भूलनगरी
प्रस्तावना:- प्रस्तावना कसली? फुकट दोन-चार वाक्यांचा फूटेज.
खालील कथा उगीच मोठ्या अपेक्षा ठेवून वाचू नये. वाचकांची गाडी वाचतावाचता कथेसह ट्र्यॅकवरून घसरली तर लेखिका अपघाताला जबाबदार नाही. पद्यात कलाटणी म्हणून जो प्रकार असतो तो गद्यात लिहिणे कठिण असते अशी लेखिकेची सध्या समजूत झाली आहे. ही समजूत चुकीची आहे असे ज्यांना वाटते त्यांनी दिलखुलास सुचवण्या कराव्यात. लेखिका त्या एका कानाने ऐकून त्याच कानाने सोडून देईल किंवा मिसळपावावर संपादनाची सोय असल्याने मूळ कथाच संपादित करेल आणि स्वतःच्या नावावर खपवेल. (सर्वांनी ह. घ्या.)
सूर्यप्रकाशाची तिरिप डोळ्यांवर पडली तशी सीमाने डोळे किलकिले केले. सकाळ झाली आहे हे क्षणभर तिला कळलेच नाही. शेजारी रवी अजूनही ढाराढूर घोरत होता. ती गादीवर उठून बसली आणि बेडरूमच्या भिंतीकडे भकास नजरेने पाहू लागली. का कोणास ठाऊक, तिला थोडसं कलकल्यासारखं वाटलं. समोरच्या भिंतीवर लटकणारा त्यांच्या लग्नातला फोटो गायब होता. "अं?" मनाशी आश्वर्य करत सीमाने सभोवार नजर फिरवली. तिचे ड्रेसिंग टेबल, त्यावरील क्रिस्टलची फुलदाणी, तिच्याबाजूचा दोघांचा फोटो, उजव्या कोपर्यातलं कपाट, खिडकीला तिने लावलेले नवे सिल्कचे पडदे सगळेच नाहीसे झाले होते.
"आई गं!" तिच्या मस्तकात तीव्र कळ उठली तसा तिने हात कपाळावर नेला. कपाळावर रुपयाच्या नाण्याएवढं टेंगूळ आलं होतं. क्षणभर ती विचारात पडली आणि त्यानंतर तिने रवीला गदगदा हलवायला सुरुवात केली.
“उठ रवी! हे बघ काय आहे? आपण बघ कुठे आहोत? अरे उठ, आपण आपल्या घरात नाही आहोत. भलतीकडेच कुठेतरी आहोत.” रवी उठला तो डोकं गच्च धरूनच. "कशाला बोंबलते आहेस? आधीच डोकं जाम चढलंय माझं.” तो सीमावर डाफरला.
“चढेल नाहीतर काय? इतकं प्यायची गरज होती का पार्टीत काल? अरे पण बघ ना! आपण कुठे आहोत नक्की? हे आपलं घरंच नाहीये.” सीमाच्या नजरेत काळजी दिसत होती. रवीनेही खोलीवरून नजर फिरवली. त्याच्या ओळखीचे त्या खोलीत काहीच नव्हते पण खोली छान प्रशस्त होती. तो ताडकन उठला. त्याने आपल्या विस्कटलेल्या केसांतून बोटे फिरवली आणि खोलीतल्या खोलीत एक-दोन फेर्या मारल्या.
“ऑं! असं कसं झालं? कोणाच्या घरात आलो आहोत आपण?" सभोवार नजर फिरवून रवी म्हणाला, "काल रात्री कार तू चालवत होतीस. तूच कुठेतरी घेऊन आलीस. कोणाच्या घरात आहोत आपण? चल या खोलीच्या बाहेर पडू. घरात कोणी असेल त्यांना विचारू इथे कसे पोहोचलो ते.”
रवी आणि सीमाच्या एका मित्राने, मोहनने नुकतेच खंडाळ्याच्या जवळ एक फार्म हाऊस घेतलं होतं. काल त्याने सर्वांना पार्टी ठेवली होती. बरेच दिवसांनी मित्र-मित्र जमल्याने रवीने नेहमीपेक्षा थोडी जास्तच घेतली होती. रात्री गाडी चालवणं अशक्य झालं तसं सीमाने ड्रायविंग करण्याचं ठरलं. मोहनने आणि त्याच्या बायकोने; नीताने, रवी आणि सीमाला फार्म हाऊसवरच राहण्याचा आग्रहही केला होता. शनिवारची रात्र होती, दुसर्या दिवशी रविवार होता पण रवीला काही कामं निपटायची होती त्यामुळे परत येणं भाग होतं.
रवी आणि सीमा दोघे त्या खोलीच्या बाहेर पडले तसे त्यांना जाणवलं की त्यांची बेडरूम पहिल्या माळ्यावर होती. जिना उतरून खाली येताना रवीने मोठ्याने विचारलं, “अहो कोणी आहे का इथे? हलो!!” घरातली शांतता अजिबात बिघडली नाही. कोणी नव्हतंच बहुधा घरात. तळमजल्यावर लिविंगरुमला लागून स्वयंपाकघर दिसत होते. तिथे कोणी असेल तर म्हणून रवी आणि सीमा स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. यावेळेस सीमाने हाक दिली, “कोणी आहे का घरात? इथे कसे पोहोचलो आम्ही?” घर तरीही शांतच राहिले. त्या दोघांनी आणखी दोन चार हाका मारल्या पण घरातून कोणतीही हालचाल झाली नाही.
"मला वाटतं रवी की काहीतरी घोटाळा आहे. आपण स्वत:हून इथे आलो नाही, आपल्याला इथे कोणीतरी घेऊन आलं आहे.” सीमा हळूच म्हणाली.
“हो? मग तू आठव ना, तू ड्रायविंग करत होतीस. तुला आठवायला हवं की आपण इथे कसे आलो? आपल्याला इथे कोणी आणलं?.” उपहासाने रवी पुटपुटला.
“मी ड्रायविंग करत होते आणि तू मागच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरला होतास. मला इथे कसे आलो ते काही आठवतच नाही.” सीमा वैतागून म्हणाली.
“काल तू कोक पीत होतीस त्यात काही घातलं होतंस का गं हळूच!” रवीच्या चेहर्यावर मिश्किल झाक होती.
“मस्करी करू नकोस रे! मला ना जरा भीती वाटायला लागली आहे.”
“बरं! बरं! असं करू, मोहनला फोन करू. तो फार्महाऊसवरून येईल इथे आणि घेऊन जाईल आपल्याला.” असं म्हणून रवीने आपले खिसे चाचपडले. “अरेच्चा! माझा सेलफोन आणि पाकिट गाडीत राहिलं वाटतं”.
“गाडीत राहिलं की कोणी लंपास केलं?” सीमाचा चेहरा उतरला होता.
“लंपास करणारे माझ्या हाताचं रिस्टवॉच, तुझं मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी तसंच टाकून जातील का? ... बाहेर लिविंगरुममध्ये फोन आहे तिथून फोन करतो.”
रवीने बाहेरच्या खोलीत जाऊन फोन उचलला आणि कानाला लावला.फोनमधून डायलटोन येत नव्हता. त्याने वायर तपासली. वायर हवेत लोंबकळत होती. स्वयंपाकघराच्या दारात सीमा उभी होती तिला त्याने ती वायर दाखवली. “मेलाय हा फोन. कोणीतरी डिसकनेक्ट करून ठेवला आहे.”
“रवी इथून बाहेर पडूया. आपली गाडी आहे का बाहेर ते पाहू.” सीमा पुटपुटली.“अगं पण माझं डोकं जाम दुखतंय. थोडा चहा करतेस का? हे बघ! ज्याचं घर आहे त्याने घरात आपल्याला सुखरूप झोपायला दिलं तो आपण कपभर चहा प्यायला म्हणून काही म्हणणार नाही.”
सीमाने स्वयंपाकघरात वळली आणि तिने नाखुशीने फडताळातले शिस्तीत लावून ठेवलेले डबे उघडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व डबे रिकामे होते. सीमाने स्वयंपाकघरातली लाकडी कपाटे एक एक करून उघडायला सुरुवात केली परंतु ती कपाटे इतकी घट्ट बसली होती की तिच्याच्याने ती उघडेनात. “ए रवी! हे कपाट दे ना रे उघडून. त्यात खायला काही सापडते का ते पाहते.”
रवीनेही नेटाने प्रयत्न केला पण दार घट्ट बसले होते. त्याने असेल नसेल तो सर्व जोर काढून दार खेचलं तसा दाराचा नॉब त्याच्या हातात आला. “ऑं! हा काय प्रकार आहे? हे दार कोणीतरी घट्ट चिकटवून बंद केले आहे की काय?” रवी आश्चर्याने मागे सरकला. त्याने झटदिशी सीमाचा हात पकडला आणि तो तिच्या कानापाशी पुटपुटला, “इथून बाहेर जाऊया! काहीतरी घोटाळा दिसतो.” घाईतच ते दोघे घराबाहेर पडले.
सकाळचे १० वाजले असावेत. रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्याच्या दुतर्फा घरं होती, दुकानं होती मात्र कोठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. रवी आणि सीमाने नजर फिरवून सर्वत्र पाहिलं पण कोणतीही हालचाल त्यांच्या नजरेने टिपली नाही.
“सीमा! चल शेजारच्या घराची बेल वाजवूया. कोणीतरी असेल तर पाहू. विचारू काय प्रकार आहे तो.” रवीने सीमाचा हात धरून तिला ओढतच शेजारच्या घराकडे नेलं. दाराची बेल वाजवली तशी ती वाजल्याचा आवाजच आला नाही. त्याने दोन तीनदा जोरजोरात बेल दाबली पण ती वाजलीच नाही म्हणून वैतागून त्यांनी दरवाजा ठोठवला, पण आतून कोणतीही चाहूल लागली नाही तशी ती दोघं पुन्हा रस्त्यावर आली.
“ हे रे कुठे आलो भलतीकडे आपण? इथे सर्वत्र स्मशानशांतता आहे. मला भीती वाटायला लागली आहे. सगळी घरं कशी बंद दिसताहेत. त्यांत कोणीतरी लपून आपल्याला पाहात असेल तर? आपल्यावर पाळत ठेवून असेल तर?”
“घाबरतेस काय? मस्त कोवळं ऊन पडलंय. कोण खायला येतंय सकाळच्या वेळी? आपली कार असती तर बसून सरळ हायवेला लागलो असतो पण तुला आठवतच नाही कार कुठे गायब झाली ते.” रवीचा टोमणा सीमाला फारसा आवडला नसावा.
“रवी, मला वाटतं की काल आपण रस्ता चुकलो होतो. मी काल ड्राईव करत होते ना तेव्हा हायवेवर मध्येच रस्त्यावर दिवेच नव्हते. एकेठिकाणी मला रस्ता थोडा अरुंद झाल्यासारखा वाटला. ओळखीचा वाटत नव्हता, आणि मग नंतर काय झाले ते नाही आठवत.... तुला कित्तींदा सांगितलं की इतकी पित जाऊ नकोस. मला रात्रीबेरात्री गाडी चालवण्याची सवय नाही हे माहित होतं तुला.” सीमाने बोलता बोलता आवाज चढवला.
“मला आता कळेनासं झालंय की प्यायलं कोण होतं? मी प्यायलो होतो म्हणून मला आठवत नाही पण तुलाही कसं आठवत नाही की पुढे काय झालं ते? आर यू शुअर की तू एखादा पेग मारला नाहीस?”
“पुरे हं रवी! वाट्टेल ते विनोद करू नकोस.” सीमाने त्याला तिथेच तोडलं. “आता आपण काय करायचं ते सांग. या रस्त्यावरून सरळ चालत जाऊया. हाका मारूया लोकांना. सकाळची वेळ आहे. कामासाठी घरातून बाहेर पडणारी माणसं, शाळेला जाणारी पोरं तरी दिसायला हवी होती. रवी, आपण एखाद्या ग्रेव्हटाऊनमध्ये नाही ना आलो.”
“म्हणजे ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसं? गावातले सगळे मृत असतात आणि ते झोंबी का काय बनून जिवंत माणसांच्या मागे जातात...” रवीने दोन हात हवेत पसरले आणि सीमाकडे पाहून दात विचकले.
“प्लीज बी सिरिअस रवी! तुला काहीच वाटत नाहीये का रे? आपण कुठेतरी येऊन फसलोय हे नक्की. चल ना त्या समोरच्या दुकानात जाऊ. ते उघडलंय म्हणजे कोणीतरी असणार आत.”
ते दोघे दुकानासमोर उभे राहिले. दुकानात अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. त्यांनी बराचवेळ हाका मारल्या तरी कोणी बाहेर आले नाही. रवीने सीमाकडे पाहून डोळा मारला आणि दुकानात समोर ठेवलेला बिस्किटांचा पुडा हळूच आपल्या खिशात सरकवला. सीमाने रागाने त्याच्याकडे पाहिले तसे तो चटकन दुकानाबाहेर पडला. “हे काय केलंस?” सीमा मागोमाग येत खेकसली.
“अगं, काहीतरी पोटात नको का ढकलायला? बिस्किटं तर बिस्किटं!” म्हणत रवीने पुड्याचे वेष्टन फोडले आणि आ वासून तो पुड्याकडे पाहात राहिला. “अरेच्चा! पुडा चक्क रिकामा आहे की...असा रिकामा पुडा का ठेवला असावा त्या दुकानात?” रवीने डोळे विस्फारले आणि पुडा भिरकावून दिला. "विक्षिप्तच प्रकार आहे सगळा.” असे म्हणून तो रस्त्यावरून पुढे जाऊ लागला तसे सीमाने त्याला धावतच गाठले. रस्ता अद्यापही निर्मनुष्य होता.
“ए रवी तू एक पाहिलंस या ओसाडवाडीत पक्षांचा किलबिलाटही नाही, झाडंही किती तुरळक आहेत आणि कशी बावलेली, मृतवत दिसताहेत. एखादं भटकं कुत्रंही नाही.” सीमा पडेल आवाजात म्हणाली.
रवीलाही गावातला वेगळेपणा जाणवू लागला होता. सीमासारखं आपल्याला भिऊन चालणार नाही हे त्याला कळत होतं. त्याचं डोकं अजूनही ठणकत होतं. “थोडसं पाणी मिळेल तर बरं होईल, तहान लागली आहे.” त्याची नजर सभोवार फिरत होती. काही अंतराने रस्ता सोडून डावीकडे एक विहिर त्याच्या नजरेला पडली तसं दोघांनी विहिरीकडे जाणारा रस्ता पकडला. विहिरीवर आडाला बांधलेला पोहरा रवीने घाईघाईने आत सोडला.
’टण्ण!!’ आश्चर्याने रवीने विहिरीत डोकावून पाहिले. विहिर साफ सुकी होती. आत पाण्याचा टिपूसही नव्हता. पोहरा जोरात जमिनीवर आदळल्याचा आवाज झाला होता. रवीने भुवया आक्रसल्या, “सीमा, खरंच घोटाळा आहे काहीतरी इथे. विचित्रच गाव आहे. एकही सजीव गोष्ट दिसली नाही आपल्याला आतापर्यंत. काल आपला ऍक्सिडेंट झाला का गं? म्हणजे आपण मेलो असलो तर?”
“रवी अरे काहीतरीच काय बडबडतो आहेस?”
“काहीतरीच कसं? आपण मेलो असलो आणि हा नरक असला तर.... आपल्या पापांची शिक्षा अशाप्रकारे दिली असेल तर? अनंतापर्यंत आपण याच गावात राहायचं.. फक्त मी आणि तू.”
“पापांची शिक्षा? आपण कोणती पापं केली आहेत? आणि नरक काय असा असतो?” रवी चिडवतो आहे की गंभीर आहे ते न कळल्यानं सीमा तडकून म्हणाली, “हे बघ! मी इथे जास्त वेळ काढू शकत नाही. तू येतो आहेस ना? मी मुख्य रस्त्याने चालायला सुरुवात करणार आहे. गावाबाहेर हायवे मिळेल नाहीतर एखादा मोठा रस्ता. तिथे काही ट्रान्सपोर्ट मिळतो का पाहू.”
रवीने निमूटपणे तिच्याबरोबर चालायला सुरुवात केली तरी नजरेने तो सतत हालचाल शोधत होता. मुख्य रस्त्यावर दूरवर त्यांना एक देऊळ दिसले तसे रवीने चेहर्यावरच्या रेषा सरळ करत सीमाचे लक्ष देवळाकडे वेधले.
“आहा! सीमा, म्हणजे आपण नरकात नसणार. ते बघ देऊळ दिसतंय. त्यात पुजारी भेटतो का पाहू.” असं म्हणून रवीने पुन्हा सीमाचा हात पकडला आणि तिला ओढतच तो देवळाच्या दिशेने जाऊ लागला. देवळाच्या मोजक्या पायर्या चढून त्या दोघांनी चौथर्यावर प्रवेश केला. देवळातही शुकशुकाट होता. गाभार्याच्या दिशेने जात त्यांनी पुजार्याला हाका मारायला सुरुवात केली. कडक उन्हातून गाभार्यात प्रवेश केला तशी दोघांच्याही डोळ्यासमोर अंधारी आली. काही क्षणांनी डोळे किलकिले केल्यावर सीमाला देवळाचा गाभारा रिकामा दिसला. मूर्ती, समया, दिवे, कलश कशाकशाचाही त्या गर्भगृहात पत्ता नव्हता. भरला होता केवळ अंधार.
“हे काय अभद्र?” सीमा चित्कारली. हे एखादे मृतांचे गाव असावे अशी कल्पना गेला काही वेळ तिच्या डोक्यात घोळत होती ती खरीच असावी असे तिला पुन्हा एकदा वाटून गेले. धावतच ती बाहेर आली आणि देवळाच्या पायर्यांवर डोकं धरून बसली.
खांद्यावर रवीचा हात पडला तशी ती मुसमुसू लागली. “इथून बाहेर पडू रवी. आता इतर कुठे थांबायचं नाही, सरळ रस्त्याला लागूया. आपल्याला फसवून कोणीतरी इथे आणलं आहे. मगासपासून आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवून असल्यासारखं वाटतंय.”
“बरं चल!” रवीला प्रकरणातील गांभीर्याची कल्पना आली होती. त्याने सीमाला उठायला मदत केली. दोघांनी पुन्हा मुख्य रस्ता धरला. सूर्य डोक्यावर आग ओकायला लागला होता. किती चालायचं, कुठे जायचं, कसं जायचं या सर्व प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता पण एका जागी वाट बघत बसण्यापेक्षा कुठेतरी गेलेलं बरं असं म्हणून दोघे पावले ओढत निघाले. अदमासे अर्धा मैल चालणे झाले असावे. समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.
“सीमा पळ! ही एसटी आपल्याला पकडायलाच हवी.” असं म्हणत रवी वेड्यासारखा धावत सुटला आणि त्याच्यामागे सीमाही. एसटी मंदगतीने जात होती. रवीने चालत्या एसटीत झटकन उडी मारली आणि मागून येणार्या सीमासाठी हात पुढे केला, “हात दे!” असे म्हणून त्याने सीमालाही आत घेतले.
धापा टाकत दोघे दरवाजाशेजारच्या सीटवर कोसळले. “रवी! वाचलो रे, सुटलो एकदा या विचित्र जागेतून.” असं म्हणत सीमाने आपले डोके रवीच्या खांद्यावर टाकले. रवीनेही डोळे बंद करून आपले डोके सीमाच्या डोक्यावर टेकवले. क्षणभराने रवीने डोळे उघडले तसे एसटीत कोणीही चिटपाखरू नजरेस पडले नाही. एसटीचा वेग अचानक वाढल्यासारखा वाटला. सीमानेही डोळे उघडून इथेतिथे नजर फिरवली.
“सीमा, एसटीत कोणी नाहीये. फक्त आपण दोघेच!” रवी कुजबुजला. सीमाने हे अपेक्षितच असल्याच्या आविर्भावात फक्त मान डोलवली. तिचे आपल्याकडे फारसे लक्ष नसावं असं रवीला जाणवलं. ती आश्चर्याने खिडकीतून बाहेर पाहत होती. रवीने खिडकीबाहेर नजर टाकली आणि काहीच क्षणात त्याला काय घडतं आहे याचा अंदाज आला. एसटी त्या माळरानावर गोल गोल चकरा मारत होती. एकाच ठीकाणी!
“मी..मी पुढे जाऊन ड्रायव्हरला विचारतो की हे काय चाललय?” रवी पुन्हा कुजबुजला तसा सीमाने त्याचा हात घट्ट पकडला, “रवी! मला नाही वाटत आपली यातून सुटका आहे असं.” तिला हुंदका अनावर झाला.“वेडी का? समोर ड्रायव्हर दिसतो आहे. मी विचारतो त्याला.” म्हणून रवी जागेवरून उठला.“सांभाळून रे!” चालत्या एसटीत ताडताड पावलं टाकत रवी ड्रायव्हरच्या जवळ उभा राहिला. "थांबवा! ही एसटी थांबव इथेच नाहीतर..." सर्व त्राण एकवटून त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले... नाहीतर आपण काय करणार याची त्याला कल्पनाही नव्हती.
करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता.
“ओ सायेब! वरडताय कशापाय? काय जालं बोंबलायला? ह्ये घ्या थांबवली यश्टी!” त्याने उलटा आवाज काढला. रवी धडपडत उभा राहिला. सीमाही मागच्या सीटवरून धावत त्याच्यापाशी आली.“कुठे जाते आहे ही एसटी? कोणत्या गावाला?” सीमाने तोंड उघडले.
“कोन्त्या बी गावाला जात न्हाय. हितंच फेर्या मारती हाय.” ड्रायवरने आपले तंबाखू खाऊन पिवळे झालेले दात उचकटले.
“रवी, चल आपण उतरूया आधी.” सीमाने काकुळतीला येऊन म्हटले. रवी आपल्या पायांवर स्थिरस्थावर झाला होता, त्याने पुढे सरून ड्रायवरची बकोट पकडली, “साल्या! काय प्रकर आहे तो सांग नाहीतर देतो तुला सटकावून.” अचानक हल्ल्याने ड्रायवर जागीच सटपटला, “ओ सायेब! कालची उतरली न्हाय वाटतं, च्यामारी! या लोकास्नी मदत करा आनी यांचा मार बी खा.. तुमा सायब लोकांची तराच न्यारी.”
“आं!” रवीने त्याची बकोट सोडली, “कसली मदत?”
“कसली मदत काय इचारता राव? काल तुमी दोगं तर्र हून गाडी हाकत व्हता. या बाईंनी गाडी रस्ता सोडून आन्ली आनी झाडाला ठोकली. दोगंबी तितंच ढेर जालं व्हतं. मी आनि रफिकचाचानं पायल म्हून बरं! तुमा दोगांना आन गाडीला फार काय जालं नवतं पन आमच्या गाडीतून आनलं काल रातच्याला तुमाला हितं, आनी बंगलीत झोपवलं.”
“दोघंही तर्र होतो?” रवीने संशयाने सीमाकडे पाहिलं.
“नीता म्हणत होती की वाईन जुनी आहे, मुरलेली. थोडी चव बघ.” सीमा खजील होऊन म्हणाली.
“वा! आणि पिऊन तर्र झालो म्हणून शिव्या खायला मी,” रवी चरफडला.
एव्हाना रवी, सीमा आणि ड्रायवरचे त्रिकुट एसटीमधून खाली उतरले. “आणि आमची गाडी कुठे आहे?” रवीच्या आवाजातला संशय कायम होता.“हेडलाईट फुटलाना वं. रफिकचाचा रिपेअर करायला गेला हाय. सक्काळी धा वाजताच. यील थोड्यायेळानं. मग जा तुमी तुमच्या गावाला.”
“हं! आणि तुम्ही दोघे कोण? या गावातले वेताळ आणि संमंध?”
“आं!” ड्रायवरला काही समजलं नसावं, “मी चंदू. मी आनी रफिकचाचा हितलं केयरटेकर हाय.”
“केअरटेकर? साल्यानो या स्मशानालाही केअरटेकर लागतो होय.” रवीला अजूनही काहीतरी घोटाळा असल्यासारखे वाटले.
“ओ सायेब! शिव्या कशापाय देता? ह्ये समशान दिसतं का तुमाला?”
“नाही स्मशान नाही हे नंदनवन आहे. सकाळपासून गावात फिरून दमलो. एक जिवंत प्राणी नजरेला नाही आला. घरांत माणसं नाहीत, विहिर सुकी, दुकान रिकामं, देवळात देव नाही, या तुझ्या एसटीत प्रवासी नाहीत.” रवी घुश्श्यात म्हणाला.
“चला सायेब! चा पिऊ.” चंदूला हसण्याची उबळ आवरली नाही. “शामू शर्माच्या चित्रपटाचा स्येट हाय ह्यो. जंगी पिच्चर हाय म्हनतात. आक्खं गाव उबारलं हाय त्या शोलेतल्या रामगडवानी. गेला म्हयनाभर समदं हितंच व्हतं, दिवस रात शूटींग चाललं व्हतं. पन त्या हिरोचं आनी शामू सायबांच मधीच कायतरी बिनसलं बगा. गेले धा दिस शूटींग बंद व्हतं. आता समदं निस्तरलं म्हनतात. उंद्यापास्न शूर्टींग पुन्यांदा चालू व्हईल, म्हून काल खरेदीसाटी मी आन रफिकचाचा भायेर गेलो व्हतो. रातच्याला परत यीताना तुमची गाडी आमच्या फुडं, येकदम भन्नाट जात व्हती. धाडकन आपटली तशी आमी उतरलो आनि तुमा दोगांना भायेर काडलं आनि हितं आनलं. मला वाटलं दुपारपातुर उटनार न्हाय तुमी दोगं म्हून मी माजं काम करत व्हतो. या येश्टीची टेश्ट घ्यायची व्हती पर तुमी येवड्या गुश्श्यात याल आसं वाटलं न्हाय...”
रवीचा चेहरा गोरामोरा झाला होता. त्याने मान वळवून सीमाकडे पाहिले तशी तिने नजर खाली वळवली. रवीच्या चेहर्यावर स्मितरेषा उमटली, आता सर्व घोळ त्याच्या ध्यानात येत होता. त्याने चंदूच्या पाठीवर थाप मारली. “चंद्या! लेका चुकलो यार! तू आणि रफिकचाचा होता म्हणून आम्ही ठीकठाक आहोत. चल चहा पाज. डोकं अजून भणाणतंय आणि घशालाही कोरड पडलीये. जाम टरकलो होतो आम्ही.” असं म्हणत तो मागे वळला आणि त्याने आपला हात सीमाच्या खांद्यावर ठेवून तिला जवळ ओढलं. आपलं तोंड तिच्याजवळ नेऊन तो कुजबुजला,
“झेपत नसेल तर पिऊ नये माणसाने आणि प्यायली तरी गाडी कधीच चालवू नये. चल! तूर्तास चंदूच्या हातचा चहा पिऊ.”
********
मूळ कल्पना: कधीतरी फार पूर्वी पाहिलेल्या एका पाश्चात्य मालिकेवरून.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



मस्त
कलाटणी एकदम फिट्ट.
कथा आवडली
उत्कंठावर्धक झाली आहे. शेवटही जमला आहे.
मस्त
कथा आणि कलाटणी. रुपांतर चांगले झालेय.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
रुपांतर
तसं रुपांतरच आहे पण ही कधीतरी पाहिलेली मूळ कथा अगदी अमेरिकन वळणाने जाणारी विज्ञानकथा होती. म्हणजे परग्रहावरील माणसे-बिणसे.
मजा आली
माझी जरा जास्त झाली असल्याने ट्यूब लगेच पेटली नाही. नक्कीच मजा आली.
--------------------------------
अहो गुढवादी, आपला भाग्यांक ७ आहे का?
हा हा हा...
प्रियाली,
सही एकदम..! सुरूवातीला वाटलेच होते की शेवट गमतीदार असणार... पण छान झाली आहे कथा... खूप आवडली..
- प्राजु.
छान आहे.
मस्त कथा. शेवटपर्यंत उत्कंठा टिकून राहिली.
वाचताना मधे वाटले होते की बसमध्येही कोणी नसेल (बिनाचालक).
पण पूर्ण कथा वाचल्यावर मग वाटले चालकही नसता तर कथा उगीच लांबली असती.
मस्त! :)
मस्त टाईमपास कथा..
भूलनगरी, भुताटकी....! हम्म! म्हणजे इट सीम्स प्रियाली बॅक इन ऍक्शन!
तात्या.
लय भारी !
आवडली कथा.
जर त्या चंदू ने खूलासा केला नसता तर आमच्या -हदयाच्या ठोक्यांनी वेग घेतलाच होता !
झक्कास बरं का ! शेवट सहीच आहे.
मस्त
कथा वेगळ्या प्रकारची आहे आणि मस्तच खुलवली आहे.
----------------------------------------------------------------------
अवांतर :-
कलाटणी देणे अवघड असते हे मान्य असून देखिल एक दिलखुलास सुचवणी...
सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले. ह्या सारखे संदर्भ टाळले असते तरी कथा तितकीच उत्कंठावर्धक झाली असती पण मूळ कथेतच हे जसेच्या तसे असेल तर नाईलाज हे ही खरे.
बिनधास्त प्रियाली! :)
आपण दुसर्याच कोणत्या तरी घरात आहोत ही कल्पनाच इतकी भयानक आहे की असे झाल्यास हे सगळे विसरून त्याच घरात चहा वगैरे करण्यासाठी स्वयपाकघर धुंडाळणे म्हणजे (मला) जरा अतीच वाटले.
मला तरी ह्यात अतीच वगैरे काही वाटले नाही. कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं!
)
तात्या.
मच्छीचं जेवण
>>कथेतल्या सीमाच्या जागी जर आमची प्रियाली असती तर तिने फक्त चहाच काय, मस्तपैकी मच्छीचं जेवणबिवण बनवलं असतं!
)
तात्या, सीमाच काय तुमची साधना कोळीण असती तरी मच्छीचं जेवण बनवू शकली नसती हो.. फडताळाची सगळी दारं घट्ट बंद होती हे विसरलात काय??
)
कलाम साहेबांच्या केशरचने व्यतिरीक्त आता आपल्याला असहमतीसाठी आणखी एक पॉइंट मिळाला बघा
त्याचं असं आहे ;-)
मूळ कथेत अशा टाइपचा सीन होता असे आठवते. म्हणजे चहा बिहा भारतीयकरण झाले पण ते दोघे किचनचे ड्रॉवर्स उघडतात इ. इ. काय आहे की वाचकांना कथा असल्याने काहीतरी होणार अशी धास्ती आहे ती त्या दोघांना तोपर्यंत तेवढी नाही. ते प्रवास करत होते, कोणाच्यातरी घरात सुखरुप आहेत. घरही व्यवस्थित आहे. (म्हणजे भूतबंगला इ. नाही. मॉडर्न, प्रशस्त, सूर्यप्रकाशाने भरलेले) त्यामुळे खूप भीती त्यांच्या मनात नाही. आता या पुढची गोष्ट म्हणजे...
नवरा जर सकाळी उठून म्हणाला "ह्यँगओवर! चहा दे तरतरी येईल." तर बिचारी बायको कोणत्याही परिस्थितीत चहा देईल. दिवसभर चिडचिड, कटकट कोण ऐकणार?
काय आहे की वाचकांना सतत कथेतील रहस्य दाखवून देण्याचा प्रकार आहे. चिकटवलेले ड्रॉवर्स म्हणजे फक्त सेटसाठी बनवलेले, दुकानातले रिकामे पुडे - पेरिशेबल फूडमुळे तयार केलेली प्रॉपर्टी... यांतून वाचकांना हा चित्रपटाचा सेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न.
वास्तववादी विचार केला तर मात्र हे असे चहा करतील का? किंवा भली चांगली माणसं दुकानातून चोरी करतील का? हे प्रश्न स्वाभावीक आहेत. 
असो. दिलखुलास सुचवणीबद्दल खरंच आभार!
छान
मस्त कथा आणि नावही आवडले.
स्वाती
जबरद्स्त
अतिशय छान
(जवळ जवळ घाबरलेला) लबाड बोका
धमाल उत्कंठावर्धक कथा
आणखी विनोदी करून 'आवाज'बिवाजला पाठवता येईल.
मस्तच!
मस्त आहे गोष्ट
आवडली. राम गोपाल वर्माने आजवर सिनेमा कसा नाही बनवला यावर ?
- (शामू शर्मा) सर्किट
मस्त!
गोष्ट छानच आहे. राम गोपाल वर्मांसाठी नाही तरी निदान बीएमएम च्या एकांकीका स्पर्धेसाठी याचे नाट्यरुपांतर करता आले तर पहा. नक्कीच यशस्वी होईल. माहीती हवी असल्यास कळवा.
+१
सहमत आहे. एक सुंदर एकांकिका निश्चित्तच होईल. "एक उलट एक सुलट" छाप एकांकिकांपेक्षा छान होईल.
- (प्रायोगिक एकांकिकांना भिणारा) सर्किट
"करकच्चून
"करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता."
काय दिल्ली सफर केली वाटत डीटीसी मधून ;} नाही केली तर एकदा करुन पाहाच.
एक मात्र गोष्ट तुमची मला आवडली तुम्ही वाचकांना कथेचा एक भाग बनवता व वाचकाला असे वाटते की कथा नायक / नायिका ह्यांच्या मागे मागे तो देखील हे सर्व पाहत फिरत आहे.... उदा. "समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.
" हे वाक्य वाचले रे वाचले तो सीन [चित्र] डोळ्यासमोर येते व असे वाटते की रवी व सीमा दोघे बस कडे पाहत आहेत व मी त्यांच्या मागून त्यांना व त्या बस ला पाहत आहे, ह्यातच तुमच्या लेखनाचे यश सामावलेले आहे, अभिनंदन.
राजे
(*हेच राज जैन आहेत व ह्यांना ही कथा खुप ... खुप....... खुप X १००० वेळा आवडली आहे)
माझे शब्द....
भयानक आवडली
कथा भयानक आवडली. का आवडली हे सांगता येणार नाही. बांधणी उत्तम आहे, उत्कंठा कायम ठेवली आहे, अप्रतिम कलाटणी वगैरे कारणे द्यायची असतातच. पण मला प्रियालीचे लेखन आवडते. ( मी आणि प्रियाली एकाच कंपूतले आहोत, हे काही कारण झाले नाही. )
प्रियालीताई, इतिहासावर आधारित एखादी भयकथा आल्यास अधिकच मजा येईल. विचार करा.
चित्तर
इतिहासावर आधारित भयकथा
माझा एक प्रयत्नः
मंगल पांडे त्याच्या कोठडीत गपचिप पडला होता. तेवढ्याअत इंग्रजाच्या एका भुताने त्याला गोळी मारली. गोळीत गायीची चरबी आहे, असे त्याला वाटले.. आणि अगागा , मेलो मेलो असे म्हणत तो उठला..
(ते स्वप्न होते, हे लक्षात आले लगेच, कारण सर्व*क्षी चा लेख वाचूनच मंगल झोपला होता.... अशी भीतिदायक स्वप्ने त्यानेच पडतात...)
- (स्वातंत्र्यसैनीक, नव्हे स्वातंत्र्यसेनापती) सर्किट
कारण सर्व*क्षी चा लेख वाचूनच मंगल झोपला होता
मी काहीच बोलणार नाही. पण प्रतिसाद भयंकरपणे गंभीर असा आहे.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आभार
कथेला प्रतिसाद देणार्या सर्वांचे विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
विकास,
बीएमएमला पाठवण्यासारखी गोष्ट तयार आहे का याबाबत साशंक आहे पण कथाबदलाबाबत तुमची सुचवणी मात्र नक्कीच वाचायला आवडेल.
सर्किट,
तुम्ही एक स्वतंत्र भयकथा, गूढकथा लिहाच. तशी फार गरज नाही म्हणा, आयपी शोधतो सांगितले की सगळे आपोआप टरकतील.
परंपरा..:)
विशेषतः मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपूगिरी अबाधित ठेवून आपल्याच कंपूतील लोकांना भरघोस प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हा हा हा! 'मनोगतावरून परंपरेने चालत आलेली कंपुगिरी' हे शब्द आवडले..
थोडक्यात कंपुगिरीचे मूळ मनोगतात आहे हे सांगितलेस ते बरे झाले. मनोगतावर प्रथमत: कंपुगिरी सुरू केली ती आमच्या विन्याने! मी कंपुगिरी करायला त्या फोकलिच्या विन्याकडूनच शिकलो!
)
विन्या की जय हो....
आपला,
(महान कंपुबाज) तात्या.
कथा
मस्त पकड घेत होती ('आहट' मध्ये वगैरे व्हायचे तसे
); शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
('शेवटाच्या' आधीचा भाग वगळता) 'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
प्रियाताईकडून यापेक्षा सुरस भयकथा वाचायची सवय झाल्याने ही कथा तितकीशी आवडली नाही
(अपेक्षाबाज)बेसनलाडू
धन्यवाद!
>>शेवट कळल्यानंतर मात्र 'फुस्स' अशी प्रतिक्रिया झाली (कदाचित हेच अपेक्षित होते का प्रियाताई?)
हो! तेथेच कलाटणी होती.
>>'इच्छा'च्या वेळी पण माझी अशीच काहीशी प्रतिक्रिया झाली होती.
काय दुष्ट माणूस आहेस!!! प्रत्येक गोष्टीत कोणीतरी 'भगवान को प्यारा' व्हायला हवा का?
) असो, असा अपेक्षाभंग होणार हे माहित असल्यानेच वर 'गोष्टीतून फार अपेक्षा ठेवू नये ' असे लिहिले होते. 
उपक्रमावर हिचकॉकच्या लेखात एक वाक्य होते:
रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.”
माझ्या ब्लॉगवरही एक दोघांचा असा अपेक्षाभंग जाणवला. प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको.
टाइपकास्टिंगची चिंता नको :)
प्रियाताई स्वतःला हिचकॉकच्या पंक्तीत बसवत नाही बॉ! पण टाईपकास्ट तरी नको.
त्यामुळे असे रामू वर्मा / आहट टाइप वातावरणनिर्मिती करणारे काही वाचले की आमचे डोके थरारक शेवटाच्या दृष्टीनेच तयारी करू लागते. याला तू हवे तर आमच्या डोक्याचे (लिमिटेड) टाइपकास्टिंग समज, तुझ्या लेखनाचे नाही. असो.
वेगासचे वर्णन, शिल्पचित्रांची मांडणी, हिचकॉक, फ्लाइंग डचमन वरचे लेख, मासळीवरील तात्यांच्या लेखाला आणि इतरत्रही दिलेले अनेक प्रतिसाद लक्षात घेतले, तर टाइपकास्टिंगची चिंता निदान तू तरी करू नयेस प्रियाताई. पण भयकथा लिहिण्याच्या बाबतीत तुझा आणि काही अंशी अनुताईचा हात धरू शकणारे कमीच नाही का
(टाइपकास्टेड)बेसनलाडू
फुस्स बेला
बेला तुजा फुस्स परतिसाद वाचुनश्यानि आपिक्शाबंग जाला न्हाइ. कहाणी लय भारी पिर्यालि. लिवत जा.
(यष्टीप्रेमी) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
पोपट झाला रे!
तुझा अपेक्षाभंग करण्यासाठी प्रतिसाद लिहिला नव्हताच खोजा!!!
(प्रतिसादमास्टर)बेसनलाडू
"तुझ्या (**)त धमक किती? तू नडतोस किती?"
चीडला :)
चीडला
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?तू चिडतोयस किती?"
छान....कथा
छान....कथा उत्कंठावर्धक आहे.