लग्नाला यायचं हं!

सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला.
“अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?”
“काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.”
“ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.”
एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो.
दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात.
आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो.
“जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.”
“ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“
“आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.”
“प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.”
“गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.”
“सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.”

या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी.
एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.”
“अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.”
“तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?”
“अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.”
परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?”
आता बघा तुम्हीच.
आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते
a
म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अ‍ॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते.
b
या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज)
हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.)
c
(कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर)
हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते.
आता आमचे खरे काम सुरु होते.
ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी.
कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात.
d
उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो.
कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते.
पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते.
f
(सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट)
आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अ‍ॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्‍याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात.
f
(कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन)
आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात.
j
(लॅमिनेशन मशीन)
काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते.
नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्‍या माणसाने येऊ नये असा संकेत आहे.
k
(गिलोटीन: पेपर कटिंग मशीन)
डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते.
l
(हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.)
m
पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्‍या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात.
n
नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात.
o
“आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?”
“तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अ‍ॅडव्हान्स.”
....................................................................................................................
(ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

आयला भारी बे अभ्या. मस्तच लिहिले आहेस. नेहमी पाहतो ती लग्नपत्रिका तयार करण्यातपण किती लडतरी असतेत ते निस्ती पत्रिका बगून कळत नाही. त्यामुळे हे बघितल्यावर माहितीत खूप भर पडली :)

अवांतरः आधी वाचून मला वाटलं ही अनौन्समेंट आहे की काय ;)

हात्तिच्या! अपेक्षाभंग झाला की रे अभ्या! :-P..

लेख सवडीनं वाचेन.. :-D.

अपेक्षा भंग झाला. :)

मलाही वाटलं अभ्याच्या लग्नाची लग्नपत्रिका आहे, आणि सर्वांना जाहिर निमंत्रण दिलंय.असं काही.

-दिलीप बिरुटे

अगदी इतक्या आनंदाने, उत्सुकतेने धागा उघडला होता.

सगळ्यांना एवडं लेकरु काम मरमर काम करतंय हे दिसंना.
कसं काम करतो एवढं सांगायला गेलो तर माझ्याच लग्नाची चर्चा.
करतो हो. लवकर करतो. :) केल्यावर अवश्य सांगतो.
वर्‍हाड असतंय जेवणासाठी एवढं मात्र खरं. ;)

आभ्या, ते तुसं एकारान्त आडनाव आमच्यावालं एकारान्त नाही. आम्हाला केल्यावर अवश्य सांगतो हे शोभते. असं करू नको राव ! आहेर बिहेराची काळजी नसावी. " आपल्या प्रेमळ उपस्थेतीची आम्हास आस आहे तोच आम्हाला मिळलेला आहेर " हे वाक्य आपण गाळू फारतर ! बाकी मीही सिझन मधे सोलापुरास येतो. स्नेहाताई व मला
शिकावू उमेदवार ( निव्वृत्त शिकाउ ) म्हणून घेशील काय ? मौज मस्ती मस्करीत आशीर्वाद चे आर्शीवाद होणार नाही याची गॅरंटी !

एकदम छान माहिती.

छान माहिती..

मस्त रे मित्रा.. एकदम इंटरेस्टिंग.

असेच एका लहान गावातल्या म्युझिक कम ऑलपर्पज स्टुडियोत बसलेलो असताना तत्कालीन नवीन पद्धतीने निवडणुकांच्या "कॅसेट्स" बनवून घेणारे लोक्स आले होते त्यांच्या स्टुडिओमालकाशी चर्चा आठवल्या.

"त्यांना दादा म्हणतात पण ते वीस वर्षाचेच आहेत.. 'तरुण तडफदार' मधे घाला त्यांना.

"अर्र .. हे अण्णाप्पा साठ वर्षाचे आहेत का.. मग तरुण तडफदार नव्हे... 'अनुभवी नेतृत्व' मधे घाल.."

"थांबा.. तुम्ही आधी तरुण तडफदार कोणकोण त्यांची सगळी नावं एकदम सांगा.. लिही रे.. "

"बेडगीकर कोण? अच्छा.. नव्वदचे आहेत का? काही करत नाहीत ना ते हल्ली... "आशीर्वाद" मधे घे.."

इत्यादि..

पैसे कोण देणारे? मग त्यांचे नाव आधारस्तंभ म्हणून टाक.
हे भाई आहेत का? मग खंबीर साथ करा.
मागचा परांचा कोणाचा आहे? शुभेच्छुक करा फोटोसहीत.
उरलेले व्हय? नावे टाका फक्त.
बसत नाहीत व्हय? मंडळाचे नाव घ्या फक्त.
ओ प्रेसवाले जरा रेट कमी करा की, तुमचे पण नाव टाकतो त्यात.
(आमचे असतेच हो. फक्त टाकायला लाज वाटते ;) )

पैसे कोण देणारे? मग त्यांचे नाव आधारस्तंभ म्हणून टाक.
हे भाई आहेत का? मग खंबीर साथ करा.

आई ग्ग.. जबरी... :D

मस्त रे अभ्या.
या विषयावर एकदाचा लिहिता झालास.

फक्त इतक्यातच थांबू नकोस. छपाई तंत्रज्ञानावर अजूनही लेख येऊ देत.

बाकी शेजारी राहणार्‍या पाटीलकाकांनी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोन का केला म्हणे?

तू गप रे मेल्या.. नसत्या शंकाच भारी तुला. वशाड मेलो.

=))

एक शंका आहे.

हे "वशाड मेलो" मधलं वशाड नक्की काय प्रकार आहे? कुणी वशाड मेलो म्हटले की लोळून हसणारी स्मायली बघायची लै सवय झालीय , पण अज्ञान तसेच राहिले. कृपया बॅट्री टाका प्ळीज.

कोकणी भाषेतला शब्द आहे.
बहुधा 'आचरट' ह्या शब्दाला समानार्थी असावा.

धन्यवाद. :)

वशाड हा 'ओसाड'चा अपभ्रंश आहे.
मेलो>> मेला..
कोकणीत आ चा ओ.. आणि ओ चा आ होतो..
उदा. हा काय करतोय.. हो काय करता हा

ओसाड चा अपभ्रंश वशाड आहे तर "वशाड मेलो" चा अर्थ शिवीसारखा कसा होईल?

वशाड मेलो ला शिवीचा दर्जा नाहीच आहे मुळी.. असच म्हणायचं असतं..

माझा एक बिगरकोकणी मित्र 'शिक्षणाच्या आयचा घोव' ऐकल्यावर तावातावाने बोलत होता की शिवी वापरलीच कशी. त्याला मी शांतपणे म्हटलं 'बाबा रे, घोव या शब्दाचा अर्थ 'नवरा' असा होतो' आता यात गलिच्छ काये ते तूच सांग.

त्याला मी शांतपणे म्हटलं 'बाबा रे, घोव या शब्दाचा अर्थ 'नवरा' असा होतो' आता यात गलिच्छ काये ते तूच सांग.

हम्म! बरोच पोचलेलो दिसतंय की रे तू!!!
तो शब्दप्रयोग तसा नाहिये सुधांशूराव!
आणि तो मूळचा जसा आहे ती शिवीच आहे!!!
आणि हो, ती गलिच्छ ही आहे!!!!!
यापेक्षा अधिक इथे देऊ शकत नाही! इथले लोकं काका म्हणतात आम्हाला!!
:)

>>आणि हो, ती गलिच्छ ही आहे!!!!!
असं पण आहे का!! बर झालं म्हणजे कोकणाबाहेरच्या लोकांसमोरच वापरावा फक्त. अर्थ विचारला तर तयार आहेच माझ्याकडे. तुम्ही खरा अर्थ कळवा सवडीने. ;)

हम्म ओक्के...इंट्रेस्टिंग!!!

'वशाडी येवो' हाही या गाळेचा (= शिवीचा) पाठभेद. आठवा: असा मी असामी मधले भिकाजी जोशी ('लग्नाला जातो मी') - वशाडी येवो या नारदास. एव्हाना त्या सुभद्रेचे लग्न होऊन तींस पोरदेखील झाले असेल :)

धन्यवाद णंदणभौ या माहितीबद्दल :)

बॅट्या आता बास कर हां. ;)
आपण त्याच्या पत्रिकेत 'आमच्या वशाड मेल्याच्या लग्नाला यायचं हं' असं लिहून खाली आपल्या सगळ्यांची नांवे लिहू.
मी त्याला सेपरेट बॉर्डर करुन देतो :)

=)) =))

(वशाडमेला) बॅटमॅन.

तुम्ही टाइमफिक्स चाकरमान्याना न्हाय कळाया हे धंदे. ;)
मी कधी घरी येतो अन जातो हे माझ्या घरातल्या लोकांना कळत नाही, शेजार्‍यांना तर लै लांब.

लका लै भारीये बे हे सगळं मजा आली वाचून…मेटालिक ,सिल्क ,टेक्श्चर वगैरे कागद प्रकार यात वापरता येतात काय ?

ऑफसेट प्रिटिंगमध्ये पांढरा रंग छापत नाहीत. तो कागदाचा गृहीत धरलेला असतो. त्यामुळे छापू शकतो पण फोटो वगैरे रिझल्ट मार खातात. टेक्श्चर पेपर त्रास कर्तात मशीनला. त्यापेक्षा टेक्श्चरची इमेज वापरुन रिझल्ट मिळवता येतो. मेटॅलिक शाई स्पॉट कलर म्हणून छापता येते. तो चार रंगापेक्षा वेगळा रंग असतो. सिल्क वर ऑफसेट प्रिंटीग होते पण ते वेबफीड (सलग रोल न्यूजपेपेरप्रमाणे) असते. हे शीटफीड मशीन आहे.

अभ्या तेरे धागे का टायटल पढके मे कौअन्से गाणे पे नाचु तेरि शादि मे ऐसा सोच रैली थी पर तुमने अप्पुनको बोले तो पोपट कर दियेला अहि ;)
झक्कास माहीती रे भविष्यातली एक( पत्रिका छापायची ) ऑर्डेर तुलाच मिळणार ;)

होय गं पिवशे, मीपण शहनाई वैग्रेची तयारी करावी म्हणत धागा उघडला अन हाय रे राम, 'अभि' तो कुच नै !

पुण्यात (मुंबईची उपनगरं असतात. पुण्यात काय असतं हे अजून डिक्लेर नाही सो शिवापूर, सासवड,ओझर, पिरंगुट, रांजणगाव, आळंदी, सिंहगडापर्यंत पुणं सॉरी पुणेच)....
हल्ली ए४ साईजची किमान दोन पानं भरुन पत्रिका असते.
पहिल्या पानावर वरच्या कोपर्‍यात गणपती, खाली आक्खे येडे, खुळे, कुदळे, वांजळे, अमुक, तमुक पाटील नि त्यांच्या पदव्या, आतल्या डाव्या पानावर सगळे कार्यवाह, उजव्या आक्ख्या पानावर नातेवाईक नि त्यातनं जागा राहिलीच तर नवरा नवरीची नावं. मागच्या पानावर पूर्ण शिवाजी महाराज !

हल्ली पत्रिकेचे फ्लेक्स पण बघितलेत.

मूळ विषयासंदर्भातः अभ्या, सविस्तर लेखमाला येऊ दे नि शेवटाला 'खरं' निमंत्रण पण येऊ दे.

प्यारे तू म्हणतोयस ते लोण आता सगळीकडे पसरलेय. :( मी ए ४ नव्हे तर त्याच्या दुप्पट आकारात पण पत्रिका छापल्या आहेत.

मस्तच माहिती :)

(पत्रिका बनवणारा ) अमोल केळकर

नवी दुनिया... स्वतःच्या लग्नाच्यावेळी ग्राहक म्हणून धावती-ओझरती भेट झाली होती या व्यवसायाशी
या लेखाने बरेच अंतरंग उलगडले!

आभार!

लय भारी रे एकदम सविस्तर लिवलं हय्स.

बाकी आम्ही तुम्हाला "वत्स अप " वर संदेश टाकून थकून गेलो, आता पाटील काकांसार्ख डायरेक येऊ काय ;)

आम्ही तुम्हाला "वत्स अप " वर संदेश टाकून थकून गेलो

वत्सा अपा एवढं सविस्तर लिहूनपण तुला कळंना व्हय म्या कीती बिज्जी हाय ते. ;) कसं उत्तर द्यायचे राव? एखांद्या सौ. ला श्री. झालं म्हणजे?
(करु करु, तुमचे काम लौकर करु :) )

एकदम छान महिती.....

धाग्याचे शीर्षक वाचून एकदम उडालेच होते. मला न सांगता अभ्या आणि लग्नाला बोलावतोय? पण मजा आली. यक्दम डिट्टेल माहिती. ते आधारस्तंभ वगैरे लै भारीच!

आणी ती आपलीचं चुक आहे हे न मान्य करुन प्रिन्टिग्वाल्याने स्वता:चे नुकसान (आर्थिक + शारिरीक) करुन घेतल्याचे आठवते... :-P ;-)

एक पत्रिकेचं डिझाईन नक्की करायचं तर आम्हाला कष्टंबर म्हणून किती ताप होतो, तुला तर येडच लागायची वेळ येत असेल. :)
बाकी, ह्या विषयावरच्या सखोल माहितीबद्दल मंडळ आपलं कचकन आभारी आहे!

आता लग्नपत्रिकेसारखा सब्य इषय झाला, म्होरच्या अंकात फ्लेक्साच्या मजा मजा येउंद्या. ;)

धम्या म्या म्होरच्या अंकात फ्लेक्साचा नव्हं तर बारच्या गिर्‍हायकांचा इषय घ्यावा म्हनतोय. ;)

तुमी लिवा धम्या हाय तुमाला साथ द्यायला

तू लिही रे अभ्या बारच्या गिर्‍हाईकांवर! पायजे तर जनरलायजेशनसाठी मी आणि घाश्या शँपल सेट म्हणून येतो. ;)

बाकी, 'बारचा स्टाफ आणि त्यांचा गिर्‍हाईकांचा अभ्यास' हे लै अभ्यासून पाहण्यासारखं प्रकरण आहे राव. कोणत्या टेबलला सर्विस नीट द्यायची, कोणत्या टेबलला दुर्लक्ष करायचं, कोणत्या टेबलला बील जास्त मारायचं -कोणत्या नाही, बील मारायचं तर ते बीओटीमध्ये ताणायचं का आकडा तोच ठेऊन (पेग सिस्टिममध्ये) दांडी मारायची, दांडी मारायची तर ती कोणत्या कष्टमरला मारायची, कोनत्या कष्टमरला दांडी मारलेली कळू शकतं, किती पेगपर्यंत कळू शकतं...ह्या सगळ्या यक्सपर्टाईझसाठी गिर्‍हाईकांचा अभ्यास करावाच लागतो!

येऊ दे...येऊ दे!

आस्सं आसतय काय? मंग आमालाबी फ्लेक्ष बनवतानाची जंमत वाचायाची हाये. आब्या, तू ल्हिइच मंग!

सवडीने अभ्यास करणार आहे...

ऑ?????????

नेमका कसला अभ्यास म्हणे?

पत्रिकांचा अन त्या बनवण्याच्या तंत्राचा.
हो, नोकरी सुटली तर वांधा नको ! अभ्या असिस्टंट म्हणून तरी घेईल नक्कीच !

का? पीडाधाग्याचा दुसरा भाग काढायचाय का? का रसायने? ;)
हायेस तिथं लै सुखी हायेस. तशीच आनंदात राहा गं बहिणाबै. :)

या मा.त. क्षेत्राचं काय होईल ते सांगता येत नाही.

मराठी प्रूफ रिडींगचं काम मला करता येईल असा विश्वास वाटतो.

अभ्याशेठ, कृपा असूदा गरिबावर.

बापरे एवढे झेंगाट असते का पत्रिका बनवणे...

सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात.

या वाक्यातील ताशी २००० आकडा बरोबर आहे का? ३६०० सेकंदाना २००० हे गणित जरा भारी वाटतेय..

जर्रा चुकलाय. ;)
३००० ते ४००० पण करतात सीझनमध्ये. एकेक पाकीट चिकटवत बसत नसतात हे लोक.=)) =)) =))
मस्त चार पाच जणांचा ग्रुप खाली वीरासनात बसलेला असतो. डाय कट केलेले कागद एकाच वेळी ९०-९० घेऊन पत्त्यांसारखे पिसारा करतात. एकाच वेळी त्यांच्या कडांना अगदी मोठ्या ब्रशाने खळ लावली जाते. नजरेची पापणी लवायच्या आत त्या कडा उलटून पाकीटे चिकटवली जातात. हे सगळे काम टीव्ही बघत बघत. :) तरीही १००० पाकीटात एखादे खराब निघते. या कामाची मजुरी अत्यंत अल्प असते (हजारी ८० रुपये) त्यामुळे ह्याच वेगाने काम केले तर त्यांना परवडते.

बाब्ब्बौ!!

हा हा हा.
लहान असताना मामाच्या लग्नाच्या पत्रिका अश्याच स्वस्तात (;)) छापुन आणल्या होत्या.
पाकीटे चिटवून त्यात पत्रिका कोंबण्याच्या कामाला घरच्या घरी पोरा टोरांना (मे महिन्याच्या सुट्टीचा सदुपयोग म्हणुन) जुंपलं होतं. त्यात परत नवरदेवाच्या अन त्याचा धाकल्या बंधुच्या नावाची अदलाबदल करुन छापणार्‍याने मोठाच घोळ घालून ठेवला होता. =)) ते दुरुस्त करताना नाकी नऊ आले होते.

नारायणातल्या गोणेश्वराची "तिकीट विक्री चालू आहे" आठवलं :-)

हायला, मला वाटलं तुम्ही झायरात करुन निमंत्रण देऊनशान र्‍हायले म्हणून हाभिनंदनासाठी धाग उघडून पाहिला तर वन्ली माहिती! छान लिहिलं आहे.

हि फक्त पोच. सावकाश वाचून प्रतिक्रिया देइनच.
पण हे लाडूचे आमंत्रण नाही हे कळल्यावर जरा वाईट वाटले. असो.

मला वाटले अभ्या लायनीला लागला. कदाचित जमले असेल पण तो असा धागा काढून मिपावर चा रागरंग काय याचा वेध घेत असेल. असो. पत्रिकांमधील अजोड वा़गमय हा एक मोठा मिस्किल विषय आहे.आता लोकांकडे पैसा बक्कळ आला. पत्रिकेचा आकार आता " सौ बाईसाहेब यांसी " या १९४० मधील पत्रिकेचा राहिला नाही. पुलंच्या वात्रटपणाचा आव आणून म्हणायचे तर आता पत्रिका व पत्रावळी यात फरक राहिला नाही. हो ! काहीना वापरलेला कागद असतो ही तसा.
अभ्या ,असले धागे काढून मोदक , वल्ल्ली सारखी मिपावरील यच्चयावत 'मी उभा आहे' गिर्‍हाईके गळाला लावायचा विचार आहे काय तुझा ? कर कर लेका चैन , खा भाव !
आपला चा चौ.

माझा मिपावर कामाची झैरात करण्याचा काहीही उद्देश नाही राजासाब. लायनीला लागेन लवकरच, पण असा इथे बिजनेस करत बसलो तर मात्र जरा अवघड है. ;)
जास्त सांगत नाही पण उगी दोनतीनशे क्वांटींटी, त्यात दुनियेचा चिकित्सकपणा, पंधरावीस प्रुफे काढत बसण्यापेक्षा मी इकडे पाटीलकाकासारखे दोन तीन हजाराचे लॉट मारत सुखी आहे.
(हेच उत्तर पू. शिल्पातैंसाठी पण आहे ;) )
(संपूर्ण प्रतिसाद हल्का घेणे ;) )

लेख आवडला. बाकी लग्नपत्रिकेतला मजकूर हा स्वतंत्र विषय ठरावा. गावातल्या ढीगभर नावं असलेल्या पत्रिका, शहरी दवणकाव्यात्मक किंवा कणेकर जे ठरावीक किस्से वात येईपर्यंत सांगत असतात त्यातला विजय चव्हाणच्या लग्नपत्रिकेसारखा लाडातला मजकूर असणार्‍या ("विजयला पद्मश्री मिळाली. पद्मश्रीचा विजय झाला"), कुठल्या भाषांत किती छापायच्या याचे होणारे हिशोब आणि हमखास चुकीचा लिहिला जाणारा 'शुभाशीर्वाद' इ. इ. :)

विजय चव्हाण नाय ओ, विजय कदम. अशी पद्मश्री कोणालाही मिळत नाही, त्यासाठी लै फील्डिंग लावावी लागते. हे म्हणजे पतौडीच्या थोरल्या नबाबांची शिफारस करावी तर 'नजरचुकीने'(!!!!, !!!!! ;) ) धाकल्या नबाबांना पद्मश्री दिल्यासारखं झालं राव.

विजय चव्हाण नाय ओ, विजय कदम.

अर्रर्रर्रर्र, गफलत झाली अंमळ.

हे म्हणजे पतौडीच्या थोरल्या नबाबांची शिफारस करावी तर 'नजरचुकीने'(!!!!, !!!!! ) धाकल्या नबाबांना पद्मश्री दिल्यासारखं झालं राव.

=)) =))

पुलेशु.
गोणेश्वराची आठवण मलाही झाली.

मस्त हो पत्रिकावाले. डिट्टेल्ड लिहलंय.!!

व्वा व्वा.... एकदम भारी. आधी वाटलं आमंत्रण आहे की काय तुझ्या लग्नाचे ;-) :)

माहितीपूर्ण लेखन आवडले. मला आधी तुझ्या लग्नाची बातमी आहे की काय असे वाटले.

वेगळ्या विषयावरचं माहितीपूर्ण लेखन आवडलं. मनोवृत्ती आणिं तंत्रज्ञान या दोन्हीतल्या अखंड बदलाने काय काय बदलू शकतं याबद्दल आणखीही वाचायला आवडेल.

>> . हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते.
सी.एम.वाउ.के. म्हणजे सियॉन, मजेंटा, यलो आणि ब्लॅक ना?

फार पूर्वी पासून मला एक प्रश्न छळत आलाय. की स्क्रीनवरच्या रंगांसाठी बहुतेक वेळा आर.जी.बी. (रेड, ग्रीन, ब्ल्यु) वापरतात. पण फोटोशॉप, कोरल वगैरे स्पेशलाइझ्ड सॉफ्टवेअर्स सीएमवायके का वापरतात? त्याचा नेमका फायदा काय?

आणखी एक म्हणजे स्क्रीन वर एकावर एक रंग मारत गेल्यास शेवट पांढरा रंग बनतो. त्याविरुद्ध कागदावर एकावर एक रंग मारत गेल्यास शेवटी काळा रंग होतो. म्हणजे जो रंग स्क्रीनवर दिसतो आहे नेमका तोच रंग (शेड) कागदावर तस्साच दिसेल असं नाही. मग ही गॅप टाळण्यासाठी नक्की काय करतात ?

(एके काळी थोडं कलर कॅलिब्रेशन मधे काम केलेला )

सी एम वाय के वा आर जी बी अशी दोनच मॉडेल नाहीत. अनेक आहेत. जास्त लोकप्रिय आहेत ही दोन.आर जी बी चा ही फोटो छापता येतो पण त्यातील काळा रंग भुरकट काळा रंग येतो. सबब कमर्शियल कामात मुद्रणासाठी आर जी बी वापरले जात नाही. तेथे सायन,मॅजेंटा, यलो व ब्लॅक असे चार वेळा वेगवेगळे मुद्रण होते. सांगणे न लगे की त्याच्या फोटोत ही चार चॅनेल्स असतात. हौशी लोकानी एकदा आर जी बी च सीएमवायके दोन्ही मुद्र्ण करून पहावे. फरक दिसेलच !

हे लेखन खूपच आवडले. मी लहान असताना काही नातलगांकडे प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय होता. ऑफसेट प्रिंटींग वापरले जायचे. तू सांगितलेले व त्या काळात अस्तित्वात असलेले बरेच प्रकारचे पत्रिकांचे प्रिंटींग मी डोळ्याने पाहिलेले आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर, अगोदरच्या वर्षातील वह्यांची कोरी पाने एकत्र करून त्यांच्याकडून एका आकारामध्ये कापून व बांइंडींग करून रफ वही पण बनवून घ्यायचो. ते गिलोटीन ज्या क्रूरतेने कागदी गठ्ठे कापत असे त्याच्या जवळ जायलाही भय वाटायचं.

त्या काळात अक्षरजुळणी फारच त्रासदायक प्रकार होता. दोन दशकांपूर्वीच्या एका हिंदी चित्रपटात (बहुधा प्रतिघात) पोलिस असलेल्या नायकाचा मित्र मारला जाण्यापूर्वी प्रिंटींग प्रेसमध्ये अक्षर जुळणी करून शेवटचा संदेश ठेवतो.
योगायोगाने नायक तेथे आल्यावर त्याच्या हाताचा पंजा त्या सेट करून ठेवलेल्या अक्षरांवर पडतो अन त्याला तो संदेश मिळतो.

९० च्या दशकात डिटीपीचे आगमन झाले अन ऑफसेट प्रिंटींगला येत गेलेली अवकळा मी पाहिली आहे.

अजून येऊदे तुझे या क्षेत्रातले अनुभव.

बाकी अशी फसवी शीर्षके का वापरतोस रे, उद्या लांडगा आला रे आला असे नको व्हायला..

थोडीशी गफलत होतीय श्रीरंगा.
अस्तंगत झालेले ते ऑफसेट नव्हे, ते लेटरप्रेस. ते ट्रेडल मशीनवर उभे राहून छापायचे, त्यावर एक मोठी रंगाची फिरती तवकडी असायची आणि त्यावरचे रोलर. उलटे खिळे जुळवून त्याचा ठसा कागदावर घ्यायची ती जॉन गटेनबर्गची आद्य पध्दत.
खरेतर डीटीपी सुरु झाल्यापासून ऑफसेटला सोनेरी दिवस आले. कारण प्रीप्रेसचा खर्चच कमी झाला. डीटीपीचा अर्थच मुळी डेस्क टॉप पब्लिशिंग आहे. म्हणजे जे काम करायला एखादी मोठी खोली आणि भारंभार यंत्रे लागायची ते आता एका मेजावर (पीसी) होते.
बाकी शीर्षकातला लांडगा गुपचूप येऊन जाणारे. ;)

बरोबर आहे तुझे, अभ्या.

लेटरप्रेस प्रकार होता तो. मोठ्या यंत्राशेजारी एक माणूस उभा रहायचा अन प्रत्येक पान छापून (शाई लावलेला अक्षरांच्या आरशातल्या प्रतिबिबांचा साचा त्यावर दाबून) झाले की ते काढून कोरे पान ठेवायचा.

शीर्षक वाचून उत्सुकता ताणली गेली. :)

लेख उत्तम झालाय. वेगळ्या विषयावर आणि संबंधीत असूनही जास्त माहिती नसलेला विषय आहे हा. आता पुढचा भाग येऊ दे.

- नीलकांत

अभ्या, सगळ्यांना तुझ्या लग्नाची बघ किती काळजी!

लेख मस्तच झालाय. लग्नपत्रिकेतला मजकूर, फ्लेक्स वरचे साहित्यिक मजकूर यांच्यावर पण एक खुसखुशीत लेख यूंद्या...

माहीतीपुर्ण लेख आहे :). मला वाटले की तुम्च्या लग्नाचे जाहिर निमंत्रण आहे.

मी १० वी मधे असताना

स्र्कीन पेन्टीग

च काम केले आहे. हे खुप च मस्त आहे.

छान छान. टेक्नीकल काही समजत नाही फारसं...म्हणजे नाहीच. असो.
लग्नाचा सिझन येउ घातलाय म्हणुन ही झैरात चांगली केलीये.

भारी रे!!!! फ्लेक्स च्या मजा येवूद्यात!

व्वा! असे तंत्रज्ञान समजावून सांगणारे अजून लेख येऊ द्यात. मजा येते वाचताना. ज्ञानात भर पडते.

पत्रिका चांगल्या प्रिंटर कडे टाका हो. नाहीतर शेवटी सगळ्यांनी लग्नाला यायच ऐवजी तिकिट विक्रि चालू आहे असे छापलेले यायचे.
सौजन्य - नारायण

प्रकाशकाका तसल्या गफलतींचा जमाना गेला आता. ;) लोक एखादा ऊकारपण चुकलेल्या पत्रिका घेत नाहीत किंवा पैसे द्यायची टाळाटाळी करतात. त्यासाठी प्रत्येक प्रुफावर असा शिक्का मारुन ग्राहकाची/तपासणार्‍याची सही घेतल्याशिवाय आम्ही छापतच नाही. :)
a

पुर्वी मुद्राराक्षसाचे विनोद किंवा उपसंपादकाच्या डुलक्या अशा शीर्षकात असे किस्से यायचे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकात 'एकीचे नक्षत्र बदल्याने..... 'च्या ऐवजी 'एकीचे वस्त्र बदलल्याने.. असे छापले गेले आहे ते आठवले.

स्वगतः चला या निमित्ताने स्वतःच्या पुस्तकाची टिमकी वाजवून घेतलीच की

एक चांगला लेख वाचला. मराठीत असे लेख कमी वाचायला मिळतात. नवीन शिकणार्‍यांना उपयुक्त. अभीनंदन. अश्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे. हल्ली असे माहीतिपुर्ण लेख मिपावर येतात. त्यामुळे माझ्या सारखा कधीतरी मिपावर लिहीणार्‍याला आनंद वाटतो. धन्यवाद.

अश्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे.

=)) =)) =)) =))
सगळी शीर्षकाची करामत आहे आप्पा. ;)
'प्रतिरुप छपाई पध्दतीने रंगीत छपाईचे तंत्र' हे शीर्षक दिले असते तर टोटल पाच प्रतिसाद मिळायची चोरी झाली असती. ;)
तुम्हाला आणि मला स्वतःला पण धन्यवाद आपल्यासारख्यांना इथे लिहायला आनंद वाटल्याबद्दल. ;)

पाहिलत :-/
एवढा त्रास असतो छ्पाईकर्तास्नी :-/
म्हुन मी माझ्या लग्नात पत्रिकाच छप्ली नै :-/
सर्रळ मेल करुन इन्वीटेशनवलं :प

हिच तेवढी एकटी हुश्शार हाय. =)) =))
बाकी हिची आयडीया बी काय वाईट नाय. म्या पण 'हलवायाला डायबेटीस असतो" ह्यो नियम पाळणारे. ;)

:D :D

Pages