एक फिरकी अशीही!

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
6 Apr 2010 - 4:56 pm

कोण कोणाची, कधी, कशी फिरकी घेईल ह्याचा नेम नसतो! आमच्या पूर्वीच्या घराच्या मालकीणबाई ह्या एरवी अतिशय चलाख, लबाड म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना कोणी सहसा उल्लू बनवू शकायचे नाही. पण एकदा त्यांच्या मैत्रिणीनेच त्यांची कशी फिरकी घेतली ह्याचा हा एक भारी व विनोदी किस्सा :

मालकीणबाईंच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. भरपूर स्थळे आधी नाकारून झालेली. मालकीणबाईंना त्यांच्या लेकासाठी सर्वगुणसंपन्न आणि मुख्य म्हणजे श्रीमंताघरची सून हवी होती. मिळाली ती सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण. लग्नानंतर सून सासरी नांदायला आली.

इथे मालकीणबाईंच्या एका जवळच्या मैत्रिणीला आमच्या मालकीणबाई व त्यांच्या सुनेची फिरकी घ्यायची हुक्की आली. [तिला आधीचा कोठलातरी स्कोअर सेटल करायचा होता!!!] तिने नव्या सूनबाईला बाजूला घेऊन सांगितले, ''तुझे सासरेबुवा म्हणजे लाखात एक माणूस! काय ते व्यक्तिमत्त्व, काय तो सज्जनपणा! अगदी पापभिरू हो! सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही त्यांना! अगदी नेमस्त आयुष्य. पण....तुझ्या सासूपासून जरा सावध रहा, बरं का!'' आता नव्या सूनबाईला हे जरा अनपेक्षित होते. त्यामुळे तिने जरा आश्चर्याने, भेदरून विचारले, ''म्हणजे?''
''अग्गो, तुझ्या सासर्‍याला नाही कसलं व्यसन, पण तुझी सासू? रोज संध्याकाळी ''घोट'' लावून बसते की गो! आता माझी एवढी जवळची मैत्रिण म्हणल्यावर मी तिच्याविषयी खोटं कशाला सांगू? पण तू ह्या घरची नवी सून म्हणून सांगते, संध्याकाळ झाली की सासूपासून जरा चार हात लांबच रहा. एकदा प्यायला लागली की काही भरवसा नसतो तिचा! शिव्या काय देते, अंगावर धावून काय येते..... लाल -लाल डोळे होतात तिचे.... डोळे गरागरा काय फिरवते...झोक काय जातात....तू आपली काळजी घे हो!''

नवी सून टेन्शनमध्ये! ही बातमी कन्फर्म तरी कोणाकडे व कशी करणार? नवर्‍यासकट सर्वच अपरिचित! सासरी कोणाला विचारणार? शिवाय सूनबाई लहानपणापासून मुंबईच्या अत्याधुनिक वर्तुळात वावरल्यामुळे क्लबिंग करणार्‍या, नशाबाज बायका तिच्या परिचयाच्या होत्या. आता आपली सासूच अशी म्हटल्यावर तिच्या तोंडचे पाणीच पळाले!

सासूबाई सकाळी नव्या सुनेला चहाला बोलावीत. सून ''येऊ क्का नक्को'' करत स्वयंपाकघराच्या दारातूनच सासूच्या चेहर्‍याकडे टकमक पाहत बसे.
दिवाणखान्यातील काचेच्या कपाटातील उंची, आकर्षक बाटल्यांमधील विदेशी मद्य, कट ग्लासेस, डिकॅन्टर इत्यादी जामानिमा पाहून तर तिची पाचावर धारणच बसली. आपल्या माहेरचे कोणी आलेत आणि आपली सासू समोर हा जामानिमा घेऊन मोठ्या ऐटीत दारू पीत बसली आहे, मोठमोठ्याने बरळते आहे, शिव्याशाप देते आहे....ह्या कल्पनेनेच तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले!!

त्यातून एक दिवस तिने सासूबाईंना त्या कपाटापाशी बघितले. त्या मद्याच्या बाटल्या तपासून बघत होत्या. शंकेचे रुपांतर आता खात्रीत झाले!

वस्तुस्थिती अशी होती की मालकीणबाईंना खरोखरी सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. पण त्यांच्या पतिदेवांना मात्र रोज सायंकाळी घोट लावून बसण्याची सवय होती. सायंकाळी एक वेळ सूर्य मावळला नाही तरी चालेल, पण पतिदेवांना चकण्यासकट साग्रसंगीत मदिरापान व्हायला म्हणजे व्हायलाच लागे. उच्च प्रतीच्या विदेशी मद्याचे ते खास शौकीन! बाहेर कोठेतरी पिऊन धिंगाणे नकोत म्हणून त्यांच्यावर घरीच पिण्याची सक्ती होती. तरीही ते बाहेर दोस्तांकडे गेले की हळूच घोट, दोन घोट घशाआड करत. व्हिस्कीचे दोन-तीन पेग झाले की मग त्यांचे विमान चांगलेच हवेत तरंगू लागे. एरवी गप्प बसणार्‍या त्यांच्या जिव्हेवर मग वीज खेळू लागे. मनातला असंतोष, खदखद, वैताग उफाळून बाहेर येत असे. परिणिती धुसफूस, भांडणे, शिव्याशाप इत्यादी इत्यादी मध्ये होई.

सुनेने जेव्हा सासूला मद्याच्या कपाटापाशी पाहिले तेव्हा सासू प्रत्यक्षात कपाटातील मालाचा व नवर्‍याने त्यापायी किती पैसे उडवलेत ह्याचा अंदाज घेत होती. पण सुनेला वाटले ते भलतेच!!

लेकाचे लग्न झाल्यावर आता नव्या सुनेसमोर तमाशे नकोत म्हणून मालकीणबाईंनी नवर्‍याला सज्जड दम भरला होता. पण इकडे सूनबाई तर सासूच्या समोर टिकतच नव्हती. आली तरी चार पावले दूर. मधेच त्यांच्या चेहर्‍याकडे एकटक पाहत बसे. संध्याकाळी तर जणू लपाछपीचा खेळ चालू असे. सासू ज्या खोलीत येई त्या खोलीतून सूनबाई छू!!!!! त्यांनी काही कामासाठी बोलावले की ती आपल्या ऐवजी नवर्‍याला पिटाळत असे. एरवी लाडात असणारी आपली बायको आपल्या आईच्या समोर असे का वागते हे त्यालाही कळत नसे. सूनबाई सासर्‍यांशी नीट बोलत असे पण सासूबाई आल्या की एकदम गप्प! जणू तोंडाला कोणी कुलूपच घातले आहे!!

सुरुवातीला मालकीणबाईंना काही वेगळे जाणवले नाही. पण मग मात्र त्यांना ''दाल में कुछ काला है'' चा वास येऊ लागला. त्यांनी आपल्या मुलाला विचारले. त्याला तर काहीच माहिती नव्हती. पण त्यालाही काहीतरी वेगळे जाणवले. त्याने आपल्या बायकोला खोदून खोदून विचारले तशी तिने 'सांगू की नको' आविर्भावात त्याला जे जे घडले ते सांगितले अन सत्य सामोरे आले. मुलगा अवाक! त्याने त्याच्या आईला सर्व प्रकार सांगितल्यावर मालकीणबाईंना आपल्या मैत्रिणीने आपली व नव्या सुनेची कशी फिरकी घेतली ते लक्षात आले.

''काय गो, तुला मी 'त्यात'ली वाटले क्काय?'' सासूने सुनेला विचारले. आता सासूला खरे तरी काय सांगणार! सूनबाईंनी मग हक्काचे शस्त्र उपसले. बघता बघता मुसमुसून रडायला लागल्या. झाले! सासूबाई विरघळल्या!! त्यांनी सुनेला जवळ घेतले आणि सत्य परिस्थिती समजावून सांगितली.

सुनेला सत्य परिस्थिती समजल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि सासूबाई आता मैत्रिणीच्या फिरकीचे उट्टे कसे काढायचे ह्या योजनेत गर्क झाल्या!

-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

वावरविनोदजीवनमानमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2010 - 5:04 pm | प्रकाश घाटपांडे

सुनेला सत्य परिस्थिती समजल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि सासूबाई आता मैत्रिणीच्या फिरकीचे उट्टे कसे काढायचे ह्या योजनेत गर्क झाल्या!

जालाव बी या योजना चालत्यात!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पर्नल नेने मराठे's picture

6 Apr 2010 - 5:09 pm | पर्नल नेने मराठे

बाहेर कोठेतरी पिऊन धिंगाणे नकोत म्हणून त्यांच्यावर घरीच पिण्याची सक्ती होती.
:D

चुचु

रेवती's picture

6 Apr 2010 - 7:08 pm | रेवती

ही जरा अतिरेकी फिरकी आहे असे वाटले. मैत्रिणीनं चेष्टा म्हणून किंवा अन्य काही कारणानं तसं केलं असेल पण परिणाम फारसा चांगाला झाला नाही.;) मालकिणबाईंनी अद्दल घडवली कि नाही? नाहीतर अद्दल घडवतानाही काटकसर!;)

रेवती

अरुंधती's picture

7 Apr 2010 - 1:56 pm | अरुंधती

रेवती, त्यांचा मैत्रिणींचा असाच साळकाया माळकाया ग्रुप होता गं.... त्यांनी कसे उट्टे काढले ते मला नीट माहित नाही, पण काढले एवढे नक्की.... हिशेबाबद्दल त्या फार पर्टिक्युलर होत्या ;) हा किस्सा त्यांच्या सुनेने सांगितल्यामुळे आम्हाला कळला. त्यांनी त्यांची फजिती कधीच उघडी केली नाही.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

6 Apr 2010 - 7:13 pm | शुचि

हा हा. प्रसंग मस्त खुलवून सांगीतलाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!

गणपा's picture

7 Apr 2010 - 4:20 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
मैत्रीणीने मस्तच दांडी गुल केली की.