स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
20 May 2010 - 2:58 pm

वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. स्त्रीची आजची प्रतिमा या निमित्ताने या पुस्तकाची आणि माणूसकी कधीही न विसरलेल्या एका महान वैज्ञानिकाची छोटी ओळख; लिझ माईट्नर, तेरा वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालेली एक भौतिकशास्त्रज्ञ, पण नोबेल पारितोषिकपात्र वैज्ञानिकांची निवड करणारेच खुजे पडले असावे.

भौतिकशास्त्रालाच सर्वस्व अर्पून अणूकेंद्रकांवर काम करणारी लिझ, ऑस्ट्रीयात जन्मलेली ज्यू होती. बाराव्या वर्षानंतर इतर सर्व मुलींप्रमाणेच तिच्याही नशीबात घरीच बसणं होतं. घरी बसून भरतकाम शिकताना तिला त्याचीही आवड लागली. तेव्हा आजीने सांगितलं, "शनिवारी शिवणकाम करणं वाईट!" "आपण करून तर पाहू या काय होतं आहे ते!", असा विचार करून एक टाका घालायचा आणि वर पहायचं, पुढचा टाका घालायचा असं करत संपूर्ण शनिवार भरतकाम करूनही विघ्नरहित गेला. या गोष्टीला आता जवळजवळ शंभर वर्ष झाली असतील, पण आजही गणेश चतुर्थीला चंद्र पहायला नाही या आणि अशा अनेक श्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक आजूबाजूला पाहून खेद होतो. आठ वर्ष अशीच घरात काढल्यावर अचानक आशेचा किरण दिसला. पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रीयन सरकारने मुलींना महाविद्यालयीन शिक्षण खुले केले. लिझच्या मोठ्या बहिणीने महाविद्यालयीन शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेली 'मॅच्युरा' ही स्पर्धापरीक्षा प्रथम क्रमांकाने ओलांडली आणि पुढच्या वर्षी लिझनेही अथक प्रयत्नांनी महाविद्यालयामधे प्रवेश मिळवला. सुरूवातीला समाजसेवेसाठी डॉक्टर बनण्याचा विचार सोडून स्वतःची आवड म्हणून लिझ भौतिकशास्त्र शिकू लागली.

व्हीएनाच्या विश्वविद्यालयामधे तिला खुद्द लुडविग बोल्ट्झमन ("बोल्ट्झमन स्थिरांक"वाला) शिकवायला होता आणि त्याच्याबरोबरच काम करून लिझने पीएच.डी.ची पदवी मिळवली. व्हिएनामधे तिला मनाजोगते काम मिळेना म्हणून ती बर्लिनमधे आली. तिच्या वडीलांनीच तेव्हा तिला पैशांच्या रूपाने भरीव प्रोत्साहन दिले (तिच्या वयाच्या ३५ वर्षांपर्यंत ती आईवडीलांकडून पैसे घेत होती). मॅक्स प्लँक हा जगविख्यात भौतिकशास्त्रज्ञ तेव्हा (तेव्हाच्या) कैसर विल्यम संस्थेमधे कार्यरत होता. त्याच्या दर आठवड्याला असणार्‍या व्याख्यानांना उपस्थित रहाण्याची स्त्रियांना अनुमती नव्हती. पण लिझच्या बौद्धिक क्षमतेपुढे नमून प्लँकने त्याचा निर्णय बदलला. तोपर्यंत लिझसोबत काम करण्याची इच्छा ऑटो हान या रेडीओकेमिस्टने व्यक्त केली होती. ऑटोची मदतनीस म्हणून आणि पुढे ऑटोची सहकारी म्हणून लिझ काम करू लागली. ऑटो आणि लिझने बीटा-प्रारणे, अणूकेंद्रके या विषयांवर अनेक पेपर्स लिहीले. अनेक संशोधनांमधे लिझचा सहभाग ऑटोपेक्षा जास्त असूनही त्यांच्या संशोधन पेपरांमधे लिझ स्वतःचं नाव ऑटोच्या नंतरच लिहायची*.

लिझ अनेक वर्ष बिनपगारी काम करत होती. घरून मिळणारी तुटपुंजी मदत, मंदीमुळे झालेली प्रचंड महागाई यामुळे फक्त काळी कॉफी आणि पाव यांवर ती दिवसदिवस रहात होती. वयाच्या ३५व्या वर्षी तिला प्रागमधून नोकरीची पृच्छा झाल्यावर कैझर विल्यम संस्थेतच तिला १००० मार्क्स एवढे वेतन आणि ऑटो हानच्या समकक्ष पद देण्यात आले. पण ऑटोला तिच्या चौपट पगार होता.

पुढे पहिल्या महायुद्धकाळात माणुसकीपोटी लिझ युद्धक्षेत्रात परिचारीकेचे काम करत होती. तिथल्या डॉक्टरांनीच जखमांमुळे युद्धक्षेत्रातून माघार घेतल्यावर लिझही परत आली. पुढे कैझर विल्यम संस्थेतच तिला तिच्या कामासाठी स्वतंत्र विभाग दिला गेला. युद्धानंतर तिने 'ऑजे परिणामा'चे शास्त्रीय विवेचन दिले. ऑटोबरोबर केलेल्या कामातून प्रोटोअ‍ॅक्टीनियमचा स्थिर आयसोटोप तिने शोधला. जड अणूकेंद्रकांवर अल्फा कणांचा मारा करण्यापेक्षा धीम्या न्यूट्रॉन्सचा मारा केला तर त्यातून जड मूलद्रव्य तयार होतील यावर तिचा विश्वास होता. चार वर्ष या प्रयोगावर काम केल्यानंतर यात चूक आहे हे तिच्या लक्षात आले. ज्या संशोधनासाठी तिची सगळ्यात जास्त ख्याती होती त्याच कामावर बोळा फिरताना दिसत होतं, तरीही तिने मेहेनतीने ती "जड" मूलद्रव्य काय आहेत याचा शोध घेतला. अणूविखंडनाची प्रक्रिया शोधली गेली ही अशी! युरेनियम-२३५ वर धीमे न्यूट्रॉन्स आदळले की त्यातून बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतात ही गोष्ट तिच्या लक्षात आली. आपला सख्खा भाचा रॉबर्ट फ्रीश याच्याबरोबर तिने हे "जगप्रसिद्ध" संशोधन प्रसिद्ध केलं. शांतताकाळात हा शोध मिळती तर आज मॅक्स प्लँक, नील्स बोहर या लोकांबरोबरच कदाचित लिझचंही नाव भौतिकशास्त्राच्या पुस्तकांतून दिसतं.

मधल्या काळात जर्मनीत नाझींचा प्रभाव वाढत होता. जर्मनीतून निसटण्याची आलेली संधी लिझने नाकारली. अजूनही गोष्टी सुधरतील अशी वेडी आशा, पन्नाशी उलटल्यावर नव्या जागी जाण्याबद्दल असलेली भीती इ गोष्टींचा परिणाम म्हणूनही असेल पण जर्मनी न सोडण्याच्या निर्णयाबद्दल तिला पुढे अनेकदा पश्चात्ताप झाला. या काळात जगप्रसिद्ध डॅनिश शास्त्रज्ञ नील्स बोहरनेही तिला कोपनहेगनला येण्याबद्दल सुचवलं. तिचा भाचा आणि कोलॅबोरेटर रॉबर्ट फ्रिशही तेव्हा तिथेच होता. शेवटी डर्क कोस्टर या डच शास्त्रज्ञाने लिझला बर्लिनमधून पळवून नेलं आणि नेदरलंड्समार्गे ती स्वीडनच्या राजधानीत स्टॉकहोमला पोहोचली. जवळ फक्त १० जर्मन मार्क आणि डोक्यात असलेली बौद्धीक संपदा एवढीच काय तिची मिळकत होती. या वेळीस मात्र ऑटोने आपल्या बोटातली हिर्‍याची अंगठी लिझकडे दिली होती. स्टॉकहोममधे मान सीगमानच्या संस्थेतही लिझला संशोधनाचं स्वातंत्र्य मिळालं नाहीच; पण तरीही तिथूनच ती ऑटो हान आणि त्यांचा सहाय्यक फ्रिट्झ स्ट्रासमन यांना पत्रांतून मार्गदर्शन करत होती. रॉबर्ट फ्रिशच्या जोडीने तिने अणूविखंडनाचा सिद्धांत प्रसिद्ध केला आणि तिच्याच मार्गदर्शनावरून हान आणि स्ट्रासमन जोडीने युरेनियमवर न्यूट्रॉन्सच्या मार्‍यातून क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतात हे प्रयोगांनिशी सिद्ध केले.

याच काळात सुप्रसिद्ध मॅनहटन प्रोजेक्ट सुरू होतं. तिथे काम करण्यासाठी लिझलाही रितसर आमंत्रण होतं. पण "संहारक अस्त्र निर्माण करण्यासाठी मी मदत करणार नाही", असं सांगून तिने नकार दिला. जपानमधे अण्वस्त्र पडल्यानंतर संपूर्ण मिडीयाने तिला "बाँबची ज्यू जननी" म्हणून डोक्यावर घेतलं. प्रसिद्धीची हाव नसलेल्या लिझला तिच्यासंदर्भात 'बदला' वगैरे गोष्टी ऐकून प्रचंड त्रास झाला; अनेक वर्षांपूर्वी ती कॅथलिक झाली होती हे तिचं बोलणं वार्‍यावरच विरलं. याच संशोधनाबद्दल ऑटो हानला युद्धसमाप्तीनंतर नोबेल पारितोषिक देण्यात आले. आणि या संपूर्ण प्रयोगाची नेती लिझ?

युद्धानंतर ऑटोने आपले स्थान जपण्यासाठी लिझचा उल्लेख टाळला, लिझचं कर्तृत्व जिथे जिथे शक्य असेल तिथे नाकारलं. मदतनीस स्ट्रासमनला त्याने किमान पारितोषिकातले १०% देऊ केले (हाच पैसा स्ट्रासमन पति-पत्नीने "भीक नको" अशा भावनेने नाकरला!) पण लिझ मात्र सदैव दुर्लक्षित राहिली. फ्रिट्झ स्ट्रासमनच्या म्हणण्यानुसार लिझ जन्माने ज्यू असूनही पुरूष असती तर ऑटो हानला तिचं श्रेय नाकारणं शक्यच झालं नसतं. तरीही नोबेल वितरणाच्या समारंभात ऑटो आणि त्याची पत्नी एडीथ यांच्या मैत्रीखातर ती तिथे उपस्थित राहिली!

लिझने तिचं आत्मचरित्र लिहिलं नाही; तिने मागे ठेवलीत ते तिने बनवलेली उपकरणं, त्यांचे आराखडे आणि प्रचंड प्रमाणात शास्त्रीय संशोधनकार्य आणि पत्रव्यवहार! तिच्या आयुष्यावर आधारित The beginning of the end नावाचा चित्रपट लिझने परवानगी नाकारल्यामुळे सुरूवातीलाच बासनात गुंडाळला गेला. आयुष्यभर आणि आयुष्याच्या शेवटासही आर्थिक हलाखी, पैशांची चणचण असतानाही सत्याचा अपलाप करणार्‍या स्क्रिप्टला तिने अजिबात होकार दिला नाही.

भौतिकशास्त्राला संपूर्णपणे वाहून घेतलेली ही संशोधक वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिचा भाचा, रॉबर्ट फ्रिश याच्या केंब्रिजमधल्या घरी निर्वतली. हॅंपशरमधल्या एका चर्चमधे तिच्या भावाच्या शेजारी तिला पुरलं. लाडक्या मावशीच्या कबरीच्या दगडावर रॉबर्टने खोदवून घेतलं: "Lise Meitner: a physicist who never lost her humanity."

*ज्या व्यक्तीने काम जास्त केलं असतं तिचं नाव संशोधनात आधी लावलं जातं, या हिशोबात पेपर्स "माईट्नर आणि हान" असे असायला हवे, जे "हान आणि माईट्नर" आहेत.

पुस्तकाचं नाव: लिझ माईट्नर
लेखिका: वीणा गवाणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

समाजजीवनमानविज्ञान

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2010 - 3:28 pm | प्रकाश घाटपांडे

"शनिवारी शिवणकाम करणं वाईट!" "आपण करून तर पाहू या काय होतं आहे ते!"

त्येंच्याक बी शनवारी शिवत नवती मान्स. वाचुन मौज वाटली
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सहज's picture

20 May 2010 - 3:34 pm | सहज

प्रेरणादायी व्यक्तीमत्व.

इन्द्र्राज पवार's picture

20 May 2010 - 3:41 pm | इन्द्र्राज पवार

आपला हे अभ्यासपूर्ण लेखन वाचल्यानंतर मला जेम्स मिचेनरच्या एका लेखाची प्रकर्षाने आठवण झाली. त्या लेखाचे शीर्षकच त्याने दिले होते ~ "यू नेव्हर स्टॉप लर्निंग..." ~ किती योग्य आहे असे म्हणणे, विशेषतः असले लिखाण वाचल्यावर, हे पटते. "लिझ" च्या वाट्याला जे दुर्लक्ष आले ती तर नारी विश्वाची खंतच आहे. मेरी क्युरीची तर अशीच अवस्था होती ना? दोन वेळा "नोबेल" पारितोषिक विजेतीलादेखील सुरुवातीची वर्षे "दाई"चे काम करावे लागले होते, तर ट्युशन फी भरण्याची ऐपत नाही म्हणून कॉलेज प्रवेश नाही, तर पुढे थोडे पैसे जमा केले तर विद्यापीठाने "स्त्री" म्हणून प्रवेश नाकारला. असो.

एका फार चांगल्या आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आपले अभिनंदन..!

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

लेख आवडला
युद्धानंतर ऑटोने आपले स्थान जपण्यासाठी लिझचा उल्लेख टाळला
फ्रिट्झ स्ट्रासमनच्या म्हणण्यानुसार लिझ जन्माने ज्यू असूनही पुरूष असती तर ऑटो हानला तिचं श्रेय नाकारणं शक्यच झालं नसतं

तिच्या बध्द्ल मी वाचलेला किस्सा
लिझ माईट्नर, ही हिटलरच्या राज्यात जागतिक दर्जाची संशोधक होती. पण तिच्याच कार्यालयातील लोक तिच्याबरोबर चालत जात असलेल्या तिच्या हाताखालील दुय्यम सहकार्‍यांना 'गुड मॉर्निंग' सारखे अभिवादन त्यांच्या भाषेत करीत. परंतु तिच्याकडे पाहात देखील नसत. एकास्त्रीला बॉस म्हणून त्याकाळी पुरुष सहन करु शकत नसत . आजही इतक्या वर्षांची मानसिकता काहीकाही ठिकाणी कायम आहे, ती बदलणें सोपें नाहीं. आताशीं कोठें हें सत्य समाज पचवायला लागला आहे.

अवांतर :
शनिवारी शिवणकाम करणं वाईट!"
अरेच्चा, त्यांच्याकडेही असंच विचार करतात का ? 8}
~ वाहीदा

Dhananjay Borgaonkar's picture

20 May 2010 - 3:57 pm | Dhananjay Borgaonkar

लिझची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आजच्या काळात कामापुढे पैशाला कमी महत्व देणारे असे किती लोक असतील?

समंजस's picture

20 May 2010 - 4:18 pm | समंजस

छान लेख लिहीलाय अदितै :)
तुमची ही लेखमाला बरीच उपयुक्त ठरतेय कर्तुत्ववान स्त्रियांबद्दल माहिती मिळायला!!!

मस्त कलंदर's picture

20 May 2010 - 4:19 pm | मस्त कलंदर

अदिती, नव्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली यात शंकाच नाही.. अशा लोकांबद्दल वाचले, की स्वतःच्या खुजेपणाची जाणीव खूप प्रकर्षाने होते.
पुस्तक लवकरच वाचेन गं मी...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चिंतातुर जंतू's picture

20 May 2010 - 5:20 pm | चिंतातुर जंतू

"शनिवारी शिवणकाम करणं वाईट!"

शनिवार हा ज्यू धर्मी लोकांचा साप्ताहिक सुटीचा दिवस असतो. ज्यू धर्मीयांना त्या दिवशी अनेक गोष्टी प्रतिबंधित असतात. जिथं या धर्माचा उगम झाला, त्याच भूभागात जन्मलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांतले काही लोकही हे पाळतात. इतकंच नाही, तर आपल्याकडच्या 'नाकर्त्याचा वार शनिवार' या परंपरेमागेही अनेक शतकांपूर्वी पश्चिम किनार्‍यावर येऊन राहिलेले ज्यू धर्मी लोकच आहेत, असाही एक प्रवाद ऐकण्यात आहे. कोकणापुरतं सांगायचं तर त्यात तथ्य असायला नक्कीच जागा आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

ऋषिकेश's picture

20 May 2010 - 5:30 pm | ऋषिकेश

अशी व्यक्तीमत्त्वं प्रेरणादायक तर असतातच पण त्यांना मिळालेली वागणूक बघुन एकीकडे माणूस म्हणून वाईट वाटते तर दुसरीकडे काहि बाबतीत अजूनही हा भेद समाजात दिसतो त्यामुळे खजीलही करते.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चिंतातुर जंतू's picture

20 May 2010 - 5:40 pm | चिंतातुर जंतू

उघड उघड स्त्री द्वेष्टे असणारे लोक इथे कमी असतील, अशी आशा आहे; मात्र, खंडीभर मराठी माणसांत हिटलरला प्रेरणास्थानी मानणारे किमान मूठभर लोक तर नक्कीच आढळतात, असा अनुभव आहे. हिटलरपासून प्रेरणा घेतलेले अनेक राजकीय नेते आजही विशिष्ट जाती-धर्म-भूभागातले लोक 'इथे' नकोतच, असं म्हणत आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात, आणि त्यांना सुशिक्षित मराठी माणूस आपल्या हृदयाचे सम्राटही बनवताना दिसतो. ज्यू द्वेषाला खतपाणी घालून हिटलरच्या जर्मनीनं किती प्रतिभावंतांना गमावलं, याची जाणीव पुन्हा एकदा करून देणारी ली़ज़ माईट्नरची कहाणी अशांसाठीही बोधक ठरू शकेल.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

स्वाती दिनेश's picture

20 May 2010 - 5:41 pm | स्वाती दिनेश

लेख उत्तमच आहे, ओळख आवडली.स्फूर्तीदायक!
(जाता जाता- वीणा गवाणकरांनी आयडा स्कडर वरही लिहिलेले पुस्तक असेच प्रेरणादायी आहे.)
स्वाती

बहुगुणी's picture

20 May 2010 - 5:52 pm | बहुगुणी

धन्यवाद, अदिती.

या आधीच्या प्रत्येक लेखाचा दुवा पुढच्या लेखात सुरूवातीला असला तर बरं होईल, म्हणजे वाचायचे राहून गेलेले लेख शोधत बसायला लागणार नाही.

डावखुरा's picture

21 May 2010 - 1:43 am | डावखुरा

उत्तम व्यक्तिमत्वाची उत्तम शब्दांत ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु..
आणि पुलेशु.
बहुगुणी यांच्या सुचनेला दुजोरा.... ----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

Just for the sake of completeness: अदिती व्यतिरिक्त इतर लेखकांनी लिहिलेले याविषयीचे लेख खालील दुव्यांवर आढळतातः

स्त्रीची आजची प्रतिमा -भाग २ - राजेश घासकडवी
स्त्रीची आजची प्रतिमा - भाग ३ - बिपीन कार्यकर्ते
आजची स्त्रीची प्रतिमा - भाग ३ गार्गी - हृषीकेश (हाच लेख मिपावरही वाचला होता, त्याचा दुवा सापडला नाही)

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2010 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ग.

ओळख आवडली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 May 2010 - 6:13 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची उत्तम ओळख.

मुक्तसुनीत's picture

20 May 2010 - 6:50 pm | मुक्तसुनीत

असेच म्हणतो.

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 11:24 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

अस्मी's picture

21 May 2010 - 10:33 am | अस्मी

असेच म्हणते....अतिशय सुंदर लेख :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

चित्रा's picture

20 May 2010 - 6:15 pm | चित्रा

लेख आवडला.
कितीही बुद्धिमान शास्त्रज्ञ झाले तरी त्यांनाही निर्णय घेताना चलबिचल, आणि कधीकधी चुकाही होत असतात, असे दिसते. लिझ यांना नोबेल मिळाले नाही, याबद्दल विकीपीडियावर असे वाचले - A 1997 Physics Today study concluded that Meitner's omission was "a rare instance in which personal negative opinions apparently led to the exclusion of a deserving scientist" from the Nobel.

अरुंधती's picture

20 May 2010 - 6:44 pm | अरुंधती

अदिती, उत्तम व माहितीपूर्ण लेख! एवढ्या हालांमध्ये दिवस काढून आपल्या ध्येयाप्रती, अभ्यासाप्रती इतके प्रामाणिकपण व तळमळ..... केवळ अप्रतिम व स्फूर्तीदायी! धन्यवाद एवढ्या गाढ्या संशोधिकेची ओळख करून दिल्याबद्दल! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

20 May 2010 - 6:46 pm | स्वाती२

छान ओळख!

सुवर्णमयी's picture

20 May 2010 - 6:55 pm | सुवर्णमयी

लेख आवडला. सुरेख ओळख करून दिली आहेस
सोनाली

मदनबाण's picture

20 May 2010 - 9:23 pm | मदनबाण

लेख आवडला...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

मिहिर's picture

20 May 2010 - 10:30 pm | मिहिर

छान झालाय लेख.
वाचले आहे ते पुस्तक. मस्तच आहे.
अवांतर: हे पुस्तक वाचल्यावर मी वर्गातल्या मुलांना nuclear fission चा शोध कोणी लावला ते विचारत असे. त्यांनी पुस्तकात दिलेले ऑटो हान व स्ट्रासमन सांगितले की मी त्यांना माइटनरबद्दल सांगे व लक्षात ठेवण्यास सांगे.

श्रावण मोडक's picture

20 May 2010 - 10:33 pm | श्रावण मोडक

मालिका वाचतो आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

Nile's picture

20 May 2010 - 11:14 pm | Nile

छान ओळख! लिझवर निघालेली डीक्युमेंटरी The Path to Nuclear Fission: The Story of Lise Meitner and Otto Hahn मी पाहिली आहे, तिचा सुरुवातीचा काळ, हान बरोबरचे काम, रॉबर्ट बरोबरचे संवाद वगैरे गोष्टी छान चित्रीत केल्या आहेत. मिळाल्यास जरुर पहा.

त्या डॉक्युचा ट्रेलर येथे पाहता येईल.

-Nile

अनामिक's picture

20 May 2010 - 11:05 pm | अनामिक

लेख आवडला. धन्यवाद अदिती.

-अनामिक

शिल्पा ब's picture

20 May 2010 - 11:39 pm | शिल्पा ब

खुपच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाविषयी लेख लिहिल्यबद्द्ल आभारी आहे..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

नंदन's picture

21 May 2010 - 5:07 am | नंदन

लेख.

त्याच्या दर आठवड्याला असणार्‍या व्याख्यानांना उपस्थित रहाण्याची स्त्रियांना अनुमती नव्हती. पण लिझच्या बौद्धिक क्षमतेपुढे नमून प्लँकने त्याचा निर्णय बदलला

-- यावरून कमलाबाई सोहोनींनी सर सी. व्ही. रामन यांना त्यांचा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मध्ये स्त्रियांना प्रवेश न देण्याचा निर्णय बदलायला लावला होता, त्याची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शुचि's picture

21 May 2010 - 5:17 am | शुचि

लेख खूप आवडला आदिती.
प्रेरणा घेऊन थोडं वाचलं ते लिहीते - ६ जानेवरी १९३९ या दिवशी ऑतो हान आणि लिझ माईट्नर यांच्या नीरीक्षणात पुढील गोष्ट आली ती अशी की न्यूट्रॉन्स चा मारा युरेनियम वर केला असता , युरेनियमचा अणू जवळ जवळ अर्धा झाला. त्यांची खात्री पटली की २ अधिक हलक्या गोष्टी जन्मास आल्या असाव्या. पण त्यातही सर्वात धक्कादयक गोष्ट ही होती की - त्यांच्या ऑसिलोस्कोपवर 200,000,000 इतक्या व्होल्ट्स ची नोंद झाली. ऑटो हन चे लक्ष पूर्ण रासायनिक प्रक्रियेतच गुंतले गेले आणि ही उर्जानिर्मीती ची अतिशय महत्त्वाची नोंद त्याने गंभीरतेने घेतली नाही. परंतु लिझ माईट्नर ला कळून चुललं होतं की ही महत्त्वाची/ जग ढवळून काढणारी, अणूजगतील घटना आहे. तिने यावर विचार केला आणि स्पष्टीकरण शोधून पाठ्पुरावा केला. हे तिचे भरीव योगदान.

हेच इथे वाचता येइल - http://www.3rd1000.com/nuclear/cruc18.htm

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

Pain's picture

21 May 2010 - 8:48 am | Pain

भारी आहे!

गुंडोपंत's picture

21 May 2010 - 9:41 am | गुंडोपंत

सुंदरच लिखाण आहे.
एका चांगल्या पुस्तकाची
ओळख करून दिल्याबदल धन्यवाद.

आपला
गुंडोपंत

विजुभाऊ's picture

21 May 2010 - 12:56 pm | विजुभाऊ

धन्यवाद एका चांगल्या पुस्तकाची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीस.
पुनश्च अतोनात धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिक्रियांबद्दल आभार! या लेखाच्या प्रशंसेला वीणा गवाणकर पात्र आहेत, मी नाही. या मालिकेच्या निमित्ताने 'लीझ माईट्नर' या पुस्तकाची ओळख करून द्यायची असं आधीच ठरवलं होतं.

इन्द्रराज: शिक्षण पूर्ण होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याआधी अनेकांना वेगवेगळी कामं करावी लागतात. सध्या सुस्थितीत असणार्‍या माझ्या एका खगोलशास्त्रज्ञ मित्राने (जो आता वयाची तिशी गाठायच्या आतच त्याच्या क्षेत्रात बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.) कॉलेजात शिकत असताना "गार्डन सेंटर"मधे हमालीची नोकरी केलेली आहे. पण फक्त स्त्री आहे म्हणून संधी नाकारणं या गोष्टीचा त्रास होतो आणि आजही तो अनेकींना कायमस्वरूपी नोकरी मिळवताना सहन करावा लागतो.

शुचि: मान सीगबान हा स्वतः नोबल लॉरियट, नोबेल कमिटीत होता आणि त्यानेच लीझच्या नावाला विरोध केल्याचे उल्लेख वीणा गवाणकरांच्या पुस्तकात आहेत. ऑटो हानला स्वतःला नोबेल मिळाल्यावर त्यालाही नावं सुचवता येऊ लागली, पण त्यानेही कधी लीझचं नाव सुचवलं नाही.
बेरियम आणि क्रिप्टॉनचे अणू तयार होतात हे हान-स्ट्रासमन यांनी शोधलं पण ही जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, त्याचा संबंध सुप्रसिद्ध E=mc2 हे लीझच्या लक्षात आलं. पण हलकी मूलद्रव्य तयार होण्याची कल्पना १९३०च्या शतकात आयडा नोडॅक या संशोधिकेने मांडली होती, पण तिने पुढचे प्रयोग/समीकरणं सादर न केल्यामुळे तिला या शोधाचं क्रेडीट दिलं जात नाही.

थोडं अवांतरः भारतातील वैज्ञानिक स्त्रियांसाठी बंगालुरूच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्सेसच्या रोहिणी गोडबोले Women in Science ही संस्था चालवतात. त्यांनीच Leelavati's daughters नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे.

अदिती

राजेश घासकडवी's picture

21 May 2010 - 8:40 pm | राजेश घासकडवी

कर्तृत्ववान पण अज्ञात वैज्ञानिक स्त्रीची चांगली ओळख. त्या काळासाठी तिच्या कपाळी स्त्री असणं आणि नाझी जर्मनीत ज्यू असणं अशा दुहेरी दुर्दैवाचे पट्टे ओढले होते. त्यातला दुसरा ती पुसू शकली...