हांडवो (बेक्ड्)

गणपा's picture
गणपा in पाककृती
2 Oct 2011 - 4:40 pm

साहित्यः

१ वाटी तांदुळ.
१/४ वाटी चणा डाळ.
१/४ वाटी मुग डाळ.
१/४ वाटी तुर डाळ.
१/२ वाटी उडिद डाळ.
१/२ वाटी दही. (आंबट असल्यास उत्तम.)

दुधी किसलेला. (पाणी काढुन.)
कोबी बारीक चिरुन.
(तुमच्या आवडी नुसार गाजर आणि अन्य भाज्या सुद्धा चालतील.)

१ ते दिड इंच आलं.
२-४ हिरव्या मिरच्या.

१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
साखर-मीठ चवीनुसार.

फोडणीसाठी :
तेल, राई, तिळ, हिंग.

कृती:

तांदुळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवाव्या.
आल मिरची, भिजवलेले तांदुळ आणि डाळी थोड्या भरड वाटुन घ्याव्या. (ईडलीच्या पिठापेक्षा किंचीत दाट.)
दही टाकुन मिश्रण ढवळुन घ्याव.
उबदार ठिकाणी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवाव.

मीठ, साखर, हळद, लाल तिखट, किसलेला दुधी आणि कोबी टाकुन मिश्रण चांगल एकत्र करुन घ्याव.

राई, तिळ, हिंग टाकुन फोडणी करावी. आणि त्यातली १/२ ह्या मिश्रणात टाकावी.

बेकिंगच्या भांड्याला तेला/तुपाचा हात लावुन घ्यावा. आणि हे मिश्रण त्यात ओताव. (साधारण १.५ ते २ इंच जाडीचा थर ठेवावा.)
राहिलेल्या फोडणीत १/४ चमचा लाल तिखट टाकुन ती वरुन टाकावी.

ओव्हन १८० ते २०० °C वर ठेवुन त्यात हा हांडवो ३० ते ४० मिनिटे बेक करावा.

ओव्हन नसल्यास नॉन्स्टीकच्या फ्राइंगपॅनमध्ये मंद आचेवर १५ मिनिटे शिजवाव. आणि मग उलटुन परत १५ मिनिटे शिजवाव.
बेक करायचा नसल्यास ढोकळ्या प्रमाणे उकडूनही करता येतो. (पण चवीत फरक पडतो.)

चटणीसोबत वा दुपारच्या वाफाळत्या चहासोबत हांडवोचा आस्वाद घ्यावा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Oct 2011 - 4:42 pm | पैसा

हे मी नक्की करून खाऊ शकेन.

पैसातै सारखंच म्हणते मी.. थोडा बदल..

मी हे नक्कीच नवर्‍याकडून करवून घेऊ शकेन :P

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2011 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते

पैसाने हे करावे किंवा मितानच्या नवर्‍याने... मला मात्र बोलवावे... मग खाता खाता गणपाचा गेम कसा करावा त्याचा प्ल्यान करू! कसें?

विलासराव's picture

2 Oct 2011 - 5:37 pm | विलासराव

गणपाचा गेम करायलाच हवा आता.

काय रे हे अभद्र ? गणपाचा गेम केला तर पुढच्या पाकृ चे काय ? त्याची जागा घ्यायला तुमच्या डोक्यात फिट्ट आहे का कोणी नविन मेंबर ? का तुम्हाला तरी असा स्वयंपाक करता येतो ?

पाषाणभेद's picture

3 Oct 2011 - 8:47 am | पाषाणभेद

गणपा सोन्याची कोंबडी आहे. त्या कोंबडीचे चिकन करून कसे चालेल?

ब्रेकिंग न्यूजः

सूत्रोंसे अभी अभी मिली खबर के अनुसार मिपा सदस्य गणपा जो बहोत अच्छे बावर्ची माने जाते है वो असल में एक 'सोने की मुर्गी' है| अधिक जानकारी के लिए आप पाभे से संपर्क करे| ;)

@ गणपा,

एक शिक्का बनवून घेतोय. 'मस्त मस्त पाकृ, तोंपासु' असा. तुम्हा चार दोन लोकांच्या पाकॄ आल्या की मारायचा शिक्का. बास्स!

स्मिता.'s picture

3 Oct 2011 - 2:14 pm | स्मिता.

गणपाचा गेम केला तर पुढच्या पाकृ चे काय ?
असेच म्हणते. खाली पाभेंनी म्हटल्याप्रमाणे गणपा ही 'सोन्याचे अंडे देणारी कोंबडी' आहे.
हां... बिका... सॉरी सॉरी... श्री. बिपिन कार्यकर्ते ही जबाबदारी घेणार असतील तर आपली काही हरकत नाही.

@गणपा: पाकृ छानच, हे सांगायलाच हवे का?

निवेदिता-ताई's picture

2 Oct 2011 - 6:34 pm | निवेदिता-ताई

मस्तच रे.............:)

खूप आवडला हा प्रकार..

गंपा, छान समजावून सांगितलीस कृती!
फोटू छान आलाय.
यावेळेस प्लेटेतल्या साहित्यात काही वस्तू कमी वाटतायत का?;)
हा हांडवो वरून थोडा कडक असेलही पण आतून मऊ होता की नाही?
मी आतापर्यंत जे दोन तीन प्रकार खाल्ले ते खाताना घशात कोरडे वाटले म्हणून त्यातला इंटरेस्ट कमी झाला होता.
मला हवी असलेली कृती दिल्याबद्दल यावेळेस गंपाला माफ करण्यात आलेले आहे.

यावेळेस प्लेटेतल्या साहित्यात काही वस्तू कमी वाटतायत का?Wink

आमचाबी गोंधळ, घाई गडबड होतो अधे-मध्ये. ;)

हा हांडवो वरून थोडा कडक असेलही पण आतून मऊ होता की नाही?

अगदी. वरुन मस्त क्रिस्पी. आतुन हलका फुलका. :)

मला हवी असलेली कृती दिल्याबद्दल यावेळेस गंपाला माफ करण्यात आलेले आहे.

माफ केल्या बद्दल धन्स. ;)

जाई.'s picture

2 Oct 2011 - 8:07 pm | जाई.

छान

सोपी आहे पाककृती

मदनबाण's picture

2 Oct 2011 - 8:17 pm | मदनबाण

लयं भारी ! :)

सोना-शार्वील's picture

2 Oct 2011 - 8:26 pm | सोना-शार्वील

एकदम छान,आणी प्रेझेन्टेशन पण

सोना

पांथस्थ's picture

2 Oct 2011 - 8:26 pm | पांथस्थ

मस्त आहे हांडवो. करुन पाहिलाच पाहिजे...

प्रास's picture

2 Oct 2011 - 10:13 pm | प्रास

गणपाभौ,

आता ओव्हन घ्यायला बाजारात जाणं आलं..... ;-)

हांडवो आवडीने हादडायला आवडेल.

:-)

सुहास झेले's picture

2 Oct 2011 - 10:13 pm | सुहास झेले

तुझी सुपारी देतोय.... उचलून आणतो तुला मुंबईत ;-) :) :)

स्वाती२'s picture

2 Oct 2011 - 11:36 pm | स्वाती२

मस्त!

शाहिर's picture

2 Oct 2011 - 11:41 pm | शाहिर

छान ...

अवांतर : ही पा कृ चिकन किंवा अंडे घालुन कशी करता येइल :)

मी हा प्रकार कधीच खाल्ला नाहिये. पण दिसायला तरी चांगला वाटतोय. एकद करुन बघितला पाहिजे. :)

सन्जोप राव's picture

3 Oct 2011 - 5:56 am | सन्जोप राव

हांडवोची पाककृती आवडली.
गणपा, राई हा शब्द वापरत जाऊ नका. मराठीत 'मोहरी' हा उत्तम शब्द आहे.

चित्रा's picture

3 Oct 2011 - 9:09 am | चित्रा

हिंदी शब्द म्हणून आलेला नसावा. राई हा शब्द काही मराठी जातींमध्येही वापरला जातो असा माझा समज आहे.
उदा. माझ्याकडे रसचंद्रिका म्हणून माझ्या आजीने आईला दिलेले पुस्तक आहे. त्यात पदार्थास राई-निंबड्याची फोडणी द्यावी असे सर्रास म्हटले आहे. सारस्वत महिला समाजाने काढलेले हे पुस्तक ६० सालचे तरी निदान असावे (कदाचित त्याहूनही जुने असावे). लेखिका मला वाटते अंबाबाई संशी.

बाकी पाककृती छान.

विजुभाऊ's picture

3 Oct 2011 - 1:13 pm | विजुभाऊ

चित्रा ताई " राई" हा शब्द तद्दन मराठीच आहे.
प्राध्यापक महोदयानी "राईचा पर्वत करणे" ही म्हण बहुतेक दुसर्‍या भाषेत ऐकलेली असावी.
असो.
हान्डवो या पदार्थाची अजून एक पाककृती या इथे http://misalpav.com/node/16518

ऋषिकेश's picture

3 Oct 2011 - 9:11 am | ऋषिकेश

पाककृती आवडलीच! गणपाला नमस्कार केलेल्या हातांचा परमनंट फोटो पाठवत आहे.. (उगाच दरवेळी तेच ते / तत्सम लिहितो.. पण नेहमी नवीन शब्द स्तुती करायला आणायचे कोठून :) )

बाकी सन्जोपराव,
राई हा 'सामान्य' शब्द आहे. हिंदीतील 'सरसों' साठी. त्यातील काळ्या सरसोंला आपल्याकडे 'मोहरी' म्हटले जाते. लाल सरसो, सफेद सरसों साठी मराठी नाव मला माहित नाहि. आपल्या बहुतांश पदार्थात सफेद राई वापरली जात नाही त्यामुळे राई ही लाल(सर) सरसोंसाठी (याचे दाणे जरा मोठे असतात) तर मोहरी ही काळ्या सरसोंसाठी वापरले जाते असे वाटते.

सुनील's picture

3 Oct 2011 - 10:50 am | सुनील

गणपा, राई हा शब्द वापरत जाऊ नका. मराठीत 'मोहरी' हा उत्तम शब्द आहे.

वर चित्रा आणि ऋषिकेश यांनी स्पष्टीकरण दिलेलेच आहे. ही काही उदाहरणे - राई हा शब्द मराठीतदेखिल वापरला जातो याची.

१) शाळेत शिकलेली एक कविता - खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या.
२) एक वाक्प्रचार - राईचा पर्वत करणे

पाकृ थोडी किचकट वाटते पण चवदार असावी. (कोणी आयती करून दिल्यास) खायला आवडेल!

गणपा's picture

3 Oct 2011 - 2:07 pm | गणपा

हांडवोची पाककृती आवडली.

धन्यवाद सन्जोप राव. :)

गणपा, राई हा शब्द वापरत जाऊ नका. मराठीत 'मोहरी' हा उत्तम शब्द आहे.

अगदी लहानपणा पासुन हा शब्दच कानावर पडत आलाय. त्यामुळे राई या शब्दाबद्दल जो आक्षेप घेतलाय त्या बद्दल अधिक जाणुन घ्यायला आवडेल. काही चुकत असल्यास सुधारणा करण्यास नक्कीच आवडेल. :)

सन्जोप राव's picture

3 Oct 2011 - 3:09 pm | सन्जोप राव

राई हा शब्द मराठी नाही असे मी माझ्या प्रतिसादात म्हटलेले नाही. मोहरी हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो म्हणून ही सूचना. बाकी दामुअण्णा मालवणकरादिकांनी माझ्या मराठी ज्ञानाचा राईचा पर्वत केलेला आहे, त्याकडे मी दुर्लक्ष करतो.

सानिकास्वप्निल's picture

3 Oct 2011 - 6:22 am | सानिकास्वप्निल

तोंपासू :)

पाषाणभेद's picture

3 Oct 2011 - 8:46 am | पाषाणभेद

हे चालेल पण सध्या नको. नवरात्रीचे उपास चालू आहेत.

कवितानागेश's picture

3 Oct 2011 - 12:08 pm | कवितानागेश

आता याच्यासाठी दही आंबट कसे काय करावे बाई??!

- सुग्रण माउ ;)

माऊताईंनी भले गंमत म्हणून प्रश्न विचारला असेल पण आमच्याकडे व्यवस्थित थंडी सुरु झाल्याने साधं दहीच १० तासांनी सेट होतय. तरी आत्ता रात्री लावून ठेवलेलं दही उद्या संध्याकाळी तरी आंबट होईल या आशेनं फ्रिजमध्ये टाकणार नाहिये. त्यानंतर मात्र हांडवो नक्की करणार.

माझी यायची वेळ चुकली की काय?? ;)

रेवती's picture

4 Oct 2011 - 8:37 pm | रेवती

पुन्हा ये की!

आता याच्यासाठी दही आंबट कसे काय करावे बाई??!
खरेच की आता इंडीया स्टोअर्स मध्ये आंबट दही शोधणे आले.

बाकी इतक्या चाम्गल्या पाककृतीवरच्या प्रतिसादात पदार्थाबद्दल बोलायचे सोडून एका राई एवढ्या शब्दाची नसलेली चूक दिसणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नोहे. असेच म्हणावे लागेल. त्यासाठी दिव्य दृष्टीच हवी.
हे असे नसलेले खडे शोधण्याचे काम दिव्य लोकच करु जाणे

सगळ्या रसिक खवय्यांचे आभार. :)

मृत्युन्जय's picture

3 Oct 2011 - 2:58 pm | मृत्युन्जय

मादक आहेत रे फोटो गणपा. उपास चालु आहेत रे. कुठे फेडशील ही पापे.

कच्ची कैरी's picture

3 Oct 2011 - 4:33 pm | कच्ची कैरी

व्वा !! दिल गार्डन गार्डन हो गया !!! एकदम झक्कास पाकृ.!!!!

प्रभो's picture

4 Oct 2011 - 1:24 am | प्रभो

मस्त रे...

ही खास गुजराथी पाककृती आहे. मला फार आवडतो हांडवो!!
एकदम रूचकर, आणि हेल्थी.. असा आहे हा प्रकार! पोटभरीचाही आहे.
आम्ही खूपदा एक दिवसाच्या सहलीला जाताना करून घेतो सोबत.

विसोबा खेचर's picture

4 Oct 2011 - 3:15 pm | विसोबा खेचर

नतमस्तक...!

इथून पुढे गणपाच्या पाकृंना वरील एकाच शब्दात कायमस्वरुपी प्रतिक्रिया द्यायची असे मी ठरवले आहे. एरवी कौतुकाचे सगळे शब्दच संपले माझ्याकडचे..! :)

तात्या.

जागु's picture

4 Oct 2011 - 11:34 pm | जागु

लय भारी.

मी-सौरभ's picture

6 Oct 2011 - 5:26 pm | मी-सौरभ

याची नॉन वेज आव्रुत्ती बनवा की :)

भलती भोळे's picture

3 Nov 2011 - 3:47 pm | भलती भोळे

फार छान व सोपा प्रकार आहे