टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
डोझम्माचे बारसे
बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच!! वैताग यायचा अगदी!! इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...
... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच!! पुणेरीपणा कामी येतो तो असा!! ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल!! ते नंतर.
तर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय!! घरच्या जेवणाची खूप आठवण यायची! इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.
एव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता. लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खरं तर घर बघितल आणि एकदम आवडलच!! अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही!! पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता.
एके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत!! मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू!! मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या!! अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत!! हिला मराठी समजेल का??
तरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग? आणि चक्क आली की बया शेपटी हलवत!! मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर? पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार? सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया!! मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी! बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या. परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा?? काय पण लोक असतात!! असो.
आणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की!! तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर. अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.
आणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन!! भलतीच धमाल मग!! बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत!! दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने!! ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम! तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते!! इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त. पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती, मग तसेच साजरे नाव नको का? आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा!!
आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!
आहे की नाही गंम्मत??
आता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

जमला
भाग जमला म्हटल
(संत्राच्या बागेत रमणारा ) नितिन
मस्त !!!
डोझम्माची गोष्ट आणि लेखनही आवडले.
छान आहे...
लिखाण आवडले... डोझम्मा पण आवडली. अजून येऊ द्या.
डोझम्मा...
डोझम्मा, डोझी आणि डोझुलींचे फोटो टाकले असते तर जास्त मजा आली असती...
असो. लेख मस्त आणि सहज झाला आहे. अभिनंदन.
झकास.......
आवडलं बुवा आपल्याला........
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
बंगळुरुमधले कुत्रे ...
हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल
>>
पण थोडक्यात सांगायचे तर ..........
असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल
१ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर
२ कुत्रे
<<< दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत
मस्त ;)
असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल
१ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर
२ कुत्रे
माहितीपुर्ण प्रतिसाद !!!
दोन्ही
दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत
आवडले
पण....
१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
२.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही.
३.कुत्रा हा इमानदार असतो.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
नितीन,
नितीन, डॉक्टरसाहेब, बिपीन कार्यकर्ते, पेठकरकाका, मन, अभिरत तुम्हां सार्यांचे धन्यवाद लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल.
पेठकरकाका: तेह्वा फोटो काढायला जमलं नाही....
मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!!
अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! :<
अभिरतः खी, खी, खी....
छान..
डोझम्मा आवडली..लेख छान झाला आहे यशोधरा, आमच्या गच्चीमध्ये एका बदकीणीने अंडी घातली होती , त्याची आठवण झाली
स्वाती
छान..
आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!
डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!
आपला,
तात्यम्मा!
मस्तच
मस्त लिहीलीय गोष्ट...
डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!
असेच म्हणतो
छान आहे गोष्ट. आवडली.
आभार
आनंदयात्री, ऋचा धन्यवाद.
आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या??
तात्यम्मा, धन्यवाद
लवकरच..
यशोधरा,
तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात!
असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना...
आपला,
(रौशनीचा प्रेमी) तात्या.
हाहाहाहा
> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात!
हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे.
लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.
यशोधराताई,
यशोधराताई,
मस्तच...
ओहोहो.....क्या बात है!
छान जमलाय हाही लेख
बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला...
पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती !
अजुन येऊदे असंच:)
पु.ले.शु.