ईशान ..... भाग १

निरंजन's picture
निरंजन in जनातलं, मनातलं
21 Oct 2010 - 7:02 pm

HIV Rehabilitation centre ला जायचा माझा तो पहिलाच दिवस होता. एड्‍स हा स्पर्षानी होत नाही, डास चावण्यानी होत नाही हे सर्व माहिती असून मनाची तयारी व्हायला बरेच दिवस लागले.

एका मित्राकडून माहिती मिळाली होती की इथे फ़क्त लहान मुलंच ठेवतात. या मुलांची आई/वडिल वा दोघेही एड्‌स्‌नी दगावलेले होते व या मुलांनासुद्धा त्याची लागण झालेली होती. माझ कस स्वागत होईल ? या ठिकाणी. मला मुलांशी बोलण जमेल का ?सर्वच प्रश्न होते. जे मुल काही दिवसात मरणार आहे, त्या मुलाशी कस वागायच ? काहीच कल्पना नव्हती. माझा अंदाज होता मुलं बेडवर पडुन असतील.

आधी संचालिकांशी मित्रानी ओळख करुन दिली, मी विचारल की "मुलांना ती एड्‌स्‌ची पेशंट आहेत हे माहीती आहे का ?" त्या म्हणाल्या "काहींना माहिती आहे काहिंना नाही"

आम्ही मुल होती त्या हॉलमधे गेलो. ३ वर्षापासून १४ वर्षापर्यंतची मुल इथे होती. एकमेकांशी खेळाणारी व थट्टा मस्करी करणारी ती मुल पाहिल्यावर ही मुल HIV झालेली असतील अस वाटतच नव्हत. माझा मित्र इथे वरचेवर येत होता त्याची ओळाख होती. मुल लगेच त्याच्या भोवती "अंकल अंकल" करत गोळा झाली. माझी ओळख करुन दिल्या गेली व मी गोष्ट सांगणार आहे अस मित्रानी परस्पर डिक्लेअर केल. मुलं गोष्ट म्हणल्यावर माझ्या भोवती गोळा झाली. कोणत्याही परिस्थितीत असलेली मुलं गोष्ट म्हणल्यावर कशी उत्तेजित होतात ते मी तीथे बघितल. मग बिरबल-बादशहा, पंचतंत्र वगैरे मधल्या गोष्टी सांगितल्या.

हळू हळू मुलांच्या ओळखी करुन घेतल्या. ईशान ७-८ वर्षांचा, मोठा गोड मुलगा पण सर्वांना फ़ार चिडवायचा. त्याचे डोळे अचानक चमकायला लागले. ओठाच्या कोपर्‍यातुन थोड हसु यायला लागल. आणि त्यानी मला विचारल

"काका तुम्हाला भुताच्या गोष्टी येतात का ?"

बाकी मुल खु खु करुन हसायला लागली. मला समजेच ना हासायला काय झाल. माझा मित्र म्हणाला "ईशान चुप." ईशानचा व इतर मुलांचा चेहरा पडला. भुताची गोष्ट सांगुन मला या मुलांना घाबरवायच नव्हतं. व नाराजपण करायच नव्हतं. मी मित्राला म्हणालो

"अरे असु दे. पण ईशान मला येत नाही रे भुताची गोष्ट. तुच सांग बर तुला येत असेल तर"

परत त्याचा चेहरा उजळला. तेच मिश्किल हसु परत ओठावर आल.

"काका, तुम्ही भुत पाहिलय ?"

आता तर बाकी मुलं जास्तच हासायला लागली. ईशाननी त्यांना गप्प केल.

"नाही रे मी नाही पाहिल भुत"
"काका तुम्हाला भुत पाहायचय का ?"
"मी म्हणालो हो पाहिन की"
"पण तुम्ही खुप घाबराल. ते भुत खुप डेंजर दिसतय"
"नाही घाबरणार दाखव"

आता तर सर्व मुल खुपच हासायला लागली. माझी उत्सुकता खुपच वाढली होती. काय बर दाखवतायत ही मुलं. काही तरी माझी फ़िरकी घेणार हे नक्कीच होत. ईशान रेखाकडे बघुन म्हणाला.

"रेखा जरा लवकर वर जा आणि भुताला तयार कर."

रेखा जरा मोठी मुलगी, ती लगेच वरच्या मजल्यावर गेली. आणि थोड्याच वेळात ईशान मला घेऊन निघाला. सर्व मुलांचा लोंढा आमच्या मागे.

कथासमाजजीवनमानविचारलेखअनुभव