फ्लँडर्साच्या रणामध्ये

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
19 Sep 2010 - 8:34 pm

फ्लँडर्साच्या रणामध्ये
मूळ कविता इंग्रजीमध्ये; कवी : जॉन मॅकक्रे.

फ्लँडर्साच्या रणामध्ये स्थानदर्शक आमचे
क्रूस आहेत रोवले - त्यांच्या रांगां-रांगांंमध्ये
फुलतात रानफुले. वरती आकाशामध्ये
धजून अजून थवे चंडोलांचे उडणारे
ऐका अंधूक गाणारे, बंदुकींच्या बारांमध्ये.

कोण आम्ही? आम्ही मृत. पण कालचे जिवंत -
उषःकाल भोगायचो, संध्यारंगांत न्हायचो
प्रेमी झालो, प्रिय झालो - जरी आज पडलेलो
फ्लँडर्साच्या रणामध्ये.

आमचा लढा शत्रूशी, पुढे चालवावा तुम्ही.
आमचे गळते हात, तुम्हा मशाल देतात.
उंच तिला धरायचे, आहे कर्तव्य तुमचे.
तुम्हावर सोपवला विश्वास, जर ढाळला -
नाही निजणार आम्ही, फुलतात फुले जरी
फ्लँडर्साच्या रणामध्ये
- - -

(मूळ कविता इंग्रजीमध्ये; कवी : जॉन मॅकक्रे. हा कॅनडाच्या सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल हुद्दा असलेला डॉक्टर होता. पहिल्या महायुद्धात फ्लँडर्सच्या रणभूमीवर त्याने ही कविता रचली, तेव्हा त्याचा एक मित्र हल्लीच मृत्युमुखी पडला होता. कवी मॅकक्रे हासुद्धा पुढे युद्धात मरण पावला. कॅनडाच्या पार्लमेंट इमारतीच्या शांती-मनोर्‍यावर ही कविता कोरलेली आहे. कॅनडामधीलच नव्हे, तर अन्य देशांतील सैनिकांना ही कविता भावते. इतकेच नव्हे, या कवितेची भावनिक हाक इतकी वैश्विक आहे, की यातून युद्धविरोधकांनाही अंतर्मुख स्फूर्ती मिळते.)

- - -
In Flanders Fields
By: Lieutenant Colonel John McCrae, MD (1872-1918)
Canadian Army

In Flanders Fields the poppies blow
Between the crosses row on row,
That mark our place; and in the sky
The larks, still bravely singing, fly
Scarce heard amid the guns below.

We are the Dead. Short days ago
We lived, felt dawn, saw sunset glow,
Loved and were loved, and now we lie
In Flanders fields.

Take up our quarrel with the foe:
To you from failing hands we throw
The torch; be yours to hold it high.
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.

- - -

करुणवीररसकविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

19 Sep 2010 - 9:05 pm | श्रावण मोडक

संमीश्र स्वरूपाचा अनुवाद. पहिला भाग अवघडलेला आहे. त्यात मूळ इंग्रजीतील सहज प्रवाहीपणा निसटला. अगदी काटेकोरपणे मूळ मजकुराशी प्रामाणिक राहत तशाच प्रतिमा देण्याचा आग्रह हे त्याचे कारण आहे. दुसर्‍या भागात प्रवाहीपणा आहे, तिसऱ्या भागात पुन्हा अवघडलेपण येतं आहे.
फ्लँडर्साच्या असं करण्याचा आग्रह का? फ्लॅंडर्सच्या असे का नाही केले? मराठीत सहज बोलताना फ्लँडर्सच्या असेच म्हटले जाईल आणि तेच कवितेत येणं अधिक उचित वाटत नाही का?

धनंजय's picture

19 Sep 2010 - 9:20 pm | धनंजय

मान्य.

ही कविता प्रवाही ऐकू येण्यासाठी काही शब्दांचे उच्चार नेहमीच्या भाषेतले करावे लागतात.

ध्वनिमुद्रित करून चढवतो.

धनंजय's picture

19 Sep 2010 - 9:36 pm | धनंजय
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 9:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता वाचून दाखवण्याची तुमची पद्धत आवडते. भाषांतरात तिसर्‍या कडव्यात थोडा कृत्रिमपणा वाटला, पण या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

थोडी सूचना: "... तेव्हा त्याचा एक मित्र हल्लीच मृत्युमुखी पडला होता." 'हल्लीच'च्या जागी 'नुकताच' हा शब्द योग्य वाटतो का?

श्रावण मोडक's picture

19 Sep 2010 - 9:55 pm | श्रावण मोडक

ऐकलं. इथं ऐकताना फ्लँडर्सच्या रणामध्ये हेच उचित वाटलं मला.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Sep 2010 - 9:45 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं कविता आहे. :) छान.

पॅपिलॉन's picture

19 Sep 2010 - 10:04 pm | पॅपिलॉन

आमचे उत्तर येथे.

राजेश घासकडवी's picture

20 Sep 2010 - 4:38 am | राजेश घासकडवी

मोजके शब्द व आकारबंध नेटकेपणे पाळलेला आहे. मात्र या अनुवादामुळे मूळ कवितेतली धार कमी झाल्यासारखी वाटली.

मी एक भावानुवादाचा प्रयत्न केला आहे - इथे.

तसंच मूळ कवितेत दुसरं कडवं अर्धवट राहिलं आहे का?

धनंजय ऐकायला खूप छान एखाद्या गोष्टीसारखी वाटली.
धन्यवाद इतक्या सुरेख कवितेची ओळख करून दिल्याबद्दल.

सहज's picture

20 Sep 2010 - 6:41 am | सहज

अर्थवाही काव्यानुवाद आवडला. दोन नव्या अनुवादांना प्रेरणा दिली म्हणुन ह्या काव्याचे गुणगान करावे की परिक्षेचे पेपर तपासणार्‍या शाळामास्तरसारखे तेच तेच वाचण्यात व वेगळेपणा शोधण्यात मग्न व्हावे कळत नाही :-)

'कर चले हम फिदा' आठवले अर्थात ते गाणे एकदम 'सैनिकी' गाणे आहे.

माझ्या मराठी आंतरजालावरच्या वावरात, धनंजय नेहमीच न्याय व सत्याच्या मार्गाने प्रबोधन करताना आघाडीवर दिसले आहेत. आता त्यांच्यासारखे अनेक लोक आंतरजालावर अजुनही असलेल्या पुर्वाग्रहांना उत्तर देताना बघतो. कदाचित धनंजय म्हणुनच आता प्रबोधनातुन निवृत्त होत असतील व 'आमचा लढा पुढे चालवावा तुम्ही' असे म्हणत असतील तर नामंजुर बर का धनंजय!

पाषाणभेद's picture

20 Sep 2010 - 8:35 am | पाषाणभेद

छान कविता अन अनुवादही

चित्रा's picture

23 Sep 2010 - 3:50 am | चित्रा

कविता आवडली.

या कवितेची भावनिक हाक इतकी वैश्विक आहे, की यातून युद्धविरोधकांनाही अंतर्मुख स्फूर्ती मिळते.

म्हणजे कशी? त्याबद्दलही भाष्य हवे होते.

कवितेत कवीने सांगितलेला शोक इतका प्रामाणिक आहे, की वेदना आपल्यापर्यंत पोचतात.

"शोक प्रामाणिक आहे" म्हणजे कसा - एकही शब्दाचा नाट्यमय आलाप नाही. एखादे दृश्य बघून भकासपणे त्याचे वर्णन करतानाची ही मनःस्थिती आपल्याला पटते. आपल्या स्वतःच्या मित्रांचे मरण किंवा जवळच्या नातेवाइकांचे मरण आठवून बघावे. ढसाढसा रडणे होत असेल, तर अगदी थोडा वेळ. सुन्न-शून्य नजरेने आपण निसर्गाकडेही अगदी "वस्तुनिष्ठ"पणे बघतो. तो शोक. मेलेल्या व्यक्तीबरोबर आपण कायकाय अनुभव घेतले, त्याच्या आठवणी वरचेवर येत राहातात. एकत्र मिळून काहीकाही अनुभवायचे राहिले, असे राहूनराहून वाटते. अशीच ही पहिली दोन कडवी होत. युद्धविरोध असणार्‍याला हा शोक हादरवतो.

पुढचे कडवे दृढनिश्चयाचे आहे. कितीही मेले तरी भार दुसर्‍या कोणाच्या पाठीवर जात राहाणार. आता कवितेच्या अंतर्गत "कॅनडाची बाजूच न्याय्य आहे" हा युक्तिवाद नाही. कवीचे असे मत असेलच, शंका नाही. पण ते तपशील या कवितेत नाहीत. युद्ध नेहमीसाठी चालू राहाण्यासाठी जो मित्रशोक स्फूर्ती देतो, तो प्रामाणिक आहे, हे या कवितेतून वाचकाला पुरते पटते. तिकडे दोन मैल पलीकडे जर्मन सैनिकही जर्मन भाषेत असा-म्हणजे-असाच मित्रशोक करत असेल. मृत-मित्रांची शपथ घेऊन युद्ध पुढे चालवायचा तितकाच प्रामाणिक निश्चय करत असेल. हा विचार ओघाने मनात येतो.

युद्धविरोधी व्यक्ती प्रामाणिक शोक आणि प्रामाणिक निश्चय दोन्ही लक्षात घेतो. लढणार्‍यांच्या सैनिकांच्या हातात हे शोक-दृढनिश्चय-चक्र थांबवणे शक्य नाही, हे त्याला पटते. (याला "सूडचक्र" म्हणणे कसेसेच वाटते.) मात्र पहाट-संध्या उपभोगणारे, प्रेमी, प्रिय असण्याच्या लायकीचे तरुण वाया जाण्याचा हा चक्रीवाढ शोक थांबावा याबाबत त्याचा निर्धार अधिक पक्का होतो.

"युद्ध न्याय्य आहे" असा विचार ज्या वाचकाचा आहे, त्यालासुद्धा ही कविता स्फूर्तिदायक ठरते. कवितेचे शेवटचे कडवे "वॉर बॉन्ड"च्या जाहिरातीसाठी यूएसमध्ये सुद्धा वापरले होते.

त्या काळी युद्ध "विकण्या"साठी अशा कितीतरी कविता वापरलेल्या असतील. प्रत्येक शाळकरी पोराने र-ला-ट लावून अशा देशभक्तीच्या कविता केल्या असतील. त्या हजारोनी कविता कालवश झाल्या पण ही टिकली.

पहिल्या महायुद्धात ब्रिटनची बाजू न्याय्य होते, की जर्मनीच्या कैसरची? तो मारलेला आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड चांगला राजपुत्र होता की ऐयाश... ब्रिटनला भारतीय, कॅनडीयन, ऑस्ट्रेलियन सैनिक मरायला पाठवण्याचा हक्क होता का... आपणा तिर्‍हाइतांना या बाबतीतली उत्तरे स्पष्ट नसतीलही. तरी मॅकक्रेच्या भावनांचा प्रामाणिकपणा लख्खपणे कळून येतो. म्हणून ही कविता अजून कालबाह्य झालेली नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2010 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काव्यवाचन आवडले. आवाज तर मस्तच..!

फक्त कवितेच्या खाली लिहिलेल्या स्पष्टीकरणात तुम्ही म्हणता तसं 'कवितेची युद्धविरोधी आणि भावनिक वैश्विक हाक' एक वाचक म्हणून माझ्यापर्यंत कवितेतून पोहचत नाही. चित्रा यांनी विचारलेल्या प्रश्नांसारखेच ती भावना कशी आहे, हे कवितेतून स्पष्ट होत नाही. अर्थात आता दिलेले स्पष्टीकरण कविता समजून घेण्यास मदत करते. कवितेचा अनुवाद करुन गोड आवाजात इथे डकवल्याबद्दल धन्यु.....!

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

24 Sep 2010 - 3:36 am | धनंजय

कवितेची भावनिक हाक वैश्विक आहे - खुद्द कवितेची हाक युद्धविरोधी नाही...

ती भावनिक हाक वैश्विक आहे, म्हणून युद्ध चालू ठेवायच्या कवितेतल्या दृढनिश्चयाच्या अगदी उलट युद्धविरोधाचा निश्चय करणार्‍यांपर्यंत सुद्धा ती हाक पोचते.

इन्द्र्राज पवार's picture

24 Sep 2010 - 9:33 am | इन्द्र्राज पवार

"खुद्द कवितेची हाक युद्धविरोधी नाही....."

~~ हे तुम्ही सांगितले ते फार चांगले झाले, कारण आपले भारतीय मन नको इतके हळवे आहे 'युद्ध' या कृष्ण ढगाबाबत. पण सैनिकाला असे वाटून चालत नाही. त्याची अकाऊंटिबिलीटी फक्त आणि फक्त युद्धाशीच असते, आणि कर्नल तर पायापासून शिरापर्यंन्त १०० टक्के हाडाचे सैनिक होते. सबब त्यांच्या कवितेत युध्दाच्या विरोधात एक शब्द न येणे ही बाब त्यांच्या 'सोलेम ड्युटी' चे द्योतक आहे.

इन्द्र

धनंजय's picture

25 Sep 2010 - 3:01 am | धनंजय

अन्यत्र विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येथे देत आहे.

दोन प्रश्न होते :
१. "पॉपी" फुलाचा उल्लेख "रानफुले" असा का आहे? अफू-खसखशीचे फूल असा का नाही?
२. "लार्क"चा उल्लेख "लार्क" असाच ठेवावा का? त्यावरून शेलीच्या "लार्क" कवितेची आठवण येईल.
- - -
१. ऐतिहासिक वर्णनावरून आपल्याला कळते की कविता रचताना कवीच्या नजरेसमोर खरोखरच "पॉपी" नावाची रानफुले होती. ही फुले वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने अफूच्या फुलाच्या नात्यातली आहेत, परंतु यांच्यातून अफू निघत नाही. "पॉपी" शब्दापासून साधारणपणे इंग्रजी-भाषक लोकांच्या मनात त्यांच्या ओळखीची रंगीबेरंगी फुले येतात. अफूच्या फुलाची अंधूक आठवण येत असेल, तर ती दुय्यम आठवण म्हणून. आता "पॉपीखाली झोपणार नाही" हे शब्द वाचताना "वेगळेच पॉपीचे फूल, त्याच्या रोपट्याचा चीक उलट निद्राकारक असतो" अशी अंधूक आठवण काही लोकांना येते, हे खरे आहे. त्यातून अलंकारिक विरोधाभास जाणवत असेल, हेदेखील खरे आहे. परंतु माझ्या मते हा ध्वनित अर्थ दुय्यम आहे.
२. "लार्क" हा चंडोलाच्या जातीचा पक्षी आहे. (अथवा चंडोल हा लार्क जातीचा पक्षी आहे.) येथेसुद्धा अशी बाब आहे, की ऐतिहासिक नोंद आहे - मॅकक्रेने कविता लिहिली त्या भागात त्या ऋतूत लार्क पक्ष्यांचे फार थवे होते. मात्र लार्क हा स्वच्छंदी गाणारा, उंच उडणारा पक्षी आहे ही गोष्ट मात्र प्रकर्षाने मनात येते. शेलीचा लार्क, मेरेडिथचा लार्क असेंडिंग (राल्फ वॉहन विल्यम्सचे "लार्क असेंडिंग" संगीत) या सर्व कलाकृतींमुळे लार्कची ही उदात्त प्रतिमा इंग्रजीभाषक लोकांत आहे. मात्र "लार्क"ची उथळ-मजेदार-गंभीर-नसलेला अशीसुद्धा प्रतिमा आहे. (ऑन अ लार्क = मजा म्हणून).
ही दुहेरी प्रतिमा मराठीभाषकांत नाही. मात्र चंडोलही उंच/दूर उडणारा गाणारा पक्षी आहे. बालकवींच्या "फुलराणी" मधला चंडोल आठवावा -

"आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला"...

"चंडोल" भाषांतरामुळे "लार्क"चे प्राणिशास्त्रीय वर्णनही जमते, आणि काहीतरी अंधूक साहित्यिक पडसादही उमटतात. म्हणून भाषांतरात "चंडोल" निवडला.

- - -
इंग्रजीमध्ये "घुबड" सज्जन-शहाणे असते, तर मराठीमध्ये अपशकुनी असते. एखाद्या इंग्रजी कवितेत घुबडाचा उल्लेख आला, तर भाषांतरकाराने काय करावे? भाषांतर करणे म्हणजे मॅसोकिझमचा प्रकार आहे! अशी कुचंबणा होताना भाषांतरकाराचा आनंद होतो की काय...

इन्द्र्राज पवार's picture

25 Sep 2010 - 2:58 pm | इन्द्र्राज पवार

"परंतु यांच्यातून अफू निघत नाही. "पॉपी" शब्दापासून साधारणपणे इंग्रजी-भाषक लोकांच्या मनात त्यांच्या ओळखीची रंगीबेरंगी फुले येतात."

~~ तुमच्या वरील विधानाला "आय डीफाय, मिलॉर्ड" धर्तीचा वकिली प्रतिसाद म्हणून नव्हे तर एक 'सिम्बॉलिझम' म्हणून इंग्रजी-भाषक पॉपीकडे कसे पाहातात हे पाहण्यासाठी विकीवरून घेतलेला खालील उतारा : (याकडे एक सर्वसाधारण वाचन म्हणून पाहावे. दोघांच्याही कवितेच्या संदर्भात या माहितीला महत्व देवू नये....शेवटी तो भावानुवाद आहे.)

Symbolism

Poppies have long been used as a symbol of both sleep and death: sleep because of the opium extracted from them, and death because of their (commonly) blood-red color. In Greco-Roman myths, poppies were used as offerings to the dead.[1] Poppies are used as emblems on tombstones to symbolize eternal sleep. This aspect was used, fictionally, in The Wonderful Wizard of Oz to create magical poppy fields, dangerous because they caused those who passed through them to sleep forever.[1]

A second meaning for the depiction and use of poppies in Greco-Roman myths is the symbolism of the bright scarlet colour as signifying the promise of resurrection after death.[2] The poppy of wartime remembrance is Papaver rhoeas, the red flowered Corn poppy. This poppy is a common weed in Europe and is found in many locations, including Flanders Fields, the setting for the famous poem by Canadian surgeon and soldier, John McCrae, "In Flanders Fields".

त्यामुळे पॉपी=अफू=निद्रा हे मेतकूट प्रतिकात्मक असावे.

इन्द्रा

दुव्यामधील दुसर्‍या अर्थामध्ये अफू/झोप नाही. मरणाच्या उलट पुररुज्जीवन (रिसरेक्शन) अर्थ आहे.

ग्रेकोरोमन मिथच्या उल्लेखानंतर "वॉरटाइम रिमेंब्रन्स"च्या तिसर्‍या अर्थाला "थर्ड मीनिंग" असे लिहायला विकीलेखक विसरलेला आहे. "कॉर्न पॉपी" हे "वीड" (रानफूल) युरोपात मोठ्या प्रमाणात उगते, असे मात्र विकीलेखक सांगतो. आणि त्या संदर्भात फ्लँडर्स फील्ड्स कवितेचा उल्लेखही करतो हे विशेष. या फुलाचा अफूशी संबंध नाही.

सामान्यपणे दिसणार्‍या फुलाबद्दल उल्लेख असला तर लोकांमध्ये असामान्य अफूच विचार प्राथमिक म्हणून येणार नाही. (येत नाही.) उदाहरणार्थ "मधमाशी" ही विशेष प्रकारची माशी मध बनवते, तिच्याबद्दल "कामसू", "रागावून डसणारी" वगैरे प्रतिमा मराठी बोलणार्‍यांना असते. मात्र सामान्य माशीबद्दल उल्लेख आला (उदाहरणार्थ : "तुपात पडली माशी" हे बालकाव्य) तर सामान्य ओळखीची बिन-मधाची माशीच मनात येते. "कामसू", "रागावून डसणारी" वगैरे अर्थ एखाद्या रसिकाच्या मनात आले तर दुय्यम म्हणून येतात.

ऋषिकेश's picture

23 Sep 2010 - 8:55 am | ऋषिकेश

कवितांतर आवडले :)

सुरेख. भावानुवाद व मूळ कविता, दोन्ही.
ध्वनिमुद्रण मात्र ऐकू शकले नाही. पुन्हा कधीतरी. इथून काढून टाकू नये अशी धनंजय ह्यांना विनंती.

विनायक प्रभू's picture

25 Sep 2010 - 3:01 pm | विनायक प्रभू

आवडली