग आम्ही गप्पा मारल्या. त्याने त्याच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. जसा तो बोलत गेला तसा तो मला जास्तच आवडू लागला. या माणसाने आपले आयुष्य टाईगाच्या जंगलात शिकारीत घालविले होते. बाहेरच्या शहरी संस्कृतीचे त्याला वारेही लागलेले नव्हते. जणू टाईगाचा आदिमानवच. त्याच्या हकिकतींमधून मला कळले की तो त्याच्या रायफलमुळेच या जंगलात तग धरुन आहे. शिकारीत मरलेल्या प्राण्यांच्या बदल्यात चिनी व्यापाऱ्यांकडून छर्रे, दारु व तंबाखू मिळवायची एवढाच काय तो त्याचा बाहेरच्या जगाशी संबंध. ती रायफलही त्याच्याकडे त्याच्या वडिलांकडून आलेली होती. त्याचे वय त्याच्या अंदाजाप्रमाणे त्रेपन्न होते व त्याने आत्तापर्यंत एकदाही घरात रात्र काढलेली नव्हती. आकाशाखाली झोपणे त्याला पावसात शक्य होत नसे तेव्हा तो स्वत:साठी पाने व लाकूड वापरुन तात्पुरता निवारा उभा करे व त्यात झोपे. मात्र त्याच्या आठवणीत आई, वडील, बहीण व घर असलेले आठवत होते.
‘ते सगळे वारले’ एकाएकी तो गंभीर झाला.
‘मला बायको, मुलगा, मुलगी, घर, सगळे होते. पण देवीच्या साथीत ते सगळे देवाघरी गेले व मला घर जाळून टाकायला लागले. मी एकटा..’.

हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची छाया पसरली. बहुदा त्याला पूर्वायुष्यात भोगलेल्या यातना आठवत असाव्यात. मी त्याचे सांत्वन करायचा प्रयत्न केला पण ज्याचे घरदार व माणसे उध्वस्त झाली आहेत त्याचे सांत्वन कोणत्या शब्दात करणार? कदाचित काळच त्याचे सांत्वन करु शकेल. मला त्याला मदत करावीशी वाटत होती पण कशी ते उमजत नव्हते. माझ्या डोक्यात तेवढ्यात एक कल्पना आली. त्याच्या जुनाट रायफलबद्दल मी त्याला नवी कोरी रायफल देऊ केली पण त्याला त्याने नम्रपणे स्पष्ट नकार दिला. ती त्याच्या वडिलांची आठवण होती व अजुनही चांगले काम देत होती असे त्याचे म्हणणे पडले. शिवाय ती रायफल त्याची अत्यंत आवडती होती हेही महत्वाचे कारण होतेच. त्याने त्याची रायफल उचलली व तो तिला प्रेमाने कुरवाळू लागला.

मध्यरात्र उलटून गेली तरी आम्ही गप्पा मारतच होतो. अर्थात देरसूच बोलत होता व मी ऐकत होतो. मला त्याच्या गोष्टी ऐकून मोठी मजा वाटत होती. त्याच्या शिकारीच्या गोष्टी व तो एकदा लुटारुंच्या तावडीत कसा सापडला व त्याने त्याची कशी सुटका करुन घेतली हे सगळे ऐकताना मला फार जादूई वाटत होते. तो वाघाला मारणार नाही कारण तो त्या जंगलाचा देव आहे व जिनसेंगचे माणसांपासून संरक्षण करतो हेही मला नव्यानेच कळाले. नद्यांचे पूर व सैतानी शक्ती कशा असतात याबद्दलही महत्वाची माहिती त्याने पुरवली.
एकदातर एका वाघाने त्याला जमिनीवर लोळवले होते. त्याच्या बायकोने त्या जंगलात त्याचा माग काढला तेव्हा हा जखमी अवस्थेत रक्तस्त्रावामुळे बेशुद्ध पडलेला तिला आढळला होता. त्या आजारातून तो उठेपर्यंत त्याची बायकोच शिकार करुन सगळ्यांचे पोट भरत होती.
गप्पांच्या ओघात मी त्याला शेवटी सध्या आपण कोठे आहोत हे विचारले. त्याने सांगितले की आपण लेफू नदीच्या उगमाजवळ आहोत आणि उद्या आपल्याला पहिली झोपडी लागेल.

एका सैनिकाला जाग आली त्याने उठुन आमच्याकडे डोळे फाडून बघितले व हसून तो परत झोपी गेला. अजुनही वर खाली सगळीकडे अंधारच होता. दवाचे चांगले मोठाले थेंब पडायला सुरुवात झाली होती. उद्या चांगली हवा असणार मी मनाशीच म्हटले. वातावरण स्तब्ध होते जणूकाही निसर्गाची विश्रांतीच चालू होती. एक तास उलटला असेल नसेल, आणि पूर्व दिशेला रंगांची उधळण झाली. मी माझ्या घड्याळात पाहिले, सहा वाजले होते. आज ऑर्डर्लीची जबाबदारी ज्याची होती त्या सैनिकाला उठविण्याची वेळ झाली होती. मी त्याला हलवले व उठायला सांगितले. तो डोळे चोळत उठला व त्याची नजर देरसूवर पडली.
‘हॅलो ! अरे वा पाहूणा आलेला दिसतोय’ असे म्हणून त्याने बूटाशी झटापट चालू केली.

आकाशाचा रंग आता निळा झाला नंतर ढगाळ झाला व ढगही दाटून आले. त्या रंगाची छाया खाली झाडांवर व डोंगरांवरही पसरली. काही क्षणातच आमच्या तळावर गडबड उडाली. घोडे फुरफरु लागले. खारीने तशीच कर्कश्य साद घातली पण यावेळी तिला कोणीतरी प्रतिसाद दिला. हळद्याची मंजूळ शीळ ऐकू येऊ लागली तर त्याला साथ म्हणून सुतार पक्षी तबला बडवायला लागले. टाईगाला जाग आली. प्रत्येक मिनिटाला प्रकाश वाढत होता. थोड्याच वेळात डोंगराआडून सूर्याची किरणे त्या जंगलात फाकली व सगळीकडे दिवस उजाडला. आता आमच्या तळावरचे दृष्य एकदम बदलले. ज्या ठिकाणी जिवंत ज्वाळा आकाशात जात होत्या त्या ठिकाणी आता मद्दड राखेचा ढीग पडला होता. आमचे रिकामे कप जागेवरच लवंडले होते व ज्या ठिकाणी माझा तंबू होता तेथे आता एक काठी उभी दिसत होती व त्याखाली तुडवलेले गवत.....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.
एक स्वैर भाषांतर.
ज्यांना पाडस आवडते त्यांना हे निश्चितच आवडेल......असे वाटते.

कथालेख

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

14 Oct 2013 - 7:52 pm | अनिरुद्ध प

भाषांतर्,पु भा प्र.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2013 - 8:08 pm | मुक्त विहारि

नेहमीप्रमाणेच ओघवते लिखाण.

पु.भा.प्र.

आतिवास's picture

14 Oct 2013 - 8:23 pm | आतिवास

वा! देरसू! माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक.
तुम्ही सुरेख लिहिलं आहे. चित्रपटाची एकेक फ्रेम तंतोतंत डोळ्यांसमोर आली.
पाहतेच आता चित्रपट परत. :-)

पुढच्या भागाची वाट पाहते.

शैलेन्द्र's picture

14 Oct 2013 - 10:01 pm | शैलेन्द्र

मस्त आहे.. येवुद्या अजुन

अहो साहेब, तुमची वर्णानशैली इतकी जबरी आहे कि हा देरसू कोणालाही आवडेल.
पुभाप्र.

पैसा's picture

15 Oct 2013 - 9:05 am | पैसा

अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं. इतकं प्रत्ययकारी वर्णन! मस्तच!

जयंत कुलकर्णी's picture

18 Oct 2013 - 4:06 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !