होत आहे विश्व माझे...

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी...
8 May 2012 - 11:08 am

कालचा काळोख माझा आजचा अन् हा प्रकाश
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||

अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके,
आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके
गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||१||

काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी
जे जसे दिसते जगाला ते तसे नसते मुळी
कळुन आले, जाणिवेने बघत गेलो आसपास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||२||

काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी
बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||३||

जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे आणि माझी साक्ष मी
कर्म त्याचा मार्ग चालो, चालतो मीही उदास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||४||

-चैतन्य दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 May 2012 - 11:14 am | प्रचेतस

अप्रतिम.

मूकवाचक's picture

8 May 2012 - 2:49 pm | मूकवाचक

अप्रतिम!

उदय के'सागर's picture

8 May 2012 - 12:37 pm | उदय के'सागर

खरंय....

छान आहे कविता!

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 2:46 pm | JAGOMOHANPYARE

काही ठिकाणी कालगंगेच्या मात्रा जमत नाहीत. का हे वेगळे वृत्त/ प्रकार आहे?

सुधीर's picture

8 May 2012 - 1:34 pm | सुधीर

सुंदर जमली आहे! फक्त शेवटल्या ओळीत
"कर्म त्याचा मार्ग चालो, चालतो मीही उदास"
"उदास"च्या एवजी प्रेरणादायी शब्द आल्यास (झकास? छे छे! हा आपला प्रांत नाही) अजून सुंदर होईल का? असे वाटून गेले.

चैतन्य दीक्षित's picture

8 May 2012 - 4:08 pm | चैतन्य दीक्षित

सुधीर,
'उदास' हा शब्द ''उत् + आस' = ज्याने (कर्मफळाची) आशा सोडली आहे असा' या अर्थी वापरला आहे.
त्यामुळे तो वरवर अयोग्य वाटत असेल, पण बदलता येणार नाही.

पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सुधीर's picture

8 May 2012 - 11:40 pm | सुधीर

ओ-हो! शब्दसंग्रहात वाढ झाली. आवडली कविता.

धन्या's picture

8 May 2012 - 2:58 pm | धन्या

मस्त जमलीय कविता.

चैतन्य दीक्षित साहेब, अतिशय छान कविता आहे.

"होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश "

ही ओळ अप्रतिम झाली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2012 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा

अतीशय उत्कट अभिव्यक्ती

निशदे's picture

8 May 2012 - 11:45 pm | निशदे

फॅन तर आहेच तुझा......... आणि एकेका कवितेतून तू मलाच त्याचे कारण दाखवून देतोस...... :)
इतकी अप्रतिम जमली आहे........एकेक कडवे लाजवाब आहे. :)

चैतन्य दीक्षित's picture

9 May 2012 - 12:16 pm | चैतन्य दीक्षित

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

जामोप्या,
मी कालगंगेत लिहायचं असं ठरवलं नव्हतं ही कविता लिहिताना. सुचत गेली आणि लिहीत गेलो.
मात्रा कदाचित इकडे-तिकडे झाली असेलही पण लयीत व्यवस्थित वाचता येतेय त्यामुळे कालगंगा नसून दुसर्‍याच कुठल्या तरी वृत्तात झाली असावी :) माझाही वृत्तांचा एवढा अभ्यास नाहीये :)
कालगंगा म्हणजे- गालगागा गालगागा गालगागा गालगा असेच ना?