✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 01/05/2012 - 19:54  ·  लेख
लेख
लेखाधार - अनेकांकडून तिच्याबद्दल लिहिले गेलेले आठवणीवजा लेख. अलिकडेच केव्हातरी ठाण्याजवळच्या घोडबंदर रस्त्यावरून चाललो होतो. आता या घोडबंदर परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. लांबलचक रुंद रस्ता आणि आजुबाजूला मोठमोठे घरप्रकल्प आणि सर्वत्र सिमेन्टचं जंगल. परंतु एकेकाळी मात्र इथे अगदी भरपूर वनश्री होती, झाडंझुडपं होती. सर्व परिसरच अत्यंत रमणीय होता. गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस ५५ चित्रपटाचं काम सुरू होतं आणि गुरुदत्तने चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी याच रमणीय परिसराची निवड केली होती. चित्रपटाचे संवादलेखक अब्रार अल्वीही सोबत होते. वास्तविक चित्रिकरणाच्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं परंतु केवळ गुरुदत्तच्या आग्रहाखातर ते ऐन उन्हाळा असूनही सोबत आले होते. चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी एक छानसी हवेशीर सावली पाहून एका झाडाखाली निवांत बैठक मारली. एकिकडे चित्रिकरणाची लगबग सुरू होती तेवढ्यात 'ती' अल्वींच्या शेजारी आली आणि 'अरे वा! यहा बैठे हो आरामसे, आपके तो मजे है..' असं म्हणत तिनेही त्यांच्या शेजारीच मस्त बैठक मारली. मनमोकळं, निरागस, अल्लड, जीव खलास करणारं हास्य, मोहक अदा....! मूर्तीमंत सौंदर्यच अल्वींच्या शेजारी काही क्षण विसावलं होतं! काही दिवसांपूर्वी अल्वींची ही आठवण वाचनात आली होती. मालाडला बाँबे टॉकिजच्या लगतची झोपडपट्टी. तिथे अताउल्लाखान नावाचा एक पठाण राहायला आला होता. सोबत त्याच्या बायकोचा व ८-९ पोरांचा कुटुंबकबिला. त्यापैकीच एक बेबी मुमताज. बेबी मुमताज दिसायला सुरेख, वागण्याबोलण्यात चांगलीच चंट आणि हुशार. गायचीही आवड. बेकार असलेल्या अताउल्लाखानने लेकीचं नशीब आजमावण्याकरता आणि त्यायोगे उत्पन्नाची काही सोय होते का ते पाहायला बेबी मुमताजला शेजारीच असलेल्या बाँबे टॉकिजात नेलं. तिथं त्यांची गाठ पडली बाँबे टॉकिजचे अध्वर्यू हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्याशी. त्यांनी पाहताचक्षणी बेबी मुमताजला पसंद केलं आणि लगोलग तिचं 'बसंत' ह्या चित्रपटातून भारतीय रजतपटावर पहिलावहिलं आगमन झालं. ८-१० वर्षाच्या एका मोहक चिमुरडीनं रंगमंचावरून 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' हे गाणं गायलं आणि गाण्यानंतर 'आप लोग कल आईये तो और सुनाउंगी गाना..' असं म्हणत चटकन एक छानशी अर्धगिरकी घेऊन मागे वळली. ती तिची पहिली मोहक अदा..! ते वर्ष होतं १९४२. तेव्हापासून प्रवास सुरू झाला एका निस्सीम मनमोहक सौंदर्याचा. प्रवास सुरू झाला एका जीवघेण्या मोहक हास्याचा, प्रवास सुरू झाला मधाळतेचा अन् मादकतेचा.. 'प्रेम' या संकल्पनेवरच जिनं जिवापाड प्रेम केलं अशा एका शापित यक्षिणीचा प्रवास सुरू झाला. देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं आणि.... Venus of Indian Cinema चा उदय झाला..! अत्यंत प्रतिभाशाली अन् नैसर्गिक अभिनय क्षमता, लहान वयापासूनच असलेला विलक्षण आत्मविश्वास, जगाला वेड लावणारं हास्य - कधी स्मितं तर कधी अल्लड खळखळणारं, आणि सार्‍या विश्वात एकमेवाद्वितीय ठरावं असं सौंदर्य.. या सगळ्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे ती..! १४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिन. सारी दुनिया तो दिवस 'प्रेमदिन' म्हणून साजरा करते.. माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..! एव्हाना मालाडच्या झोपडीतून तिचं कुटुंब पेडररोडवरच्या अपमार्केट मध्ये राहायला आलं होतं. एकाच वेळेला अनेकानेक चित्रपटांचं चित्रिकरण सुरू झालं होतं आणि सुरेन्द्र, सप्रू, सुरेश इत्यादींपासून ते अशोककुमार, देवसाब, आरके यासारख्या नामवंतांसोबत ती अगदी लीलया सराईतपणे आपला ठसा उमटवीत होती. परंतु लहान वयापासूनच चित्रपटात काम सुरू केल्यामुळे फॉर्मल शिक्षण म्हणून जे असतं ते तिच्याजवळ नव्हतं. त्यामुळे डॉ सुशिलाराणी पटेल यांच्याकडे संभाषणात्मक इंग्रजीचे धडे गिरवायला तिने सुरवात केली.. बाबुराव पटेल हे 'फिल्म इंडिया' या पहिल्या सिमेमासिकाचे संपादक तसंच सिनेदिगदर्शक. त्यांच्या पत्नी डॉ सुशिलाराणी पटेल याही लेखक, अभिनेत्री तसंच पत्रकारही. या पटेल दाम्पत्याचा तिच्यावर विलक्षण लोभ.. सुशिलाराणींनी आठवण सांगितली होती - 'त्या काळात रोज संध्याकाळी चित्रिकरण संपलं की तेवढ्याच उत्साहाने ती आमच्या घरी यायची. जेवढी सुरेख-मोहक, तेवढीच अल्लड आणि निष्पाप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. घरच्या गरिबीपायी फॉर्मल शिक्षण नव्हतं परंतु बुद्धीमत्ता होतीच. त्यामुळेच ती माझ्याकडे अवघ्या ३ महिन्यात अगदी उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. बर्‍याचदा तिचं आमच्याकडे खाणं-पिणंही व्हायचं.. त्यातून ' गरमागरम पकोडे' हे तिचे विशेष लाडके! :) ती जेव्हा अगदी प्रथम त्यांच्या घरी आली तेव्हा सुशिलाराणींनी लिहून ठेवलं आहे - "She was wearing no make up. Her dazzling smile and lovely olive complexion required no artificial help. She was well built and complete natural..!" असो.. तूर्तास थोडा हळवा झालो आहे म्हणून इथेच थांबतो. साक्षात कर्दनकाळ असलेल्या बापालाही 'नो रिग्रेटस्' असं म्हणून माफ करणारा तिचा स्वभाव, तिची दानशूरता, तिचं आणि दिलिपकुमारचं प्रेमप्रकरण, तिचं आणि किशोरदाचं बस्तान न बसलेलं लग्न, सार्‍या दुनियेची हृदयं काबीज करणारी ती, परंतु तिचा स्वत:चा मात्र जीवघेणा हृदयरोग आणि त्यानंतरचं भयानक एकाकीपण व त्यातच तिचं अकाली जाणं...! अजून खूप काही लिहिन म्हणतो. जमेल की नाही ते सांगता येणार नाही..! 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' या गाण्याचा उल्लेख वर केला आहे. याच गाण्याच्या काही ओळी आहेत, 'छोटी सी दुनिया की छोटी छोटी बाते, छोटे छोटे दिन और छोटी छोटी राते.. छोटी उमरिया रे.." कसा योगायोग असतो पाहा.. 'छोटी उमरिया रे..' असं म्हणून ते कडवं संपतं. पण तीच ओळ तिच्याबाबतीतही 'छोटी उमरिया रे..' म्हणून खरी ठरते आणि मुमताज जहान बेगम दहलवी अवघ्या ३६ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेते..! (पुढील भाग सवडीने) -- तात्या अभ्यंकर.
  • इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - २)
  • इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - ३)

Book traversal links for इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

  • ‹ गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating
  • Up
  • इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - २) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
10785 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

पुढील वाचकांस जास्त ताटकळत

मेघवेडा
गुरुवार, 01/05/2012 - 20:18 नवीन
:( पुढील भागांकरिता वाचकांस जास्त ताटकळत ठेवू नये ही विनंती. लवकर लिहा प्लीज.
  • Log in or register to post comments

.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/05/2012 - 20:10 नवीन
.
  • Log in or register to post comments

+१

मन१
गुरुवार, 01/05/2012 - 21:59 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

या स्वर्गीय सौंदर्या बद्दल

गणपा
गुरुवार, 01/05/2012 - 20:11 नवीन
या स्वर्गीय सौंदर्या बद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल तात्या. पुढचा भाग टाकायचे जमवाच.
  • Log in or register to post comments

+१११

मनराव
Fri, 01/06/2012 - 15:42 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पुढील भाग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/05/2012 - 20:14 नवीन
तात्या, पुढील भाग लवकर टाका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाचून वाईट वाटलं. आपली

रेवती
गुरुवार, 01/05/2012 - 20:29 नवीन
वाचून वाईट वाटलं. आपली लेखनशैली छान.
  • Log in or register to post comments

बेगम मुमताज जहान ने लोकाना बे

विजुभाऊ
गुरुवार, 01/05/2012 - 20:33 नवीन
बेगम मुमताज जहान ने लोकाना बे गम केले. तिच्या चेहेर्‍यावरचे खट्याळ हसू कोणीच विसरणार नाही
  • Log in or register to post comments

:(

अन्या दातार
गुरुवार, 01/05/2012 - 21:15 नवीन
लवकरात लवकर लिहा पुढचा भाग. (मुमताज दहलवी प्रेमी) अन्या
  • Log in or register to post comments

मधुबाला एक प्रसन्न निखळ

गणेशा
गुरुवार, 01/05/2012 - 21:27 नवीन
मधुबाला एक प्रसन्न निखळ सदाबहार व्यक्तिमत्व .. लेखन आवडले.. हळवे करणारे असले तरी हळवे न होता लिहा अशी विनंती
  • Log in or register to post comments

सगळ्यांप्रमाणेच मीही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 21:30 नवीन
सगळ्यांप्रमाणेच मीही म्हणतो--पुढचा भागतर लवकर येऊद्याच..पण असेच अजून लेखही येत राहू द्या...!
  • Log in or register to post comments

मधुबाला

तिमा
गुरुवार, 01/05/2012 - 21:32 नवीन
हे नांव इतके परिचयाचे आहे की तिचे खरे नांव सुद्धा लिहावेसे वाटत नाही. तिचे सौंदर्य तर अवर्णनीयच, पण तिचा खट्याळपणा, नजरेतली बुद्धिमत्ता ही सुद्धा मोहून टाकणारी होती. तात्या, तुम्ही तर आमच्या काळजाला हात घातलाय.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय..

कौशी
गुरुवार, 01/05/2012 - 23:25 नवीन
पुढचा भाग लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

मधुबाला म्हणजे मुर्तीमंत

किसन शिंदे
Fri, 01/06/2012 - 12:16 नवीन
मधुबाला म्हणजे मुर्तीमंत सौंदर्य!! पुढचा भाग येईल कि नाही सांगता येणार नाही त्यामुळे तुर्तास या भागावरच समाधान मानून घेतो.
  • Log in or register to post comments

>>>देविकाराणीने त्या बेबी

मनराव
Fri, 01/06/2012 - 15:44 नवीन
>>>देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं <<< अगदी सुयोग्य नाव ठेवलं त्यांनी.....
  • Log in or register to post comments

सुरेख. पुढील भाग लवकर लिहा,

यशोधरा
Fri, 01/06/2012 - 16:07 नवीन
सुरेख. पुढील भाग लवकर लिहा, ही विनंती.
  • Log in or register to post comments

.........

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/06/2012 - 16:20 नवीन
..............
माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..!
+१००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments

भारतात सर्वत्र साजरा होईल

विसोबा खेचर
Fri, 01/06/2012 - 17:04 नवीन
भारतात सर्वत्र साजरा होईल तेव्हा होईल, परंतु निदान मिपावर तरी तो तसा साजरा व्हावा अशी इच्छा आहे. दर १४ फेब्रुवारी रोजी मिपाच्या मुखपृष्ठावर तिचं एखादं छानसं चित्र लावून, आज १४ फेब्रुवारी. मधुबालाचा वाढदिवस. त्या निमित्ताने मिपा परिवार 'बावनखणी-सौंदर्य दिन' साजरा करत आहे..! असं शीर्षक द्यावं... खरं तर माझ्याच कारकिर्दीत मला हे करायचं होतं, पण राहून गेलं... असो.. मी स्वत: हे नीलकांताला कळवीनच, परंतु आपणही सर्वांनी असे विनंतीवजा व्य नि नीलकांताला पाठवावेत ही विनंती.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

खुपच सुरेख. पुढचा भाग लवकर

जागु
Fri, 01/06/2012 - 16:28 नवीन
खुपच सुरेख. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा