'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt . Ltd .
'काव्य ' कविता स्टोअर्स Pvt. Ltd.
* सुख दु:खाचे किरकोळ व घाऊक विक्रेते *
मी : हा ....गुड मॉर्निंग मन ...कसं काय रात्री झोप लागली का गोडावून मध्ये .....
मन : हा होय मालक .....पण न्हाई इतकी .....
मी : घे च्या ....दुकानात कसं माणसानं जरा फ्रेश ऱ्हावं ......
मन: होय घेतो की ....
गिऱ्हाईक : राम राम शेटजी ...
मी :हा ...राम राम ..आज ...काय काम काढलंत ?
गिऱ्हाईक : दु :खं द्या जरा नवीन .......
मी : ए मन्या ,,ती भारी दु :खं आन रं इकडं ....
हे घ्या ...एकदम बेश्ट माल .....
गिऱ्हाईक : आत्ता कसं .........कितीला हे सगळं ....
मी :अडीचशे फक्त !!
गिऱ्हाईक : आवं काय सांगता राव ..... नेहमीच्या गिऱ्हाईकाला ...!!!
मी : काय करणार आहो .......सगळंच महागलंय ....भावनांच्या किमती वाढल्या.... तसं लगोलग दु:ख्खांचेही रेट वाढलेत बघा ..... बरं घ्या तुमाला म्हणून डिसकाऊन्ट ......२३० द्या .
..माझीही ..बोहनी हुईल ...!!!
गिऱ्हाईक : हा हे घ्या मोजून ...बरंय ....भेटू . परत ...!!!
मन : मालक , ते गोडावून मधे पाणी टपकतंय .....
मी : हा ...डागडुजी करून घ्यायला हवी एकदा !!
वाचक गृहिणी : ओ शेट ....हि घ्या लिस्ट ...
मी: आणा बघू ......छोट्यांची बडबडगीते ,तरुणांचे दु:ख , म्हाताऱ्यांच्या जखमा , किरकोळ सुखं ..etc ..etc .....
…… तरुणांच्या दु:खाचा नवीन माल येतोय अजून ,,,ते उदयाला दील .....बाकीचं बांधून ठेवतो ...सांच्याला या ...
वाचक गृहिणी : बर
मी : ओ वैनी ....वेळ आणलाय काय ...कसंय.....आजकाल बंदी आलीये वेळावर ...आमी ठेवत नाई मग दुकानात ... गिऱ्हाईक घेऊनच येतात आपापला बरोबर .......
वाचक गृहिणी : ह्म्म्म आणलाय ..हा घ्या ...याचा त्याला करू नका हं ! आणि टोटल मांडून ठेवा बर का ...पाऊस झाला की दीन मग प्रतिसाद ....येते मग सांच्याला अं !!!
मी : ए मन्या , ते पाणी टपकतंय…..तिथं तो काळपट वेळ ठेव आपला ..न्हाईतर सगळीकडं पाणीच व्हायचं !!
मन : बर
तात्या : काय शेट ...
मी : आओ काय तात्या ...दिसत न्हाई आजकाल ....
तात्या : तालुक्याच्या गावाला जाऊन युन असतो ....लेकरं बाळं तिकडंच शेटल झालीत .....लई झाक आहे तिकडचं सगळं .... ..बरं ...जरा सुख द्या थोडं बांधून .....
मी : घ्या
तात्या : कितीला ??
मी : हा ...राहुद्या ओ द्या नंतर .......
तात्या : बरं भेटू मग अं ......चला .....गाडी सुटलं न्हाईतर !!!
मन : मालक ....तोट्यातच चाललंय सगळं ....कशाला फुकट सोडता गिऱ्हाईकाला ?
तो शेजारचा बघा ....खप वाढलाय त्याचा ...माल स्वस्त लावलाय त्यानं आपल्यापेक्षा ...
...आवं ...शीर्षकाचे सुद्धा वेगळे प्रतिसाद घेतो तो ........
मी : आरं .......'ढसाढसा ' म्हणून 'मुसुमुसु ' विकतो तो ....त्याची काय बात करतो तू .....
आपण असं गिऱ्हाईकाला फसवत न्हाई ..!!!
मुलगी : ओ काका.... ओ काका ......
मी : काय गं चिमुरडे , शाळंला सुट्टी का ?
मुलगी : व्हयं ..... हे घ्या ...एका प्रतिसादात काय द्याल ?
मी: आण इकडं ....मन्या हिला २ चारोळ्या दे तिथल्या ...!!
मी : या या ताई .....
ताई : नमस्कार भाऊ ! कसे चालू आहे ....
मी : तुमचे आशीर्वाद हायत बघा ....चाललंय ठीकठाक .......
ताई : तुमचा सगळा माल चांगला असतो ….,आज मुद्दाम सांगायला आले ....अगदी सगळ्या प्रकारचा मिळतो इथे .....
मी : हा ....गिऱ्हाईक हुशार झालंय ....चोखंदळ झालंय जास्त !! मग.... सगळंच ठेवतो की आजकाल .....
कसंय बघा ....दु:ख जितकं जुनं ….. तितकं भारी ,, सुख जितकं नवीन ..फ्रेश ...तितकं छान !!
गिऱ्हाईकाचं समाधान म्हतवाचं !!..बाकी काय सगळं .....हायच की .....ते विडंबन वगैरे पटत न्हाय आपल्याला ....आपण सगळा ओरिजिनल मालच ठेवतो .......
ताई : खरं आहे ! गाळा घ्या एखादा मंडईत आता .......
मी : हा ...घेतला असता ओ कधीच ......पण या प्रेम आपुलकी मधे सगळं गेलं बघा ......
आणा झाल्या ,भाका झाल्या , वचनं विचारू नका , आज इथं ,उद्या तिथं ......
शेवटी हे दुकान तेवढं आलं हिश्श्याला ......जाऊदे .....आपलेच भोग म्हणायचे !!
ताई : जाऊदे हो चालायचंच ,फार मनाला नका लाऊन घेऊ ....बरं येते मी आता ...आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला ........!!
मी : ताई नमस्कार करतो हं ! अच्छा…. काळजी घ्या !!!
मी : मन्या , तू ते शेजारच्याचं काय सांगत व्हता मगाशी ....
मन : आवं ,,,संग्रह पण काढलाय त्यानं नवा कोरा .....लई भारीये !!!
मी : कितीला आसंल रं !!
मन : ४०-५० हजार प्रतिसाद तरी आसतील बुवा .....
मी : हा ...काढू आपणही कधीतरी ......त्यात काय एवढं !!
बर चल ! नुसता गप्पांत वेळ दवडू नको ....गोडावून मधल्या पाण्याचा मार्ग कसा काढायचा त्याचा इचार कर .........
आता ही काळ्या ढगांची गाडी आली की लक्ष दे ......उंचावरचं हिल स्टेशन , झोपलेला निसर्ग , प्रेमावरल्या गझला , तरुणांची दु:ख .......सगळा माल नीट उतरवून घे ..........
.अन रात्री लवकर झोप. उद्या खूप कामय बर का ! नाहीतर बसशील खेळत त्या पाण्याशी .......
आता पाऊस झाला की गिऱ्हाईकं वाढतील तीन -चार .......
मग लावील बोर्ड " आज रोख , उद्या उधार !" .
पावभर मनोरंजन आणि छ्टाकभर
कल्पना रंजक आहे. छान !
हम्म
मस्त
कल्पना अवडली.
जिलब्या टाकायचा तांब्या घेऊन
जिलब्या टाकायचा तांब्या??????
@त्यागात शांती असते हे इतक्या
तांब्या नाही घाणा
तांब्या नाही घाणा
हम्म
ठिक आहे.....