एक कप च्या - परीक्षण

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
12 Feb 2010 - 1:45 pm

'कला' या संस्थेने ६ फेब्रुवारी ला बे एरियात याचा खेळ ठेवला होता. त्याच बरोबर 'एक साधा प्रश्न' ही एक आणि डॉ जगन्नाथ वाणी यांच्या सामाजिक कार्याबद्दल एक अशा दोन छोट्या फिल्म्स ही बघायला मिळाल्या. दोन्ही छान आहेत.

'एक कप च्या' मला अतिशय आवडला. ज्यांना थिएटर मधे मिळणार नाही त्यांनी डीव्हीडी आणून जरूर पाहा. एकदम हलका फुलका, साधी कथा, सहज सोपे विनोद असलेला चित्रपट आहे.

चित्रपटाच्या सुरूवातीलाच वातावरण निर्मिती सुरेख केलेली आहे. किशोर कदम च्या कुटुंबातील वातावरण फारच मस्त घेतले आहे. कसलेही स्टीरीओटाईप न दाखवता, कसलीही अतिशयोक्ती न दाखवता आप आपल्या वयाप्रमाणे वागणारे या कुटुंबातील सर्वजण आपल्याला एका मिनीटात आवडतात. इतके प्रातिनिधिक कुटुंब मराठी चित्रपटात क्वचित दिसते, त्यामुळे पुढे दाखवले जाणारे प्रश्न आणि ते ते कसे सोडवतात या कथेला एकदम 'मास अपील' मिळतो. हा चित्रपट नेहमीसारखा रिलीज होउन चालला नाहीतर खूप आश्चर्य वाटेल.

कोकणातील एका खेड्यातील ही कथा. नायक किशोर कदम हा एस टी मधे बस कंडक्टर असतो, घरी बायको, चार मुले आणि म्हातारी आई. मुख्य कथा ही की या एका साध्या कुटुंबाला विजेचे बिल एकदम बरेच मोठे येते आणि नायकाला आपले काम सांभाळून वीज मंडळाकडून ते दुरूस्त करून घेताना काय अडचणी येतात आणि त्यावर ते सगळे कसा मार्ग काढतात याचे चित्रण आहे. या प्रयत्नात असताना त्याला गेल्या काही वर्षांत नवीनच लागू झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची माहिती होते. यात नायकाने त्याचा उपयोग करणे आणि त्यायोगे प्रेक्षकांना त्याची माहिती करून देणे हाही आणखी एक उद्देश असावा.

कोकणाचे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे यात. एस टी तील त्याच्या नेहमीच्या दिनक्रमाचे शूटिंग आणि त्यात दाखवले गेलेले 'डिटेल्स' हे सुद्ध खूप आवडले. असे डिटेल्स सहसा फक्त इंग्रजी चित्रपटात दाखवतात. म्हणजे कंडक्टर्स, बस कंट्रोलर एकत्र उभे राहून कोणी कोणती बस घ्यायची ते ठरवतात, मग हा जाउन रोजची तिकीटे, नाणी वगैरे घेउन ड्यूटीवर जातो ते दाखवणे आणि त्यातील संवादातून नायकाची व्यक्तिरेखा उभी करणे हे ही खूप छान घेतले आहे. मराठी/हिन्दी चित्रपटात हे अपवादानेच दिसत असल्याने मुद्दाम उल्लेख करावासा वाटला. तेथील भाषा किती अस्सल आहे ते मला माहीत नाही पण बहुधा असावी.

कलाकारांमधे सर्वांचेच काम सुंदर झाले आहे. सर्वात चांगले अश्विनी गिरीचे (किशोर कदम च्या बायकोचा रोल), त्यांच्या घरातील वातावरण तिच्यामुळे आहे असेच नेहमी वाटते. किशोर कदम ने ही मस्त रंगवला आहे नायक. आपण भ्रष्टाचार करायचा नाही आणि कोणाला पैसे देउन काम करून घ्यायचे नाही असे ठाम मत असलेला नायक दाखवताना उगाचच "मै अपने आदर्शोंपे..." छाप भाषा नाही, उलट असेच वागणे नैसर्गिक आहे असे दाखवलेले आवडले. त्याचा मित्र मुस्लिम आहे, पण तो ही सामान्य माणूसच. तो चित्रपटभर "मित्र" या रूपातच वावरताना दाखवला आहे, तेथेही उगाचच हिरवे कपडे, अब्बूजान वगैरे प्रकार नाहीत, कारण त्याची येथे काही गरज नाही. किशोर कदमच्या चारही (!) मुलांची कामे मस्त. तो मित्र, म्हातारी आई, सरकारी कर्मचारी, एसटीतील इतर कर्मचारी, "फलाट" आणि कॅन्टीन चे वातावरण सगळे छान घेतले आहे. देविका दफ्तरदार चा ही रोल सुंदर आहे. अगदी दोष काढायचाच झाला तर त्या धाकट्या मुलीचा उत्साह जरा काकणभर जास्त वाटला. त्याचा मोठा मुलगा एक नाटकातील पत्रकाराची भूमिका करण्यासाठी त्याचे संवाद सतत पाठ करत असताना दाखवला आहे - काही शॉट्स मधे त्याचे संवाद आणि कथेतील शॉट यातून काहीतरी सांगायचा प्रयत्न असावा पण नीट कळाला नाही. फक्त एकदा तो घटनेने भारतीय नागरिकाला दिलेले अधिकार सांगताना वीज मंडळात यांची फाईल फिरताना/बंद होताना दाखवलेले आवडले.

वीज मंडळात मात्र काय चाललेले असते ते जरा आणखी खोलात दाखवले असते तर आवडले असते. हजारो लोक ज्यात काम करत असतात अशा ऑफिसेस मधे काही पद्धती/सिस्टीम्स असाव्या लागतात. त्यात काय दोष आहेत (कशामुळे हा प्रश्न सुटायला एवढा वेळ लागतो) वगैरेचे चित्रण जरा जड/कंटाळवाणे झाले असते म्हणून टाळले असेल.

मी हरिश्चन्द्राची फॅक्टरी पाहिला नाही, त्यामुळे तो किती चांगला आहे मला माहीत नाही, पण एका मोठ्या लोकशाहीत एका सामान्य नागरिकाला आपल्या अधिकारांची जाणीव होउन तो त्याचा कसा वापर करतो हे इतक्या मनोरंजक पद्धतीने दाखवणारा चित्रपट हॉलीवूड मधल्या लोकांना नक्कीच आवडला असता असे वाटते. अमिताभने एका ठिकाणी म्हंटल्याप्रमाणे ऑस्कर म्हणजे ऑलिम्पिक सारखी सर्वोच्च स्पर्धा नव्हे, ती केवळ एका वेगळ्या वातावरणातील वेगळ्या चवीच्या लोकांनी घेतलेली स्पर्धा आहे, पण जर आपण दरवर्षी पाठवत आहोत, तर त्यांना आवडू शकणारा असा चित्रपट पाठवायला हरकत नव्हती.

एकूण अतिशय सुंदर आणि हलका फुलका चित्रपट आहे, जरूर बघा!

नंतर एक आठवले - "कंडक्टर" (वीजवाहक या अर्थाने) चा वीज प्रवाह काढून घेणे यात लेखक-दिग्दर्शकांना काही श्लेष दाखवायचा होता की काय कोणास ठाउक :)

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2010 - 1:57 pm | स्वाती दिनेश

चित्रपट मिळवून पाहिन,
परीक्षण चांगले !
स्वाती

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 2:00 pm | विसोबा खेचर

मुख्य कथा ही की या एका साध्या कुटुंबाला विजेचे बिल एकदम बरेच मोठे येते आणि नायकाला आपले काम सांभाळून वीज मंडळाकडून ते दुरूस्त करून घेताना काय अडचणी येतात आणि त्यावर ते सगळे कसा मार्ग काढतात याचे चित्रण आहे.

मूळ कथासूत्रच अजब आहे, अनोखं आहे! :)

सुरेख परिक्षण...

तात्या.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 Feb 2010 - 2:29 pm | भाग्यश्री कुलकर्णी

महाराष्ट्रात गेल्यावर नक्की मिळवुन पाहिन.

शुचि's picture

12 Feb 2010 - 3:52 pm | शुचि

परीक्षण आवडलं. सर्वांगानी विचार केलेला आहे.

पिक्चर पहाणं न पहाणं गौण कारण आम्हाला पिक्चर आवडत नाहीत. पण परीक्षणं जरूर आवड्तात.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2010 - 3:52 pm | भडकमकर मास्तर

परीक्षण आवडले.
बहुतेक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा हा सिनेमा आहे..
यातल्या म्हातार्‍या आईचे काम केले आहे त्यांचा लेख एका दिवाळी अंकात ( बहुतेक दीपावली / माहाराष्ट्र टाईम्स ??)आलेला वाचला होता...

शंका .. एक कप च्या असे नाव का दिले असावे?
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

मिसळभोक्ता's picture

12 Feb 2010 - 11:43 pm | मिसळभोक्ता

एक कप च्या असे नाव का दिले असावे?

लाच = च्या पाणी

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

रेवती's picture

12 Feb 2010 - 6:38 pm | रेवती

छान परिक्षण!
देविका दफ्तरदारचा अभिनय मला आवडतो.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांचे सगळे सिनेमे नाही पाहिलेले पण दोनेक सिनेमात काही आवडलेल्या गोष्टी म्हणजे घरगुती वातावरण आणि साधेपणा. रोज जसे आपण राहतो तसे वातावरण, फार भपका नाही.

रेवती

अभिज्ञ's picture

12 Feb 2010 - 10:00 pm | अभिज्ञ

ह्या नावाचा चित्रपट आहे व तो कधी रिलिज झाला हे खरच माहित नाही.
परिक्षण वाचून तर हा चित्रपट नक्कीच पाहणार.
बाजारात ह्या चित्रपटाची डिव्हिडी उपलब्ध आहे का?
अन चित्रपट पाहण्यास उद्युक्त करणारे अजून एक कारण म्हणजे "किशोर कदम" ह्यांच्या कामाचे वाचलेले कौतुक.
"जोगवा" व "नटरंग" हे दोन्ही चित्रपट पाहुन आपण तर किशोर कदम च्या अभिनयाचे फॅन झालो आहोत.

असो
परिक्षण आवडले.