बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो.
स्वानुभव
१९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.
त्या काळात (आजही ही परिस्थिती फार सुधारलेली नाही असे माध्यमांतील माहितीवरून कळते) बलुचिस्तानमधे घर असलेल्या व्यक्तीला सुट्टीत स्वतःच्या घरी जायला कराची मार्गे जावे लागत असे. कराचीपर्यंतच्या दोन तासाच्या विमानप्रवासानंतर तेथून घरी जाण्यास अजून ४ ते ५ दिवस लागत असत. ती परिस्थिती खरी असल्याने माझ्या ऑरगॅनायझेशनमधील बलुची लोकांना सुटीला जोडून १० दिवस ट्रॅव्हल टाइम दिला जात असे. ही झाली बलुचिस्तानमधील रस्त्यांची व दळणवळणाची स्थिती. बलुचिस्तानमध्ये मोठी धरणे आहेत व त्यावर मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. पण, त्यांच्या परिसरांतील बलुची गावा-शहरांना त्यांचे पाणी अथवा वीज मिळत नाही. सर्व फायदा दूरवरच्या पंजाबमध्ये जातो अशी त्यांची तक्रार असे. इतकेच काय, आमच्या ऑरगॅनायझेशनमध्ये असलेल्या पाकिस्तानी अधिकार्यांसमोर "तुम्ही बांगला देशाला स्वतंत्र व्हायला मदत केलीत. आम्हाला का नाही करत ? आम्हाला नाही राहायचे यांच्याबरोबर" असे आम्हाला सांगत असत. कोणाचीच बाजू घ्यायची नसल्याने आम्हाला (मी व इतर भारतीय अधिकारी) बरेच ऑकवर्ड वाटत असे. पण त्यांची तळमळ खरी असे हे स्पष्ट दिसत असे.
आजही तेथे वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, इत्यादी मूलभूत सेवांची चणचण आहेच. नोकरीतली महत्वाची पदे व व्यवसाय पाकिस्तानच्या इतर प्रांतांतून, विशेषत: पंजाबमधून, आलेल्या लोकांनी बळवले आहेत. चीनच्या सहकार्याने विकसित होणार्या ग्वादर बंदराच्या प्रकल्पाचे फायदे स्थानिक लोकांना न मिळता ते स्थलांतरीत लोकाना मिळत आहे, बलुचींना, मिळालेच तर, बहुदा कष्टाच्या कामावर समाधान मानावे लागत आहे.
बलुचीस्तानचा नजिकचा इतिहास
थोडक्यात, बलुची स्वातंत्र्याची आस फार जुनी आहे. तिची मुळे १९४७ साल व त्यानंतरच्या बलुचिस्तानच्या इतिहासातील घडामोडींत आहेत...
१. बलुचिस्तान ब्रिटिश इंडियाचा भाग कधीच नव्हता. त्या भूभागावर ब्रिटिश सरकारचा (ब्रिटिश इंडीयाच्या प्रशासनाचा नव्हे) कमीजास्त प्रभाव असे. खरान, लासबेला, मक्रान आणि कलात अशी चार राज्ये एकत्रितपणे बलुचिस्तान अशी ओळखली जात असत. त्यातल्या कलातच्या खानाची त्यांच्यावर तडक अथवा मांडलिक या नात्याने कमीजास्त सत्ता होती. मात्र, ट्रायबल राज्ये असल्याने या राज्यांत काही ना काही कुरुबुरी चालू असत.
२. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या (१४ ऑगस्ट १९४७) तीन महिने अगोदर महंमद अली जिन्ना (होय तेच ते कायदे आझम जिन्ना) यांच्या ब्रिटिश दरबारी केलेल्या वकिली कारवाईने, ब्रिटिश राणीचा दूत या नात्याने ब्रिटिश व्हॉइसरॉय, जिन्ना व खान ऑफ कलात (त्या वेळेस बलुचिस्तानच्या राजाचे हे नामाभिदान होते) यांच्यात ११ ऑगस्ट १९४७ या दिवशी एक करार केला गेला. त्यातली महत्त्वाची कलमे खालीलप्रमाणे आहेत (त्यातल्या काही भागांकडे लक्ष वेढण्यासाठी ते मी ठळक केले आहेत). मात्र, कराराची कलमे मूळातून समजावीत यासाठी मुद्दाम त्यांचे भाषांतर केलेले नाही :
a. The Government of Pakistan recognizes Kalat as an independent sovereign state in treaty relations with the British Government with a status different from that of Indian States.
b. Legal opinion will be sought as to whether or not agreements of leases will be inherited by the Pakistan Government.
c. Meanwhile, a Standstill Agreement has been made between Pakistan and Kalat.
d. Discussions will take place between Pakistan and Kalat at Karachi at an early date with a view to reaching decisions on Defence, External Affairs and Communications.
३. या करारातील वकिलीची फी म्हणून जिन्नांनी कलातच्या खानाकडे स्वतःच्या वजनाइतके सोने मागितले होते व खानाने ते दिले..
४. म्हणजे, खुद्द जिन्नांच्या वकिलीने; भारत (१५ ऑगस्ट १९४७) व पाकिस्तान (१४ ऑगस्ट १९४७) या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याच्या अगोदर काही दिवस; ११ ऑगस्ट १९४७ ला बलुचिस्तान स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनला होता.
५. त्यानंतर बलुचिस्तानच्या दार उल आवाममध्ये (देशाचे निर्णय घेणारी सभा, एकप्रकारे लोकसभा) आपण स्वतंत्र रहावे की भारत, अफगाणिस्तान किंवा इराण यापैकी कोणा एकात विलीन व्हावे यासाठी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेत पाकिस्तान हा पर्याय नव्हता. (आता पाकिस्तानात असलेल्या नॉर्थ वेस्ट फ्राँटीयर प्रॉव्हिन्सचे (आताचा खैबर पख्तूनवा) नेते "सरहद्द गांधी" खान अब्दूल गफार खानही आम्हाला भारतात घ्या असा आग्रह करत दिल्लीत आले होते व काही दिवस ठाण मांडून बसले होते. खान अब्दूल गफार खान नॉर्थ वेस्ट फ्राँटीयर प्रॉव्हिन्सचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या एका इशार्यावर कडवी पठाण जमात हातातले शस्त्र खाली टाकायला तयार असे इतका त्यांचा प्रभाव होता. पण, तो मुस्लिम प्रांत असल्याने त्यांची विनंती अमान्य केली गेली. ते, "तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या हाती सोपवता आहात" असे म्हणत नाईलाजाने परतले. त्याकाळच्या या प्रांताचे विचार पाहता बलुची लोकांच्या विलिनीकरणचर्चेत पाकिस्तान पर्याय नसल्याचे आश्चर्य वाटू नये.)
६. काही काळानंतर, जिन्नाचे मन बदलले व ऑक्टोबर १९४७ पासून त्यांनी कलातच्या खानावर विलिनीकरणाचा दबाव आणायला सुरुवात केली. म्हणजे ज्याला फी घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले तोच देश गिळंकृत करण्याचे ठरवले.
७. २१ फेब्रुवारीमध्ये कलातच्या दार उल आवामने पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दर्शविला.
८. २६ मार्च १९४८ ला पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानवर हल्ला करून त्याला काबीज करणे सुरू केले.
९. २७ मार्च १९४८ रोजी बलुचिस्तानच्या पाकिस्तानबरोबरच्या विलिनीकरणावर कलातच्या खानाची जबरदस्तीने सही घेतली गेली. अश्या रितीने ब्रिटिश साम्राज्यापासून राणीच्या सहमतीने स्वतंत्र झालेला बलुचिस्तान २२७ दिवसांच्या स्वातंत्र्यानंतर बळजबरीने पाकिस्तानचा प्रांत बनला.
१०. हे अर्थातच, बहुसंख्य बलुच लोकांना मान्य नव्हते. त्यामुळे, तेव्हापासूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई चालू आहे. तेव्हापासून आजतागायत, पाकिस्तानी फौजेने अनेक हत्याकांडे, मानवी अत्याचार, नरसंहार आणि इतर क्रूर कारवाया केल्या आहेत. बलुच स्वातंत्र्याच्या घोषणा देणर्या लोकांना हेलिकॉप्टरमधून वर नेवून खाली भिरकावून देण्यासारख्या अनेक जगाने कधी न पाहिलेल्या कारवाया यात सामील आहेत. हल्ली मोबाईल फोन व सोशल मिडियाच्या मदतीने हा इतिहास हळू हळू सबळ पुराव्यांसह (रियल टाईम संदेश, व्हिडिओ क्लिप्स, इ) उजेडात येत आहे.
११. बलुचिस्तानचा हा इतिहास काश्मीरशी बराच मिळताजुळता आहे. मात्र, काश्मीर भारताला लागून आहे, काश्मीरचा राजा भारताकडे मदत मागायला आला आणि भारताने काश्मीरमध्ये लष्करी कारवाई केली म्हणून काश्मीरमधला परिणाम वेगळा दिसत आहे. इतकेच.
बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा यशस्वी न होण्याची काही मुख्य कारणे
१. पाकिस्तानचा जवळ जवळ अर्धा भूभाग (३४७,१९० चौ किमी) असलेल्या या एवढ्या विशाल भूभागात फक्त १ कोटी ३२ लाख लोकसंख्या आहे (संपूर्ण पाकिस्तानचि लोकसंख्या १८ कोटीपेक्षा जास्त आहे). त्यातले फक्त निम्मेच बलुच (५४%) असून इतर पश्तून (३०%), ब्राहुई (१५%), हजार, सिंधी, पंजाबी, उझबेक, तुर्कमेन, इत्यादी आहेत.
२. बलुची लोकसंख्या एकसंध नसून अनेक टोळ्यांत विभागली गेली आहे. त्या टोळ्यांत क्षुल्लक कारणाने विवाद होणे हे विरळ नाही. त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्यलढा विविध विचारधारांच्या अनेक गटांकडून स्वतंत्रपणे लढला जात आहे. पाकिस्तानी सैन्य, अर्थातच या दुफळीचा पुरेपूर उपयोग करून घेत आले आहे.
३. हा भाग पाकिस्तानने कसोशीने जगाच्या डोळ्यांपासून दूर ठेवलेला आहे. तेथे स्थानिक व परदेशी वार्ताहरांना मुक्त प्रवेश नाही. केवळ सरकार (मुख्यतः सैन्याने निवडलेले) वार्ताहर तेथे जाऊ शकतात व अर्थातच त्यांचे वार्तांकन म्हणजे सैन्याचा प्रचार (प्रोपागांडा) असतो. तेथे गेलेल्या अनेक पाश्चिमात्य वार्ताहरांना शारीरिक मारहाणही झालेली आहे, यात एक स्त्री वार्ताहरही आहे. अफगाणिस्तानच्या दगडाखाली पाय सापडलेल्या अमेरिकेचे पाकिस्तानशी असलेले संबंध, पाश्चिमात्य वार्ताहरही तेथे सुरक्षित नसण्यात व या प्रकाराचे जागतिकीकरण न होण्यास कारणीभूत आहेत (चीनच्या मते मसूद अझहर अतिरेकी नाही, अगदी तसेच !).
४. पाकिस्तानातील बलुची भूभागाबरोबरच, त्याला लागून असलेल्या अफगाणिस्तान आणि इराणमध्येही बलुचबहुल किंवा लक्षणीयारित्या बलुच लोकसंख्या असलेले भूभाग आहेत. या तीन देशांतील बलुच भूभागाचे एकत्रिकरण होऊन स्वतंत्र बलुचिस्तान बनावा अशी इच्छा असलेले गट तेथेही आहेत. त्यामुळे, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीकडे ते दोन देशही संशयाने पाहत असतात व शक्य तेवढे ते प्रयत्न दडपत असतात.
५. या वरच्या स्थानिक कारणांमुळे व जागतिक पाठबळ नसल्यामुळे बलुची स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मनुष्यबळ, रसद, शस्त्रे, दारुगोळा आणि राजकीय पाठिंब्याच्या सततच्या अभावात आपला संघर्ष चालू ठेवणे भाग पडले आहे.
६. नजीकच्या काळात या परिस्थितीत काही लक्षणीय बदल होईल अशी सद्य परिस्थिती नाही.
७. पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा उल्लेख आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केल्यामुळे, ही समस्या जगासमोर प्रकर्षाने आली आहे. मात्र, मध्यपूर्वेतल्या बंडाळीत अडकलेले असल्याने व अमेरिकेचे पाकिस्तानातील हितसंबंध पाहता, पाश्चिमात्य सत्तांना बलुचिस्तानकडे फार लक्ष देण्याइतका वेळ व रस आहे असे दिसत नाही. तरीही, त्यांच्या चळवळीला बर्याच दिवसांनी मिळालेल्या या प्रसिद्धीचा उपयोग करून संयुक्त राष्ट्रसंघावर जितका प्रभाव पाडता येईल तितका पाडण्याचे प्रयत्न, पाश्चिमात्य देशात विस्थापित झालेले बलुच नेते, न्यू यॉर्क व जिनिवा येथे करत आहेत.
असो सद्या इतकेच पुरे.
==========================
मुख्य संदर्भ :
१. http://nation.com.pk/blogs/05-Dec-2015/how-balochistan-became-a-part-of-pakistan-a-historical-perspective
२. https://en.wikipedia.org/wiki/Balochistan,_Pakistan
वाचन
15811
प्रतिक्रिया
31