सर्सर आल्या सरीत...

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
6 Jul 2012 - 1:18 pm

सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी
शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि!

डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर
जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर !

चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची
मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची!

शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही
ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही!

वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून
ओला श्रावण हळूच डोकावला मनातून!

मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा?
चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा !

त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे
अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !

म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी
होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी!

-चैतन्य दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jul 2012 - 1:31 pm | प्रचेतस

पावसाची सर पडून गेल्यासारखे वाटले, नव्हे ती तर पडतीच आहे बाहेर.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Jul 2012 - 1:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे
अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे !

हे खासचं.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2012 - 2:28 pm | अत्रुप्त आत्मा

पावसाळी मनाचे बोल... :-)

झकास! साला कविता कराव्यात तर चैतन्यानं. मस्त नादमय, वृत्तबद्ध आणि आशयघन. जियो!

शुचि's picture

6 Jul 2012 - 6:57 pm | शुचि

चैतन्य दीक्षीत यांच्या कविता मला खूप आवडतात.

पैसा's picture

6 Jul 2012 - 6:44 pm | पैसा

मस्त! अप्रतिम! सुरेख!

अमितसांगली's picture

7 Jul 2012 - 8:48 am | अमितसांगली

झकास....

चैतन्य दीक्षित's picture

9 Jul 2012 - 9:28 am | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
मेवे, कस्चं कस्चं... :)

चतुरंग's picture

9 Jul 2012 - 9:53 am | चतुरंग

अल्लड कविता सुंदर खाशी सुबक ठेंगणी
चैतन्याचे काव्य फुले या रिमझिमत्या श्रावणी!

(श्रावणप्रेमी) रंगा

(श्रावणप्रेमी) रंगा

दया, मोडक कहा और कैसे है उस्का पता करो|
-एसीपी (काल्पनिक चक्र फिरवत) प्यारेद्युमन.

मनमेघाची मस्त कविता...

नंदन's picture

10 Jul 2012 - 12:36 am | नंदन

सुरेख कविता!

मंदार दिलीप जोशी's picture

20 Jul 2012 - 1:16 pm | मंदार दिलीप जोशी

प्रसन्न वाटलं वाचून.