तरुणीशिक्षणनाटिका

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
7 Aug 2010 - 3:46 pm

(प्राचीन कवींच्या काव्यातील काही आल्हाददायक भाग द्यावा असे काही मिपाकरांनी सांगितल्यावरून एक नमुना )

प्राचीन कवींनी बहुतांशी धार्मिक लेखनच केले असले तरी तेवढेच केले असे म्हणावयाचे कारण नाही. पांडवप्रताप म्हटला तर धार्मिक ग्रंथ आहे, म्हटला तर मनोरंजक कथासंग्रह आहे. त्यातील जवळजवळ सार्‍या गोष्टी फ़ॅन्टसी या सदरातच मोडतील. आज एका मनोरंजक काव्याचा परिचय करून घेऊ. "बिल्हणचरित्र" या संस्कृत ग्रंथाचे "विठ्ठल" या वामन पंडिताच्या काळातील कवीने केलेले भाषांतर आज बघू. कथा अशी.

विक्रमांकदेव या राजाच्या शशिलेखा किंवा चंद्रकला ह्या रूपयौवनसंपन्न बुद्धिमान कन्येला अनेक शास्त्रांचे शिक्षण देऊन विद्यासंपन्न करावे असे राजाला वाटले. कर्मधर्मसंयोगाने "चौरपंचासिका", कर्णसुंदरी" इत्यादि काव्यांचा कर्ता तरुण कवी बिल्हण राजाला भेटला व त्याची विद्वत्ता, अंगचे चातुर्य पाहून राजाने आपल्या कन्येच्या कलाशिक्षणाकरिता त्याची नेमणुक केली. सुमुहुर्तावर गुरुजींनी शिष्य़ेला पाठ द्यावयास सुरवात केली व काही दिवसातच राजकन्या विद्यातेजाने चेतोहर दिसू लागली. मग "तरुणीशिक्षकनाटिकेत" ला पुढचा प्रवेश सुरू झाला. गुरुजींनी शिष्येला सांगितले की "तुला सर्व शास्त्रे पढवली पण "स्मरशास्त्र" तेवढे राहिले". अर्थात शिष्येने आग्रह केला की "तेवढे कशास ठेवावयाचे ? तेही शिकवून मगच तुम्ही स्वदेशास जा." आग्रहाला बळी पडून त्या शास्त्राचे धडे गिरवावयास सुरवात झाली थोड्याच दिवसात राजकन्या "पुरुषभुक्त" झाली आहे असे दासींच्या लक्षात आले. राजाच्या कानावर गेल्यावर भडकून राजाने बिल्हणाला सुळाची शिक्षा ठोठावली.

शिपायी बिल्हणाला सुळावर चढवावयाला घेऊन गेले व त्याला म्हणाले "घे देवाचे नाव" . बिल्हण काही बोलेना तेव्हा ते त्याला म्हणाले "अद्याप कां न भजसी भगवंतजीतें !" अखेर बिल्हण म्हणाला, "माझे मनाला दुसरे कांहींच दिसत नाही. माझी देवी ती चंद्रकला, ती मला दिसते,

"मी आयिका, नृपसुतारतिसौख्य जाणें
अद्यापि देव दुसरा तिजविण नेणें "
असे उत्तर देऊन त्याने त्या आनंददायिनी नृपनंदिनीचे आणि तिच्या बरोबर अनुभवलेल्या अनेक सुखप्रसंगांचें स्मरण सुरू केले. तो म्हणाला,

अद्यापि ते कनकचंपकवर्णगौरी ! उत्फुल्लपद्मनयना तनुरोमहारी !
सुप्तौस्थिताच शयनीं मदविव्हलांगी ! विद्या जशी गति स्मरतो प्रसंगीं !!
अद्यापि चंद्रवदना नवयौवनांगी ! पीतस्तनी मजपुढें उभि हेमरंगी !
माझी तनू स्मरशरें पिडितांचि वेगीं ! गत्रे सुशितल करी सुरतप्रसंगी !!
अद्यापि ते तरुणपल्लवरक्तपानी ! चोळी तिची तटतटीत भुजंग-वेणी !
वस्त्रांचलस्खलन होत विलोकतांची ! तीच्या स्तनासि उपमा स्मरकंदुकांची !!
अद्यापि ते कुशल काव्यकला विनोदी ! तै मी स्मरें त्रिदशनाथसुखासि निंदी !
आलिंगिली भुजलता पसरोनि शाली ! ते राजहंसगमना स्मर अंतकाळीं !!
अद्यापि बाळहरिणीनयनी स्मरे मी ! कंदर्पयुद्ध मजशी करि गुप्त धामीं !
वक्षोजकुंभ घन पीन धरी स्वपाणीं ! तेव्हां सुरेंद्रसुख तुच्छ मनांत मानीं !!
अद्यापि चंद्रवदना करि फार खंती ! लावण्यसागरलता द्विजराजकांती !
रात्रौ दिवा स्मरण होय तिच्या मुखाचे ! दावा मुहुर्त मुखवारिज वल्लभेचें !!
अद्यापि धरितसे निजजीविताशा ! जन्मांतरीं वरिन हे प्रमदा परेशा !
अन्योपभोग मजला न लगेच कांहीं ! ते दाखवा शशिकला कवळीन बाहीं !!
अद्यापि वक्त्रकमलावरि भृंग येती ! गंडस्थळीं परिमळास्तव चुंबिताती !
हे वारिता ध्वनि उठे करिं कंकणाची ! तेणें करुन मुरकुंडी वळे मनाची !!
अद्यापि तन्वि मधुरावरदान देते ! म्या रोविले निजनखें स्तनमंडलातें !
उद्भिन्नरोमपुलकांकित होय बाला ! ते आठवे मदनमंजरि वेळवेळां !!
अद्यापि ते नृपसुता रतिभोगकालीं ! प्रेमाकुलें करयुगे धरिं कंठनाली !
दंतोष्टपीढनक्षतें सुखभाव दावी ! ते मे स्मरें मदनमंदिरदेवदेवी !!
अद्यापि धूर्जटि धरि विष तें स्वकंठी ! कूर्में धरागिरिवरा धरले स्वपृष्ठीं !
अंबोनिधीस वडवानल नित्य जाळी ! केलांगिकार बुध पाळिति सर्व काळीं !!

बिल्हणाचे हे बोलणे ऐकून राजाचे मन पालटले; अत्यंत अनुरुक्त अशा या दोघांस जीवदान द्यावे असे मनांत आणून त्याने शिक्षा माफ केली व त्यास आपली कन्या अर्पण केली.

थोडी लांबण लागली खरी, पण या कवींच्या कविताही लांब, त्याला काय करणार ?

शरद

!

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

छान रसग्रहण + परिचय करुन दिला आहे.

येउ द्या अजुन असेच छान छान लेखन :)

इंटरनेटस्नेही's picture

7 Aug 2010 - 4:27 pm | इंटरनेटस्नेही

+१

खूप सेन्श्युअल कविता आहे. आवडली.
यावरून आठवलं - बायबलमधील "साँग ऑफ सॉलोमन" अशाच पठडीतील मला तरी प्रथमदर्शनी वाटलं. लोकं त्यावर बराच अभ्यास वगैरे करतात. माझा अभ्यास नाही. मला फक्त वरवरचं सेन्श्युअ‍ॅलिझम कळलं.

चित्रा's picture

7 Aug 2010 - 6:43 pm | चित्रा

कनकचंपवर्णगौरीचे स्तोत्र ऐकून खर्‍या राजकन्येच्या पिताश्रींनी स्वतः जाऊन मुलाला फासावर लटकवले असते असे वाटते :)

विठ्ठल-कवीच्या काव्याची ओळख आवडली.

(का कोण जाणे, भज गोविंदम.. नहि नहि रक्षति .. आठवले. हे काव्य त्याच्या अगदी उलट असे काहीतरी वाटले. ह्या अशा गोष्टी बर्‍याच होत्या असे दिसते. उदयन-वासवदत्तेची कथाही अशाच स्वरूपाची होती असे आठवते).

पाषाणभेद's picture

7 Aug 2010 - 7:28 pm | पाषाणभेद

एकदम पिच्चरची इश्टोरी दिसूं र्‍हायलीय.
शरदराव, एकदम छान परिचय करून दिलात बघा. आम्हास असले काही वाचावयास भेटणार नाही. तुम्ही आमच्यासाठी थोडी मेहनत आणखी घ्या अन असल्या काव्याचा परिचय करून देत चला.
धन्यवाद.

निखिल देशपांडे's picture

7 Aug 2010 - 7:54 pm | निखिल देशपांडे

मस्त कविता..
असे काही मिपाकरांनी सांगितल्यावरून एक नमुना
असे नमुने अजुन येउ द्या

शारिरशृंगारात पंतकवींचा हात धरू तंतकवीच जाणो!

कवितेचा परिचय आवडला.

सुनील's picture

7 Aug 2010 - 9:29 pm | सुनील

त्याकाळात "संस्कृतीरक्षक" नव्हते हे त्या विठ्ठलाचे नशीबच म्हणायचे! नाहीतर काही खरे नव्हते बिचार्‍याचे!

बाकी, परिचय आवडला हे सां न ल.

राजेश घासकडवी's picture

7 Aug 2010 - 10:43 pm | राजेश घासकडवी

हा भाग खूपच आल्हाददायक झाला आहे अजून येऊ द्यात.

संस्कृतप्रचुर भाषेत कवीने अतिशय कामुक वर्णन केलेलं आहे.

वक्षोजकुंभ घन पीन धरी स्वपाणीं !
किंवा
म्या रोविले निजनखें स्तनमंडलातें !

अशीच विधानं रूपकांच्या वस्त्रांत लपेटून आली तरी मिसळपाववर परखड खरडी येतात. अशा ओळी 'मराठीत' भाषांतरल्या तर काय होईल कोण जाणे. संस्कृत शब्दांत ती स्तोत्रासारखी वाटावी, इतकं संस्कृतीरक्षकांचं संस्कृत कच्चं असतं का? कदाचित माझाच अभ्यास कमी असेल, कदाचित हे वर्णन आत्मा परमात्म्याच्या मीलनाविषयीचं असेल.

छान ओळख करुन दिलीट काव्याची. धन्यवाद.
अजून येऊ द्यात असे लिखाण.

उत्तम लेख. महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथात तुम्ही म्हणता तो विट्ठलाच्या कवितेचा "संपूर्णयौवनमदालसखंजनेत्री" वगैरे भाग आणि हे बॅकग्राऊंड दिलेले आहे, मात्र एक शंका अशी की तिथे या काव्याच्या संदर्भात हे चौरपंचाशिकेचे भाषांतर आहे असे लिहिलेले आहे (असे वाटते-कुणि पाहता का जरा) आणि मूळ काव्यात देखील सुरुवातीला "अद्यापि" हा शब्द होता, त्यावरून भाषांतरातदेखील तो प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला आला आहे (हे मात्र कन्फर्म)

अवांतरः

रामजोशी यांची प्रसिद्ध "छेकापन्हुति" महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथात दिलेली आहे. या अलंकाराचे वैशिष्ट्य असे, की सकृद्दर्शनी वर्णन एका गोष्टीचे आहे असे वाटावे, पण ते निघावे दुसर्‍याच गोष्टीचे उदा. खालील कविता. बॅकग्राऊंड आहे कृष्ण आणि राधा एकमेकांबद्दल त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सखा/सखींना जरा कोड लँग्वेज मध्ये सांगताहेत, तो धागा पकडून सखा/सखी बरोब्बर विचारतात की तो कृष्ण अथवा ती राधा का, आणि कृष्ण आणि राधा नंतर आढेवेढे घेऊन सांगतात की नाही, ते दुसर्‍याच गोष्टीचे वर्णन होते म्हणून. कविता मला पूर्ण नै आठवत, सबब थोडिशीच लिहिल्या गेली आहे. पण या वासावरून पक्वान्नाची झलक मिलेल असा अंदाज करायला हरकत नाही.

राधा: "गुणवंत कुचावर लोळे, अति शोभला|
सखी: तो कृष्ण काय गे सांग मला|
राधा: नव्हे गे, हार आठवला|

कृष्णः वंशसंभवा अधरचुंबिनी वाटते बरी|
सखा: वृषभानूची सुता काय रे राधा लकुचस्तनी|
कृष्णः नव्हे रे, मुरली आठवली मनी|

गुणवंत- गुणी(नेहमीच्या अर्थाने) म्हणून कृष्णः, तसेच गुण=दोरा, सबब गुणवंत=हार.
वंशसंभवा- वंश= बांबू, म्हणून बांबूपासून बनविलेली ती बासरी असा एक अर्थ, तसेच वंशात जन्मलेली असाही एक अर्थ म्हणजे इथे राधा.
कुच- छाती/स्तन.
लकुच- फणस(!)

असो. नागेश आणि विट्ठल हे लै चावट कवी असे महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात. यांपैकी कुणि एक नगरजवळील "भिंगार नामक कुग्रामात होता" असे वाचल्याचे स्मरते.