मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विद्यार्थ्यांनो...

पुंबा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
देव, गुरू आणि पालक चिकित्सेच्या पलिकडले आहेत, त्यांना कुठलेही प्रश्न विचारू नयेत, जसे असतील तसे स्विकारावेत. त्यांच्यात दोष असू शकत नाहीत हे मुकाट्याने मान्य करा. जे जे हे सांगतील ते ते नैतिक, महान, अंतिम सत्य, तुमच्या शंका, तुमचे आक्षेप म्यानबंद करून त्यांच्या वाटेने चालू पडा. तुम्हाला दिसू शकतील वेगळ्या वाटा, कुठल्यातरी निराळ्याच सत्याची छोटी शलाका, आम्ही त्याचा बंदोबस्त करू व्यवस्थीत, तुम्ही फक्त ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची झापडं बांधा. देव, गुरू, पालक यांचे मातीचे पाय दिसले कधी चुकून जरी तरी तेच पुनःपुन्हा पुजा. तुम्ही सगळे असे प्रश्न न विचारणारे, गुणवान, कधीही बंड करण्याची शक्यता नसणारे व्हाल, कणा मोडलेल्या मेंढरांना हाकणे आम्हाला देखिल सोपे पडेल. एकसाची, एकजीनसी, आज्ञाधारक गुणी बालक आम्ही म्हणेल त्याचा खात्मा करू शकेल. लक्षात ठेवा, चिकित्सा, टीका आदी चार्वाक- तुकारामाचे फालतू लाड तुमच्याकरीता नाहीत. आम्ही वर्षानुवर्षे जपलेली असत्ये, पडलीच उघडी चुकुनमाकुन तर व्यवस्थाच बुडेल आमच्यासहित. चला, प्रश्नचिन्हांची छाटणी चालूये, एका हाताचे अंतर घ्या, रांग धरा, एकही प्रश्न विचारू नका, आयती उत्तरे मिळतील ती पाठ करा. संदर्भः
http://www.thehindu.com/news/national/dont-question-god-guru-and-parents-minister/article19626164.ece

वाचन 7636 प्रतिक्रिया 0