त्झुगझ्वांग - अर्थात बुडत्याचा पाय खोलात! - भाग १
बुद्धिबळाच्या पटावर काहीवेळा अशी स्थिती येते की खेळाडूने कोणतीही खेळी केली तरी डाव हारण्याकडेच वाटचाल होते. ह्या स्थितीतून डाव मागे फिरू शकत नाही! अशा स्थितीला त्झुगझ्वांग असे म्हटले जाते. (मूळ जर्मन असलेल्या शब्दाचा अर्थ 'चाल करण्याची अनिवार्यता' असा आहे.)
या लेखात आपण अशा दोन अतिशय प्रसिद्ध त्झुगझ्वांग डावांबद्दल माहिती माहिती करून घेणार आहोत.
एक मनोरंजक बाब अशी की दोन्ही डावात प्रसिद्ध खेळाडू एरॉन निम्झोविच याचा सहभाग आहे! पहिल्या डावात निम्झोविचने प्रसिद्ध जर्मन खेळाडू फ्रेडरिक सामिश ह्याच्याविरुद्ध त्झुगझ्वांग वापरून डाव जिंकला आहे तर दुसर्यात अलेखिन ह्या दिग्गजासमोर तो त्झुगझ्वांगलाच बळी पडला आहे!
फ्रेडरिक सामिश (पांढरा) वि एरॉन निम्झोविच (काळा) - राणीचा भारतीय बचाव - निम्झोविच वेरिएशन
डावाची सुरुवात राणीच्या भारतीय बचावाने झाली. (आकड्यांसमोर लिहिलेली पहिली खेळी पांढर्याची.)
1. d4 Nf6
2. c4 e6
3. Nf3 b6
4. g3 Bb7 पांढर्या कर्णात येऊ पाहणार्या उंटाला प्रतिस्पर्धी म्हणून निम्झोविचने त्याचाही उंट कर्णात बसवला
5. Bg2 Be7
6. Nc3 O-O किल्लेकोट करुन राजा सुरक्षित
7. O-O d5 डी५ ह्या खेळीने पटाच्या मध्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया पुढे नेली.
8. Ne5 c6 काळ्याने डी ५ मधल्या प्याद्याला जोर दिला.
9. cxd5 cxd5 ह्या खेळीचे विश्लेषण आवश्यक आहे. डावाच्या मध्यात तणाव निर्माण झालाय तो तसाच टिकवणे खरेतर पांढर्याच्या फायद्याचे आहे. परंतु सामिश प्याद्यांची मारामारी करतो. ह्याने दोन गोष्टी झाल्या. एकतर तणाव कमी झाला त्यामुळे काळ्याचे पटाच्या मध्यावरचे स्थान पक्के व्हायला मदत होईल आणि सी ४ ह्या घराचा उपयोग काळा पुढेमागे त्याचे ठाणे म्हणून करू शकतो.
10. Bf4 a6 वरती उल्लेख केलेले c4 ठाणे .a6 आणि.b5 ह्या खेळ्यांनी मजबूत करणे हा काळ्याचा उद्देश आहे
11. Rc1 b5
12. Qb3 Nc6 घोड्याची ही खेळी फसवी आहे. ए५ मार्गे सी४ असा प्रवास करुन घोडा मजबूत स्थितीत जाण्याची धमकी देतोय. काय होते ते बघा -
13. Nxc6 सामिश तो घोडा मारतो! पांढर्याचा उत्तम स्थितीत बसलेला घोडा एका अप्रगत काळ्या घोड्यासाठी खपला आणि डावाचं सारथ्य काळ्याकडे सरकलं! अशा खेळ्या त्यांचा परिणाम एकदम दाखवत नाहीत तर एखाद्या विषासारख्या हळूहळू भिनत जातात! Bxc6 काळ्याच्या उंटाने घोडा मारला.
14. h3 Qd7 एच ३ ही उदासीन खेळी आहे. पांढर्याने डावाचे सुकाणू घेणे जरुरीचे आहे. त्याने मोहोर्यांची प्रगती करण्याऐवजी वेट अँड वॉच असा बचावात्मक खेळ केला. काळ्या वजिराने उंटाला जोर दिला आणि दोन्ही हत्ती समन्वयात आणले.
15. Kh2 Nh5 राजाची खेळी - पुन्हा एकदा पांढर्याची नकारात्मक खेळी. त्याचा फायदा घेत काळ्याने घोडा उंटावर घातला.
16. Bd2 काळा उंट मागे गेला. f5! पांढर्याच्या राजाकडची बाजू आता मोकळी झाली काळ्याने त्याचे प्यादे एफ५ असे पुढे सरकवत जागेचा ताबा घेतला!
17. Qd1 सामिशने वजीर मागे नेला, ई३ असे प्यदे खेळून पुढे आलेल्या घोड्याला मागे हटवणे हा उद्देश.
b4! घोड्यावर हल्ला. दोन उद्देश - घोडा मागे रेटणे आणि बी५ घरावरचा जोर हटवून आपल्या उंटाला ती जागा मिळवून देणे.
18. Nb1 घोडा हटला. बघा डावाची अवस्था, नकारात्मक खेळ्यांमुळे एकेक करुन पांढर्याची सगळी मोहोरी पहिल्या रांगेत येऊन बसली आहेत! Bb5 काळ्याच्या पांढर्या पट्टीतल्या उंटाने मोक्याची जागा धरली. आता पांढरा लागलीच ई३ खेळू शकत नाही कारण उंटाने एफ१ मधल्या हत्तीचा वेध घेतला जातोय!
19. Rg1 Bd6 पांढर्याने हत्ती हलवून ई प्याद्याच्या बढतीची वाट मोकळी करुन घेतली.
20. e4 प्यादे पुढे सरकले. आता काळा घोडा हलवायलाच लागणार तो एफ६ मधे मग इ५ खेळून काळ्या उंटावर आणि घोड्यावर एकदम हल्ला करायचा आणि दोन्हीपैकी एक मटकवायचे असा साधा सरळ प्लॅन आहे सामिशचा!
fxe4! निम्झोविचची आश्चर्यकारक खेळी. घोड्याचे बलिदान! उद्देश? येईलच लक्षात! ;)
21. Qxh5 वजिराने घोडा मटकावला. Rxf2 हत्तीने प्यादे मारले - आता फायदे बघा - घोड्याच्या बदल्यात दोन प्यादी मिळाली, पटाच्या मध्याचा ताबा मिळाला, सातव्या पट्टीत हत्ती घुसला!
22. Qg5 वजिराला परतीची वाट करुन देतोय पांढरा Raf8 डबल हत्ती! बुद्धीबळातले पोटेंट काँबिनेशन!!
23. Kh1 पुन्हा एकदा राजाची नकारात्मक खेळी R8f5 शांतपणे दुसरा हत्ती आत घुसला, पांढर्या वजिरावर हल्ला!!
24. Qe3 पांढर्या वजिराची माघार. Bd3 काळ्याचा उंट आणखीन आत सरकून बसला. घोड्यावर दाब. वजिराची घुसमट. हत्तींची कुचंबणा अशा त्रिविध तापात पांढरा हेलपाटलाय!!
25. Rce1 हत्ती हलवला. h6!! अत्यंत सुंदर खेळी - वेटिंग मूव. पांढर्याने डाव सोडला!!!
कारण स्थिती त्झुगझ्वांगची आहे.
पांढरा काहीही खेळला तरी डाव कोलमडतोय.
कसे ते पहा.
- पांढर्याने ए३ असे प्यादे पुढे टाकून घोड्याला वाट करुन द्यायचा बेत केला तर काळा ए५ खेळून त्या प्याद्याला जोर देतो. प्याद्याची मारामारी झाली तर घोड्याला पुढे यायची घरे पुन्हा बंद होतात!
- काळ्या पट्टीतला उंट सी१ मधे जाऊ शकत नाही कारण घोड्याचा जोर जातो आणि उंटाने घोडा पडतो.
- हत्ती ई पट्टी सोडून गेला की काळा हत्ती ई७ मधे येतो आणि आता पांढरा वजीर अडकला!
- राजाशेजारचा दुसर्या हत्तीला तर बिचार्याला एकमेव जागा आहे आणि ती सुद्धा पांढर्या पट्टीतल्या उंटाने धरली आहे!
- राजा Kh2 हलवला तर - R5f3 आणि वजीर अडकला. उंटाने हत्ती मारता येत नाही कारण तो पिन झालाय!
- जी४ असे प्यादे हलवले तरीही R5f3 आणि वजीर अडकला. उंटाने तो हत्ती मारला तर आरएच२ अशी मात!
हा डाव इथे संपूर्ण खेळून बघता येईल.
-(क्रमश: - पुढल्या भागात अलेखिनचा डाव!)
Book traversal links for त्झुगझ्वांग - अर्थात बुडत्याचा पाय खोलात! - भाग १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख! चाली नि त्यांचं
तुमच्या प्रतिक्रियेवरुन
पर्याय उपलब्धि....
त्झुगझ्वांग ही परीस्थिती जवळ जवळ डावाच्या शेवटी उद्भवते
छान वर्णन
चेसगेम्स डॉट कॉमवरील
>>ते अंक आणि रोअमन अक्षरांनी
मस्त वर्णन!
बेष्टं!
मस्त आहे, खेळुन पाहिले , मजा
काळ्याच्या पांढर्या पट्टीतल्या उंटाने....
मस्त विश्लेषण...