✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५

अ
अर्धवट यांनी
Mon, 08/16/2010 - 20:04  ·  लेख
लेख
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४ त्या जंगलात फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे आवश्यक होते.. तिथल्या गाड्या नाहीयेत.... झालं.. एवढ्या कष्टावर बोळा फिरणार असं वाटलं क्षणभर. थोडी आजुबाजूला चौकशी केल्यावर शेजारच्या गावात भाड्याने गाडी मिळू शकेल असा सुगावा लागला. एकट्यासाठी एवढे पैसे द्यायला जिवावर येत होतं. पण माज करायचाच तर दात टोकरून कशाला असा अस्सल विचार करून, थेट टोयोटाची, उघड्या छताची, फोर व्हील ड्राइव्ह, स्टेशन वॅगन ठरवली दोन दिवसासाठी, तिथल्याच एका रेंजरला चालक म्हणुनही ठरवून टाकला.. आणि क्षणाचाही विलंब न करता जंगलात घुसलो...आत शिरल्यावर सर्वप्रथम काय झालं असेल, तर जंगल ह्या संकल्पनेला जोरदार धक्का बसला. पण हा धक्का सुखद होता. हे काही सदाहरीत जंगल नव्हे. हा तर सॅव्हाना प्रदेश. चारही बाजुला क्षितीजापर्यंत पसरलेलं पिवळंधम्मक गवत, चार ते बारा-पंधरा फूट उंचीचं... अधुनमधुन 'जागते रहो' असं सांगत रामोशासारखे उभे असणारे वृक्ष... नजर जाइल तिथपर्यंत फक्त पिवळा सोनसळी प्रकाश... मावळत्या प्रकाशात नववधुसारखं सामोरं आलेलं हळदीच्या माखल्या अंगाचं रान... वाह.. काय बेहोषी पहिल्या भेटीतच... मी भारावल्यासारखा तो पिवळा-तांबूस सोहळा पाहात होतो. ती मावळतीची छटा, पिवळ्या गालिचावरून अस्तंगत होणारा तो लाल गोळा.. रंग बघावेत.. की आकार.. की सावल्या पहाव्यात.. की नुसते आवाज ऐकावेत.. गवताच्या पात्याची ती तळपत्या तलवारीसारखी सारखी सळसळ्..त्या पात्यावरून प्रकाशाची तिरीप चमकुन होणारा भास्..कधि ते चकाकतं सळसळतं गवत पाण्यानं भिजुनंच चमकतय असं वाटतं.. आणि ह्या सगळ्यावर आपल्या आरस्पानी सौंदर्यानं मुक्त बागडणारे ते पशुपक्षी. कधी शेकडो हरणांचे, काळवीटांचे कळप तर कधी एखादाच हत्ती, तर कधी लगबगीनं जाणारा एखादा जिराफ किंवा झेब्रा. एखादा निवांतपणे गवत खाण्यात गुंग झालेला शेकडो हरणांचा अथवा काळविटांचा कळप म्हणजे तर साक्षात काव्यच.. ती झोकदार, अवखळ चाल, जराशा आवाजानं टवकारणारे कान.. तुमच्याकडं पाहुनही न पाहिल्यासारखं करणारी ती मोहक नजर.. आणि अचानक, अगदी अनपेक्षीत उधळणारा तो संपुर्ण मुक्तछंद....पाण्यावर दगड मारल्यावर अचानक जशा लहरी चौफेर उसळाव्यात तशी चपळ, त्वरीत पण लयबद्ध हालचाल.. एक एक चित्र म्हणजे अक्षरशः एकेक कविताच... आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही. आपली गाडी दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होइपर्यंत टक लावून मान किंचितही न झुकवता दोन-तीन नर सतत आपल्याकडे बघत असतात. त्या नजरेचं संमोहन जबरदस्त असतं.. खेचलेच जातो आपण.. यालाच रानगारूड म्हणत असावेत का.. आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, पण खरा झेब्रा जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा जनजागृती मोहीम, शिट्टी, लाल दिवा कश्शाचीही आवश्यकता नसते. गाड्या आपोआप बंद होतात. नजर थबकते. जिराफ वगैरे भारदस्त मंडळींची तर काय ऐट विचारता, आपला घास खाता खाता मान तिरकी करून असं रोखुन बघतील की आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं, आणि आपण अनाहुतपणे बोलुन जावं 'चालुदे, चालुदे.. सावकाश' पण हे सगळं, बघायला ओपन ४*४ असेल तरच खरी गंमत. छत उघडं टाकून, उभं राहुन, मोकळा, भणाणता वारा कान सुन्न होइपर्यंत तोंडावर घ्यायचा. चारीबाजुला नजर फिरवुन, त्या अथांग पिवळ्या कॅनव्हासवर एखादा फटकारा जिकडे दिसेल ती दिशा चक्रधराला ओरडुन सांगायची... की निघाले त्या दिशेने सुसाट.. चांगली गाडी, चांगला चालक आणि चांगली नजर असेल तर सफारीत मजा आहे.. नाहितर थोडं अडचणीचंच काम आहे ते... माझ्या बरोबर एक युरोपियन जोडपं बिचारं छोट्या कारमधुन आलं होतं.. प्रत्येक ठिकाणी हे पोहोचेपर्यंत प्राणी पसार व्हायचे.. प्रत्येक वेळेला हे त्यांच वरातीमागुन घोडं बघुन मलाच दया आली. सॅव्हाना मधे पाहायचे ते 'बिग फाइव्ह' म्हणजे सींह, हत्ती, चित्ता, बफेलो, आणि गेंडा.. यापैकी हत्ती, बफेलो उदंड दिसले.. गेंड्यानं पण लांबुन दर्शन दिलं.. चित्त्याचा काही योग आला नाही.. आणि वनराजांच काय झालं हे पुढच्या लेखात.. काही प्रकाशचित्रे टाकतोय.. अगदी साधा कॅमेरा नेला होता, पॉइंट अँड शूट... काही फोटो चांगले आले असतील तर ती रानाची जादू, माझी कला नाही.. काही नसतील आले तर ते काव्य मला लक्षांशानेही टिपता आलं नाही हा साधा निष्कर्श. इथल्या फोटोंचा एक वेगळा संग्रह कलादालनात प्रकाशीत करावा म्हणतो.. म्हणजे अजुन बरेच फोटो टाकता येतील..  

Book traversal links for धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५

  • ‹ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
  • Up
  • धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7588 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

सुंदर

सुनील
Mon, 08/16/2010 - 20:20 नवीन
अप्रतिम!!! फोटोंचा वेगळा धागा काढाच!
  • Log in or register to post comments

फोटो लैच भार्री..

वात्रट
Mon, 08/16/2010 - 20:25 नवीन
<<आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, >> खरय आणि ते डुंबनारे प्राणी म्हणजे गेंडा दिसतोय हो न? .
  • Log in or register to post comments

गेंडा न्हाय, पानघोडा हाय

अनाम
Mon, 08/16/2010 - 20:37 नवीन
गेंडा न्हाय, पानघोडा हाय त्यो. (पाणघोडा ??? काय साम्य आहे घोड्यात आणी याच्यात? एक वेळ समुद्रीघोड्याच तोंड पटावरल्या घोड्याशी मिळत-जुळत असत म्हणुन ठीक आहे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वात्रट

आधी विलासरावांची परदेशवारी

अनाम
Mon, 08/16/2010 - 20:29 नवीन
आधी विलासरावांची परदेशवारी आणि आता अर्धवटरावांची सफारी.. मज्जाच मज्जा :)
  • Log in or register to post comments

ठीक

श्रावण मोडक
Mon, 08/16/2010 - 20:29 नवीन
ठीक. म्हणजे लेखन नेहमीचेच. ठीक अशासाठी म्हटले की, "हे ठीक. पुढं काय?" थोडक्यात वाट पाहतो आहे. हे काही १+१ नव्हतं.
  • Log in or register to post comments

जिराफ

प्रियाली
Mon, 08/16/2010 - 20:40 नवीन
जिराफाच्या अंगावर चौकोनी, गोलाकार, पंचकोनी वगैरे आकारांचे ठिपके पाहिले होते परंतु दातेरी ठिपक्यांचा जिराफ पहिल्यांदाच पाहिला. अधिक शोध घेता त्याला मसाई जिराफ म्हणतात असे कळले. नवी माहिती समजली. फोटो आवडले पण शेवटच्या चित्रातला प्राणी समजला नाही. ;) यावेळेस लेखातून विशेष काही हाती लागले नाही पण फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले पण शेवटच्या चित्रातला प्राणी समजला नाही

चिंतामणी
Tue, 08/17/2010 - 00:32 नवीन
प्रियाली लै भारि. (हसुन हसुन पडल्याने खुर्ची मोडली. तिच्या भरपाई बद्दल नंतर लिहीन.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

प्रियाली तै

मी-सौरभ
Tue, 08/17/2010 - 21:34 नवीन
:) तुम्ही भलत्याच विनोदी बगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

वाचतोय दादा !

शाहरुख
Mon, 08/16/2010 - 20:59 नवीन
सगळे भाग वाचले..लेखन अलंकारिक असूनही नाटकी अजिबात वाटले नाही :-)
  • Log in or register to post comments

मस्त फोटू! वर्णनही आवडलं.

रेवती
Mon, 08/16/2010 - 21:27 नवीन
मस्त फोटू! वर्णनही आवडलं. जिराफाच्या अंगावर वाळलेली पानं चिकटवल्यासारखी वाटताहेत. झेब्र्याचं वर्णन जास्त आवडलं.
  • Log in or register to post comments

बा अर्धवटा!!! लेख आणि फोटो

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/16/2010 - 21:33 नवीन
बा अर्धवटा!!! लेख आणि फोटो बघून तुझा लै लै हेवा वाटला रे...
  • Log in or register to post comments

अगदी अगदी हेच!!

चतुरंग
Mon, 08/16/2010 - 21:35 नवीन
(चतकोर)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

नंदन
Tue, 08/17/2010 - 03:39 नवीन
सहमत! वर्णन आणि फोटो - दोन्ही झकास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मस्त...लहानपणापासूनच

शिल्पा ब
Mon, 08/16/2010 - 22:08 नवीन
मस्त...लहानपणापासूनच discovery वर आफ्रिका पहिल्यापासून तिथे जायची इच्छा आहे....तुमचे लेख म्हणजे जवळच्या माणसाने recommend करावे तसे आहेत...छान...आणि सगळ्या गोष्टी जरा डिटेल मध्ये लिहित चला हि विनंती.
  • Log in or register to post comments

मज्जा आहे

विलासराव
Mon, 08/16/2010 - 23:11 नवीन
मज्जा आहे बुवा तुमची. आणी आमचीपण........कारण बसल्या जागेवर आफ्रिकन सफारीचा योग आमच्या कुंडलीत दिसतोय. चालु द्या.
  • Log in or register to post comments

हैच! लय मस्त लिहिलंय,, काहि

ऋषिकेश
Mon, 08/16/2010 - 23:30 नवीन
हैच! लय मस्त लिहिलंय,, काहि वेळा तुमचे वर्णन इतके छान फुलले आहे की फोटोची गरज भासु नये मात्र अजून मोठे लिहा राव! हे लांबीला ठीक ठीकच आहे
  • Log in or register to post comments

अर्धवटभाउ

चिंतामणी
Tue, 08/17/2010 - 00:36 नवीन
फोटोची संख्या वाढली अन मजकूर कमी झाला. तुम्ही TRP(तुमचा भाव)वाढवायच्या मागे आहात का????
  • Log in or register to post comments

मस्तच

धनंजय
Tue, 08/17/2010 - 03:34 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

झकास फोटो आहेत पण तपशीलवार

नगरीनिरंजन
Tue, 08/17/2010 - 08:04 नवीन
झकास फोटो आहेत पण तपशीलवार माहिती असेल तर आणखी चांगलं होईल.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन; फोटो जास्त सुंदर

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/17/2010 - 08:54 नवीन
सुंदर लेखन; फोटो जास्त सुंदर आहेत का ललितलेखन हे ठरवता येत नाहीये. फोटोंचा वेगळा धागा काढण्याच्या सूचनेला अनुमोदन.
  • Log in or register to post comments

व्वा!

समंजस
Tue, 08/17/2010 - 10:25 नवीन
सुंदर! अप्रतिम!! सर्वच छायाचित्रे. वेगळ्या धाग्यात इतरही छायाचित्रे येउदेत :)
  • Log in or register to post comments

निसर्गाचे ..

गणेशा
Tue, 08/31/2010 - 18:34 नवीन
निसर्गाचे वर्णन खुप सुंदर काव्यात्मक पधतीने केले आहे. मस्त एकदम, निसर्गाचा अप्रतिम देखावापाहिला की मन ही अगदी हरवुन जात असेल नाही ? - शब्दमेघ
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा