मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समोसा

प्रभाकर पेठकर · · लेखमाला
समोशाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत - १) पंजाबी समोसा २) पट्टी समोसा. पंजाबी समोशासारखेच 'दिसणारे' दुसरे समोसे म्हणजे लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा. पंजाबी समोसा, लखनौ समोसा आणि गुजराथी समोसा ह्यांना एकच संज्ञा वापरली जाते, ती म्हणजे 'पंजाबी समोसा'. वरून दिसायला सारखेच असले, तरी त्यातील सारण वेगवेगळे असते. पंजाबी आणि गुजराथी समोशात बटाट्याची 'भाजी' असते. पंजाबी समोशात मसाले जरा तीव्र असतात, तर गुजराथी समोशात बटाट्याची भाजी तुलनेने सौम्य असते. दोन्ही समोशातील भाजी पिवळ्या रंगाची असते. पंजाबी समोसे पिरॅमिडसारखे असतात, तर गुजराथी समोसे त्रिकोणीच पण झोपवलेले (जरा चपटे) असतात. लखनौ समोशातील सारण खास मसालेदार असते. आले-लसूण-मिरची, जिरे, गरम मसाला, चाट मसाला घालून चमचमीत करतात. क्वचित कोठे त्यात भाजलेली बडीशोपही घालतात, तर शिया मुसलमानांकडे ह्या समोशात काजू तुकडे आणि बेदणेही घालतात. यातील अंतर्भूत जिन्नस तुमच्या चवीच्या प्राधान्यावर अवलंबून असते. मी मूलभूत जिन्नस इथे देत आहे. साहित्य : मैदा - २ वाट्या तेल - अर्धी वाटी आलं - १ इंच लसूण - ४ पाकळ्या हिरव्या मिरच्या - ३ जीरं - अर्धी लहान चमचा (टी स्पून) मटार - अर्धी वाटी कांदे - एक मोठा बटाटे - ३ मध्यम तिखट - अर्धी लहान चमचा. गरम मसाला - १ लहान चमचा चाट मसाला - १ लहान मसाला किंवा गरजेनुसार जास्त घ्यावा. 1 कृती : मैदा आणि तेल मिसळून घ्यावे. किंचित मीठ (१/८ लहान चमचा) घालून थोडे थोडे पाणी मिसळत पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठ जरा जास्त मळावे लागते. जास्त मळल्याने त्यात ग्लुटन तयार होऊन पीठ एकजीव होते. हे मळलेले पीठ बाजूला ठेवून द्यावे. साधारण २० मिनिटांनी मैद्याचे गोळे बनवून लंबगोल आकारात जाडसर लाटून त्याला मधून कापून त्याच्या दोन पट्ट्या बनवाव्यात. 1 ह्या प्रत्येक पट्टीचा एक समोसा होतो. म्हणजे एका लंबगोल पोळीतून दोन समोसे बनतात. सर्व पट्ट्या बनवून त्यावर ओले कापड टाकून झाकून ठेवावे. कांदा बारीक चिरून मध्यम आचेवर, लाल रंगावर तळून घ्यावा, 1 आणि बाजूला ठेवून द्यावा. 1 आता दुसर्‍या पातेल्यात थोडे तेल घालून त्यावर जिरे टाकावे. जिरे तडतडले की त्यावर आले, लसूण, मिरची पेस्ट टाकून परतावे. नंतर त्यावर मटार घालून परतावे. मटार फ्रेश असतील (मी फ्रोजन वापरलेत) तर उकडून घ्यावेत आणि मग वापरावे. मटार परतून शिजले की त्यावर तिखट, गरम मसाला घालून परतावे. 1 मसाला न जाळता नीट परतून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि त्यात उकडलेले बटाटे, तळलेला कांदा आणि चाट मसाला मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट मळून घ्यावे आणि त्याचा एक गोळा करावा. आता समोशाची एक पट्टी, सरळ बाजू (कापलेली) तर्जनीवर येईल अशी ठेवून त्याच्या मध्यापासून डाव्या बाजूला अर्ध्या भागावर, फक्त कडेलाच पाणी लावून चण्याच्या पुडीप्रमाणे त्याची घडी घालावी. पाणी लावलेली बाजू दुसर्‍या बाजूवर दाबून त्याचा कोन बनवावा. 1 ह्या कोनात सारण भरून पट्टीच्या वरच्या भागाला पाणी लावून डब्याला झाकण लावतो तसे बंद करून घ्यावे. कडा दाबून त्याची बैठक बनवावी आणि एका ताटलीत काढून ठेवावी. 1 असे सर्व समोसे (बारा होतील) बनवून घ्यावेत आणि मंद आचेवर तळून घ्यावेत. 1 शुभेच्छा.

वाचन 34094 प्रतिक्रिया 39