मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
23 Apr 2008 - 4:54 pm

राम राम मंडळी,

ही डिसेंबर २००७ मधली हकिकत आहे. बरेच दिवस मिपावर लिहीन लिहीन म्हणत होतो, आज योग आला.

"तात्या, कुठे आहेस? काय करतो आहेस?"रात्री एकच्या सुमारास मोर्‍याचा फोन.

निनाद मोरे! एका स्वतंत्र लेखाचा आणि व्यक्तिचित्राचा विषय! परंतु त्याबाबत पुन्हा कधितरी...

"अरे बाबा, रात्री एक वाजता सभ्य माणसं काय करत असतात? माझ्या माहितीप्रमाणे ती झोपलेली असतात! तेच मीही करत आहे. गाढ झोपलो होतो. बोल, फोन का केला होतास?"

"आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन हायवे - चेकनाक्याजवळच्या बारमध्ये ये. मी जरा आज अंमळ जास्तच घेतली आहे आणि माझं पैशाचं पाकिट कुठे मिळत नाहीये, हरवलं आहे किंवा बहुदा कुणीतरी मारलं आहे. तू बिलाचे पैसे घेऊन ये, तुझे पैसे मी उद्या परत करीन!"

मोर्‍या हे अडखळतच बोलत होता. फुल्टूच झाली होती त्याला!

मी मनातल्या मनात मोर्‍याला शिव्या देत देत अंथरुणातनं उठलो आणि मैत्रीला जागत मुकाट्याने स्कूटरला किक मारून चेकनाक्याजवळच्या बारमध्ये पोहोचलो. मला आलेला पाहून मोर्‍या आनंदला. "अरे ये तात्या, बस बस. बरं झालं तिच्यायला तू आलास. माझं पैशाचं पाकिटच सालं कुठे मिळत नाहीये! आता आलाच आहेस तर एक पेग मार!"

शेवटी हो ना करता करता मोर्‍याला कंपनी म्हणून मीही एक पेग प्यायलो, बिलाचे पैसे चुकते केले आणि आम्ही दोघे बारच्या बाहेर पडलो. फुल्टू झालेला मोर्‍या, "उद्या भेटू रे तात्या!" असं म्हणून मला बायबाय करून रिक्षा पकडून घरी निघून गेला. मी बारच्या बाहेरच एक पानवाला होता, तिथे मस्तपैकी एक १२० पान जमवलं आणि घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!

"चला साहेब, जरा आमच्या चौकीपाशी चला. तुम्हाला आमचे साहेब बोलावताहेत!"

"का? कशाला? मी काय केलं? अहो हे पाहा, लायसन आहे माझ्याकडे."

"ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही चला. साहेबांनी बोलावलंय!"

"चला! कुठायत तुमचे साहेब?"

'साला, कर नाही त्याला डर कशाला?' अस म्हणून मीही मोठ्या मस्तीत तेथून जवळच असलेल्या चौकीपाशी पोहोचलो. तिथे एक घार्‍या डोळ्याचा, करड्या नजरेचा वाहतुक शाखेचा इनिसपेक्टर साहेब उभा होता. वर्दीवरल्या पाटीवरून त्याचं नांव शिंदे आहे हे मला कळलं

"नमस्कार शिंदेसाहेब! बोला, काय काम होतं?" मी.

"नांव काय तुमचं?"

"अभ्यंकर."

"कुठे बसला होता?"

"हे काय, इथेच! तो समोरचा बार दिसतो आहे ना, तिथे बसलो होतो."

हे ऐकून शिंदेसाहेबांनी थोडाश्या मिश्किलपणानेच मला पुढचा प्रश्न विचारला,

"काय मग? ब्रॅन्ड कुठला ब्रॅन्ड? किती पेग झाले?" :)

"हां हां, ब्रॅन्ड ना? रॉयल चायलेन्ज! फार नाही, एकच पेग प्यायलो. मित्राला कंपनी म्हणून!" मीही हसत हसत उत्तर दिलं. मला अजून प्रसंगाचं गांभीर्य कळलेलं नव्हतं, पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची कल्पना नव्हती!

"अरे वा! रॉयल चायलेन्ज का? बरं बरं! लावा, गाडी साईडला लावा जरा, आणि समोरच्या चौकीत जाऊन त्या बाकड्यावर बसा!"

??

"अहो पण मी काय केलं आहे? मला कशाला अडवताय?"

"दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे अभ्यंकरसाहेब! तुम्हाला माहीत नाय का?"

आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. च्यामारी भलत्याच भानगडीत सापडलो होतो! बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची! ;)

"जाऊ द्या शिंदेसाहेब! चुकलं खरं. एक वेळ माफ करा अन् सोडून द्या. पुन्हा असं करणार नाही!" मी आवाजात शक्य तितकी नम्रता आणत म्हटलं.

"अगदी बरोबर! तुम्ही पुन्हा असं करू नये म्हणूनच तर तुम्हाला पकडलं आहे!" इनिसपेक्टर साहेब पुन्हा एकदा खुनशीपणे हसत हसत म्हणाले!

रात्री दीडचा सुमार. स्थळ -ठाण्याचा हायवे चेकनाका. शिंदेसाहेब आणि दोनचार पोलिस शिपाई गराडा करून माझ्याभोवती उभे होते. दोन-तीनदा विनंत्या करूनही इनिसपेक्टर ऐकेना. मला वाटलं बहुतेक माझी स्कूटर, लायसन वगैरे आता जप्त होणार! शिवाय दंडही भरावा लागणार! त्याशिवाय दुसरा पर्यायच दिसत नव्हता!

"ठीक आहे साहेब. मला माझा गुन्हा मान्य आहे. किती दंड भरायचा ते सांगा. तो मी भरतो आणि मला जाऊ द्या!"

"तुम्हाला आता कसं जाऊ देणार? या क्षणी तुम्ही आमच्या अटकेत आहात!"

अटक??

च्यामारी, ही अटकेची नवीन भानगड काय आहे ते मला कळेना. आता मात्र मला अंमळ चिंताच वाटू लागली.

"अहो साहेब, पण अटक कशाबद्दल? मी दंडाची रक्कम भरतो ना!"

"त्याचं काय आहे अभ्यंकर साहेब, तुमच्यावर आम्ही कलम १८५ लागू केलं आहे. तेव्हा नुसता दंड भरून चालणार नाही. आता जरा वेळाने आपण आमच्या गाडीतनं सिव्हिल हॉस्पिटलला जायचं आहे. तिथे तुमच्या रक्ताची चाचणी करावी लागेल! मग त्यावर तुमची जबानी घेऊन आपण आमच्या वाहतुक कार्यालयात जायचं, तिथे अनामत म्हणून दोन हजार रुपये दंडाची रक्कम भरायची आणि मगच घरी जायचं! उद्या सकाळी तुम्ही पुन्हा आमच्या ओफीसमध्ये यायचं, तिथून आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन जाऊ. तिथे जजसाहेबांसमोर गुन्हा कबूल करायचा आणि दंड भरायचा! बस! एवढंच आपल्याला करायचं आहे. आहे की नाही सोप्पं? तुम्ही कशाला घाबरताय, आत्ता तुम्ही अटकेत आहात म्हणजे फक्त आमच्या ताब्यात आहात. आम्ही काय तुम्हाला गजाआड बंद वगैरे करणार नाही! तेव्हा जा जाऊन तूर्तास त्या बाकड्यावर चुपचाप बसा!"

च्यामारी! हा शिंदेसाहेब मला भलत्याच लफड्यात अडकवू पाहात होता! आयला! घरी चांगला सुखाने झोपलो होतो ते मोर्‍यामुळे नसत्या भानगडीत अडकलो होतो! आणि मोर्‍या रांडेचा पिऊन टाईट होऊन रिक्षा करून सुखाने घरी जाऊन केव्हाच झोपला होता! :)

मी चुपचाप माझी स्कूटर रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि पोलिसांच्या वाहतुक शाखेच्या चौकीत जाऊन त्या बाकड्यावर बसलो. तिथे अजून चारसहा मंडळी बसली होती. चौकीबाहेर पोलिसांचं पकडसत्र सुरूच होतं. काही वेळाने अजून दोनचार रथीमहारथी चौकीत दाखल केले गेले! आता तिथे आम्ही एकूण दहाबारा आरोपी मंडळी जमा झालो होतो. परंतु एकंदरीत वातावरण फारसं गंभीर नव्हतं. शिंदेसाहेब आणि त्यांचे सहकारी तसे आमच्याशी बरे वागत होते. शिव्याओव्या किंवा हात चालवत नव्हते!

"क्यू साब, कुछ तोडपानी नही हो सकता क्या? दोपाचसौ रुपिया लेके छोड दो साब!" आमच्यातला एक जण साहेबांना म्हणाला. कुणीतरी पंजाबी असावा. एकदम हायफाय, चांगल्या कपड्यातला होता. चांगल्या हुद्द्यावरचा किंवा वरपर्यंत पोहोच वगैरे असलेला वाटत होता!

"नही, पैसा नही चाहिये मुझे! पैसा रखो अपनेही पास!" शिंदेसाहेब एकदम गुरकावले त्याच्यावर!

"क्या साब? चलो, कोई बात नही! हज्जार रुपया लो और छोड दो! मुझे घर जाना है! नही तो मुझे अभी आपके बडे साबसे बात करनी पडेगी!"

आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला,

"ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!"

आता मात्र इतका वेळ तसं बरं असलेलं वातावरण जरा तापू लागलं! आम्ही बाकीची आरोपी मंडळी यावरून काय तो धडा घेऊन चुपचाप उभे होतो! तेवढ्यात आमच्यातला अजून एक इसम पुढे झाला. त्याने खिशातनं एक ओळखपत्र काढलं आणि तो शिंदेसाहेबांना म्हणाला,

"हे बघा साहेब, मी पत्रकार आहे. मला सोडा!"

हे ऐकल्यावर शिंदेसाहेब आणखीनच भडकले!

"पत्रकार आहेस ना? मग दारू पिऊन गाडी चालवत नाहीत हे तुला माहीत नाही काय? कुठे बसला होतास भडव्या? किती पेग झोकलेस मादरचोद? तोंडाला साला जाम वास मारतो आहे तुझ्या! साल्या १८५ सोबतच मुंबई पोलिस कायद्याची अजून दोन-चार कलमं लावून तुला आज लॉकप मध्येच टाकतो! काय लिहायचं ते लिही तुझ्या पेपरात! पोलिसांची बदनामी करणार्‍या बातम्या नेहमी देता ना पेपरात? मग 'दारू पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी एका पत्रकाराला पकडले!'ही बातमीही तुझ्या नावासकट दे की तुझ्या पेपरात! मला ओळखपत्र दाखवतोय भडवा!

च्यामारी, शिंदेसाहेब भलतेच कडक होते. कुणाकडूनही एक पैसा घ्यायला तयार नव्हते की कुणा बड्या आसामीच्या फोनच्या दडपणाखालीही येत नव्हते!

जरा वेळाने ती पोलिसांची निळ्या रंगाची मोठी जाळीची बसगाडी आली, त्यात आम्हा सर्व मंडळींना बसवले आणि रात्री दोनच्या सुमारास आमची यात्रा ठाण्याच्या शासकीय रुग्णलयाकडे निघाली! मंडळी, सुदैवाने आपला स्वभाव हा एकूणच फार चिंता करत बसण्याचा नाही. 'साला, जो होगा वो देखा जाएगा!' ही आपली खुशालचेंडू वृत्ती! आयुष्यात प्रथमच पोलिसांच्या त्या मोठ्या निळ्या जाळीदार गाडीमध्ये आरोपीच्या जागेवर बसलो होतो! आता एकंदरीतच हे प्रकरण मला थोडंसं थ्रिलींग वाटू लागलं होतं!;) आत्तापर्यंत ही गाडी नेहमी लांबूनच किंवा शिणेमातच पाहिली होती. का कुणास ठाऊक, परंतु आता मनातली भिती जरा चेपली होती आणि एकंदरीतच तो प्रसंग मी थोडा एन्जॉय करू लागलो होतो! त्या बसगाडीतले ते दोघंतिघं पोलिस, बाकीचे अंमळ बावरलेले, 'च्यामारी, घरी आता बायकापोरांना काय सांगायचं?' या विचारात गढलेले आरोपी पाहायला मला आता हळूहळू गंमत वाटू लागली होती! त्यातच मीही एक आरोपी होतो!

तात्या अभ्यंकर! आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५!
है स्साला, क्या बात है! :)

गाडीत योगायोगाने शिंदेसाहेब माझ्या बाजुलाच बसले होते. मी कसनुसा चेहरा करून त्यांच्याकडे बघितले तशी ते पुन्हा एकदा मिश्किल हसले!

"अहो, कधी कुठे घेतली तर स्वत: वाहन चालवायचं नाही. रिक्षा किंवा टॅक्सी करायची! यापुढे लक्षात ठेवा. काय?!"

"हो साहेब, यापुढे लक्षात ठेवीन!" (पण आत्ता सोडता का?)

कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;)

थोड्याच वेळात आमची गाडी शासकीय रुग्णालयात पोहोचली!

पुढची रामकहानी, सॉरी तात्याकहानी पुढच्या अंतीम भागात. अंतीम भाग येत्या ४८ तासात!

आपला,
तात्या अभ्यंकर,
आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५!

वाङ्मयसमाजजीवनमानअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

23 Apr 2008 - 5:04 pm | नीलकांत

असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद...

झकास उत्सुकता ताणल्या गेलीये. लवकर लिहा पुढे काय झालं ते.

नीलकांत

विसुनाना's picture

23 Apr 2008 - 6:47 pm | विसुनाना

असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद...
झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते.

मला तर ब्रेकमधली 'रॉयल चॅलेंज'ची (म्हंजे मल्ल्याबाबाच्या आयपीएल टीमची हो!) जाहिरातही दिसत आहे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2008 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद...झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते.
 

विजय आचरेकर's picture

23 Apr 2008 - 5:33 pm | विजय आचरेकर

खरच थ्रिलींग.......

धमाल मुलगा's picture

23 Apr 2008 - 5:39 pm | धमाल मुलगा

तात्याबा,
तुम्हाला भिती नाही वाटली? च्यामारी, एखादा इमानदार पोलिस बघितला तरी आपली हवा टाईट होते बॉ!

डेंजरच आहे प्रकरण...
लवकर टाका बॉ पुढचा भाग!

-(घाबरट) ध मा ल.

स्वाती राजेश's picture

23 Apr 2008 - 5:44 pm | स्वाती राजेश

तात्या मस्त लिहिले आहे पण अर्धवट का सोडले?
वाचता वाचता विचारांची तारच तोडली..
आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले.
उत्सुकता लावून ठेवली...
लवकर लिहा....

प्राजु's picture

24 Apr 2008 - 12:58 pm | प्राजु

स्वाती म्हणते ते अगदी खरं आहे..
आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले.
उत्सुकता लावून ठेवली...
.. काय तात्या...??
पण हे असं खुशालचेंडू वागणं खरंच शोभतं तुम्हाला.. :))

आता पुढचा भाग मात्र लवकर लिहा..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनस्वी's picture

23 Apr 2008 - 5:46 pm | मनस्वी

थ्रिलींग...

(स्वगत : आता या कहाणीचेपण २ भाग करायची काय गरज होती.)

मदनबाण's picture

23 Apr 2008 - 5:47 pm | मदनबाण

आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला,"ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!"
याला म्हणतात मराठी दणका !!!!!

कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;)
:)

(१०० मालिकेचा जबरदस्त पंखा) आणि पुढील ४८ तासांच्या प्रतिक्षेत.....
मदनबाण

प्रभाकर पेठकर's picture

23 Apr 2008 - 5:48 pm | प्रभाकर पेठकर

रंगत आणली आहे, तात्या. ४८ तास वाट बघतो.

लिखाळ's picture

23 Apr 2008 - 6:49 pm | लिखाळ

मस्त !
४८ तासांची वाट पाहतो आहे. लवकर लिहा.
--लिखाळ.

मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

शितल's picture

23 Apr 2008 - 6:58 pm | शितल

तात्या माझ्या माहिते प्रमाणे तुमचा तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे.
कारण आय.पी.सी. १८५ हा Illegal purchase or bid for property offered for sale by authority of public servant आहे,
मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा
Driving by a drunken person or by a person under the influence of drugs.
असा आहे.

४८ तास कधी स॑पत आहेत ह्या प्रतिक्षेत असलेली
शितल.

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे.

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा
Driving by a drunken person or by a person under the influence of drugs.

धत् तेरीकी! मला वाटलं हे आय पी सी मधलं कलम आहे. धन्यवाद शितल. या भागात आणि पुढल्या भागात तशी सुधारणा करेन..

आपला,
(मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५ अंतर्गत सजा झालेला आरोपी) तात्या.

स्वाती दिनेश's picture

23 Apr 2008 - 7:31 pm | स्वाती दिनेश

काय रे बाबा असे तुकड्यातुकड्यात देतोस? आता आले ना ४८ तास वाट पाहणे?
हा भाग झकास जमला आहे हे वेसांन ल.
स्वाती

विदेश's picture

23 Apr 2008 - 8:53 pm | विदेश

मोजत बसलोय की तात्या!
अजून किती तास-मिनिटे-सेकंद राहिले हो ४८ तास संपायला?

धनंजय's picture

24 Apr 2008 - 12:57 am | धनंजय

पण हे कलम भा.दं.सं.१८५ म्हणजे काय भानगड आहे बुवा? हे मला कळलेच नव्हते. वर शितल यांनी सांगितले म्हणून मोटार वाहातुक कायद्याबद्दल १८५ कळले...

चौकीवर जाऊन रक्तचाचणी करण्यापेक्षा तिथल्या तिथे काही चाचण्या केल्या असत्या तर बरे झाले असते. म्हणजे सरळ रेषेवर पावलापुढे पाऊल ठेवून चालणे, डोळे बंद करून उभे राहाणे, वगैरे. शक्यतोवर जे पोलीस दारूच्या गुत्त्यासमोर पाळत ठेवून असतात, त्यांच्यापाशीच श्वासातल्या आल्कोहोलची चाचणी करण्याचे यंत्र असले तर बरे असते.

असे केल्याने एकच पेग घेणार्‍या तात्यांचा खोळंबा झाला नसता. तसेच पोलीस अधिकार्‍याने त्यांना जातीने स्टेशनावरती नेले. तिथे आणखी चार फुल्टू लोक स्कूटर, गाड्या चालवत गेले असतील! चाचणी तिथल्या तिथे केली असती, तर या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे कामही कार्यक्षम झाले असते.

असो. लिहिताय म्हणजे सहीसलामत सुटलात. कसे सुटलात त्याबद्दल कुतूहल आहे.

विकास's picture

23 Apr 2008 - 10:44 pm | विकास

लेख चांगलाच उत्कंठावर्धक आहे आणि स्वतःसंदर्भात नसल्याने वाचायला मजा आली :-)

बाकी मद्यपानानंतर स्कूटर चालवायची नाही इथपर्यंत ठिक आहे पण आपण (४८ तासाची वाट पहायला न लावता) लिहीणे चालू ठेवले असते तर बरे झाले असते! :-)

भाई's picture

23 Apr 2008 - 11:06 pm | भाई

खुमासदार आणि ओघवत्या वर्णनामुळे मुळातच चटपटीत असलेला विषय अधिक रंजक झालेला आहे.

पोलिस आणि आमचे कसे जमायचे कारण आम्ही तर नांवापासूनच,
भाई

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2008 - 1:47 am | पिवळा डांबिस

उत्तम वातावरण निर्मिती!!

बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची!
होय बाबा, आम्ही पाह्यलंय या लोकांना दुसर्‍यांना कानफटवतांना!! विशेषतः आयपीएस अधिकार्‍यांना!! काय त्यांना कानफटात कसं मारायचं याचंही ट्रेनिंग देतात का काय नकळे. पण काडकन आवाज काढतात!!!:)))

तात्या अभ्यंकर,
आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५!
व्वा! काय जबरदस्त टायटल आहे!! आत्तापर्यंतच्या वाचलेल्या तुझ्या सगळ्या टायटल्सपेक्षा जोरदार!!!!:))

पुढल्या भागाची वाट पहात आहे....

फोलिसांपासून दूर रहाणारा,
पिवळा डांबिस

भोचक's picture

24 Apr 2008 - 2:50 pm | भोचक

मैफल रंगात यावी अन माईक बंद पडावा असं झालंय.

४८ तास संपण्याची वाट पहाणारा.
(भोचक)

प्रमोद देव's picture

24 Apr 2008 - 3:19 pm | प्रमोद देव

मी आपला तंद्रीतच गुणगुणायला लागलो. "लट उलझी,सुलझा जा बालम!"
तुम्हाला सांगतो चीज काय नजाकतदार आहे. प्रेयसी अशी आपल्या प्रियकराला.....
जाऊ द्या. मुद्याचे सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणाल...
तो इनस्पेक्टर माझ्याकडे संशयाने पाहतोय असे वाटायला लागले... अहो खरंच होते ते. खस्सकन खेचून त्याने मला कोपच्यात घेतले. मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला.
"आत्ता तुम्ही गात होता ती चीज बिहागमधली काय हो!" इन्स्पेक्टरच्या ह्या अनाहूत प्रश्नाने मी तर गारच पडलो.
इन्स्पेक्टरला हे 'अंग' असेल असे कधीच वाटले नाही. मी होकार देताच त्याने मला हळूच इतरांपासून अगदी दूर नेले आणि ही चीज मला नीट म्हणायला सांगितली. मग काय महाराजा! आपण समजलो. पंछी पिंजडेमे फस गयेला है!
असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सहज's picture

24 Apr 2008 - 3:43 pm | सहज

मस्त!!!

+१

एकदम शक्य आहे!!!

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 11:48 am | विसोबा खेचर

मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला.
असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले.

हा हा! सह्ही लिहिलं आहे प्रमोदशेठ...

तात्या.

चित्रा's picture

25 Apr 2008 - 1:33 am | चित्रा

लेखाचे शीर्षक बघून मला आधी वाटले तात्या काहीतरी "माहितीपूर्ण" लिहीतायत की काय?!

४८ तास कधी संपणार, म्हणे?

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 12:44 pm | आनंदयात्री

बाकी लेख फक्कड, दुसर्‍या भागाची वाट पहायला लावणारा !

वाट............लावू..................नका................................!!;))

चतुरंग

केशवसुमार's picture

25 Apr 2008 - 1:52 am | केशवसुमार

चित्रगुप्त दादरला बसलो होतो तेव्हा ऐकवला होता..उत्तम शंब्दांकन..
आणि तो पुढचा भाग लवकर टाक..पुढे काय झाले ते मला माहिती आहे पण लोकांना असे टांगत ठेऊ नकोस..
केशवसुमार
(स्वगत:-'बरी अद्दल घडली !'असे किती जण मनातल्या मनात म्हणाले असतील बरं?)

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 11:42 am | मनस्वी

अरे ओ सांबा.. अठ्ठेचाळीस तास खतम होनेको कितने तास है रे..
बस्स ५ तास सरकार..
कहाणी एका रात्रीची.. आणि ब्रेक ४८ तासांचा.. बहुत नाईन्साफी है..

विजुभाऊ's picture

25 Apr 2008 - 12:13 pm | विजुभाऊ

४८ तास मोजायला सुरवात कधीपासुन करायची......

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2008 - 2:07 pm | भडकमकर मास्तर

आहाहा..तात्या...
हा लेख म्हणजे खणखणीत सिक्सर आहे....
लै मजा आली राव.....
..............हा प्रसंग कधीही कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो...इतका रिअलिस्टिक लेख !!!!
एक विनंती : प्लीज पुढचा लेख क्रमशः नको... वेळ घ्या पण काय ते एकदम संपवा...

अभिज्ञ's picture

25 Apr 2008 - 7:33 pm | अभिज्ञ

तात्या,
आपल्या वाद्याप्रमाणे ४८ तास उंलटून गेलेले आहेत तरिहि आपला पुढचा भाग
अजुन आलेला नाहि.
अजुन किति वेळ वाट पाहायचि???????

आपल्या केसचि आतुरतेने वाट पाहणारा..
(हायकोर्ट जज्ज) अबब.

»

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2008 - 9:15 pm | प्रभाकर पेठकर

तरिहि आपला पुढचा भाग

अहोऽऽऽऽ आपल्या कथेचा किंवा लेखाचा पुढचा भाग असे म्हणा..

इथे उरात धडकी भरते हो....!

चतुरंग's picture

25 Apr 2008 - 10:17 pm | चतुरंग

अहो काय हा ऍटमबाँब??!! एकदम हसू सुध्दा नीट बाहेर येईना;००
मी ऑफिसातल्या खुर्चीतून घसरलोच, तरी बरं लॅबमधे असल्यामुळे आजूबाजूला कोणी नाहीये नाही तर काही खरं नव्हतं!;)))

चतुरंग

मदनबाण's picture

25 Apr 2008 - 10:27 pm | मदनबाण

हे वाचुन जज्ज साहेबांना मात्र नक्कीच उरात धडकी बसेल..... :)))))

(कोर्टची पायरी कधीही न चढलेला)
मदनबाण

अभिज्ञ's picture

26 Apr 2008 - 12:24 am | अभिज्ञ

चुकलेच कि,
पेठकर काका लै भारी......)

कथेचा भाग असेच वाचावे....)

तात्या,पुढचा भाग (लेखाचा हो) लगिच येउ द्यात.

हि विनंती

अबब

अवांतर-आमचे उपनाम "वाघ" असल्याने ,आम्हि शिकार "भाग" करुन खात नाहि बरे...)

वरदा's picture

25 Apr 2008 - 11:36 pm | वरदा

मला तर जवळ तिकीट असलं तरी समोरुन टी सी आला की उगाच भिती वाट्टे..कधी बिनातिकीट गेले नाही तरी मला टी सी ने पकडल्याची स्वप्न पडायची लोकांना पकडलेलं पाहून्..... हे तर एकदम भारीच्...

सुनील's picture

26 Apr 2008 - 5:49 am | सुनील

तुमची तात्याकहाणी वाचून ३-४ महिन्यांपूर्वी (गेल्या डिसेंबरात) घडलेला प्रसंग आठवला.

आमच्या कंपनीची ख्रिसमस पार्टी होती. परंतु काही कामामुळे मला फार काळ थांबता येणार नव्ह्ते. तेव्हा मी फक्त एक बाटली बियर घेतली (अमेरीकेतील बियरची बाटली भारतात मिळणार्‍या बाटलीच्या निम्मी असते) आणि थोडेसे खाऊन निघालो. तरीही रिस्क नको म्हणून फ्रीवेने न जाता शहरातील रस्त्याने जाण्याचा विचार केला (आणि फसलो!).

तसा बियरच्या अर्ध्या बाटलीने कोलमडणारा मी नव्हेच! त्यामुळे निदान माझ्यामते तरी मी व्यवस्थित गाडी हाकीत होतो. एक सिग्नल पार करून मी पुढे निघालो आणि तेव्हढ्यात गाडीच्या आरशात निळे दिवे चमकताना दिसले. ट्रॅफिक पोलीसाला भिडण्याचा हा चौथा प्रसंग असल्यामुळे अगदी सराईताप्रमाणे गाडी रस्याच्या कडेला नेऊन थांबवली. लायसन्स व इतर कागदपत्रे असल्याची खातरजमा करून स्वस्थ बसून राहिलो. मिनिटाभरात तो आलाच. बहुदा त्यानेही माझ्याक्डे शत्र वगैरे काही नसल्याची खात्री केली असावी.

"कुठून आलात?"

मी साळसूदपणे रस्त्याचे आणि छेदरस्त्याचे नाव सांगितले.

"हो, पण तेथे होते काय? रेस्टॉरन्ट वगैरे?"

"हो. रेस्टॉरन्ट."

"अच्छा. मग काही ड्रिन्क्स वगैरे?"

"होय साहेब."

"किती घेतलीत?"

"फार नाही. फक्त एक बियर!"

"ह्म्म. जरा इकडे पहा.", असे म्हणून त्याने एक प्रकाशझोत माझ्या डोळ्यावर टाकला.

स्वतःचे एक बोट माझ्या डोळ्यापुढे ठेवून तो म्हणाला, " मी हे बोट फिरवीन त्याप्रमाणे तुम्ही डोळे फिरवायचे, समजले?"
मी मान डोलावली.

तो त्याचे बोट उजवीकडून डावीकडे फिरवत गेला तसा मीही मान फिरवून त्याच्या बोटाकडे पाहत राहिलो.

"अहं. मान नाही फिरवायची. मान सरळ. फक्त डोळे फिरवायचे."

आता मान न वळवता नुसते डोळे फिरवून आसपासचा अंदाज घ्यायची जनानी पद्धत मला कुठे जमायला? काही "बघणेबल" दिसले की अगदी ९० (क्वचित १८० देखिल) अंशात मान फिरवून बघायची आमची सवय!

असो. कसेबसे जमवले. तोही डोळ्यात प्रकाशझोत टाकून काहितरी बघत होता.

"नक्की एकच बियर?"

"होय साहेब, एकच."

"जरा तुमचे लायसन्स बघू."

मी लायसन्स काढून दिले. ते घेऊन तो आपल्या गाडीकडे गेला.

आता मला थोडा धीर आला. कारण जरी त्यापूर्वी तीन वेळा मला ट्रॅफिक पोलीसाने अडवले असले तरी प्रत्येक वेळेस वॉर्निंग देऊन सोडले होते त्यामुळे माझ्या नावावर नोंद अशी नव्हती.

तो परत आला.

"कुठपर्यंत जाणार? "

मी घरचा पत्ता सांगितला. तिथून एक्-दीड मैलाचाच तर पल्ला होता.

"नक्की ना? की अजून कुठे बसणार?"

"नाही साहेब. अगदी थेट घरी."

"नीट जा." लायसन्स हातात देऊन तो म्हणाला.

मी गाडी चालू केली. घरी आलो. फ्रीजमधून करोनाची बाटली काढली. त्यात एक लिंबाची फोड घालून सोफ्यावर अंग टाकले आणि एक एक घोट घेत डोके शांत करू लागलो!

आता मी तुम्हाला काय सल्ला देणार म्हणा. पण भारतात एक नियम मी पाळ्तो तो म्हणजे वाहन कधीही बारच्या समोर उभे करीत नाही. थोडे दूर एखाद्या आतल्या गल्लीत ठेवतो.

तुमच्या तात्याकहाणीचा दुसरा भाग वाचण्याची उत्सुकता आहे. लवकर टाका.

जाता जाता - हायवे चेकनाक्यावरच्या एकाही बारमध्ये जाण्याचा योग अद्याप आला नाही. पण तुम्ही म्हणता तो कुठला बार? "सोनिया" की काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धोंडोपंत's picture

26 Apr 2008 - 8:07 am | धोंडोपंत

क्या बात है तात्या!!!

अप्रतिम कथन. गेले अनेक दिवस याची वाट पहात होतो. कारण तुला पकडल्यानंतर तू बोलतांना याचा उल्लेख केला होतास.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

26 Apr 2008 - 5:02 pm | भडकमकर मास्तर

या लेखावरून आम्हीही स्फूर्ती घेऊन आमचा एक अनुभव लिहिणार आहोत....क्रमशः नाही...पूर्ण अनुभव एकत्र...

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Apr 2008 - 5:19 pm | डॉ.प्रसाद दाढे

रोशनीची आठवण उरात ताजी असता॑ना हा नवा वार करू नका..तुम्ही आम्हा गरीब वाचका॑ना अस॑ चक्क्यासारख॑ टा॑गू नका..एकतर इतक॑ छान लिहिता, आणि तेही क्रमशः?का अ॑त पाहता??

झकासराव's picture

26 Apr 2008 - 6:34 pm | झकासराव

४८ तासाचा वादा करुन तो पार न केल्याबद्दल तात्या शेट वर इन्डियन पीनल कोड ४२० नुसार खटला लावायचा का काय आता???????????????? :)
आणि किती वाट बघु??

अवांतर : तात्या शेठ काल तुमच्या मामलेदाराची मिसळ (तिखट अशी ऑर्डर देवुन) खाल्ली.
चांगली आहे. :)

अजुनच अवांतर : नुकतेच मिसळपाव.कॉम चे उर्ध्वश्रेणीकरण ( अपग्रेडेशन )>>>>
तो उर्ध्वश्रेणीकरन हा शब्द मनात म्हणताना देखील आमचाच उर्ध्व लागला की. डेंजर शब्द हाये.

विसोबा खेचर's picture

26 Apr 2008 - 6:51 pm | विसोबा खेचर

झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी मनापासून क्षमा मागतो. अचानक काही घरगुती/कार्यालयीन कामं आल्यामुळे दुसर्‍या भागास थोडा विलंब झाला आहे.

दुसरा (अंतीम) भागही बराचसा लिहून तयार आहे. परंतु त्यामध्ये काही ठिकाणी अद्याप माझ्या मनासारखं लेखन झालेलं नाही, ते जरा ठाकठीक करून सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो...

येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे...

असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे...

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2008 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे...

कोयी बात नही, माफ किया ;)

सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो...

या दिवशी कोणतेही घरगुती/कार्यालयीन काम निघू नये असे वाटते :)

येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे...

आपल्या इच्छेला शुभेच्छा !!!

आपला
बिरुटेसेठ,
(तात्याचा लेखनाचा जुना पंखा)

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2008 - 6:58 pm | प्रभाकर पेठकर

बाऽऽस काय तात्या, जाओ मुआऽऽफ किया।

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Apr 2008 - 8:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

अच्छा बाबा माऽऽऽफ किया..रोशनीही लिहिणार आहात हे वाचून विशेष आन॑द झाला :)

देवदत्त's picture

26 Apr 2008 - 10:02 pm | देवदत्त

तात्या, लवकर लिहा. दोन्ही एकत्र वाचूनच प्रतिक्रिया देतो :)