तू माने या ना माने दिलदारा

गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा!
ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत.
सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत....
... त्या जोडीला तेवढाच कसदार गायकी गळा त्या संगीतरचनेला लाभला तर मग सोने पे सुहागा!!

सध्या माझ्या मनात अहोरात्र पिंगा घालणारे गाणे म्हणजे वडाळी बंधूंनी गायलेली बाबा बुल्लेशाह यांची अपरिमित माधुर्य व उत्कट प्रेमभावाने ओतप्रोत रचना ''तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनू रब मनिया''.....

बाबा बुल्लेशाह (मीर बुल्ले शाह कादिरी शतारी) या इ.स. १६८० च्या दरम्यान पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेल्या या सूफी पंजाबी संत कवींच्या अनेक रचना पंजाबी लोकपरम्परेचा व साहित्याचा एक अविभाज्य भाग आहेत. बाबा बुल्ले शाह हे प्रख्यात पंजाबी सूफी कवी. हिंसेचे उत्तर हिंसा होऊच शकत नाही ह्या त्यांच्या विचाराशी ते इतरांचा रोष पत्करूनही कायम ठाम राहिले. त्यांच्या काव्यरचना ईस्लामच्या कट्टरतेला आव्हान देणार्‍या व त्यावर टीका करणार्‍या आहेत. बुल्ले शाह यांनी आपल्या काव्यांतून कायम मानवतेचा, प्रेमाचा, सौहार्दाचा पुरस्कार केला. सामाजिक प्रश्नांवर टीकाटिप्पणी केली. आणि गूढ आध्यात्मिक प्रवासाला त्यांनी शब्दस्वरूप आकार देऊन एक वेगळेच मूर्त स्वरूप दिले.

त्यातीलच ही एक रचना....

साधे, थेट हृदयाला भिडणारे पारदर्शी शब्द आणि त्यातून परमात्म्याला घातलेले साकडे, केलेले आर्जव नकळत मन हेलावून टाकते.
प्रेमाच्या सर्वात उत्कट भावाला ही रचना शब्दबद्ध करते.

पैगाम - ए -इश्क ह्या ध्वनिमुद्रिकेतील हे गाणे आहे.

वडाळी बंधूंची सूफी गायकी जगद्विख्यात आहे. पद्मश्री पुरस्कार सन्मानित पूरणचंद व प्यारेलाल वडाळी पंजाबमधील अमृतसरच्या गुरु की वडाली भागात राहाणारे त्यांच्या घराण्यातील गायकांच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी. पूर्वापार सूफी संतांच्या रचनांची गायकी घराण्यात चालत आलेली. निसर्गदत्त पहाडी, कमावलेला आवाज आणि त्यावर भक्तीचे लेणे! सूफी परंपरेवर त्यांचा गाढ विश्वास आणि आपल्या गायकीतून ईश्वराला आर्जवाने पुकारण्याची, आवाहन करण्याची अफाट ताकद!
पंडीत दुर्गादास आणि उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले, अतिशय साध्या जीवनशैलीने जगणारे हे दमदार, खड्या आवाजाचे गायक आपल्या लवचिक अदाकारीतून सूफी रचनांच्या शब्दांमध्ये विलक्षण रसपूर्णता आणतात. त्यांच्या गळ्यातून उमटणार्‍या प्रत्येक शब्दासरशी रोम रोम पुलकित होतात. त्यांची बरसणारी, भक्तीवर्षावात चिंब करणारी गायकी आणि बुल्लेशाह यांचे मार्मिक शब्द...... भक्तीच्या डोहात डुंबायला अजून काय पाहिजे?

गाण्याचे शब्द व त्यांचा स्वैर अनुवाद :

तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनु रब मनिया

प्रियतमा, तुला आवडो अगर न आवडो, मी तुला माझा ईश्वर म्हणून आपलंसं केलंय....

दस होर केडा रब दा दवारा असां ते तैनु रब मनिया

आता तूच मला सांग की मी अजून कोणता दरवाजा ठोठावू... तूच आता माझा ईश्वर आहेस!

कोई काशी कोई मक्के जांदा कोई कुंभ विच दा धक्के खांदा

कोणी आपल्या पापांचे परिमार्जन करायला काशीला जातात, तर कोणी मक्केला जातात. तर कोणी कुंभमेळ्यात जाऊन आपली पापे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

पाया जग मै तुझ विच सारा असां ते तैनु रब मनिया

पण मला तर तुझ्या चरणांशीच सारे विश्व गवसले आहे, तूच आता माझा ईश्वर आहेस!

अपने तनकी खाक उडायी तब ये ईश्क की मंजिल पायी

ह्या शरीरातील विकार जेव्हा भस्मसात झाले तेव्हा तुझ्या दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला...

मेरी सांसोका बोले इकतारा असां ते तैनु रब मनिया

माझ्या श्वासांची एकतारी तेच गीत तर प्रत्येक श्वासागणिक गात आहे....

तुझ बिन जीना भी क्या जीना तेरी चौखट मेरा मदीना

तुझ्याशिवाय ह्या माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? तुझ्या दारात मला माझे तीर्थ गवसले आहे

कहीं और ना सझदा गंवारा असां ते तैनु रब मनिया

आता हे मस्तक अन्यत्र कोठे झुकवणे मला सहन होत नाही कारण तूच तर माझा ईश्वर आहेस!

हंसते हंसते हर गम सहना राजी तेरी रजा में रहना

आता हसत हसत मी अडचणी व संकटांचा सामना करेन. तुझी सावली हेच माझं घर.

तूने मुझको सिखाया है यारा असां ते तैनु रब मनिया

तूच तर शिकवलंस हे सारं मला......

ईश्वराला इतक्या मधुर शब्दांत आळवणारी, त्यावर प्रेमाचा हक्क सांगणारी ही अभूतपूर्व रचना.....आणि त्यावर कळस चढवणारा वडाळी बंधूंचा दिलखेचक स्वर!

अप्रतिम शब्दांना आत्म्याला साद घालणाऱ्या समृद्ध गायकीचं कोंदण लाभल्यावर कधी ऐकणारा रसिक भक्त बनतो, डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळतात, कंठ रुद्ध होतो आणि मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही. चक्षूंसमोर उभा राहतो एक फकीर. अल्लाला, परमात्म्याला जीवाच्या आर्ततेने साद घालणारा, त्याच्या प्रेमात वेडावलेला, दिवाणा झालेला, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याच परमात्म्याला पाहणारा.... गाणे संपते तेव्हा आपणही दीवाने झालेलो असतो. त्या खुळेपणाला, त्या वेडाला माझा सलाम!

(माझ्या अतिशय अल्प हिंदी/पंजाबी ज्ञानाच्या आधारावर हा अनुवाद व गाण्याचे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी चु. भू. दे. घे. फेरफार/ सुधारणा असल्यास अवश्य कळवणे.)

-- अरुंधती

प्रतिक्रिया

संगीत जितकं ऐकावं तितकी त्याची नशा चढत जाते पण हे गाणं तर पहील्यांदा ऐकतानाच मला नशा त्याची चढली. ही जी पराकोटीच्या भक्तीची गाणीअसतात ती कोणाही ऐर्‍यागैर्‍या गायक-गयिकांना पेलवत नाहीत. त्याकरता तपस्या लागते. फार फार सुंदर गायलय गाणं.

अरुंधती अशीच ओळख करून देत जा. तू उल्लेख केलायस सूफी गाण्यांचा ... मला वाटतं तो फक्त ओझरता उल्लेख आहे. कारण हे गाणं सूफी नाही. हे पंजाबी आहे.

परत एकदा धन्यवाद इतक्या उच्च, अप्रतिम गाण्याकरता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

मला खूप आवडतात ही गाणी.... एकेक करून जमेल तसा अर्थ व ओळख करून देत जाईन ह्या गाण्यांची! खरं तर ही गाणी एवढी प्रसिध्द आहेत की मला वाटले होते मराठीत आंतरजालावर त्यांच्याविषयी नक्की माहिती मिळेल! पण काहीच माहिती उपलब्ध नव्हती. मग उपसली आपली कळफलकाची लेखणी आणि लिहू (टंकू) लाग्ले कुरूकुरू.... हा हा हा!

बाय द वे, हे पंजाबी सूफी गाणे आहे. बुल्ले शाह यांनी पंजाबी भाषेतही सूफी रचना केल्या आहेत.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

जोधाअकबराच्या सिनेमातले 'ख्वाजा मेरे ख्वाजा' हे सुद्धा सूफी गाणं आहे ना? मला ते फार आवडतं.
मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही.
हेच त्या गाण्यांचं वैशिठ्य असतं. फार छान वाटतं या गाण्यांनी.
रेवती

ख्वाजा मेरे ख्वाजा माझं पण अत्यंत आवडतं गाणं आहे.... त्याचं चित्रिकरण, खास करून सूफी डर्विश नृत्य फार फार लाडकं.... किती वेळा ते गाणं ऐकलंय, पाहिलंय त्याला गणतीच नाही! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधतीजी आपण केलेल्या वर्णनाने अपेक्षा खूपच वाढल्या आणि कदाचित त्यामुळेच वडाली बंधूंचं गाणं तितकंसं खास नाही वाटलं. स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व.
मात्र आपलं निवेदन खूप आवडलं.

प्रमोदजी, एखादं गाणं चढत जाणं, दर वेळी ऐकताना त्यात अजूनच आनंद मिळणं.... असं काहीसं होतं माझं हे गाणं ऐकताना....
असो. सर्वांच्याच आवडी समान असायला हव्यात असं नाही. मला ह्या गाण्याची आध्यात्मिक आणि ईश्वराशी संवाद साधण्याची व्यक्तिगत, हक्काची स्टाईल आवडते. पंजाबी गाण्यांचा ठेका तर लाजवाबच असतो. त्यामुळे नकळतच बोटे ताल धरतात, पाय ठेका धरतात आणि मन उधाण होते! :-)

प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/