प्रथम तुजं पाहता........!!!
एका ऑस्ट्रेलिअन शॉर्ट स्टोरीवर आधारित.
मुळ कथा Hate at First Sight , Kathy Lette
[मानवी मनाच्या अनेक कंगोर्यापैकी हा एक कंगोरा! सहसा न चर्चीलेला, पण का कुणास ठाउक; ऑस्ट्रेलिअन लिटरेचर मध्ये मी अश्या दोन चार कथा वाचल्या. आपल्या "ताई" या संज्ञेला तडा देणार्या या कथा वाचुन त्यावर आधारित काही लिहावं अस वाटल खरं,पण खरच आपल्या संस्कृतीत असुनही नसलेला असा हा कंगोरा आहे. मी ही या कंगोर्याची सांगड आपल्या भाषेत मांडु नाही शकले. म्हणुन मुळ कथेच्या स्वैर अनुवादाचा हा प्रयत्न! गोड मानुन घ्याल अशी आशा.]
"सुझी....?" आश्चर्याने काठोकाठ भरलेल्या त्या हाकेसरशी चेलोची भली मोठी केस गाडीच्या डिकीत ठेवत असलेली सुझी अक्षरशः धपकन पडणारच होती. त्या सेलोचा आकार, त्यात तिचे स्वतःचे आकारमान, अन अवचीत आलेल्या त्या हाकेने गर्र्कन वळायचा तिचा प्रयत्न, या सगळ्या गणिताचे उत्तर फक्त तिच्या पाय पसररुन पडण्याकडेच नेत होते. स्वतःला कसबस सावरत सुझीने कॅरोलिनकडे नजर वळवली. पुन्हा एकदा कॅरोलिन; तिची मोठी बहिण तिच्यासमोर उभी आहे हे मनापर्यंत पोहोचायच्या आधी तिच्या नजरेने समोर उभे असलेले ते शीडशीडीत, सुडौल सुंदर व्यक्तीमत्वच टिपल. स्वतःशीच उसासत तिने आता मोठ्या बहिणीवर लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न केला.
आपल्या हाय हिल्सवर टकटक चालत कॅरोलिन अगदी हक्काने तिच्या गाडीपर्यंत पोहोचली. सुझीच्या हातातली अवजड चेलो केस ओढुन घेत तिने ती जमिनीवर आदळली. "कुठे? कुठे चालली आहेस आता तू? "गाडीत मागच्या सिटवर असलेली सुझीची भली मोठी ट्रॅव्हलिंग बॅग आता तिला दिसली. चेहर्यावर नाराजी अगदी अशी ओसंडुन वाहु लागली तिच्या.
आता सुझीला अगदी म्हणजे अगदी कानकोंड झालं. आपण काही फार मोठा अपराध करत आहोत अस आता तिला अगदी मनःपुर्वक वाटु लागलं. पण मग, गेले १५ दिवस तिने या विषयावर केलेले चिंतन अखेरीस तिच्या कामी आले. मनाचा सारा निर्धार एकवटुन तिने कॅरोलिनच्या हातातली चेलो केस काढुन घेतली अन कारच्या डिकीत व्यवस्थीत ठेवायला सुरवात केली. तिचा तो अविर्भाव पाहुन, नाही म्हंटल तरी कॅरोलिन जरा वरमलीच. "सुझी...." आवाजात किंचीत नरमाई आणत तिने विचारले, "अग्..काय हा खुळेपणा? कोठे निघाली आहेस तू?"
" हे बघ कॅरी, इथे मला भवितव्य नाही. मी सिडनी सोडुन चालले आहे." सुझीने अगदी निर्णायक आवाजात सांगितले.
"हं!" कॅरोलिन उसासली. या सुझीला कधी समजणार असा प्रश्न तिला मनोमन पडला
" अग पण, अस काय घडलं की तू सिडनीवर राग काढावास?"
"काय घडायला हवय? काही घडतच नाही आहे हेच तर माझ्या जाण्याचे कारण आहे." सुझी उसळुन म्हणाली
कॅरोलिनच्याही चेहर्यावर राग, नाराजी उमटली. ही तिची लहाण बहिण! अन तिचे हे पुरुषसंगाचे वेड! कधी समजणार आहे ह्या वेडीला देव जाणे.
"अग! तू जरा वजन कमी कर! सहज मिळुन जाइल तुला कोणीही इथेच. त्या साठी एव्हढा स्वतःचा ठावठिकाणा कशाला सोडायला हवा?"
" हो! मिळतील ना!" सुझी फुत्कारली, " पण ते टिकतील जोवर तू भेटत नाहीस तोवरच. त्या नंतर ते कुठे हवेत गायब होतात, की त्यांना जमिन गिळते देव जाणे!"
कॅरोलिन थोडीशी वरमली. "अग त्यातला एकही तुझ्या लायकिचा नव्हता." ती अजीजीने म्हणाली, " भेटेल ना! भेटेल तूला कोणी ज्याला तुझी किंमत असेल, तोवर तू थोडा दम धरायला हवा."
सुझन कॅरीपेक्षा एक वर्षाने लहाण! अगदी बालपणापासुन कॅरीने आपल्या या बाळसेदार बहिणीला जळीस्थळी सांभाळले होते. शाळेत सुद्धा कायम तिच्या अवतीभोवती असायची ती. जे तिला जमणार नाही त्यापासुन तिने कायमच तिला दुर ठेवले. शाळेच्या मैदानावर बाकिची मुले चिडवतात म्हणुन सुझीला चेलो शिकायलापण प्रोत्साहन द्यायला कॅरीच तर पुढे होती. अगदी दोन वर्षापुर्वी त्यांची आई वारली तेंव्हा सुझीला कायम सांभाळेन अस वचन तिने आईला दिले होते. शिक्षणात जास्त गती नाही तर बाकिचे छोटे मोठे जॉब्ज करायचा सल्लाही तिनेच तर दिला होता सुझीला. जर कॅरी नसती तर बिचार्या सुझीच काय झाल असत?
मग सुरु झाले यौवनाचे दिवस. अगदी शाळेपासुन जर कुणी एखादा मुलगा अथवा तरुण सुझीच्या चेलो वाजवण्यावर, तिच्या बुद्धीमान वक्तव्यावर ,(सुझी डीबेटींग मध्ये कायम पुढे असायची, पण त्यामुळे माणसाचा स्वभाव वादावादीचा, भांडखोर होतो अस कॅरीच म्हणन ऐकुन आईने तिला डीबेट्मधुन काढुन टाकल होत) भाळुन जर घरी आला, तर तो दुसर्या दिवसापासुन फक्त आणि फक्त कॅरीच्याच मागे हिंडायचा.
सुझी पुन्हा एकदा उसासली. वीतभर कमरेची ५ फुट ९ इंच उंचीची ही कॅरी होतीच तशी सुंदर. सुवर्ण कांती, निटस जिवणी, किंचीत निळसर झाक असणारे तिचे डोळे, चेहर्याला शोभेल असा क्युट ब्लंट! पाहणार्याच भान हरपायच पहाता पहाता! त्यात ती बॅकिंगमध्ये उत्तम करीअर करुन होती.
त्या दोघींच्यात बहिणी म्हणुन जराही साम्य नव्हते राखले देवाने. सुझी मेणाहुन मऊ स्वभावाची, तर कॅरी जणु एक रसरशीत लाव्हा! सुझीच लक्षणीय जडत्व, तर चटपटीत कॅरी! हुषार कॅरी! शहाणी कॅरी! व्यवहारी कॅरी! अन प्रत्येक गोष्टीत उजवी कॅरी! तिने ठरवले असते तर चेलो वाजवणेही काही अवघड नव्हते तिला, पण अभ्यासाचा एव्हढा ताण होता तिच्यावर की तिने चेलो तिच्या बहिणीसाठी सोडुन दिला. अन त्यासाठी सुझी खरच मनापासुन कृतज्ञ होती.
" किती वाट पहायची मी? आज मी ३८ वर्ष पार केली. माझ्या शरीरातली प्रजनन क्षमता मला आणि जास्तीत जास्त दोन वर्षे साथ देइल, मग ती ही हात टेकेल माझ्या पुढे. मला घर हवय माझ स्वतःच!" सुझी रडवेली झाली, " एक कुटुंब हवय माझं! एखादा साधासाच माणुस, एखादं गोंडस छोटुलं........."
"अन हे तूला सिडनी सोडल्यावर मिळायच आहे?" कॅरी ताडकन म्हणाली. "कोण देणार आहे हे सगळ तुला? मला सोडुन तू कुठे जाणार? कोण काळजी घेइल तूझी? सोड हा मुर्खपणा, अन चल घरात! मला काहीही न कळवता तू हे असले वेडाचार करुच कशी शकतेस? आपण पहिला शांतपणे बोलु या विषयावर."
बोलणे! तेच तर टाळत होती सुझी! कॅरोलिन अगदी बघता बघता सुझी कशी वेडी आहे, तिच म्हणनं कस चुकीचे आहे हे सुझीलाच पटवु शकत होती. मुर्ख सुझी फक्त कॅरोलिन ऐनवेळी अन वेळोवेळी तिच रक्षण करत होती म्हणुन या जगात टिकुन होती, नाहीतर तिची कधीची वाट लागली असती. पण आज सुझीने अगदी ठरवल होतं. जे होइल ते माझ्यामुळे, चांगल घडो वा वाईट ! माझी मी जबाबदार! अर्थात यातुन काही चांगल घडेल याची तिला स्वतःलाही खात्री नव्हतीच पण आता हे असह्य झाल होत. आयुष्यात निदान एक पाउल तिला स्वतःच्या जोरावर, स्वतःच्या निर्णयावर टाकायच होतं.आज ती परतुन घरात गेली तर परत बाहेर पडु शकणार नव्हती. गेले १५ दिवस तिने हाच एक विचार करण्यासाठी घेतले होते.
" मला काहीही बोलायच नाही आहे, मला जाउ दे " सुझी विलक्षण शांतपणे म्हणाली. तिने तिच्या सेकंड हँड कारच दार उघडलं अन स्वतःला ड्रायव्हर सीटमध्ये कोंबल.
तिच्या त्या एकदम शांत आवाजाने आता कॅरी भानावर आल्यासारखी झाली. सुझी थांबणार नाही हे तिच्या लक्षात आलं. "पण तू चालली कोठे आहेस ते तरी सांगुन जा!" आपल्या लहाण बहिणीच्या काळजीने तिचा चेहरा विवर्ण झाला. "कोण आहे आपल्या दोघींना एकमेकाशिवाय रक्ताचं?"
"तुला, तुझे करीअर, तुझा बॉयफ्रेंड आहे. नसेल तर फक्त मलाच कुणी. " सुझनचे शब्द आता जरा धारदार झाले होते.
"ठिक आहे. " कॅरीने माघार घेतली, "पण असं कोण बसलय तुझ्यासाठी घर अन संसार तयार घेउन ते तरी सांग." नाही म्हंटल तरी कॅरीच्या आवाजात उपहास उमटलाच.
"अॅलीस स्प्रींग!"
"काय? वाळवंटात? कोण आहे हा ठग?" कॅरी किंचाळलीच. आईची सारी इस्टेट तिने तिच्या लहाण बहिणीला मोठ्या उदार मनाने देउ केली होती. म्हणजे नावावर नव्हती केली, पण काढुनही नव्हती घेतली. सुझी रहात होती ते घर त्यांच्या आईचे होते. अन या सिडनीच्या उपनगरातल्या घराची किंमत काही साधीसुधी नव्हती. जो कोणी या मुर्ख सुझीला नादाला लावतोय , त्याचा डोळा या इस्टेटीवरच असणार! दुसर आहे काय या पोरीत?
"कोणीही नाही आहे." सुझी शांतपणे म्हणाली. "१५ दिवसांपुर्वी अॅलीस स्प्रिंगच्या मेयरची पेपरात जाहिरात आली होती. अॅलीस स्प्रिंगच्या तरुणांना मुलीच मिळत नाही आहेत. म्हणुन उपवर तरुणांसाठी त्यांनी दोन दिवसांनी उपवर तरुणींच गेट टुगेदर ठरवलं आहे. मी माझं नशिब त्यात आजमावुन पहायच ठरवलय. काय घडेल ते घडेल. अन जे घडेल त्याचा दोष फक्त माझा असेल. मी घराचे पेपर्स अन किल्ली तुला दोन दिवसापुर्वीच पोस्टाने पाठवली आहे, मिळेल आज उद्या. माझ सामान म्हणजे माझे कपडे, माझ्या म्युझिक सिडीज अन हा चेलो, तेव्हढच, फक्त तेव्हढच घेउन चाललेय मी. अन याच्यावर तुझा काहीही आक्षेप असण्याचे कारण नाही. "
"अग! मी तसं नव्हते म्हणतं. " खरतर कॅरोलिन हादरलीच होती. "हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण आपली, म्हणजे मला नकोच आहे ती, तुझ्यासाठीच आहे ती, इस्टेट जर बळकावायला जर कोणी तुला नादाला लावेल तर? मग तुझ्याकडे काय रहाणार? असा विचार करुन मी म्हणत होते."
"आता ती इस्टेट तुझ्याकडे आहे तेंव्हा माझा रस्ता सोड!" सुझीने कार सुरु केली.
" हे बघ! अजुन वेळ गेली नाही....." कॅरी तिच्या कारच्या पुढ्यात उभी राहिली, पण सुझीने रिव्हर्स मारत गाडी मागे घेउन झटक्यात ड्राइव्ह वे सोडुन लॉन मध्ये घातली अन, आरामात नेचर्स स्ट्रीप वरुन रस्त्याला लावली सुद्धा.
(क्रमश: )
__/\__
अपर्णा
Book traversal links for प्रथम तुजं पाहता........!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतेय..
पुढचा भाग लवकर येउ देत...
+१
विषय वेगळा दिसतोय. वाचतेय.
हम्म... इन्ट्रेस्टिन्ग.
वाचते आहे..
रोचक!! ताईपणाच्या भानगडीत
उत्तम सुरवात
कांहीशी पटते... कांहीशी नाही.
-१
दोन वेगळ्या समस्या...
हम्म...
छान वाटते आहे कथा!
प्रभावी....
छान लिहिलय अपरणातै.
वाचतोय !
+१
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
वाचतोय!!
वाचतेय!
हं..
पुढचा भाग वाचण्यासाठी उत्सुक.
वाचतोय
उत्सुक
वाचतोय.
कथा छानच अशी वाटते. दूसरा भाग
जास्त उत्कंठा ताणू नका!
वेगळ्या पार्श्वभूमीवरची वेगळी कथा.
पुढचा भाग केव्हा?
सर्वांना धन्यवाद.
सुंदर कथा आहे. अनुवादही छान