आज पुन्हा मरणास पाहिले

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
16 May 2010 - 9:03 pm

मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे.

असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे. याच बरोबर मृत्यूमुळे घडणार्‍या घटनांचा मागोवा घेण्याबरोबरच थेट मृत्यूला भिडणारे काहि चित्रपट आहे. असेही अनेक चित्रपट आहेत मात्र इथे मी लिहिणार आहे सध्या मी पाहिलेल्या चित्रपटांबद्दल. प्रत्येक चित्रपटाने मृत्यूकडे केवळ वेगवेगळ्या तर्‍हेने पाहिलं नसून त्यावर स्वतःचं असं भाष्य केलं आहे.

पहिला चित्रपट आहे आपला मराठ्मोळा "सुखांत". संजय सूरकरने काढलेला हा चित्रपट पहाणे बरेच दिवस बाकी होते. मात्र बघितल्यावर विषय डोक्यातून जाईना. चित्रपट आहे एका अंथरुणाला खिळलेल्या श्रीमती सीता गुंजे (ज्योती चांदेकर) ह्या स्त्रीचा आणि तिच्यावर नितांत प्रेम करणार्‍या तिच्या वकील मुलाचा (अतुल कुलकर्णी), त्यांच्यातील नात्याचा आणि मुख्य म्हणजे मृत्यूचा. एका असाध्य आजाराने लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार सीताबाई गुंजे मागतात आणि ही मागणी मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावतात.

अतूल कुलकर्णी आपल्याच आईने केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात लढतो. त्या निकालाचे काय होते यासाठी तुम्ही चित्रपट बघाच. पण त्याहून महत्त्वाचे आहे सूरकरांनी विचार करायला लावणं. समाजात वावरताना काही व्यक्तींकडे बघितलं की वाटतं की यांना जिवंत का म्हणावं? फक्त श्वास चालु आहे म्हणून? मरणयातना भोगून त्यांना जगायला लावण्यापेक्षा त्यांना दयामरण का देऊ नये? चित्रपट छान आहेच पण त्याहीपेक्षा त्याने डोक्याचा पार भूगा करून टाकला

sukhant Dead man Walking

दुसरा चित्रपट आहे "डेड मॅन वॉकिंग". शॉन पेनचा अप्रतीम अभिनय आणि अत्यंत सशक्त कथा. शॉन पेन ला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे. त्यांच्या मनात आहे तो फक्त द्वेष. अश्यावेळी तो एका मिशनरी ननला पत्र लिहून बोलावतो. दोघांमधली ओळख वाढत जाते. मी खून केलेला नाहि असे ह्या गुन्हेगाराचे म्हणणे असते. एक शांत नन व एक खून व बलात्काराच्या आरोपांबद्द्ल मृत्यूदंड झालेला गुन्हेगार यांच्यातले संवाद अतिशय रोचक आहेत.

शॉनने खरंच गुन्हा केला असतो का? त्याला मृत्यूदंड देणे बरोबर असते का? ह्या गोष्टी चांगल्या फूलवल्या आहेतच पण त्याच बरोबर प्रेक्षक विचार करू लागतो की मुळात मृत्यूदंड देणेच गरजेचे आहे का? मृत्यूदंड हा "इर्रिवर्सिबल" दंड झाला. जर गुन्हेगाराने हा गुन्हा केलाच नव्हता असे कालांतराने सिद्ध झाले तर हा दंड म्हणजे सरळ सरळ गुन्हेगार नसणार्‍याचा खून झाला. यात शॉनचे एक वाक्य फारच मस्त आहे "याक्षणी इतके नक्की सांगु शकतो की एखाद्याचा जीव घेणे अतिशय वाईट गोष्ट आहे. मग तो जीव मी घेतला सो, तुम्ही घेतला असो किंवा तुमच्या सरकारने". मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लावणारा हा चित्रपट. चुकवू नये असा.

अजून एक चित्रपट आहे, "टाईम टू किल". एखाद्या व्यक्तीने विषिष्ट परिस्थितीत केलेला खून हा खून समजला जात नाहि. मात्र या चित्रपटात तो खून न्यायालयातच घडतो. एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीच्या ९ वर्षाच्या मूलीवर दोन गोरे नराधम बलात्कार करतात. यामुळे पेटलेला हा नायक, त्यांना कोर्टात घेऊन जात असताना दोघांना मारून टाकतो. की कथा त्यानंतरच्या न्यायालयिन लढाईवर आहे.

संपूर्ण जुन्यावळणाचे गोरे ज्यूरी ह्या कृष्णवर्णीय व्यक्तीला खूनाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देतात का? मृत्यूदंड देताना केवळ गुन्हा बघितला जातो की गुन्हेगाराचा वंश, रंग वगैरेही लक्षात हेतल्या जातात? ह्यावर चित्रपट सुंदर भाष्य करतो.
A time to kill Taste of cherries

याव्यतिरिक्त काल एक इराणी चित्रपट पाहिला "टेस्ट ऑफ चेरीज". हा ही मॄत्यूला थेट भेटायला आतूर असलेला चित्रपट. चित्रपट सूरू होतो एका मध्यामवतीन व्यक्तीपासून. तो तेहरानमधे एका रोजगार-नाक्यावर कोणी 'लायक' व्यक्ती शोधतो आहे. पण त्याला हवी तशी व्यक्ती न दिसल्याने तो शहराबाहेरच्या निर्जन विभागात जातो. इथे आधी कळतच नाहि की असं कसलं काम आहे की तो माणूस शोधतोय. पुढे तो वेगवेगळ्या लोकांना काम करणार का विचारतो. त्यासाठी प्रचंडमोठा मोबदला देण्याचंही कबूल करतो. मात्र काय काम ते सांगत नाहि.

त्यामुळे अगदी कचराउचलणारा, पडक्या गराजचा मालकही त्याचा नकार देतो. पुढे तो एका तरूण सैनिकाला लिफ्ट देतो. त्याला कामाची थोडी कल्पना देतो तर तो सैनिक घाबरून गाडीतून उडी टाकून पळून जातो. हळुहळू प्रेक्षकाला उलगडु लागते की काम काय आहे. काम असे असते, की त्या रात्री ह्या व्यक्तीने आत्महत्या करायची ठरवले असते, आणि जर तो मेला तर त्याला जमिनीत गाडण्याची मदत त्याला हवी असते.

सबंध चित्रपटात त्याला का मरायचे आहे हे कळत नाहि. मात्र त्याची अत्महत्येच्या आधीची घालमेल छोट्या छोट्या प्रसंगांतून छन उलगडलि आहे. पुढे त्याला काय अनुभव येतात? कोणी मदत करते का? वगैरे प्रश्न कथेवरोबर हळूवार पणे उलगडत जातात. जरा चित्रपट स्लो आहे. शिवाय तो कोणत्याही शेवटाला पोहोचण्या आधीच संपतो. पण तरीही मृत्यूला भेटायला उत्सूक असणार्‍या ह्या व्यक्तीचा एक दिवस आपल्याला खूप विचार करायला मात्र लावतो.

या सगळ्या चित्रपटांतून मृत्यू वेगवेगळ्या रुपात भेटला. त्याची क्रुरता, त्याची ओढ, त्याची अपरिहार्यता, त्याची आसक्ती, त्याची भिती, त्याचा ध्यास, त्याचा माणसाअ माणसाला दिसणारा वेगळा रंग उलगडत गेला. मृत्यूला वेगवेगळ्या रंगांत, ढंगांत बघताना जाणवतो तो म्हणए मृत्यूचा थंडपणा. मृत्यूच्या आधी वा नंतर काहिहि घडो आल्यावेली तो येतो आणि थंडपणे दिलेले काम करतो

मृत्यूवरच्या चित्रपटांचा परिचय इथेच संपवणार होतो. पण काहितरी राहिल्यासारखे वाटत होते. ह्या मृत्यूने डोक्यात आलेलं विचारांचं वादळ केवळ गद्यात बांधता आलं नाहि. त्यामुळे हा लेख लिहिताना काहि ओळी सुचल्या त्याही देतो:

आज पुन्हा मरणास पाहिले
मृत्यूच्या जगण्यास पाहिले

त्या वृद्धेच्या मिटत्या डोळी
त्या अनवट नेमक्या अवेळी
डोळ्यांमधले कृतार्थ अश्रू
गंगाजल ओठांस लाविले||

फासावरचा ओघळ मोठा
प्रत्येकाच्या डोळी होता
डोळ्यांस झेपत नसताही
हिय्या करूनी त्यास पाहिले||

वेळ संपली नराधमाची
चक्काचुर होळी स्वप्नांची
किंकाळी फुटण्याच्या आधी
त्यास नळीच्या आत पाहिले||

झोपेच्या गोळ्यांची घुंदी
कधी उतरली नाहि त्याची
अन स्वप्नांच्या गावामध्ये
त्यास एकदा सोडून पाहिले||

दूर्धरातला दूर्धर रोगी
मृत्यूशय्येवरचा योगी
त्याच्याओठी हास्य पाहूनी
मृत्यूचे मी मरण पाहिले||

कविताचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

भारद्वाज's picture

16 May 2010 - 11:33 pm | भारद्वाज

अतिशय सुंदर कविता...लेखात उल्लेखलेले चित्रपट अजुन पाहिले नव्हते. आता पाहीन.

जे.पी.मॉर्गन's picture

17 May 2010 - 2:10 pm | जे.पी.मॉर्गन

डेड मॅन वॉकिंग पाहिला होता.. पण ह्या विकांताला "सुखांत" नक्की !

जे पी

बिपिन कार्यकर्ते's picture

16 May 2010 - 11:42 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम... सिनेमे बघेन. कविताही आवडली.

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

17 May 2010 - 1:53 pm | मस्त कलंदर

कविता छानच!!!
नि परिचय वाचून सिनेमे पाहायची उत्सुकताही चाळवलीय...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राघव's picture

17 May 2010 - 12:00 am | राघव

कविता खूप सुंदर.
चित्रपटांपैकी मात्र कोणताच बघीतलेला नाही अजून. वर्णने चित्रपट बघण्यास उद्युक्त करणारी. छान लिहितोस रे. :)

राघव

भारद्वाज's picture

17 May 2010 - 12:03 am | भारद्वाज

दूर्धरातला दूर्धर रोगी
मृत्यूशय्येवरचा योगी
त्याच्याओठी हास्य पाहूनी
मृत्यूचे मी मरण पाहिले||

....काय बोलू ?
-नि:शब्द

मेघवेडा's picture

17 May 2010 - 2:22 am | मेघवेडा

सुखांत आणि डेड मॅन वॉकिंग अप्रतिमच आहेत! पुढचे दोन्ही बघिन लवकरच!! कविता खासच रे ऋ!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि's picture

17 May 2010 - 2:55 am | शुचि

लेख अतिशय, फार आवडला.

मृत्यू मी पाहीलेला त्याबद्दल सांगते. रॉबीनच छोटसं पिल्लू घरी उचलून आणलेलं. २ दिवस दाणा पाणी केलं. पिल्लानी फार म्हणजे फार जीव लावला आपल्या निरागसपणानी. त्याचहं नामकरण केल रघू. सकाळ झाली की हे किलबिल किलबिल करून घर डोक्यावर घ्यायचं जोवर खायला घालत नाहीत. एकदा शनिवरी आम्ही बाहेर गेलो आणि मी खाणं ठेऊन गेले. उशीर झाला परतायला. पण तो उशीर फार घातक ठरला होता. कारण पिल्लानी खाल्लं तर नव्हतच पण बाहेर येऊन डायनिंग टेबल वरून खाली पडलं होतं. मी घरात पाऊल ठेवलं आणि चटकन जाऊन त्याला जवळ घेतलं आणी पाणी पाजलं. ते फक्त पाणी पिण्यासाठी आणि जणू मला भेटण्यासाठी रघू जीव धरून होता. त्या "अनवट"
खरच खरच अनवट क्षणी त्या पिल्लानी माझ्या डोळ्यात पाहीलं , जणू हे सांगत की मी निघतो आता आणि मान टाकली.
पण ते पहाणं इतकं वेगळं आणि सुंदर होतं. असं वाटलं कोणत्या जन्मीचं हे ऋण फिटतय का काय की काय? ते सुंदर डोळे आनि तो क्षण केवळ अनवट.
बरोबर शब्द वापरलाय कवितेत

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

ऋषिकेश's picture

17 May 2010 - 10:21 pm | ऋषिकेश

अरेरे! पक्ष्यांची पिलं फारच गोजिरवाणी असतात.. पण इतकी नाजूक की हाताळायला फार भीती वाटते.
यावरून आठवले: आमच्या शाळेत लहानपणी (बहुदा इयत्ता १ली/२री) एक चिमणी पंख्याचा किंचित धक्का लागून निपचित पडली. बाईंचं न ऐकता आम्ही तिला पाणी पाजलं, शुद्धीत आणलं पण आम्ही दूर होताच इतर चिमण्यांनी त्या माणसाने शिवलेल्या चिमणीला टोचून मारून टाकले. :(
घरी येऊन २ दिवस नुसता रडत होतो.तेव्हापासून जिवंत पक्ष्याला शिवलं देखील नाहि.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

राजेश घासकडवी's picture

17 May 2010 - 5:09 am | राजेश घासकडवी

छान लेख व कविताही सुंदर

सहज's picture

17 May 2010 - 6:22 am | सहज

सर्व चित्रपटांची चांगली ओळख!

Nile's picture

17 May 2010 - 7:16 am | Nile

लेख आवडला. टाईम टू किल तर मी पाच सहा वेळ पाहिला आहे तरी सुद्धा दर वेळ तोच आवेश निर्माण होतो.

असाच एक सिनेमा आठवला म्हणजे ग्रीन माईल, मृत्युदंड मिळालेले आरोपी असलेला एक तुरुंग, आणि तिथल्या पोलिसांचे वागणे. टॉम हँक्स नेहमीप्रमाणे भारी.

-Nile

प्रभो's picture

17 May 2010 - 7:25 am | प्रभो

लेख आवडला.

स्पंदना's picture

17 May 2010 - 7:48 am | स्पंदना

टाईम टु किल!! वाचलय!! बर याच वेळा चित्रीकरणाचे माध्यम शब्दान पुढे हरते .

बाकि म्रुत्यु सारख्या विषया वर लिहायच तुम्हाला सहजी जमल बा!!

तुमच्या लिखणा मुळे चित्रपट पहावेसे वाटायला लागले. आता शोधकार्य !!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 May 2010 - 8:06 am | अक्षय पुर्णपात्रे

डेड मॅन वॉकिंग आणि टाइम टो किल पाहीले आहेत. 'लाइफ ऑफ डेविड गेल' हा मृत्युच्या शिक्षेविषयीचा चित्रपटही ठीक आहे.

'डेड मॅन वॉकिंग'ची गाणीही सुरेख आहेत. खाली देत आहे. (कर्क यांच्या खरडवहीतून साभार)

मदनबाण's picture

17 May 2010 - 9:21 am | मदनबाण

लेख आणि कविता दोन्ही सुंदर...

मदनबाण.....

"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner

परिकथेतील राजकुमार's picture

17 May 2010 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

लेख व कविता दोन्ही सुंदर.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

इन्द्र्राज पवार's picture

17 May 2010 - 11:30 am | इन्द्र्राज पवार

अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित विश्लेषण असलेला लेख. या चार चित्रपटापैकी "सुखांत" हा मराठी चित्रपट सोडल्यास सर्व चित्रपट मी पाहिलेले आहेत. शॉन पेन हा तर अभिनयाचे दोन वेळा ऑस्कर मिळविलेला कलाकार. किंबहुना मानवी मनाची चाललेली घालमेल (प्रामुख्याने जगणे आणि मरणे या दोन बाबीशी निगडीत....) दाखविणाऱ्या अनेक कथानकाशी त्याचे नाव खूप निगडीत आहे. "Dead Man Walking" या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा उल्लेख आपल्या लेखात येणे फार गरजेचे होते. कारण तो आहे "टिम रॉबिन्स".... हा आणि "डेड मन" ची नायिका "सारा सारांडन" पती-पत्नी असून या कुटुंबाचा शॉन पेन अविभाज्य घटक आहे. "मृत्यु"चेच कथानक असलेले व या दोघांनी अभिनित केलेला "मिस्टिक रिव्हर" असाच एक दर्जेदार चित्रपट, ज्यासाठी पेन आणि रॉबिन्स या दोघानाही ऑस्कर्स मिळाली. टिम हा देखील एक फार संवेदनशील अभिनेता (आपल्याकडील संजीवकुमार धर्तीवर...) असून त्याने आपल्या अभिनयाने "शॉशंक रिडेम्प्शन" अविस्मरणीय केला आहे.

"मृत्युदंड" असावा कि नसावा या कथानकावर आपल्याकडेदेखील बी. आर. चोप्रा यांचा "कानून" हा गीतविरहीत हिंदी चित्रपट खूप गौरविला गेला होता. दुर्दैवाने मला हा कलात्मक चित्रपट पाहायला अजून मिळालेला नाही.... मात्र यावर वाचले आहे भरपूर.

"टेस्ट ऑफ चेरीज".... हा चित्रपट मला अगदी अनपेक्षीतपणे टाटा स्काय डिशवर "वर्ल्ड मूव्हीज" या चॅनेलवर पाहायला मिळाला. लेखात उल्लेख केलेल्या बाबीत फक्त एकच भर घालतो ~~ या चित्रपटाचे चित्रीकरण. निव्वळ "सुमो" सारख्या गाडीतुन इकडेतिकडे प्रवास असे विचित्र कथानक असुनही फोटोग्राफीमुळे कुठेही कंटाळा येत नाही. सबटायटलची अजिबात आवश्यकता नसलेला हा चित्रपट सर्वांनी जरूर अनुभवावा.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

निखिल देशपांडे's picture

17 May 2010 - 11:37 am | निखिल देशपांडे

ॠषिकेश, उत्तम लेख
ह्यातले चित्रपट तर नक्की पाहीन..
कविता पण छान आहे.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दत्ता काळे's picture

17 May 2010 - 11:37 am | दत्ता काळे

लेख आणि कविता दोन्हीही आवडले.

तिमा's picture

17 May 2010 - 6:35 pm | तिमा

असेच म्हणतो.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

श्रावण मोडक's picture

17 May 2010 - 6:54 pm | श्रावण मोडक

कविता स्वतंत्र हवी होती. तिची ती ताकद आहे!

मस्त कलंदर's picture

17 May 2010 - 10:57 pm | मस्त कलंदर

सहमत आहे..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब's picture

17 May 2010 - 10:07 pm | शिल्पा ब

विचार करायला लावण्याजोगे सिनेमे...time to kill मी काही वर्ष्यापुर्वी पहिला होता....तसाच to kill a mockingbird सुद्धा चांगला सिनेमा आहे...taste ऑफ cherry या वीकेंड ला बघेन...धन्यवाद...सिनेमाच्या परिचयाबद्दल

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 8:22 am | ऋषिकेश

सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

श्रामो, मक,
कवितेच्या स्तुतीबद्द्ल आभार. कविता सुचली (स्फूरली) ती चित्रपट परिचयाला पूरक म्हणूनच.. एकदा विचार आला होता.. पण एक (माझ्यासाठी) नवा प्रयोग म्हणून एकत्रच ठेवले

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चित्रा's picture

18 May 2010 - 8:27 am | चित्रा

उत्तम लेख. चित्रपटही बघूच, नक्की.

टुकुल's picture

18 May 2010 - 5:47 pm | टुकुल

लेख आवडला, दिलेले सिनेमे शोधतो आता.

--टुकुल