स्वगताच्या सांगतेची सुरुवात.

आज दुपार कशी शांत गेली. हे पण वाचत पडले होते.
कधी नव्हे ते आज्जीबाईंचे प्रश्न संपलेले दिसले.
फोनही वाजला नव्हता.
मला थोडा विचार करायला वेळ मिळाला खरा.
वारंवार मला एकच प्रश्न मला छळत होता.सगळं काही एवढं सुरळीत का बरं चाललंय ? तंटा नाही. वाद नाहीत.
छे!छे! हे वेलणकर नव्हेत.तो उसळून येणारा राग. हातवारे करून आपलं मत ठासून सांगणं.एखाद्या मुद्द्यावर तासंतास वाद घालून अचानक शरण येणं.दिवसदिवस धुमसत राहणं .सगळं काही इतिहास जमा झाल्यासरखं वाटत होतं.
गणित बरोबर आहे असं वाटत होतं पण ताळा जमत नव्हता बाई.हातचा एक चुकून विसरल्यासारखं वाटत होतं. येउन जाउन मन परत परत तिथंच घुटमळत होतं.
मग एक आयडीया आठवली.
गणित पुन्हा पायरी पायरी ने मांडा.
जिथं चूकलं नाही असं वाटत तिथेच शोधा.चूक नक्की सापडेल.
विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही .
===============================================================
अहो मॅडम उठा आता. बाई, चक्क पाच वाजले होते.
हे समोर उभे. हातात चहाचा कप. माझ्यासाठी की काय?
हे हसले.
अमेरीकेला जायची तयारी.तू बाळाकडे बघणार . ...
आमच्याकडे कोण बघणार ?.... मी आपली तयारी करतोय.
काय एक एक बदल होतायेत या माणसात.एकापाठोपाठ एक धक्केच देतायत.
आताशा मी बघतेय यांचा टारगटपणा वाढतच चाललाय.
काल रात्री मी म्हटलं
अहो होईल ना माझ्या हातून सगळं काही नीट.
जावयासमोर लाज नको जायला.
मलातर बाई टेंशन येतंय.
मला म्हणतात कसे .. ....
टेंशन कशाला ?
आय-पील आहे ना.
ला आधी काही कळलंच नाही.कळलं तेव्हा लाजून मेले गं.
===============================================================आज सकाळी बघते तो हे बसलेत सूर्या चॅनेल बघत.(पूर्वी रात्री गाणी बघायचे सूर्या चॅनेलवर.एकदा डोळे वटारून पाह्यलं तेव्हांपासून बंद.)
कायहो ?.........काय बघताय?..
म्हणतात कसे. बघतोय. समजते का बघू या जावयाची भाषा.
मी म्हटलं , अहो जावई आंध्राचा.तुम्ही बघताय तमीळ न्यूज.झालं नंतर तासभर तेलुगु चॅनेल शोधत बसले.
नंतर म्हणले आपली काशाची जुनी वाटी कुठाय?
झाली शोधाशोध सुरु
हे शोधणार. आज्जीबाई डायरेक्शन देणार.मी भाजी घेउन येईपर्यंत अर्धं किचन हॉलमध्ये.
ह्यांना चक्क हाकलं घराबाहेर .
मला म्हणाले औषधं आणून ठेवतो सगळी.ऐन वेळेवर धावपळ नको.
तासाभरानं आले ढीगभर औषधं घेऊन.
मी म्हटलं एवढी काय करायची हो औषधं?
सहा महिन्याची आणली.
अहो , जावई म्हणला सहा महिने तर खरोखर सहा महिने राहणार का काय?
चेहेरा लगेच गोरामोरा झाला. काहीच बोलले नाहीत.
मी पण थोडावेळ काही बोलली नाही. जावयाच नाव घेतलं आणि तुझी फार फार आठवण आली गं.
ह्यांना पण राहवेना. जुना आल्बम चाळत बसले.
===============================================================
बराचं वेळ झाला.काहीतरी लिहीत बसले होते.
अहो, काय लिहीताय?
जुनी वही दाखवली.चक्क पाळणे वाचत होते.नव्या वहीत कॉपी करत होते.
थोडया वेळानं गुणगुणायला लागले.
अंकी पित्याने घेतले तान्हे
आई आळवते अंगाई गाणे
विश्वाला रमवाया,अजूनी हा जागा राजस बाळ...
ह्यांचा आवाज अगदी सुरेल.थोड्या वेळाने दुसरा पाळणा.
नीज सख्या , सुकुमारा , जो जो राज कुमारा
निद्रा घे मन हारा.
आपल्याच नादात गात होते.
माझ्या मनात काहूर .
ह्यांना झालय तरी काय?
कुठेतरी गणित चुकतंय.कालपासून छळणारं मन आणखी आणखी बेचैन होत गेलं.
===============================================================
रात्री वेगळाच विषय.
मला म्हणाले तुला बाळाची ताळू तेलानी रोज भरायची आहे.जमेल ना?
मी म्हटलं तुम्ही आता व्हीसा पासपोर्ट सगळं बघा.बँकेचं काम करा.
आजीना वन्संकडे ठेवायचं की शशीधरकडे. तो विचार करा.
सकाळपासून बघतेय. काहीतरी भलतंच चाल्लय तुमचं
माझ्याकडे टकमक पहात राह्यले.काहीच बोलले नाहीत.
मन माझं परत परत वेड्यासारखं विचारायला लागलं.
काय झालय या माणसाला.
गणित सुटेना. टाळा जमेना.
================================================================
बेडरुम चा दरवाजा बंद करून हे माझ्या जवळ बसले.मला बाई राहवेना.
अहो, माझी शपथ. काही होतंय का तुम्हाला. तुम्हाला असं बघायची सवय नाही हो मला.
मला काही सुचत नाहीय्ये कालपासून. सांगा ना.
काही नाही गं .बघत्येस ना धावपळ चालल्येय ती.
बेडवर आडवे पडले.साईड टेबलवरच्या काशाच्या वाटीकडे बोट दाखवून म्हणाले,
टाळू भरण्याची प्रॅक्टीस कर.माझ्या डोक्यावर तेल घाल .बाळाच्या घालतात तसं
मी ह्यांच डोक मांडीवर घेतलं.चार थेंब डोक्यावर घातले. हळूहळू बोटानी तेल जीरवत राह्यले.
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले.
माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना.
हे शांत झोपले होते. छातीवर हाताची घडी.संथ लयीत श्वास.
माझा एकटेपणा मला सोसवेना झाला.एसिचा खर्जातला आवाज सोडला तर बाकी सारं शांत शांत.
मी हलक्या आवाजात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.
शिरो मे राघव पातु
राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.
यांच कपाळ .गोरा रंग. चौरस खांदे. निर्भीड छाती.
रामरक्षेतला राम माझाच.माझी भिती हळूहळू पळायला लागली.
मी यांच्या अंगावर पातळ चादर घातली.मला वाटलं आता रामाला माझीच नजर लागेल.बेडरुमचा नीळा मंद दिवा सुद्धा मला सहन होईना.मी हळूच उठून बंद केला.यांच्या छातीवर डोकं टेकून पडले. हे हसल्याचा मला भास झाला.पण मला आता राहवेना
मुझे अपनी शरण् में ले लो राम.
================================================================
सकाळी आजीनी स्वतःच चहा करून घेतला.पावणेसहाचा गजर झालाच नाही

क्रम चालू राहील.

+

+

शब्द थिटे.......

रामदासराव कित्ती सुंदर लिहिलय.
स्त्रीच मन इतक्या सरळ साध्या शब्दातं मांडलय की हे एका पुरुषाने लिहिलय यावर विश्वास बसत नाही, केवळ अप्रतीम.
३ - ४ पारायण केली.
या पुर्वीचे भागही वाचले होते. पण दाद द्यायची राहुन गेली.
हॅट्स ऑफ टु यु.

--गणपा

स्टाईल +१

तुमची स्टाईल मस्त आहे राव...
लिहा... शीर्षकही आवडले...
दोन प्रचंड वेगळ्या जॉनरवर ( पीसी जेसी आणि हे) एकाच वेळी लिहिताय्....क्रमशः...
मस्त.. तुमच्या मेंदूला चांगला व्यायाम आहे...
वाट पाहतोय....

( भडकमकर)

छान...

छान लिहिले आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुंदर

सुंदर लिहिलेय...

प्रशांत

एका स्त्रीच्या भावविश्वातली आंदोलने

इतक्या आरस्पानी पद्धतीने मांडली आहेत की बस्! फारच हुकुमत आहे तुमची अशा लेखनप्रकारावर (दिलिप प्रभावळकरांच्या 'अनुदिनीची' राहून राहून आठवण येते! Smile)
चतुरंग

सहमत..

रंगाशी सहमत..!

सुंदरच लिहिले आहे...

तात्या.