✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सियाचीन ग्लेशीयर.....भाग १

र
रणजित चितळे यांनी
गुरुवार, 12/20/2012 - 07:13  ·  लेख
लेख
सियाचीन ग्लेशीयर (टाईम मॅगझीनवरुन) सियाचीन ग्लेशीयर (टाईम मॅगझीनवरुन साभार) (सियाचीन ग्लेशीयर - सियाचीन हिमनद काराकोरम पर्वतरांगेत आढळतो. ह्या पर्वतरांगा हिमालयाचाच भाग आहे. ह्या हिमनदाचा पत्ता काहीसा वेगळा आहे, नकाश्यावर एन जे ९८४२च्या बिंदू पासून वर ईशान्य बाजूच्या भागाला सियाचीन ग्लेशियर म्हणता येईल. एन जे ९८४२ह्या बिंदूपासून पुढे भारत पाकिस्तान मधली प्रत्यक्ष नियंत्रण रेखा संपते. पुढे दोन्ही देशांमध्ये ही रेखा निश्चित नाही. ह्या मुळे दोन्हीही देश सियाचीन ग्लेशीयर ‘आमचा आहे’, ‘आमचा आहे’ असे म्हणत. पण नुसतेच म्हणत, तेथे जाण्याची कोणाची छाती होत नव्हती. १९८४ मध्ये भारताने तेथे सैन्य पाठवून त्याचा ताबा घेतला. हा हिमनद ७० ते ७५ किलोमीटर लांब पसरलेला आहे. काराकोरम पर्वतरांगेत तसे अजून छोटे छोटे हिमनद आहेत पण सगळ्यात मोठा हाच., सियाचिनाचा हा हिमनद, धृवप्रदेश सोडला तर जगातला दुसरा मोठा हिमनद. १९००० फुटावर असलेल्या इंदिरा कोल पासून हळूहळू समुद्रसपाटीपासूनची उंची कमी होत बेसकॅम्प पर्यंत ११००० फुटावर खाली येते. वारशी लोकांची वस्ती बेस कँपच्या खाली १० मैलावर आहे. त्या पुढे लोकवस्ती नाही.) ----------------सियाचीन ग्लेशीयर बद्दल बरेच दिवस लिहायचे होते. मध्यंतरी इंग्रजीत एक गोष्ट वाचनात आली. एका निवृत्त फौजीनीच लिहिली आहे ती. तेव्हाच मी ठरवले की ‘ह्या’ गोष्टीचे भाषांतर करायचे. त्या लेखकाला गाठले व त्याच्याकडून भाषांतर करून ‘मिसळपाव’ वर छापायची लिखित परवानगी घेतली. त्याचे आभार मी ‘मिसळपाव’ वर शेवटच्या भागात मानीन. .... --------------- हे लिहीत असतानाच १६ डिसेंबर २०१२ला रेडिओवरून एक बातमी ऐकायला मिळाली. आपण काहींनी ऐकली असेल. काहींनी नसेल. तेथे सेवा केल्यामुळे अशा बातम्या माझ्या नजरेतून सुटत नाहीत व बरेच दिवस घर करून राहतात. कालची बातमी होती ‘सियाचीन मध्ये झालेल्या एवलॉन्च मध्ये सहा जवान ठार झाले व एक बेपत्ता आहे. बचावाचे काम चालू आहे.............’ ------------ग्लेशियरला हिमनद म्हणतात. एवलॉन्चला अवधाव म्हणतात. मला स्वत:ला हिमलोट हा शब्द वापरायला आवडेल. क्रिव्हासला हिमविदर म्हणतात. मला हिमखाई वापरायला आवडेल.......... पण काही ठिकाणी मी मुद्दामून इंग्रजीच शब्द वापरले आहेत. का कोण जाणे मला वापरावेसे वाटले म्हणून वापरले.......‘जाज्वल्य’ मराठी प्रेमींचा मी क्षमस्व आहे............ आयुष्याची दोरी – एक सत्यकथा ...... का काल्पनिक?.. कारण कल्पनेतच असे होते. --------------------------------------------------खऱ्या आयुष्यात थोडेच होत असणार. ............पण ग्लेशियर मध्ये? …………….असे होते? चंडीगढचा २८९ ट्रांझिट कँप.................वेडेपण व शहाणपण ह्यातला शेवटचा दुवा तसेच भयाणता व वसती ह्या मधलाही. १७ फेब्रुवारीची रात्र. मी रात्री साडेदहाला ट्रांझिट कँप मध्ये येऊन दाखल झालो. भयानक थंडी पडली होती. येथे साधारण ह्या वेळेला अशीच थंडी पडते. आकाश साफ होते. नावाला सुद्धा कोठे ढग नव्हते. जेव्हा इतके साफ आभाळ असते तेव्हा कडाक्याची थंडी पडते. आभाळ भरून आल्यावर दिवसभराची उष्णता जशी काही जमीन व दाटलेल्या ढगांमध्ये अडकून बसते व तापमानात घट होत नाही. त्याच्या उलट आकाश निरभ्र असेल तर उष्णता निघून जाते व तापमान घटते. ट्रांझिट कँपच्या रिसेप्शनच्या रजिस्टरात मी माझे नाव लिहिले. मिश्राजीने माझे नाव दुसऱ्या दिवशीच्या आय एल च्या मॅनिफेस्ट लिस्ट मध्ये घातले. "साब वेदर एकदम क्लिअर है। आय एल ग्राउंड के लिये आर्मी बस सबेरे पाँच बजे ट्रांझीट कँप ग्राउंड सें निकलेगी। सामान की लॉरी उसके आगे जायेगी। सामान तैय्यार रखना।" सियाचीनला जायचे म्हणजे चंडीगढला असलेल्या २८९ ट्रांझीट कँप मध्ये नाव दाखल करावे लागते. रोज सकाळी भारतीय वायुसेनेची तीन, चार अजस्त्र मोठी आय एल ७६ ही विमाने जवानांना व अधीकाऱ्यांना घेऊन लेह जवळ असलेल्या ‘थॉईस’ ह्या विमानतळावर उतरवतात. पुढे टप्प्या टप्प्याने सैन्याला सियाचीनला पाठवले जाते. माझे नाव मॅनिफेस्ट मध्ये नोंदले गेल्या मुळे माझ्याकडे करायला तसे काही राहिले नव्हते. सामान बांधलेले होते ते रात्रीसाठी उघडायचे नव्हते. भल्या पहाटे जायचेच तर होते. मग काय. आता फक्त रात्र घालवायची बाकी होती. व एकच जागा सोयीस्कर होती व ती म्हणजे ट्रांझिट कँपच ऑफिसर्स मेसचा बार! ऑफिसरर्स् मेसचा बार मस्त ठेवलेला असतो. पण तो युनिटच्या मेसचा बार. त्याच्या उलट ट्रांझीटकॅम्पचा बार एकदम साधा होता. हा बार फक्त मनापासून पिणाऱ्यांसाठी होता, वेळ घालवणाऱ्यांसाठी नाही. कमिशन झाल्यावर पहिलेच पोस्टिंग सियाचीनला. सियाचीन बद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्या गुढा बद्दल आकर्षण व कुतूहल दोन्ही होते. कमिशन मिळाल्या मिळाल्या आपल्याला देशाच्या सगळ्यात अवघड जागेवर सेवा करायची संधी मिळाली ह्या कल्पनेनेच मनात गुदगुल्या होत होत्या. जोष खूप होता. आमची युनिट सियाचीनला आधीच पोहोचली होती. पण नुकतेच कमिशन मिळाल्या मुळे मला युनिट बरोबर सियाचीनला जाता आले नाही. मला आमच्या रेजीमेंटच्या रेजीमेंटलसेंटर मध्ये एकवीस दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी जावे लागले होते. येथे आमच्या रेजीमेंटच्या नुकत्याच कमिशन झालेल्या माझ्या सारख्या तरुण अधीकाऱ्यांना, युनिट्स मध्ये जाण्या अगोदर दिशानिर्देशन केले जाते. ते ज्ञानामृत पिऊन मी चंडीगढला पोहोचलो होतो. सियाचीन मधल्या युनिट मध्ये रुजू व्हायला. मी येता क्षणी बारमॅनने माझ्याकडे त्रासदायक नजरेने पाहिले. बार बंद होण्याची वेळ झाली होती व त्यात अजून मी आल्यामुळे आता त्याला त्या थंडीत बार बंद करायला उशीर होणार होता. मला पण आतले रडके, उदास वातावरण बघून क्षणभर परत जावेसे वाटले होते. पण क्षणभरच. मनात विचार आला, उद्या ह्याच वेळेला आपण बेस कँपला असू म्हणजे सियाचीन टप्प्यात आले. अशावेळी ‘एक ड्रिंक बनता है।’ असे स्वत:च्याच मनाला म्हणून बारला चिकटलो. त्या अंधाऱ्या बार मध्ये मध्यपान करणारा अजून एकच इसम होता. एका हातात मद्याचा ग्लास घेतलेला व अंगयष्टीवरून साधारण चाळीशी उलटलेला असावा असा कयास. म्हणजे बहुतेक कर्नल असावा. जर नोकरी करताना कोठेतरी, कोणीतरी त्याच्या करिअरला धक्का दिला नसेल तर चाळिशीत कर्नल पदावरच असतात सैन्यातले अधिकारी. बार मधल्या अंधारात सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरची निराशा माझ्या डोळ्यांनी हेरली. पण बारमध्ये मी व कर्नल एवढेच असल्यामुळे त्या खिन्न दिसणाऱ्या कर्नलच्या जवळच्या स्टूलावर बसण्या व्यतिरिक्त दुसरे गत्यंतर नव्हते. ग्लेशियरला जाणारी लोकं अशी एवढी खिन्न का असतात कोण जाणे. का ह्याचा चेहराच असा आहे? काहीकाही लोकं अशीच खिन्न दिसतात, नसतील कदाचित पण दिसतात मात्र. उगाचच हजार प्रश्न माझ्या मनात वावरत होते. कोणताही सीनियर दिसला की त्याला ज्युनिअरने अभिवादन करण्याचा शिष्टाचार, आयएमएच्या शिक्षणामुळे इतका भिनला होता की, माझ्या तोंडून "गुड ईव्हिनिंग सर" केव्हा निघाले माझे मलाच कळले नाही. माझ्या ‘गुड ईव्हिनिंगवर’ त्याने आपली मान माझ्या कडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण मध्येच त्याला त्यात फार स्वारस्य वाटले नाही का काय कोण जाणे, कारण माझ्याकडे न बघताच "ह्ह" असे काहीसे घशातून आवाज काढत डोके हालवल्या सारखे केले. बारमॅनने मला विचारले - "ड्रिंक साब?" बारमॅनच्या चेहऱ्यावर कंटाळा ओसंडून वाहत होता. बहुतेक त्याला वाटत होते, हा साहेब, फोन करण्यासाठीच जर फक्त आला असेल, तर किती बरे होईल म्हणजे फक्त त्या कर्नल साहेबाला निपटले की सुटलो. तेवढ्यात मी त्याला म्हणालो "एक लार्ज व्हिस्की, सोडा" ह्या माझ्या ऑर्डर करण्याने, मी बारमधून जाण्याची बारमॅनला वाटणारी थोडीशी जी धुगधुगी होती ती पण गेली. व्हिस्कीचा एक मोठा घोट घेऊन मी त्या फिरणाऱ्या स्टूलाला थोडेसे फिरवून कर्नल साहेबाच्या दिशेने वळवले. पण तो जो मघा पासून दगडासारखा बसला होता, त्यात आता सुद्धा काहीही बदल नव्हता. चेहऱ्यावर काही भाव नाहीत, हालचाल सुद्धा अगदी मोजकीच. मी दबकत विचारले "कमिंग बॅक फ्रॉम लिव्ह सर?" मला परत एक "ह्ह" असे घोघऱ्या आवाजात ऐकायला मिळाले. मी पण कसा आहे पहा. हा काही विचारायचा प्रश्न आहे. जो सुट्टीवरून परत ग्लेशियरवर जायला येतो तोच असा ह्या बारमध्ये निराश बसलेला आढळेल, ज्याला सुट्टी मिळाली आहे व जो सियाचीन ग्लेशियरवरून खाली चंडीगढला घरी जायला आला आहे तो काय अश्या काळोख्या बार मध्ये आपला वेळ वाया घालवत बसेल? सुट्टीवर जाणाऱ्याला पंख नसतात, तेवढीच एक कमी असते, नाही तर आपल्या घरी उडतच गेला असता. पण मी खरे म्हणजे काहीतरी संभाषण सुरू करायचे म्हणून हा प्रश्न विचारला होता. उत्तर दिले तर समजावे, बोलायला उत्सुक आहे म्हणून, आणि जर उत्सुक नसेल तर बरेच. मला थोडेच त्या कंटाळवाण्या कर्नल जवळ बसून मन उदास करवून घ्यायचे होते. मी माझे ड्रिंक संपवले व बारमॅनला अजून एका लार्जसाठी खुणावले. बारमॅनने मोठ्या नाखुशीने व्हिस्कीचा एक लार्ज ग्लासमध्ये ओतला. सोडा ओतत असताना, मी बारमॅनला विचारले "सिगरेट, नेव्ही कट" "नही है साब, सिर्फ चार्म्स् है।". उशिरा आलेल्या साहेबाला, त्याची जागा दाखवून हिरमुसले केले असे वाटून त्याचा चेहरा उजळला. "एक पॅकेट भी नही?" मी सोडतो का. मी त्याला परत विचारले. "नही साब सिर्फ चार्म्स्" त्याने पण सोडले नाही. तेवढ्यात त्या उदास दगडासारख्या बसलेल्या कर्नलने माझ्या दिशेने टेबलावर काही तरी सरकवले. मला पसंत असलेले नेव्ही कटचे पॅकेट होते. वाटले दाखवायलाच का होईना, त्या कर्नलला ‘नो थॅन्क्स् सर’ असे म्हणावे, पण तो आग्रह करण्यारातला वाटत नव्हता. माझ्या नो थॅन्क्स् वर ते पॅकेट लगेच त्याच्या खिशात गेले असते व मी असाच कोरडा राहिलो असतो, त्या पेक्षा "थॅन्क्स् सर" असे तोंडातल्या तोंडात बरळलो व त्याने पुढे केलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली व शिलगावली. "मी आजच एकाच्या अंत्यविधीला जाऊन आलो" कर्नल सिगारेट शिलगावीत कोरड्या आवाजात पहिल्यांदाच माझ्याशी बोलला, आणि काय बोलला तर हे बोलला. सिगारेट घेऊन चूक झाली असे वाटले. आता मला नेव्ही कट सिगारेटच्या बदल्यात त्याचे रामायण ऐकावे लागणार होते. सियाचीन सारख्या भयाणतेत जाताना अंत्ययात्रा, अंत्यविधी सारखे दु:खी शब्द कानावर पडू नयेत असे मला वाटत असताना नेमके तेच ऐकायला मिळत होते. मनात नसताना मान द्यायचा म्हणून मी विचारले, "अरेरे. कोण? कोणी घरातले? जवळचे? नात्यातले?" ह्यावर त्याने माझ्याकडे तिरकस नजरेने बघत म्हटले "हss. असे म्हणू शकतोस, घरातलाच.... जवळचाच....नात्यातलाच......होता तो" असे म्हणत मला नको असताना केव्हाच त्याने त्याची गोष्ट सुरू केली होती. मला ऐकण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्याने एक मोठा उसासा टाकला, सिगारेटचा मोठा झुरका मारला व दारूचा एक घोट घशात उतरवत म्हणाला. "मला घरच्या काही समस्याने घेरले होते. नेहमीचा नातेवाइकांमधला कलह रे. त्यातून सुटायचे होते. दोन महिन्यापूर्वी माझ्या मित्राने, "ह्यातून सुटायचे असेल तर सियाचीन ग्लेशियरला बदलीवर जाण्यासाठी आपण होऊन नाव दे" असा मला सल्ला दिला. नाव दिले व घरच्या अडचणीतून सुटलो. त्या वेळे पर्यंत मला सियाचिन बद्दल एवढी माहिती नव्हती, फक्त एवढे जाणत होतो की ती जागा अत्यंत थंड आहे. अवघड आहे. वाटले तेवढेच जरा वेगळेपण, घरातल्या नातेवाइकांच्या रोजच्या भांडणाला अगदी त्रस्त झालो होतो. मिड लाईफ क्रायसिस दुसरे काय." मला त्याच्या मिड लाईफ क्रायसिसशी काही देणेघेणे नव्हते. पण सियाचीन बद्दलची माहिती हवी होती. "मी सियाचीनला जाण्यासाठी आपणहोऊन नाव दिले व माझी बदली दुसऱ्याच आठवड्यात झाली. ह्या नाव दिल्यादिल्या लागलीच आलेल्या माझ्या बदलीनेच माझे डोळे उघडले. पुढे काय वाढून ठेवले असेल त्याची कल्पना आली. कोणी वेडाच किंवा विक्षिप्तच माणूस सियाचीनला जाण्यासाठी आपण होऊन नाव देईल. कोणी स्वतःहून थोडेच विहिरीत उडी घेतो. मला त्यातली गंभीरता समजली पण उशीर झाला होता. कामावर रुजू होण्याची तारीख पक्की झाली. आता जाण्यावाचून पर्याय नव्हता. मी असाच चंडीगढ मार्गे, टप्प्या टप्प्याने थॉईसला पोहोचलो. समुद्रसपाटी पासून ११००० फुटावर असलेल्या त्या थॉईसच्या मेस मध्ये मी, ग्लेशियरमध्ये प्रवेश करण्या आधीचे अखेरचे ड्रिंक घेतले. मला सियाचीन बद्दल माहिती करून घ्यायची होती. कोणी त्याला नरक म्हणत, कोणी त्याला भारताचा सैबेरीया म्हणत. माझे कुतूहल क्षणाक्षणाला वाढत चालले होते. कुतूहल वाढणारच. पुढचे संपूर्ण वर्ष घालवणार होतो मी त्या ग्लेशियर मध्ये, आणि मला जिवंत परत यायचे होते. माझ्या घरासाठी. माझ्या मुलांसाठी. ......कर्नल ने आपला ग्लास भरला." माझे कुतूहल जागे झाले. मी पण त्याच ‘नरकात’ दुसऱ्या दिवशी पोहचणार होतो. कर्नलची गोष्ट ऐकायची इच्छा अनावर झाली. थॉईस जवळ मी काढलेला फोटो (थॉईस जवळ मी काढलेला फोटो) सर तुम्ही एक वर्षासाठी गेला होतात पण मग येथे? अपघात झाला का? - माझा प्रश्नार्थी चेहरा पाहून विचारायच्या आधीच कर्नलने खुलासा केला. अपघात. मोठा अपघात .... ग्लेशियरमध्ये. "कसा?" कर्नलने परत मोठा श्वास घेतला. स्टूल फिरवून माझ्या कडे तोंड वळवले. त्या थंडीच्या रात्री, आता त्याचा चेहरा त्या मिणमिणत्या प्रकाशात दिसायला लागला. त्याने क्षणभर मला न्याहाळले. त्याचे चमकणारे डोळे पाहून मी जाणले व थोडा चपापलो. नक्कीच कमांडींग ऑफिसर असणार. मला माहीत होते माझ्या युनिटाच्या कमांडींग ऑफिसरच्या डोळ्यात अशीच चमक होती. अशी चमक कमांडींग ऑफिसरच्याच डोळ्यात येते. सैन्यात कमांडींग ऑफिसर होणे हे सैन्याधीकाऱ्याचे स्वप्न असते. कमांडींग ऑफिसरचे पद असे एकमेव आहे की ज्या मध्ये लेजिस्लेटीव्ह, ज्यूडीशियल व एक्झिक्युटिव्ह पॉवर्स एकवटलेल्या असतात. भारतात तरी ह्या तीनही शक्ती सैन्य सोडले तर दुसऱ्या कोणालाच एकत्र दिलेल्या नसतात. कमांडीग ऑफिसरला न्यायाधीशाचे अधिकार दिलेले असतात. ह्या अधिकाराने आर्मीएक्ट प्रमाणे तो शिक्षा ठोठावू शकतो. तसेच त्याच्याकडे आदेश देण्याचे व ते सक्तीने पाळायला लावणारे वैधानिक अधिकार आहेत. ह्या बरोबरच प्राशासनिक अधिकार आहेत हे वेगळे सांगायला नकोच. युनिट मध्ये त्याने दिलेले आदेश सर्वोच्च मानले जातात. जवळ जवळ निरंकुश सत्ता. जबाबदारी पण तेवढीच असते. आठशे जवानांचे आयुष्य खांद्यावर घेऊन तो कमांड करत असतो. त्यामुळे कमांडींग ऑफिसरचा मान काही वेगळाच व रुबाबही. त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी मला न्याहाळल्यावर, कर्नल मला विचारतो, "तू पहिल्यांदा जात आहेस ग्लेशियवर?" "येस सर्" "ओह, तुला ऐकायचाय ग्लेशियर बद्दल?" "हो सर मला जेवढी मीहिती मिळेल तेवढी चांगलीच. तेवढी माझी मनाची तयारी होईल. एव्हाना अजून एक सिगारेट शिलगावली गेली होती – त्याने पण व मी पण. तीच. नेव्ही कट. तो पुढे सांगायला लागला. सत्य घटना..... एक तर तो खूप प्यायला तरी होता, किंवा माझी खेचत तरी होता, उगाचच घाबरवायचा प्रयत्न करत होता असे वाटत होते. ग्लेशियर इतके भयानक नसणार....... कारण कल्पनेतच असे होते. खऱ्या आयुष्यात थोडेच होत असणार. "जर का आपल्या पृथ्वीवर कोठे नरक असू शकेल तर ते येथे आहे. सियाचीन ग्लेशियर. सियाचिनाचा हिमनद. एक भयानक, थिजलेले, शतकानुशतकांच्या बर्फाने गोठलेले, जो बर्फ कधी वितळळाच नाही असे ठिकाण. अन् ते सुद्धा जेथे बेसकॅम्प आहे त्या समुद्रसपाटीपेक्षा ११००० फुटांच्या उंची पासून ते १९००० फुटांपर्यंत जाणारा! जिवंतपणाची जर काही चाहूल असेल तर एकच, ती पण ग्लेशियरच. एका अजस्त्र अक्राळविक्राळ अजगरा सारखा, त्याच्या आवाक्यात येणारी प्रत्येक गोष्ट हळूहळू गिळणारा, नामशेष करणारा असा हा हिमनद. सियाचीन." "थंड बर्फावरून जोरजोरात घोंघावणारे वादळी वारे. वारा कसला झंझावात तो. आजूबाजूच्या प्रचंड पर्वत शिखरांवर आदळणारा झंझावात आधीच शून्य असलेले तापमान अजून खाली खेचून घेतो. अगदी शून्याखाली ३० डिग्री सेल्सियस पर्यंत. घातलेले कपडे चिरून, आपल्या चामड्याला फाडून हा थंड झोंबणारा वारा आपल्या हाडांपर्यंत पोहोचतो - हजारो टाचण्या टोचाव्या तशा. इतके की क्षणार्धात आपले शरीर व आपले मन बधिर करून टाकतात. जिवंत राहण्याची आपली इच्छाशक्तीच मालवून टाकतात. येथे सूर्य सुद्धा निस्तेज तळपतो. तळपतो कसला तो दिसतो म्हणून आहे म्हणायचे. पण बाकी सगळी बिरबलाची खिचडीच." "ह्या जागेला इथले राहणारे सुद्धा घाबरतात. त्यातून ही वस्ती अगदी तुरळक. जवळ जवळ नाहीच. असली तर बेसकॅम्पच्या अलीकडे खाली दहा मैलावर समुद्रसपाटी पासून १०००० फुटांच्या उंचीवर. ग्लेशियर वर फक्त आपणच. भारतीय सैन्याचे तुझ्या माझ्या सारखे असंख्य जवान. १०००० फुटावर राहणारी इथली वस्ती ह्या जागेला जीवघेणा कर्दनकाळ म्हणतात. तर अजून उंचीवर काय असेल त्याचा विचार कर. ग्लेशियर क्रूर आहे. जीवघेणा आहे. त्याच्या पांढऱ्या बर्फाच्छादित चादरीमुळे कोठेकोठे चांगले दृश्य दिसते. कोणी त्याला सुंदर म्हणेल. पण फक्त फोटोतली सुंदरता. बाकी तेथे राहायचे व काम करायचे म्हणजे त्याची क्रूरताच अनुभवायला मिळते. सुंदरता नाही. सुंदरता विसरून जावी अशी क्रूरता. येथे पावलापावलावर मरण लपलेले आहे. खरोखरीच. जीवघेण्यासाठी ग्लेशियरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात एवलॉन्च किंवा हिमलोट व क्रेवास म्हणजेच हिमविदर किंवा हिमखाई, हे सगळ्यात मोठे शत्रू. ह्या दोन्हीमध्ये आम्ही क्रेवासला सगळ्यात घाबरतो आणि त्याला कारणे पण तशीच आहेत. एवलॉन्चचा अंदाज बांधता येतो. एव्हलॉन्च कधी सुरू होणार हे ग्लेशियर मधल्या थोड्या अनुभवाने आपण जाणू शकतो. काही दिवस राहिल्याने आपल्याला कळायला लागते. एव्हलॉन्च होणार आहे ह्याचा इशारा जणूकाही तोच देतो. एव्हलॉन्च होण्या लायक काही ठराविक जागा असतात. निमुळते उंच पर्वताचे कडे जे रात्रीच्या टनांनी पडणाऱ्या बर्फाचे वजन घेऊ शकत नाहीत, अशा जागा सहजच ओळखता येतात किंवा ज्या जागांवर दिवसभरात जास्त वेळ सूर्याचा प्रकाश पडतो तेथला बर्फ थोडा ढिला होतो, व हळूहळू ओघळायला सुरवात होते अश्या जागा. काही पर्वतराशी इतक्या जवळ व निमुळत्या असतात की हलक्या झालेल्या पृथ्वीच्या पोटातल्या हालचालीचे स्वरूप वाढणाऱ्या आंदोलनात होते की ती निमुळते पर्वतराशी शहारे यावे तसे हालून त्यांच्या खांद्यावर साठलेला हजारो किलो वजनाचा वर्षानुवर्षे झोपलेला बर्फ खडबडून उठल्या सारखा खाली कोसळतो. पण तरी सुद्धा ह्या सगळ्याचा अनुभवाने अंदाज बांधता येतो. येवढेच काय, पण तिथे राहणाऱ्या जवानांनी अशा होऊ शकणाऱ्या एव्हलॉन्चच्या जागांचा अभ्यास करून पोस्टवरती जायच्या तशा प्रकारानेच वाटा ठरवल्या आहेत. कधी कधी तर इंजिनियरस्च्या युनिट्स छोटे छोटे स्फोटके वापरून एव्हलॉन्च घडवून वाट मोकळी करतात. आपणच घडवून आणलेल्या अशा एव्हलॉन्चनी पुढे अकस्मात होणारा एव्हलॉन्च आधीच झाल्यामुळे होणारी हानी टळते व वाट मोकळी होऊ शकते." "पण सकाळच्या वेळी त्यातल्या त्यात हे राक्षस झोपलेले असतात. कधी कधी एखादा दुसरा उठतो तेव्हा मग अपघात होतात. त्यामुळे दिवसभराची रसद पोहचवणे किंवा गस्त घालताना करायला लागणाऱ्या हालचाली फक्त सकाळच्या सुर्योदया पासून चार तासात संपवायच्या. ही वेळ अशी असते की, रात्रीची जीवघेणी थंडी आणि शून्याखाली ३० सेल्सीयश गेलेले तापमान, आपसूक त्या पडलेल्या बर्फाला पर्वतांच्या कड्यांवर बांधून ठेवतात. कारण मग जशी सूर्याची किरणे पडायला लागतात तसे बर्फ थोडा ठिसूळ व तकलादू बनतो... एव्हलॉन्चला टाळण्यासाठी जे सुरक्षेचे उपाय करायचे ते केले तर खूपदा जीवनहानी होत नाही. एव्हलॉन्च होण्याच्या जागे जवळून आपण सकाळीच हाललेलो असल्या मुळे दुपारी त्याच जागेवर झालेल्या एव्हलॉन्चनी हानी होत नाही." ग्लेशीयर (बिबिसी न्यूज वरुन साभार) (सियाचीन ग्लेशीयर (बिबिसी न्यूज वरुन साभार)) "पण क्रिव्हास एव्हलॉन्च पेक्षा निष्ठुर, क्रूर व दुष्ट असतो. हजारो वर्ष लागली असतील ग्लेशियर बनायला. वर्षानुवर्षे सततच्या शून्याच्या खाली राहिलेल्या तापमानाने बर्फाचे थरच्या थर तयार झाले. एवढेच काय पण ग्लेशियर मध्ये हजारो लाखो टन जे पाणी बर्फाच्या रूपात दडलेले आहे, त्यात अगदी हळूहळू स्थित्यंतरे होत राहतात. जसे काही झोपलेल्या माणसाने हळूच कूस बदलावी तसे. त्यातच ग्लेशियरच्या पोटातल्या ढवळाढवळीने त्या जवळ जवळ ७० किलोमीटरच्या ग्लेशियर मध्ये लांबच लांब भेगा, उंच उंच पर्वत शिखरे, मोठ मोठे खळगे, खोल खोल हिमखाई व कठीण कठीण कड्याकपारे तयार झाल्या. अर्थात ह्या सगळ्याल्या टनाने पडलेल्या बर्फाने आच्छादलेले असते हे ओघाने आलेच. काही भेगा व खाई इतक्या खोल तयार झाल्या की जर कोणा मध्ये मोठा दगड टाकला व तो खाली जातानाचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर खाईच्या कड्या कपारींना आपटण्याचा बराच वेळ आवाज येतच राहतो व हळूहळू तो आवाज कमी होत जातो तरी सुद्धा तो थांबत नाही. इतके खोल की तळाचा पत्ताच लागत नाही." "कधीकधी वाटते त्या खाईंना स्वतःचे असे मन असते, जिवंत प्राण्या सारख्या वागतात. त्या ग्लेशियरच्या पोटातल्या चालणाऱ्या हालचालींनी एक भयानक रूप त्यांना मिळते. काही हिमखाई आताच गिळून निपचीत पडलेल्या अजगरा सारख्या वर्षानुवर्षे पडलेल्या असतात. पण कधीकधी काही हिमखाई अगदी ह्याच्या उलट. एखाद्या सळसळणाऱ्या सापा सारख्या. अस्थिर. एकमेकांवर लादला गेलेला हजारो टन वजनाचा गोठलेला बर्फ त्याच्याच भाराने तात्पुरता वितळत राहतो व लागलीच गोठत राहतो ह्यामुळे होणाऱ्या हालचालीचे पर्यवसान हिमखाईची रचना सतत बदलत राहण्यात होते. काही हिमखाई अगदी अरुंद व सरळ असतात जसे काही ग्लेशियरमध्ये भेग पडली आहे असे वाटावे किंवा कोणी राक्षसाने भल्या मोठ्या सूऱ्याने ग्लेशियर वर वार करावे तसे. काही खाईंची तोंडे खूप मोठाली असतात, मैलभर लांब सुद्धा. तळाकडे जाताना निमुळते होत जातात. एखाद्या नसंपणाऱ्या घसरगुंडी सारख्या. जणुकाही एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून घात करायला तयार असतात. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार." (क्रमशः) आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html आणि येथे http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html (मराठी ब्लॉग)
  • सियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी
  • सियाचीन ग्लेशीयर.....भाग ३
  • सियाचीन ग्लेशीयर.....शेवटचा भाग ......आयुष्याची दोरी

Book traversal links for सियाचीन ग्लेशीयर.....भाग १

  • सियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
कथा
समाज
जीवनमान
राहणी
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
18975 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

वाचतोय !!

सूड
गुरुवार, 12/20/2012 - 07:58 नवीन
वाचतोय !!
  • Log in or register to post comments

अनुवाद मस्त जमलाय. तुमच्या

रेवती
गुरुवार, 12/20/2012 - 08:07 नवीन
अनुवाद मस्त जमलाय. तुमच्या पसंतीचे शब्द वापरल्याने मूळ अर्थ बदललाय असे वाटत नाही. तुमचे लेख म्हणजे मिपाकरांना मेजवानी असते हे नक्की! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

समयांत
Sun, 12/23/2012 - 19:37 नवीन
हेच म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माझा दादा फ्लाईट लेफ्टनंट

आनन्दिता
गुरुवार, 12/20/2012 - 09:15 नवीन
माझा दादा फ्लाईट लेफ्टनंट म्हणून या भागात काही वर्षे कार्यरत होता. त्याच्याकडून ऐकलेल्या थॉईस व सियाचीन च्या गोष्टी आज या लेखाच्या निमित्ताने परत एकदा आठवल्या..
पण फक्त फोटोतली सुंदरता. बाकी तेथे राहायचे व काम करायचे म्हणजे त्याची क्रूरताच अनुभवायला मिळते. सुंदरता नाही. सुंदरता विसरून जावी अशी क्रूरता
अगदी चपखल आपलं सैन्य सीमेवर कुठल्या परीस्थितीमधे काम करतं हे मांड्ल्याबद्दल खुप आभार,,,
  • Log in or register to post comments

:-)

रणजित चितळे
Mon, 12/24/2012 - 12:49 नवीन
खरे आहे. सुंदरता दोन दिवसासाठी, जो सहा महिने रहातो त्याला सुंदरता मुळीच भावत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

एकदम सही

इरसाल
गुरुवार, 12/20/2012 - 09:31 नवीन
क्षणभर सियाचीनलाच जावुन परतलो.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 12/20/2012 - 09:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

चितळे साहेब, सुरुवात तर छान

विंजिनेर
गुरुवार, 12/20/2012 - 10:09 नवीन
चितळे साहेब, सुरुवात तर छान झाली आहे. अनुवादासाठी घेतलेले कष्ट जाणवता आहेत. एकच विनंती आहे - पुढच्या भागांमधे अंतर ठेवू नका.
  • Log in or register to post comments

रम्यस कथा

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 12/20/2012 - 10:12 नवीन
रम्यस कथा ____/\___साष्टांग दंडवत सियाचीन च्या सैनिकांना, जगातील सर्वात उंच लष्करी ठिकाण.
  • Log in or register to post comments

मेरी जान मेरी शान...हिंदोस्ता...

मालोजीराव
गुरुवार, 12/20/2012 - 12:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लव्कर येउ द्यात.

मृत्युन्जय
गुरुवार, 12/20/2012 - 12:27 नवीन
पुढचा भाग लव्कर येउ द्यात.
  • Log in or register to post comments

रोचक कथा अन ओघवती कथनशैली .

सस्नेह
गुरुवार, 12/20/2012 - 12:54 नवीन
पुभाप्र. मी त्या फिरणाऱ्या स्टूलाला थोडेसे फिरवून कर्नल साहेबाच्या दिशेने वळवले. त्या थंडीच्या रात्री निमुळते उंच पर्वताचे कडे जे रात्रीच्या टनांनी पडणाऱ्या बर्फाचे वजन घेऊ शकत नाहीत, हळूहळू ओघळायला सुरवात होते अश्या जागा. काही पर्वतराशी इतक्या जवळ व निमुळत्या असतात की हलक्या झालेल्या पृथ्वीच्या पोटातल्या हालचालीचे स्वरूप वाढणाऱ्या आंदोलनात होते की ती निमुळते पर्वतराशी शहारे यावे तसे हालून त्यांच्या खांद्यावर साठलेला हजारो किलो वजनाचा वर्षानुवर्षे झोपलेला बर्फ खडबडून उठल्या सारखा खाली कोसळतो ...इथे अनुवादाचे वळण जरा अवघडल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

पैसा
गुरुवार, 12/20/2012 - 13:06 नवीन
नेहमीप्रमाणेच! पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहेच, पण तिथे राहून सीमेचे संरक्षण करणार्‍या सैनिकांबद्दल आदर आणखीच वाढला आहे!
  • Log in or register to post comments

+१

अमोल खरे
गुरुवार, 12/20/2012 - 13:23 नवीन
असंच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काटा !!

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/20/2012 - 16:26 नवीन
भाग संपूच नये असंच वाटत होतं. क्रीव्हास च्या वर्णनाने तर भयकथा वाचल्याचा भास झाला. हे सगळं झेलायला उर्मी, प्रेरणा, देशप्रेम हे शब्द किती कमी पडत असतील याची जाणीव होतेय. सलाम....केवळ सलाम... प्लीज पुढचा भाग खूप लवकर टाका. मिपावर तुमच्या क्रमशः ची वाट पाहणे सगळ्यात जास्त क्लेशदायक असते.
  • Log in or register to post comments

वाचतेय....

कवितानागेश
गुरुवार, 12/20/2012 - 16:31 नवीन
वाचतेय....
  • Log in or register to post comments

वाचतोय..

ऋषिकेश
गुरुवार, 12/20/2012 - 16:40 नवीन
वाचतोय..
  • Log in or register to post comments

अतिशय छान, पुढचा भाग लौकर

पुष्करिणी
गुरुवार, 12/20/2012 - 18:36 नवीन
अतिशय छान, पुढचा भाग लौकर येउदेत
  • Log in or register to post comments

छान

सामान्य वाचक
गुरुवार, 12/20/2012 - 18:36 नवीन
फारच छान. प्रत्यक्ष जाणे शक्य नसले तरी कथा वाचण्यावर समाधान
  • Log in or register to post comments

वाचतोय

प्यारे१
गुरुवार, 12/20/2012 - 18:50 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

सुरुवात मस्तच..

कौशी
गुरुवार, 12/20/2012 - 20:47 नवीन
दुसरा भाग लव्कर येउ द्या.
  • Log in or register to post comments

गोठवून टाकणारी सुरुवात...

एस
गुरुवार, 12/20/2012 - 21:25 नवीन
पुढचे भाग लवकर येऊ द्यात...
  • Log in or register to post comments

नमस्कार, नेहमीप्रमाणे एका

५० फक्त
गुरुवार, 12/20/2012 - 22:53 नवीन
नमस्कार, नेहमीप्रमाणे एका वेगळ्या विषयाला हात घातलाय तुम्ही, एका मित्राकडुन या भागाला पांढरा राक्षस म्हणतात असं ऐकलंय.तेंव्हापासुनच भिती आहे याबद्दल. बाकी तुमचं लिखाण नेहमीप्रमाणेच उत्तम.
  • Log in or register to post comments

सहनशक्तीची परिसीमा

अर्धवटराव
Fri, 12/21/2012 - 10:18 नवीन
मला शांत झोप लागावी आणि सुरक्षीत दिवस दिसावा म्हणुन किती अनाम वीर कसले भयानक कष्ट उपसतात :( अर्धवटराव
  • Log in or register to post comments

भन्नाट

आदिजोशी
Fri, 12/21/2012 - 13:54 नवीन
पु. भा. ल. टा.
  • Log in or register to post comments

एकदम जीवंत वर्णन.

प्रचेतस
Fri, 12/21/2012 - 14:15 नवीन
एकदम जीवंत वर्णन. तुमचे लेख प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत असतात.
  • Log in or register to post comments

पु.भा.प्र...

अमितसांगली
Fri, 12/21/2012 - 14:34 नवीन
वाचतोय..
  • Log in or register to post comments

एक नंबर कथा!!!!! त्यातून लेखक

बॅटमॅन
Fri, 12/21/2012 - 14:44 नवीन
एक नंबर कथा!!!!! त्यातून लेखक या वातावरणाशी परिचित असल्याने अनुभवाचे बोल वाचण्याचा आनंद मिळतोय तो लै विरळा. जियो सरजी _/\_
  • Log in or register to post comments

मस्त.......!!! खुप

मनराव
Fri, 12/21/2012 - 20:14 नवीन
मस्त.......!!! खुप दिवसांपासुन सियाचिन बद्द्ल वाचायची इच्छा होती...... पुढच्या भागाची वाट बघतोय....
  • Log in or register to post comments

सुरेख

पिवळा डांबिस
Sat, 12/22/2012 - 00:50 नवीन
सुरेख आणि अत्यंत थरारक! जणू आपणच सियाचीनमध्ये आलो आहोत असं वाटण्यासारखं!!! अनुवाद वाचनीय बनवणं हे अत्यंत कौशल्याचं काम आहे, आणि चितळेसाहेब, हे स्किल तुम्हाला पुरेपूर लाभलेलं आहे... जियो!!
  • Log in or register to post comments

खिळवून ठेवणारा लेख

श्रीरंग_जोशी
Sat, 12/22/2012 - 01:06 नवीन
या विषयावर इतके सखोल व तपशीलवार वर्णन प्रथमच वाचावयास मिळाले. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

वाचतोयच अर्थात

चाफा
Sat, 12/22/2012 - 01:57 नवीन
वाचतोयच अर्थात :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 12/22/2012 - 02:21 नवीन
फारच सुंदर सुरुवात. सियाचीन बद्दल मला पहिल्यापासून खूप आकर्षण आहे. आता तर प्रत्यक्ष सियाचीनमध्ये काम केलेल्या सैन्याधिकार्‍याच्या हातातून उतरलेली ही कहाणी वाचायला अधीर झालो आहे. लवकर लवकर पुढचे भाग टाका. असे वाचले आहे की हल्ली प्रवासी म्हणून सियाचीनला जाण्याचीही व्यवस्था आहे... अगदी बेस कॅंपच्या तयारीसकट. कृपया याबाबत माहिती द्यावी. एकदा याची देही याची डोळा सियाचीन बघायची इछा आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

अजून प्रवाश्यांना जाऊन देत नाहीत

रणजित चितळे
Mon, 12/24/2012 - 12:47 नवीन
फार क्वचित काही एक्पिडीशनंस् जातात पण ते सरकार वर अवलंबून असते. (GOVT TO GOVT).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे लोक गेले होते पहा.

विलासराव
Mon, 12/24/2012 - 19:56 नवीन
हे लोक गेले होते पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

http://marathi.yahoo.com/%E0

विलासराव
Mon, 12/24/2012 - 19:57 नवीन
http://marathi.yahoo.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C-202012576.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

पु भा प्र

रामपुरी
Sat, 12/22/2012 - 04:04 नवीन
छान जमलाय अनुवाद. (जाज्वल्य मराठीप्रेमीची एक सुचना: "तेवढीच एक कमी असते" च्या ऐवजी "एवढीच एक उणीव असते" हे कसं वाटतं?)
  • Log in or register to post comments

छान!!

चेतन माने
Sat, 12/22/2012 - 15:48 नवीन
वाचतोय पुढचा भाग लवकरच येउद्या :)
  • Log in or register to post comments

वाचतोय

jaypal
Sun, 12/23/2012 - 19:04 नवीन
शहारतोय आणि पुढिल भागाची वाट पहातोय
  • Log in or register to post comments

हम्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/24/2012 - 13:33 नवीन
'मस्त' असे तरी कसे म्हणू ? वाचतोय..
  • Log in or register to post comments

हम्म करणारे वाढलेत आजकल

समयांत
Tue, 12/25/2012 - 00:30 नवीन
हम्म मी ही वाचतो आहे. आतापर्यंत सुंदर.. पुढील भागाची प्रतिक्षा म्हणजेच पुभाप्र ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वाचतेय....

प्रीत-मोहर
Tue, 12/25/2012 - 00:09 नवीन
वाचतेय.... खुप छान अनुवाद केलाय तुम्ही सर
  • Log in or register to post comments

रणजितश्री, काय लेखनशैली आहे राव, कमाल!

संजय क्षीरसागर
Tue, 12/25/2012 - 00:32 नवीन
"कधीकधी वाटते त्या खाईंना स्वतःचे असे मन असते, जिवंत प्राण्या सारख्या वागतात. त्या ग्लेशियरच्या पोटातल्या चालणाऱ्या हालचालींनी एक भयानक रूप त्यांना मिळते. काही हिमखाई आताच गिळून निपचीत पडलेल्या अजगरा सारख्या वर्षानुवर्षे पडलेल्या असतात. पण कधीकधी काही हिमखाई अगदी ह्याच्या उलट. एखाद्या सळसळणाऱ्या सापा सारख्या. अस्थिर. एकमेकांवर लादला गेलेला हजारो टन वजनाचा गोठलेला बर्फ त्याच्याच भाराने तात्पुरता वितळत राहतो व लागलीच गोठत राहतो ह्यामुळे होणाऱ्या हालचालीचे पर्यवसान हिमखाईची रचना सतत बदलत राहण्यात होते. काही हिमखाई अगदी अरुंद व सरळ असतात जसे काही ग्लेशियरमध्ये भेग पडली आहे असे वाटावे किंवा कोणी राक्षसाने भल्या मोठ्या सूऱ्याने ग्लेशियर वर वार करावे तसे. काही खाईंची तोंडे खूप मोठाली असतात, मैलभर लांब सुद्धा. तळाकडे जाताना निमुळते होत जातात. एखाद्या नसंपणाऱ्या घसरगुंडी सारख्या. जणुकाही एखाद्या खुनी माणसा प्रमाणे किंवा कोणाला मारण्याची सुपारी घेतल्या सारखे सतत तेथे असणाऱ्या जवानांच्या मागे दबा धरून घात करायला तयार असतात. चालताना चुकलात, थोडे वजन जास्त पडले, पाय घसरला, समजले नाही, वाट चुकलात किंवा नशिबाने पाठ फिरवली तर पटकन सावज साधायला तयार."
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे...

मुक्त विहारि
Sat, 01/05/2013 - 21:08 नवीन
वाचत आहे...
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे...

मुक्त विहारि
Sat, 01/05/2013 - 21:08 नवीन
वाचत आहे...
  • Log in or register to post comments

शुन्याच्या खाली ३० अंश

किसन शिंदे
Fri, 01/11/2013 - 16:52 नवीन
शुन्याच्या खाली ३० अंश सेल्सिअस तापमान??:o आत्ताच पहिल्या भागापासून वाचायला सुरूवात केली आहे. पुढचे सगळे भाग आता वाचतोच आहे.
  • Log in or register to post comments

हॉल ऑफ फेम लेखमालिका

श्रीरंग_जोशी
Wed, 08/20/2014 - 22:23 नवीन
नुकतीच खालिल बातमी वाचली अन ही लेखमालिका वर आणाविशी वाटली. Soldier’s body found 18 years after he went missing in Siachen
  • Log in or register to post comments

हा लेख वाचणं आवश्यक झाल्याने

गवि
गुरुवार, 02/11/2016 - 10:55 नवीन
हा लेख वाचणं आवश्यक झाल्याने समोर आणलाय.
  • Log in or register to post comments

जिवंत लेखन ....... +1

मयुरMK
गुरुवार, 02/11/2016 - 11:02 नवीन
जिवंत लेखन ....... +1
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुमीत भातखंडे
गुरुवार, 02/11/2016 - 18:25 नवीन
हा लेख वर आणल्याबद्दल गवि साहेबांचे धन्यवाद. आता पुढचे भागही वाचून काढतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा