एक सवाई अविष्कार | अंक २

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
11 Dec 2010 - 11:21 am

एक सवाई अविष्कार | अंक १

माझ्या सवाईच्या पहिल्या दिवसाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आपणास आवडला हे समजून आनंद झाला, मात्र आधी सांगितल्याप्रमाणे, मला संगीतातील ओ का ठो येत नाही, फकस्त कानाला ग्वाड लागतंय म्हणून आम्ही ऐकतो झालं. त्यामुळे सांगीतिक रसग्रहण करण्याची आमची अजिबात पात्रता नाही, तेंव्हा कृपया माफी असावी. कालच्या तडफदार सुरुवातीनंतर आजचा दिवस मुळातच अपेक्षांच्या ओझ्याखाली आला. पहिल्याच दिवशी हरिजी आणि बेगम सुलताना ह्यांच्या अदाकारी नंतर आज, लोक जसराज, पंडित विश्व मोहन भट आणि यु. श्रीनिवास ह्यांच्या कडे कान लावून बसले होते.

Uma Garg Photoआजच्या दिवशी सुरुवात, उमा गर्ग ह्यांनी केली. बंगालच्या उमा गर्ग ह्यांनी राग मुलतानीने विलंबित ख्यालाची सुरुवात केली. तसे पाहता, मला अभिजात संगीत पूर्णतया कळत नसल्याने मी विलंबित रागांचा एवढा भोक्ता नाही. मात्र त्यांनी पुढे 'बालमा मोहे तुम संग लागी प्रीत' सुरु करताच दिवसात रंग भरायला सुरुवात झाली. त्याही पुढे त्यांनी 'कहा मानत नाही श्याम' ही ठुमरी सदर केली आणि त्यांच्या गायकी बरोबरच भरत कामत ह्यांचा तबला प्रेक्षकांची मने जिंकून गेला. आजच्या दिवसाला तबला नवाजांनी एकच बहार आणली, मी असा का म्हणतोय ते कळेलच.

त्यांच्या नंतर प्रसिध्द बेला शेंडे यांची बहिण सावनी शेंडे, ह्याचं पटावर आगमन झाला. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपली कला तत्कालीन राष्ट्रपतींसमोर सादर केली होती. त्यांना मिळालेले पुरस्कार वाचून दाखवले जात होते, आणि सेकंदा-सेकंदाला मी आश्चर्यचकित होत होतो. त्या मानाने वयाने लहान असूनही, त्यांची पदक तालिका, मोठ्या मोठ्यांना लाजवील अशी आहे. त्यांनी मंजुळ आवाजाने सुरुवात करताच, त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार यथोचित असल्याची खात्रीही लगेच पटली. त्यांची गायन शैली ही उप-शास्त्रीय प्रकारात मोडणारी आहे. आधी भरत कामत आणि आता तबल्याच्या साथीला सवाई मधील नेहमीचे रामदास पळसुले विराजमान झाले होते.Savani Shende Photoसावनी ह्यांनी पुरिया धनश्री ने सुरुवात केली, आणि विलंबित ख्याला नंतर, स्वरचित बंदिशीही सदर केल्या. ('चलो सखी आओ आओ' ही एकच लक्षात राहिली आहे त्या बद्दल क्षमस्व). त्यांनी त्यांच्या अदाकारीचा शेवट, सर्वश्रुत आणि सर्वप्रिय अश्या 'बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल' ने केली. रामदास पळसुले यांचा तबला आणि त्या बरोबर सावनीच्या गायकीची फिरत, स्पष्ट शब्दोच्चार, प्रत्येक शब्दाला यथार्थ उच्चारण्याची क्षमता, सर्वाना अगदीच वेड लावून गेली. सावनी शेंडे ह्यांनी पहिल्या प्रथम सवाई च्या मंचावर आपली कला सादर केली, आणि तीही एवढी उत्कृष्ठ की सूत्रधारांनी देखील त्यांचा प्रतिभेची तारीफ केली.

Pt. Vishwamohan Bhat Photo                                             U Shrinivas Photoवाद्यासंगीताचा भोक्ता मी, त्यापुढील कलाविष्काराची आतुरतेने वाट पहात होतो. पंडित विश्व मोहन भट(मोहन वीणा), आणि यु श्रीनिवास(मेंडोलीन) ह्यांची जुगलबंदी. जेंव्हा ह्यांच्या साथीला, तबल्यासाठी विजय घाटे ह्यांचा नाव घेतलं गेलं, तेंव्हा समस्त श्रोतुर्वर्गाच्या आनंदाला पारावर उरला नाही. तसे पाहता, आता ती दोघांमध्ये जुगलबंदी राहिलीच नव्हती, तर एक वाद्यांचा तिहेरी संगम अनुभवण्याची पर्वणी सर्वांना मिळाली. विशेष म्हणजे सादरीकरणाच्या फक्त अर्धा तास आधी, ह्या दोन दिग्गजांची भेट झाली होती त्यामुळे कार्यक्रमाची एकंदर रूपरेखा न आखताच, केवळ प्रतिक्षिप्त प्रतिभेचा वावर रंगमंचावर होणार होता. जुगलबंदीची सुरुवात यमन रागाने झाली आणि पुढचा मला खरंच काही एक आठवत नाही. मोहन वीणेची मंजुळ मोहकता, मेंडोलीनची विद्युल्लता, आणि तबल्याचे कठोर तांडव ह्या तिपेडी गोफाचे वर्णन माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. पंडित विश्व मोहन भट, स्वरांना हळुवारपणे गोंजारत होते, तर श्रीनिवास स्वरचापल्याचा अविष्कार करत होते, त्या दोहोंच्या साथीला पंडित विजय घाटे ह्यांचा खणखणीत तबला तर काय वर्णावा. ह्या तिहेरी संगमात वेळ कसा गेला कळलेच नाही. आपल्या कार्यक्रमाचा शेवट त्यांनी 'वैष्णव जन तो, तेणे कहिये रे' ह्या पदाने केला. तिघांच्या वाद्यातून एकत्रितपणे निर्मिलेले अमृत सर्वांना तृप्त करून गेले.

आज केवळ चारच कलाकार आपली कला सादर करणार होते, त्यामुळे जुगलबंदी संपताना फक्त रात्रीचे ८ च वाजले होते. पुढे तेजोनिधी स्वरमार्तंड पंडित जसराज ह्याचं आगमन झालं. प्रथम ध्वनीयोजनेचा काहीतरी बोजवारा उडाल्यामुळे जसराज आणि त्याच बरोबर लोकांचा पण थोडा रसभंग झाला. मात्र त्याने आनंदावर फारसं विरजण पडलं नाही. आपल्या मिश्कील आणि आनंदी स्वभावाने जसराज लगेच स्वरांमध्ये सामावून गेले. दरबारी कानडा ने सुरुवात करून मग त्यांनी अजब तेरी दुनिया मालिक आणि कलिका.. ही पदे सादर केली. Jasraj Photoत्यांनी समारोप त्यांच्या प्रसिद्ध 'ओम नमो भगवते वासुदेवाय' ने केला. त्याच वेळी त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलं, तबला आणि मृदंगम ह्यांची एक सुंदर जुगलबंदी पण सर्वांना ऐकवली. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात दोन तास कसे गेले कळलंही नाही. तिन्ही सप्तकांमधील त्यांची सुरावरील पकड केवळ लाजवाब. एवढा गंभीर खर्ज आणि इतकी सहज फिरत मी अनुभवली नव्हतीच. एक एक तान जणू सुरांना कवेत घेऊन प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधत होती. केवळ सुरांशी नव्हे तर मंडपातील प्रत्येक व्यक्ती तहानभूक हरपून विठ्ठलाचा गजर करण्यात गढून गेली होती. दोन तास झाले तरी जसराज थांबू नयेत असंच वाटत होतं. पण पुन्हा घड्याळ आडवे आले, आणि दुसर्या दिवसाचा अनैच्छिक समारोप झाला.

....संगीताच्या माधुर्याने मधुमेह होत नाही हेच आपले नशीब हो, नाही जगात इन्शुलीन तसं कमीच आहे........

हे ठिकाणआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

पारा's picture

11 Dec 2010 - 11:29 am | पारा

काही प्रतिक्रियांमध्ये मला छायाचित्रे टाकण्यास सुचवले होते, परंतु, माझ्याकडे छायाचित्रणाची सोय नसल्याने, मी मीपा वरच्याच धुरिणांना आवाहन करतो की ज्यांनी छायाचित्रे काढली असतील त्यांनी कृपया ती येथे प्रकाशित करावी :)

यशोधरा's picture

11 Dec 2010 - 12:38 pm | यशोधरा

वा वा..

आनंद's picture

11 Dec 2010 - 12:44 pm | आनंद

मस्त हो,
आज कोण कोण आहेत.
यायच म्हण्तोय.

यकु's picture

11 Dec 2010 - 3:53 pm | यकु

मला संगीतातील ओ का ठो येत नाही, फकस्त कानाला ग्वाड लागतंय म्हणून आम्ही ऐकतो झालं. त्यामुळे सांगीतिक रसग्रहण करण्याची आमची अजिबात पात्रता नाही,

सांगितीक व्याकरणदृष्ट्या अतिशुध्द वर्णन केलं असतंत तर आम्हा संगितातलं ओ का ठो न कळणारांना वाचायला बिलकुल मजा आली नसती!

मनापासून धन्यवाद!!!

मी २००७ आणि २००९ मध्ये गेलो होतो. मागच्या वर्षी (बरोबर ना?) साक्षात पंडित भीमसेन जोशींचं गायन ऐकलं आणि धन्य झालो!!

यावर्षी मात्र योग नाही....बंगळूरात पडलोय खितपत :(