पराभूत थोरवीच्या शोधात

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
10 Jun 2012 - 11:17 am

कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.' माहागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा, जै हो. अनेक तथाकथित गायनप्रेमी मंडळी केवळ रोटरी किंवा तत्सम संस्थांच्या इवेंट मॅनेजमेंटमधून आयोजित केलेल्या कार्यक्रमालाच - तिकिट पाचेकशे पासून तीन हजारपर्यंत फक्त - हजेरी लावतात. आमच्या गरवारेमधे वट्ट पन्नास रुपये तिकिटात अगदी पं. भीमसेनजी, पं जसराज, पं. उल्हास कशाळकरांपर्यंत दिग्गज गाऊन जातात. "पण ते पन्नास रुपयांचे गाणे होऽ. तिथे हे गायक मनापासून गात नैत कै. ते काय शीरीयस गाणं थोडंच आहे?" पैसे अधिक द्यावे लागतात तेच चांगले असते असा उलटा प्रवास आता चालू झाला आहे.

गाण्याचे सोडा असा उलट प्रवास सार्‍याच क्षेत्रात सुरू झालेला दिसतो. परवाच एका चर्चेत अमीरखान ला 'सत्यमेव जयते' च्या प्रत्येक भागासाठी तीन कोट रुपये मिळतात या आक्षेपाला 'इतर कोणी का केली नाही?त्याच्यासारखी समाजसेवा, तुम्ही करा मग तुम्हालाही देतील.' असे उत्तर मिळाले नि निर्वाणपदास पोहोचलो. बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन(सुटले बिचारे), अभय बंग, राजेंद्रसिंह वगैरे मंडळींना आता चित्रपटात जायला हरकत नसावी. आजच्या केवळ पैसा एके पैसाच्या नि सांस्कृतिकदृष्ट्या खुरटलेल्या जमान्यात जगणारे आपल्या जाणीवाच खुरटलेल्या आहेत नि त्या विस्तारायला पैसे जमा करण्याच्या कामातून फुरसत नाही हे वास्तव उघड्या डोळ्याने स्वीकारत नाही. स्वतःसाठी विशिष्ट सांस्कृतिक, वैचारिक पातळी हवी यासाठी त्या पातळीलाच खेचून खाली आणण्याचे धंदे सुरू झाले आहेत. थोडक्यात हिमालयाची व्याख्या बदलून पैशाला पासरी असलेल्या टेकड्यांना हिमालय म्हणून सर्टिफाय करायचे नि ती पादाक्रांत करून आपण तेनसिंग नोर्गे किंवा एडमंड हिलरी असल्याचा समज करून घ्यायचा असे काहीसे घडते आहे. जगातील प्रत्येक गोष्ट 'मोनटाईज' करता येते, विकत घेता येते असा ठाम समज असलेली संस्कृती आज रुजते आहे. आपणही आर्थिक सुबत्ता हे एकमेव उद्दिष्ट ठेवून उरलेल्या सार्‍या घटकांची अवनती नजरेआड करतो आहोत.

या सार्‍या गदारोळात अस्सलता अशी कुठे नाहीच का? असे नसावे बहुधा. अमीरखान आपला थोर समाजसेवक असतो त्या जमान्यातही बाबा आमटेंची तिसरी पिढी त्यांचे कार्य करीत असतेच. नवे समाजसेवक पुढे येतच असतात. फक्त अपरिहार्यपणे त्यांचा व्यवस्थेशी संघर्ष होतो नि आपल्याला भरपूर पैसे देणारी व्यवस्था, तिचे समर्थन आपण करायलाच हवे या भूमिकेतून मग हे समाजसेवक प्रथम 'समाजवादी', मग 'कम्युनिस्ट' नि अखेर 'प्रगतीविरोधी' ठरवून बाहेर फेकले जातात. मग त्यांची जागा भरून काढायला रंगमंचावर अमीरखान अवतीर्ण होतो. त्याच्या त्या एपिसोडस् वर चर्चा करून लोकांना आपल्यालाही सामाजिक भान आहे बरं का असे पटवून घ्यायला नि 'अहो रूपम् अहो ध्वनिम्' न्यायाने इतरांना पटवून द्यायला सोपे जाते. ते एकदा झाले की मनातला अपराधगंड बराचसा कमी होतो नि आपण मॅक्डीमधे नवा कुठला बर्गर आलाय ते तपासायला जाऊ शकतो. लौकिकार्थाने पराभूत झालेले ते समाजसेवक, आपापल्या कलेशी बांधिलकी जपणारे कलाकार, विचारवंत, अडगळीत बसून का होईन आपले स्वीकृत कार्य निष्ठेने करत असतातच. गरज असते ती त्यांचा शोध घेण्याची. पण यांना सेलेब्रिटी मूल्य नसते किंवा ज्या दिव्याच्या प्रकाशात आपले सांस्कृतिक, वैचारिक दारिद्र्य उघडे पडते तो दिवा आपणहून कोण घरात आणेल, नाही का?

ज्येष्ठ राजकीय नाटककार गो.पु. देशपांडे याच्या 'उद्ध्वस्त धर्मशाळा' या नाटकाला त्यांनी लिहिलेली (१९७४ मध्ये!) प्रस्तावना अतिशय उद्बोधक ठरावी. यातील काही भाग संकलित -नाटकांचे, तत्त्वज्ञानाचे संदर्भ वेगळे करून - करून इथे ठेवतो आहे.

________________________________________________________________________________________________________________________

- 'उद्ध्वस्त धर्मशाळा' ले. गो. पु. देशपांडे, प्रस्तावनेतून

आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत....

त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.

अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्‍यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.

या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठी-मागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे.

हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते मी जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही.

ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.

दरम्यान आपल्या हाती फक्त शोध घेण्याचे काम उरते. तूर्त अवतीभवतीच्या थोरांमधे जनमान्य अशा टेकड्या कोणत्या आणि द्रष्टेपणाचा परिसस्पर्श झालेले पराभूत आत्मे कोणते हा शोध, हा प्रश्न महत्वाचा आहे, तो पुनः पुन्हा विचारला गेला पाहिजे.

संस्कृतीसमाजजीवनमानविचारशिफारसमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Jun 2012 - 11:50 am | श्रावण मोडक

म्हाताऱ्या, पूर्वार्धही आवडला.
सावल्या लांब पडतात त्याला काय करणार? सावल्या लांबल्या म्हणजे सूर्यास्त होत आला असा एक ठोकळेबाज अर्थ सांगितला जातो. ते खरं नाही. सावल्या लांब पडतात, कारण ती माणसं प्रकाशकिरणांचे योग्य कोन पकडून अशा जागी थांबतात की त्या सावल्या लांब पडतात. पुन्हा ही सावली सूर्यप्रकाशातली नसते. ती कृत्रिम प्रकाशझोतातली असते (वायूप्रदूषणाबरोबरच प्रकाशप्रदूषण हीही आपली एक समस्या आहे हे तुला माहिती आहेच). काही माणसं त्याच प्रकाशझोतात अशा जागी थांबतात की त्यांची सावली त्यांच्या उंचीला वास्तविकरित्याही खुजी ठरवते. प्रकाश आमटे, अभय बंग ही उदाहरणं याहीसंदर्भात आहेतच.
डोक्याच्या बरोबर वर प्रकाशाचा स्रोत ठेवून माणसं रहात नसतात. कारण तेव्हा सावली निर्माण होत नसते. झालीच तर ती आपल्याच पायाखाली असते असं म्हणता येतं.
अडचण ही की आपण त्या सावल्यांच्या लांबीवरून माणसांची उंची मोजतो. मग गफलत होते. हे माणसांना जसे लागू तसेच सामाजिक घटितांनाही लागू.
सावली हा मुळात प्रकाशझोताचा परिणाम आहे हेही एकदा समजून घेतलं पाहिजे. ते समजेल तेव्हा बराच पोकळपणा लक्षात येईल. जागा कुठल्या भरल्या पाहिजेत हेही कळेल.

रमताराम's picture

10 Jun 2012 - 8:14 pm | रमताराम

सावल्यांबाबतचे विवेचन अगदी मार्मिक. अगदी पटले.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2012 - 12:32 pm | मुक्त विहारि

सध्या एव्हढेच.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 1:34 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखन वाचायला वेळ लागला... परत परत वाचावं असं लेखन. मनातलं नेमकं कसं मांडावं ते समजत नाहीये.

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2012 - 5:25 pm | भडकमकर मास्तर

१. यावरून "आरडी बर्मन कसा टुक्कार संगीतकार आहे " ' हे विधान स्पष्ट करून सांगणारा सत्तरच्या दशकातला कणेकरांचा एक लेख आठवला...
२. गो पु म्हणतात तशा टेकड्या भरपूर असतात पण त्यांना कोणी हिमालय मानत नाहीच.. सोयीपुरते कौतुक करतानाही लोकांना माहित असतेच की ही आपली एक टेकडी आहे... खरा हिमालय एखादाच असतो..

३.'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो.

यावरून शरदिनीची एक ( कदाचित एकमेव रिलेव्हंट) कविता आठवली...

कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक
माझ्या वाडःमयावडीने
काव्यलेखनबिखनथोडंफारअस्तंचालू
पोटापाण्यासाठीशिकवताशिकवता

मात्र हल्ली मजा येत नाही
काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही
काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत
सारंसारं नैराश्यभरं, ओव्हररेटेड

गायनवादननृत्य साहित्यसंगीतकला टीव्हीनाटकसिनेमा टेनिससॉकरक्रिकेट
ओ व्ह र रे टे ड

मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर
उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड
सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा
ओ व्ह र रे टे ड

गुळ्गुळीतपुरस्कारकोट्यातलेफ्लॅटबीट निवडणुकाबक्षिसंअध्यक्षपदंसंमेलनं
जुळवलेलीघडवलेलीहास्यस्पदसमीकरणं
नक्कीच ओ व्ह र रे टे ड

ते असो...

तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ
धडपड्या तरुणांचं
घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा
तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला

आत्ताच फोन आला होता मंडळाकडून
मलाहीआहेयावेळच्यासंमेलनातपुरस्कार्सांस्कृतिकमंत्र्यांच्याहस्तेकॅनयूइमॅजिन?
पुढल्याम्हैन्याच्यापैल्यारैवारी.
यायचंबर्का.

फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला
आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड
म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.
हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम
यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत"
म्हणूनतोंडभरूनहसला

अशीबातमीमिळालीकीनिराशाजनकदिवसांतसुद्धबरंवाटतं
आजवरच्यासहित्यसेवेचीकदरकरणारंकोणीआहेअसेवाटते
संमेलनउत्तमचहोणारतोप्रश्नचनाही
तुम्हीहीयायचंहंपुरस्कारवितरणाला
तेवढीच साहित्यसंस्कृतीचीसेवा
येणार्ना?

पैसा's picture

10 Jun 2012 - 9:03 pm | पैसा

आम्ही मस्त झोपेत आहोत. कशाला जागं करताय? आम्हाला टेकड्याच आपल्या बर्‍या. त्यांची उंची पण मोजता येते आणि त्या सहज पार करून पण जाता येतं. :(

बॅटमॅन's picture

10 Jun 2012 - 9:41 pm | बॅटमॅन

ररासाएब, मस्त लेख :)

अन्या दातार's picture

11 Jun 2012 - 11:58 am | अन्या दातार

मस्त मांडणी. श्रामोंचेही विवेचन मस्त.

बादवे, सत्यमेव जयते सारखा तुमचा कोणता कार्यक्रम करायचा?? ;)

मृत्युन्जय's picture

11 Jun 2012 - 12:07 pm | मृत्युन्जय

उच्च लेख आहे. भावला. सगळेच विचार नाही पटले पण त्याबद्दल दुमत दर्शवण्याची ही जागा नव्हे. लेखातला आशय पटला असल्यामुले तर नव्हेच नव्हे.

सहज's picture

11 Jun 2012 - 12:11 pm | सहज

ररा तुम्ही लिहत रहा. आम्ही वाचत आहोतच..

या सार्‍या गदारोळात अस्सलता अशी कुठे नाहीच का? असे नसावे बहुधा. अमीरखान आपला थोर समाजसेवक असतो त्या जमान्यातही बाबा आमटेंची तिसरी पिढी त्यांचे कार्य करीत असतेच. नवे समाजसेवक पुढे येतच असतात. फक्त अपरिहार्यपणे त्यांचा व्यवस्थेशी संघर्ष होतो नि आपल्याला भरपूर पैसे देणारी व्यवस्था, तिचे समर्थन आपण करायलाच हवे या भूमिकेतून मग हे समाजसेवक प्रथम 'समाजवादी', मग 'कम्युनिस्ट' नि अखेर 'प्रगतीविरोधी' ठरवून बाहेर फेकले जातात. मग त्यांची जागा भरून काढायला रंगमंचावर अमीरखान अवतीर्ण होतो. त्याच्या त्या एपिसोडस् वर चर्चा करून लोकांना आपल्यालाही सामाजिक भान आहे बरं का असे पटवून घ्यायला नि 'अहो रूपम् अहो ध्वनिम्' न्यायाने इतरांना पटवून द्यायला सोपे जाते. ते एकदा झाले की मनातला अपराधगंड बराचसा कमी होतो नि आपण मॅक्डीमधे नवा कुठला बर्गर आलाय ते तपासायला जाऊ शकतो. लौकिकार्थाने पराभूत झालेले ते समाजसेवक, आपापल्या कलेशी बांधिलकी जपणारे कलाकार, विचारवंत, अडगळीत बसून का होईन आपले स्वीकृत कार्य निष्ठेने करत असतातच. गरज असते ती त्यांचा शोध घेण्याची. पण यांना सेलेब्रिटी मूल्य नसते किंवा ज्या दिव्याच्या प्रकाशात आपले सांस्कृतिक, वैचारिक दारिद्र्य उघडे पडते तो दिवा आपणहून कोण घरात आणेल, नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2012 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, असं उत्तम लेखन विचार मांडल्यावर प्रतिक्रिया लिहिण्याची सुरुवात कुठून करायची असते. ते कै समजत नाही म्हणून ही केवळ पोच आणि सहजरावांसारखंच म्हणतो-

ररा तुम्ही लिहित रहा. आम्ही वाचत आहोतच..

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

12 Jun 2012 - 8:50 am | स्पंदना

च्यायला, असं उत्तम लेखन विचार मांडल्यावर प्रतिक्रिया लिहिण्याची सुरुवात कुठून करायची असते. ते कै समजत नाही
मी पण हेच म्हणेन.
ररा __/\__ चांगल लिवलय. माझ्या तर मते या असल्या तकलादु प्रसिद्धीन आपली तरुण पिढी नको तितकी त्यात गुंतत चालली आहे. अर्थात हे सगळीकडच.

जे.पी.मॉर्गन's picture

11 Jun 2012 - 12:15 pm | जे.पी.मॉर्गन

वर श्रामोंनी म्हटल्याप्रमाणे पूर्वार्धही आवडला. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, उद्योग अगदी अध्यात्मापर्यंत....कुठलंच क्षेत्र असं नाही जिथे मीडियॉक्रसीचा उदोउदो होत नाही. पण त्याच वेळी देशपांड्यांनी सांगितल्याप्रमाणे "मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो." कुत्र्याच्या छत्रीसारखी ही लोकं दर पावसाळ्यात उगवतात आणि काही दिवसांत दिसेनाशीदेखील होतात. पण The greatest test is the test of time. जे अस्सल ते आणि केवळ तेच काळाच्या कसोटीवर उतरतं. मग ते आर.डीचं संगीत असो, सचिनची बॅटिंग असो किंवा आमटे कुटुंबाचं काम. some things are just timeless. नाही का?

लोकं छटाकभर टॅलेंटचा उदोउदो करणारच हो. हे "महागायक" येतच रहाणार. आपण आपलं ५० रुपयांचं तिकीट काढावं आणि गरवारेच्या सभागृहात सुरांच्या वर्षावात चिंब भिजावं, फेडरचा वन हॅन्डेड बॅकहॅन्ड बघून अचंबित व्हावं, कुमार बोसच्या उजवा हात वर करून सम दाखवण्याच्या अदाकारीवर फिदा व्हावं आणि प्रकाश आमटे, अभय - राणी बंग, अनिल अवचट जर कधी समोर आलेच तर त्यांच्या पायांवर डोकं ठेवावं. बाकीच्यांसाठी हे आहेच -

"गच्छ शूकर - भद्रं ते, वद सिंहः हतं मया |
पंडिता: एव जानन्ति सिंहशूकरयो: बलम ||

अगदी मनातले विचार नटशेल मधे मांडलेत.

जे पी

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Jun 2012 - 12:23 pm | लॉरी टांगटूंगकर

मोठेपणा म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी नाही.सेल्फ रिस्पेक्ट आणि काम केल्याचे समाधान महत्वाचे .पैसा नाही किंवा प्रसिद्धी नाही म्हणून त्यांचे महत्व किंवा मोठेपण कमी होते अशातला भाग अजीबात नाही.त्यांना पराभूत म्हणणे पटले नाही....

काही गोष्टी अशाच आहे ,फोर्ब्स च्या लिस्ट मध्ये शास्त्रज्ञ कधीच दिसणार नाहीत .भारतातले शास्त्रज्ञच म्हणू; डीआरडीओ किंवा इस्रो मधल्या किती लोकांची नावे आपल्याला माहिती आहेत?पण माहिती नाहीत म्हणून त्यांचे महत्व कमी नक्कीच होत नाही...

एकदा पं.उदय भवाळकर यांना कार्यक्रम नंतर विचारले होते की आज तुम्हाला “quality audiance” मिळाला असे वाटते का?तर ते म्हणले की मी स्वतः साठी गातो,समोर कोण काय आहे याने फारसा फरक पडत नाही......

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Jun 2012 - 11:36 pm | निनाद मुक्काम प...

धोपट मार्ग सोडू नको हा मूलमंत्र ह्या तथाकथित गायकांनी अनुसरला आहे.
वहिवाटीची वाट धरण्यापेक्षा एखादी आडवळणाची वाट धरणे ह्याच्या प्रकृत्तीला झेपत नाही.
श्रेया घोशाल ,कुणाल गांजावाला असे अपवाद वगळता बाकी सर्व आनंद आहे.

मात्र आमीर खान विषयी मत जरासे खटकले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तो ह्या संकल्पमागील उदिष्ट स्पष्ट करतो.
मुळात जगात सर्वत्र कलाकार जे जनतेचे मनोरंजन करतात त्यांना समाजाची सेवा करणाऱ्या समाजसेवाकांपेक्षा झुकते माप मिळते. ह्या मागील कारण एकच कि कलाकार हा जनतेचे अभिप्राय , प्रेम , ह्याचा भुकेला असतो तर समाजसेवक हा निरपेक्ष असतो.
आजच्या काळात परकीय प्रचार माध्यामतून आलेले लोण सर्वत्र जगभर पसरले आहे. व सारखे सारखे ,तिखट मीठ मसाला लावून दाखवलेले सत्य मानण्याकडे जनतेचा कल असतो.
तेव्हा अनेक भंपक गोष्टींना वारेमाप प्रसिद्धी देणाऱ्या प्रसार माध्यमांचा विधायक वापर करून घेण्यासाठी समाजातील विधायक शक्ती व प्रवृत्ती पुढे येत असतील तर ते कौतुकास्पद आहे.
सिंधुताई ह्यांच्या सारख्या अनेक समाजसेवक आज भारतात कार्यरत आहेत.
मात्र त्यांना मी वर उल्लेखलेल्या सत्याची जाणीव झाली
.
मात्र आमीर खान ने ह्या शो मधून जे सार सांगितले आहे तेच सिंधुताई ह्यांना फार आधी उमजले. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात. " लोकांसमोर आपले दुखाचे प्रदर्शन केल्याशिवास लोक त्यास दाद देत नाहीत. त्यांनी सुरेश भटांच्या गझला असो किंवा त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संघर्षाचे प्रभावी वर्णन असो व त्यातून त्यांच्यावर निघालेला सिनेमा असो ह्यामुळेच त्या घरोघरी पोहोचल्या.
अनेक राजकीय पक्षाची कृपादृष्टी त्यांच्या संस्थेवर पडली.

आज नाना पाटेकर ने आमटे ह्यांच्यावर असाच सिनेमा ( प्रहार सारखा ) काढला.
आमटे ह्यांच्या कार्याची दखल गावोगावी महाराष्ट्रातील प्रत्येक घरांपर्यंत पोहोचेल.
कारण अजूनही भारतात जनतेच्या मनोरंजनचे मोठा व छोटा पडदा हेच प्रमुख माध्यम आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jun 2012 - 8:33 am | निनाद मुक्काम प...

ह्या बातमीची मला सुतराम कल्पना नव्हती.( येथे प्रतिसाद देण्यापूर्वी )
पण त्यानुसार घडत असेल तर उत्तम आहे.

आपल्या मनासारखी गोष्ट घडत असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2012 - 4:00 pm | परिकथेतील राजकुमार

ररा अतिशय सुरेख मांडणी आणि ज ब र्‍या द स्त लेखन.

नाना चेंगट's picture

11 Jun 2012 - 6:54 pm | नाना चेंगट

मस्त लेखन.

बर्‍याचशा विचारांशी सहमत. (असहमत विचार फारसे आत्ता तरी महत्वाचे नाहीत.)

रेवती's picture

11 Jun 2012 - 8:17 pm | रेवती

लेखन आवडले.
उध्वस्त धर्मशाळेतल्या प्रस्तावनेमधील भाग आवडला.
तुमच्या लेखनाचा सगळा भाग पटला नाही पण (नेहमीप्रमाणेच ) माझे म्हणणे मांडायला जमणार नाही. ;)

नगरीनिरंजन's picture

13 Jun 2012 - 10:01 am | नगरीनिरंजन

लेख चांगला आणि रोचक आहे.
१९७४ सालच्या लेखातही हीच व्यथा मांडली होती हे खूपच रोचक आहे, कारण ररांच्या लेखात ज्यांचा उल्लेख आदराने आला आहे अशा कलाकारांची कारकीर्द त्यादरम्यान वा त्यानंतरच बहरली आहे.

योगप्रभू's picture

13 Jun 2012 - 10:19 am | योगप्रभू

लेखाच्या शीर्षकात आपले मित्र परा यांना भूत म्हणून संबोधले आहे. ते पटले नाही.

मेघवेडा's picture

13 Jun 2012 - 2:44 pm | मेघवेडा

जबरदस्त लेखन रामराव. :)