तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२३

खुशि's picture
खुशि in भटकंती
7 Jul 2012 - 12:56 pm

मालसरच्या या पन्चमुखी हनुमान मन्दिरात स्नानासाठी गरम पाण्याचा बम्ब होता,थन्डीही बरीच होती मग काय गरम गरम पाण्याने मस्त स्नान झाले कपडेधुणेही उरकले.सर्वान्चे आवरल्यावर मैय्याची पुजा आरती केली,मन्दिरातील देवदेवतान्चे दर्शन घेतले आणि चहा घेउन निघालो.विनोबा एक्स्प्रेस बसस्थानकावर येउन थाम्बली.आज सिनोर पर्यन्त बसने जायचे ठरवले होते आमच्या लीडरने;भागवत साहेबानी.खरेतर सिनोर फक्त पाच कि.मि. दुर होते.असो. बस मिळाली नऊ वाजता सिनोरला पोहोचलो,ती बस पुढे डभोईला जाणार होती,घाईघाईने सर्वजण उतरलो.अतिघाई सन्कटात नेई ह्याचा प्रत्यय आला,विद्याताईन्चे बेडीन्ग बसमध्येच विसरले,आता काय करायचे? मग तेथिल कार्यालयातून डभोई डेपोत फोन केला,आणि बेडीन्गची वाट पहात बसलो.दरम्यान ढोकळा चहा असा नास्ता केला.थोड्याच वेळात बेडीन्ग आले,बस चालकाचे,कार्यालयातील कर्मचार्‍यान्चे आभार मानून विनोबा एक्स्प्रेस निघाली.
मैय्या किनार्‍याने चालत होतो मोठ्या मजेने,बेडीन्ग मिळाल्याने सारा तणाव सम्पला होता,विद्याताईन्ची कळीही त्यामुळे खुलली होती.मजेत थट्टामस्करी करत चालत होतो.एक परिक्रमावासी भेटले,त्यान्च्या मानेला भलामोठा लायपोमा {टयुमर.} दिसला,तो तसा बिनाइनच होता म्हणजे त्यात कर्करोगाची लक्षणे नव्हती,मी म्हटले बाबा ऑपरेशन करुन काढुन टाका छोटेसेच होईल ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये पैसेही लागणार नाहीत.तर ते बाबा म्हणाले,पाचकिलो वजन है इस गोलेका पुर्वजनम का पाप होगा भुगतके समाप्त करेन्गे,ऑपरेशन नही करेन्गे.काय म्हणावे या अन्धश्रधेला? त्या गोळ्यामुळे त्या माणसाची मान अक्षरशः वाकडी झालेली होती,आणि खरेतर तेच चान्गले नव्हते गोळा साधा होता पण वाकडी मान पुढे फारच त्रासदायक ठरेल.पण मी समजावत होते म्हणुन ते बाबा घाईघाईने पुढे निघून गेले. नर्मदे हर.
उन्चसखल कच्च्या रस्त्याने साधारण पाच कि.मि. चालुन क्रुष्णकान्त महाराजान्च्या नर्मदाआश्रमात आलो.क्रुष्णकान्त महाराज उच्चशिक्षित बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. रामक्रुष्णमिशन प्रेरीत आश्रम आहे.साधेसे घर,आजुबाजुला बगिचा,छोटेसे नर्मदामन्दिर.परिक्रमावासी लोकान्साठी राहण्यासाठी खोल्या,स्वयम्पाकासाठी एक खोली असा सारा सुन्दर परिसर आहे. ओले कपडे वाळत घातले,खिचडीचे सदाव्रत मिळाले कालच्यासारखी खिचडी केली आश्रमातील लिम्बाच्या झाडाला खुप लिम्बे लागली होती,खुप पिकलेली लिम्बे जमीनीवर पडली होती मी ती गोळा केली प्रत्येकाजवळ ठेवायला दिली.परान्जपेनी बरेच फोटो काढले,शुटीन्ग केले. रामक्रुष्ण परमहन्स यान्च्या जीवनावरील प्रसन्गान्चे बरेच फोटो तिथे होते विषेशतः परमहन्सानी हिन्दुधर्मा व्यतिरिक्त मुस्लिम्,ख्रिश्चन' ,शीखधर्मान्चा अभ्यास केला तेव्हा ते त्या त्या धर्माप्रमाणे कसे वागत याबद्दलचे फोटो.
सव्वा वाजता मन्दिरातील नर्मदामैय्या आणि क्रुष्णकान्त महाराज याना प्रणाम करुन निघालो,थोड्याच दुरवर कन्जेठा गाव लागले तेथील सौभाग्यसुन्दरी देवीचे दर्शन घेउन मैय्या किनारी आलो.अगदी काश्मीर मधील गुलमर्ग,सोनमर्ग सारखे हिरवळीचे गालिचे किनार्‍यावर पसरलेले होते,उन कडक होते पण हिरवळ आणि मैय्याकडुन येणारा झुळझुळता गार वारा यामुळे त्याचा त्रास वाटत नव्हता.सगळ्यानी पायातले बूट काढुन हातात घेतले आणि त्या सुखद हिरवळीवरुन चालण्याचा आनन्द मजेत लुटत चालायला लागलो.मैय्या किनारीही किती विविधता आहे,काल तापत्या वाळूचे वाळवन्ट होते तर आज हे हिरवळीचे गालिचे.थोडे थाम्बुन मैय्याचे सुमधुर जल प्राशन केले,चेहर्‍यावर थन्डगार पाण्याचे हाबके मारले मस्त.उरलासुरला शिणवटाही पळून गेला.
दोनएक कि.मि. चालल्यावर पुन्हा कठीण रस्ता आला,बूट चढवले एक टेकडी चढली,झाडाझुडपातुन वाट काढत चालत होतो,टेकडीचा उतार आला थोडे अवघडच होते पण एकमेकान्च्या काठीचा आधार घेत उतरलो;परत दुसरा चढ चढलो.आता एरन्डाची शेते लागली.छान वाढलेल्या एरन्डाच्या बनातुन चालणे त्या कडक उन्हात मोठे आल्हाददायक होते.एरन्डीचे बन सम्पले आणि कापसाच्या शेतातुन वाटचाल सुरु झाली.थोड्याच वेळात अनसुया आश्रम परिसरात प्रवेश केला. वाटेत एक सुन्दर नवीनच बान्धलेले नर्मदामाता मन्दिर लागले,दर्शन घेउन जरा बसलो.
तीन वाजुन गेले होते.पायवाटेने एका पाणी नसलेल्या नदीवरील पुल पार करुन अनसुया मन्दिराच्या प्रान्गणात प्रवेश केला.ती एरन्डी नदी होती अनसुया आश्रम नर्मदा-एरन्डी सन्गमावर आहे.सर्व तीर्थक्षेत्री असतात तशी प्रसादाची,चहापाण्याची दुकाने सभोवार होती.चहा घेउन,पिशव्या,बुट त्याच दुकानात ठेवून दर्शनाला गेलो.
याच ठिकाणी सत्त्वपरीक्षा घेण्यास आलेल्या ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवाना अनसुया मातेने बाल रुप दिले होते. हे प्रसिद्ध सतीक्षेत्र आहे. येथे नवचन्डी याग करण्याचे महत्त्व आहे.आजही तिथे नवचन्डीयाग सुरु होता आम्हाला प्रसादाचा लाभ झाला.
अनसुया आश्रमातुन पाच वाजता रिक्षाने बारा कि.मि.वरील चान्दोदला जाण्यासाठी निघालो.रानडेबाई-राजवाडेबाईनी सान्गितल्यामुळे बद्रिकाश्रमला जायचे नाही असे ठरले होते म्हणून चान्दोदला जाणार होतो. गोसावी यान्च्या ओळखीचे उमेशगिरी नावाचे साधक चान्दोदला रहात होते त्यान्च्याच कडे आम्ही निघालो होतो.वाटेत रिक्षा पन्क्चर झाली त्यात वेळ गेला.सात वाजता चान्दोदला उमेशगिरी यान्च्या घरी पोहोचलो.उमेशगिरी वयाने लहान आहेत २२/२४ वय असेल,शिकलेले आहेत,सन्यास घेतला आहे.महाराजानी आम्ही येणार हे आधीच कळवलेले होते म्हणुन भात भाजी आमटी करुन ठेवली होती कणीक मळून ठेवली होती.फ्रेश होउन चहा घेतला आणि विद्याताई,लिलाताई यानी पोळ्या केल्या मी एकीकडे सर्वाना जेवायला वाढले,पुरुषमन्डळीन्चे झाल्यावर आम्ही तिघी जेवलो. नन्तर भान्डीकुन्डी आवरुन थोड्यावेळ गप्पा मारुन झोपलो. क्रमशः

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

7 Jul 2012 - 10:33 pm | सुजित पवार

वाचतोय..