नियमांस धरून... (१)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
28 May 2008 - 7:23 pm

एनडीटीव्ही आणि आयबीएनवर १७० अधिक ५२ असा आकडा आला तेव्हा माधवेंद्र सिन्हांच्या चेहऱ्यावर किंचीत स्मितरेषा उमटली. पण त्यांना पूर्ण खात्री नव्हती. नेमक्या याचवेळी आतमध्ये एसकेंकडचे म्हणजेच श्री कांत आचार्यांकडचे आकडे काय असतील, हे सांगणं मुश्कील होतं. आचार्यांचे कॉण्टॅक्ट्स ध्यानी घेता, ते वेगळे असण्याची शक्यता अधिक होती. शिवाय या दोन्ही चॅनल्सचा कल त्यांना पक्का ठाऊक होता. त्यामुळं त्यांनी एक सावध निर्णय घेतला. 'आजतक'कडे ते वळले. तिथं १६५ अधिक ५० असे आकडे होते. म्हणजेच येऊन - जाऊन ७ जागांचा फरक होता. क्षणभर त्यांनी काही विचार केला आणि त्यांची पावले आतल्या खोलीकडे वळली.
"या," आचार्यांनी त्यांचं स्वागत केलं. "काय म्हणतेय परिस्थिती?"
"आकडे स्पष्ट आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युवर न्यू रिस्पॉन्सिबिलिटी सर. अॅज ऑफ नाऊ वी आर क्लोज टू २२५. आणखी ७५ पर्यंतची जमवाजमव झाली की वी वुड बी सेफ अँड स्टेबल."
"आर यू शुअर?" आचार्यांचा हा प्रश्न केवळ खुंटी हलवून बळकट करून घेण्यासाठीच आहे, हे माधवेंद्रांना पक्कं ठाऊक होतं.
"शुअर. इव्हन इण्टिलिजन्स फिगर्स आर नॉट एनी डिफरण्ट. आपल्या अंदाजापेक्षा आपण कमी आहोत. पण या घडीला, गिव्हन द रिसोर्सेस अव्हेलेबल विथ चॅनल्स, हाच ट्रेंड चालू राहील, असं दिसतंय."
आचार्यांचा चेहरा खुलला. त्यांनी सकाळीच माधवेंद्रांना सांगून ठेवलं होतं. ज्या क्षणी आपण २२० च्या पुढं सरकतो आहोत, असा अंदाज येईल तेव्हा आपण मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी बसायचं. त्यासाठी यादी सुरू करा आणि आकड्यांवर लक्ष ठेवा, अशी त्यांची सूचना होती. आचार्यांनी या काळात इतर पक्षांशी बोलणं सुरू केलं असणारच हे माधवेंद्रांना ठाऊक होतंच. त्यामुळं त्यांनी केवळ आचार्यांकडं पाहिलं.
"येस, शुअर, वी कॅन स्टार्ट नाऊ." आचार्यांचा सूर आश्वासक होता. त्याअर्थी सरकार आपणच बनवतो आहोत याची त्यांना पक्की खात्री झाली आहे, हेही स्पष्ट झालं.
"थ्री एरियाज आय वॉण्ट यू टू फोकस. परराष्ट्र, अर्थ आणि वाणिज्य. या तिन्ही क्षेत्रात आपल्याला बरेच नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्या नेहमीच्या मंडळींचा फारसा उपयोग नाही. आय वॉण्ट प्रोफेशनल्स." आचार्यांनी चौकट समोर मांडली. त्या चौकटीतच माधवेंद्रांना नावं द्यावी लागणार होती.
"शुअर सर." ते म्हणाले आणि पुढच्याच क्षणी आचार्यांचा खमका आवाज आला.
"वेल, या तिन्ही बाबींमध्ये स्वातंत्र्यावेळी होती, तशीच परिस्थिती आत्ताही आहे. स्थित्यंतराचा उंबरठा. इतिहास आपल्याला शिकवतो, माधवेंद्र. परराष्ट्र हे आता मीच हाताळावं. कॉमर्स इज इम्पॉर्टण्ट, बट, तिथं अर्थ खात्याच्या धोरणांची चौकट असतेच. तेव्हा त्याचाही प्रश्न नाही... अॅण्ड यस, नो नीड टू सर मी. जस्ट कॉल एसके. वी आर वर्किंग ऑन अ डिफरण्ट लेव्हल नाऊ."
आचार्यांचं हे एक खास वैशिष्ट्य होतं. त्यांना ही अनौपचारिकता शोभायचीही. त्यांचा उल्लेख राजकीय वर्तुळात अत्यंत आदरानं आचार्य असाच व्हायचा. केवळ ते त्यांचं आडनाव होतं म्हणून नव्हे तर त्यांच्यातील स्थितप्रज्ञताही त्याला कारणीभूत होती. मुरलेले राजकारणी असल्यानं त्यांनी आपल्या कामकाजात व्यावसायिक स्तरही जपलेला होता. ते अर्थ मंत्री होते तेव्हा त्यांचा आणि माधवेंद्रांचा संबंध आला. तो पुढं दृढ होत गेला. माधवेंद्र नोकरशहा. पण त्यांची कामकाजाची ब्युरोक्रॅटिक न होणारी, व्यावसायिक पद्धत आचार्यांना आवडली आणि ते त्यांच्या आस्थापनेचा एक भाग होऊन गेले. देशाचं नेतृत्त्व करण्याची संधी समोर आली तेव्हा आचार्यांना मुत्सद्दी सल्लागार म्हणून आधी आठवण झाली ती माधवेंद्रांचीच.
परराष्ट्र आणि वाणिज्य या दोन खात्यांसाठी माधवेंद्रांना फारसं काही करावं लागलं नाही. आचार्यांच्या डोक्यात होती तीच नावं माधवेंद्रांनीही ठरवली होती. परराष्ट्र खातं स्वतः आचार्यांकडंच आणि वाणिज्य खातं दिग्वीजय चव्हाण यांच्याकडं जाणार हे निश्चित झालं. प्रश्न होता अर्थ खात्याचाच. माधवेंद्रांनी त्यांच्या मनातली नावं मांडली.
"लुक माधवेंद्र, पटेल, ठाकूर आणि सेन या तिन्ही नावांना माझा तसा आक्षेप नाही. पण..."
त्यांना मध्येच थांबवत माधवेंद्र म्हणाले, "तिघांनाही पॉलिटकल बॅकग्राऊंड नाही. एक तर नोकरशाही किंवा अभ्यासक. त्यामुळं..."
आता त्यांना तोडण्याची वेळ आचार्यांची होती.
"लॅक ऑफ पॉलिटिकल स्किल वुईल नॉट बी अ हॅंडिकॅप. इन फॅक्ट, मला तसंच कोणी तरी हवंय. हाऊएव्हर, ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांपुढं न झुकणारी हवी. कारण आपण जी पावलं उचलू त्यातून निर्माण होणारी ताकद ही त्या व्यक्तीमागं असेल. त्या जोरावर त्या संस्थांनाही काही गोष्टी ठणकावून सांगण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये हवी. तिनं तसं न करणं हे आपल्याला पॉलिटिकली महाग ठरू शकतं. तेव्हा अशा प्रसंगी तिच्यामध्ये नसलेल्या राजकीय कौशल्यांचा भाग आपण सांभाळून घेऊ. द फेलो शुड हॅव थ्रू अँड थ्रू अंडरस्टॅंडिंग ऑफ व्हॉट ईज हॅपनिंग हिअर, आऊटसाईड अँड व्हॉट वी नीड टू डू. ही शुड बी स्ट्रॉंग ऑन द फण्डामेण्टल्स ऑफ व्हॉट वी आर डुईंग."
"इन दॅट केस, सेन इज आऊट ऑफ क्वेश्चन. ही लॅक्स गट्स. ही इज अ मॅन ऑफ अॅक्शन, बट फाल्टर्स व्हेन द नीड ऑफ स्पिकींग आऊट अरायझेस. वी नीड अ मॅन हू इज मास्टर इन बोथ द एरियाज. पटेल अँड ठाकूर फिट द बील." माधवेंद्र म्हणाले.
"ठाकूर... नो. नॉट अॅट ऑल. रिझर्व्ह बॅंकेतील डोसियर अजून कुठं तरी असेल. नको. टॉक टू पटेल. हाऊएव्हर, हीज हँडिकॅप इज दॅट ही समटाईम्स टेण्ड्स टू बी टू ब्यूरोक्रॅटिक. असो, आपण पाहून घेऊ"
---
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन."
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही."
---
ईश्वरदास पटेलांनी अर्थ खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या दुसऱया वर्षात भविष्यातील महासत्ता असा देशाचा उल्लेख प्रथमच झाला . त्याचदिवशी संध्याकाळी राधाकृष्ण कर्णिक यांचा साठीनिमित्त पुण्यात सत्कार झाला. वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या चतुरस्र साहित्यिकाची साठी झोकातच झाली. बालगंधर्व रंगमंदीर ओसंडून वहात होतं. अनपेक्षितपणे आलेला हा श्रोतृसमुदाय संयोजकांना चकीत करून गेला. कर्णिकांचं कर्तृत्त्व मोठं होतं; मात्र गेल्या काही काळात एकूणच वाचन, ग्रंथव्यवहार याविषयी आलेल्या औदासिन्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला झालेली गर्दी विलक्षण ठरली होती. ऐनवेळी बालगंधर्वच्या पटांगणात क्लोज सर्किट टीव्हीची सोय करावी लागावी आणि कार्यक्रमानंतर तिथं होणाऱ्या नाटकाचा प्रयोग पाऊण तासानं लांबणीवर टाकावा लागावा यातच सारं काही यावं.
"भरून पावलो आज," कर्णिकांनी श्रोतृसमुदायाच्या काळजाला हात घालायला सुरवात केली. बदलता समाज, साहित्यात त्याच्या प्रतिबिंबांचा अभाव, एकीकडे समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला विपन्नता, आर्थिक-राजकीय धोरणांचा अटळ परिणाम अशा मुद्यांचे विवेचन करता करता त्यांनी 'विकास, विकास म्हणतोय तो नेमका कोणता' असा सवाल केला तेव्हा समोरच्या रांगातील उजव्या कोपऱ्यात अनेकांनी एकमेकांकडं अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं होतं. एका आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेमध्ये प्रदीर्घ काळ विश्लेषक म्हणूनही कर्णिकांची कारकीर्द गाजलेली होती. देशातील मिश्र अर्थव्यवस्था आणि या संस्थेच्या भूमिकेतीलच खुलेपणाचा आग्रह या वातावरणात त्यांनी मांडलेल्या काही भूमिका चर्चिल्याही गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सवाल त्या कोपऱ्यामध्ये हालचाल माजवून गेला यात नवल नव्हतं.
कर्णिक सत्काराच्या मुद्यावर आले. "खरं तर मी अशा कार्यक्रमांच्या विरोधात आहे. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरेंच्या फंदातही मी पडलो नाही. कारण अशावेळी माणूस आधी बोलतो, मग बडबडतो आणि नंतर बरळतो, असंच मला वाटत आलंय. पण आज नाईलाज झाला."
"साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतला तेव्हाही भावना इतक्या उचंबळून आल्या नव्हत्या. कदाचित, तेव्हाच्या तारूण्याचा तो जोश असावा. माझ्या नाटकांनी शतकांवर शतकं मारली तेव्हाही इतकं भरून आलं नव्हतं. त्यातही आपण हातखंडा नाटककार आहोत या 'अहं'चा भाग असावा. महाराष्ट्रभूषण घेतला तेव्हा मी या राज्यापुढं नतमस्तक झालो होतो, पण तुमच्या या भरभरून प्रतिसादानं आज त्याहीपलीकडे विनयाची भावना निर्माण झाली आहे," त्यांनी टेबलावर मांडलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या रांगांकडं आणि त्यापुढं खाली ठेवलेल्या हारांच्या राशीकडं हात केला. "यामागचं कारण उमजत नाहीये. माणसं आयुष्याच्या अखेरीला अधिक हळवी होतात असं म्हणतात. त्याचाच हा भाग आहे का?" कर्णिक क्षणभर थांबले. उजवीकडे कोपऱ्यात पहिल्या तीन-चार रांगांवर थोडी चुळबूळ झाली. हाती टिपणवह्या घेतलेले दोघं-तिघं तिथून उठून लगबगीनं दाराकडं निघाले.
कर्णिक बोलू लागले, "सांगता येणार नाही. पण हळवा झालोय खरा. मघा बरंच काही बोललो. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. निरोप घेतो." आणि कुणालाही काही कळण्याच्या आधीच ते माईकपासून दूर होऊन खुर्च्यांकडं वळले.
---
कर्णिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी 'जागतिक' या शीर्षकाच्या कादंबरीचा पहिला मसुदा हातावेगळा केला होता. कादंबरीचं बीज केव्हाचं डोक्यात रुजून बसलं होतं. पण निवृत्तीआधीच्या धावपळीत त्यांना तशी निवांत बैठक मिळाली नव्हती. निवृत्तीनंतर मात्र त्या बीजानं पुन्हा उसळी खाल्ली आणि त्यांनी हा विषय हातावेगळा करायचं ठरवलं. धोरणांमधील स्थित्यंतर, समाजजीवनात घडलेले बदल आणि त्याचे एकमेकांना कवेत घेऊ पाहणारे पण एकमेकांपासून निसटणारेही तरंग या कादंबरीतून टिपण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. या कादंबरीसंदर्भात आणखी एक वेगळेपण होतं. प्रथमच कर्णीक एखाद्या साहित्यकृतीसाठी अभ्यास करावयास म्हणून बाहेर पडले होते. देशाच्या निवडक वेगवेगळ्या भागांतील समाजजीवन जवळून पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. याआधी नोकरीनिमित्तानं त्यांनी केलेलं देशाटन एका विशिष्ट वर्तुळातलंच असल्यासारखं होतं. ती खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं त्यांच्या या ताज्या देशाटनाला कादंबरीच्या संदर्भासह महत्त्व होतं.
या सगळ्या सायासांमध्ये पोटदुखीकडं थोडं दुर्लक्षच झालं होतं. आणि अगदीच असह्य झालं तेव्हा त्यांनी डॉ. गोडबोल्यांचं हॉस्पिटल गाठलं. त्यालाही कमलताईंचा आग्रहच कारणीभूत होता.
"डायलिसीस करावंच लागेल. त्याला पर्याय नाही." डॉ. गोडबोल्यांनी उपचारांची योजना सांगितली तेव्हा कर्णिकांपुढं दुसरी काही निवड करण्याची संधी नव्हतीच. मूत्रपिंडं निकामी होत चालली होती. कमलताई सोबत होत्या. विश्वनाथ देसाईही होते. या दोघांनीही मान डोलावली आणि पुढं सरकण्याचा निर्णय झाला.
"इट इज नथिंग. किडनी शरिरात जे काम करेल ते आपण बाहेरून करून घेतो. टेक्नॉलॉजी हॅज अॅड्व्हान्स्ड सो मच दॅट धिस प्रोसिजर इज व्हेरी कॉमन अॅण्ड सेफ नाऊ. त्यामुळं काळजीचं कारण नाही."
"किती वेळेस करावं लागेल?" देसायांनी विचारलं.
"आय थिंक, गिव्हन द कंडिशन अॅज ऑफ नाऊ, महिन्यात एकदा पुरेसं आहे." गोडबोल्यांनी सांगितलं.
"खर्चाचं काय?" कमलताईंचा काळजीनं भरलेला सूर आला.
"अक्का, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. ती आम्ही करू." देसाई म्हणाले. स्वतः कर्णिकांनीही मान डोलावून पत्नीच्या खांद्यावर थोपटत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

(पूर्वार्ध)

कथाअनुभव