मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उडदामाजी "काळे"-गोरे

गुलाम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.' (आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला. "अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?" "४ फक्त. तुमच्याकडे?" "२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो." "अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल." "अगं पण तो बिचारा..." "लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो." . . . "हे काय बिनकांद्याचे पोहे?" "अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात. तुम्ही एक दिवस बिनकांद्याचे पोहे नाही खाउ शकत?" " " "आणि आज जर का पैसे नाही मिळाले तर चहा पण बिनदुधाचा प्यावा लागेल. आज टिव्हीवर सांगत होते की आता पेट्रोल पम्पावर पण पैसे मिळणार आहेत. तिथंच बघा आज." . . . १. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?" "कितीचं पेट्रोल टाकायचंय?" "अहो पेट्रोल नको फक्त कॅश पाहिजे." "कुठुन येरवड्यावरुन आलात का?" "नाही. चिंचवडवरुन" "खी:.. खी:.. खी:.." "" २. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?" "आमाला पावर नाय" "म्हणजे? हा पेट्रोल पम्प नाही?" "पेट्रोल पम्प नाहीतर काय देशी दारुचा गुत्ता आहे? ते फक्त एसबाय च्या मशिन असेल तर मिळतंय." ३. "भैय्या. स्वाइप करके कॅश मिलेगा क्या?" "कितना चाहिये?" "२०००" "गाडी साइड मे लगाओ और कार्ड लेके इधर आओ." (आज मै उपर, आसमां निचे...) "चार्जेस लगेगा" "कितना" "२००" "अहो पण माझे तर १००% पांढरे..." . . . शेवटी मनाचा हिय्या करुन गुलामानी रणांगणावर जायची तयारी सुरु केली. कानात हेडफोन, खिशात किंडल, कमरेला आयपॅड, कपाळाला गंध, हातात भवानी आपलं.. पाण्याची बाटली.. गनिमाचं बळ बरंच दिसत होतं. हरकत नाही. शक्ती दे जगदंबे. हर हर महादेव!!! "च्यायला... २ तास झाले. रांग अजुन तिथंच आहे. काळे लोक तिकडे मस्त मजेत आहेत. ५०० कोटी नुसत्या लग्नावर उडवतायेत आणि गरिबाला स्वतःचेच ५०० सुध्दा मिळत नाहीत." "अहो थोडे दिवस त्रास सहन करा. मग बघा. राजकारण्यांची तर चांगलीच जिरणार आहे. सगळे काळे बाहेर येणार आहेत"- पाठीमागुन एक गोरा म्हणाला "पण मी तर ऐकलं की त्यांच्याकडे कॅश फारशी नसतेच. सगळे शेअर्स, जमिनी आणि सोनं वगैरे.."- गुलाम "सगळंच निघणारे आता. बघाच तुम्ही. या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सगळा देश पोखरलाय. ही कीड एकदाची काढून टाकायलाच पाहिजे. आता अख्खा देश बदलायचा म्हणजे आपण पण थोडा त्रास सहन करायला नको का? ३० डिसेंबर पर्यंत कळ काढा फक्त." - पुन्हा तोच गोरा माणूस शरीराचं ओझं या पायावरुन त्या पायावर करत गुलामानी निमुटपणे मान हलवली. "अरे दार उघडलं. दार उघडलं." "शांतपणे रांगेत या सगळ्यांनी." "अरे ढकलु नका रे" "अहो पण मी सिनीअर सिटीझन आहे..." "सोबत लहान मुल आहे हो..." "अरे देवा!!! दार पुन्हा बंद झालं. म्हणजे गेला अजुन एक तास..." "अहो दार उघडा ना प्लीज.. माझा भाउ आत गेलाय आणि डॉक्युमेंट्स माझ्याकडेच राहिलीत..." "तो आत्ताचा गोरा माणूस कुठे गेला? आत्तातर माझ्या मागे उभा होता" - गुलाम करड्या रंगाच्या काचेतुन तो गोरा माणूस मात्र शांतपणे कॅश काउंटरवर उभा असलेला दिसत होता...

वाचन 9359 प्रतिक्रिया 20