मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किल्ले ढाकची भरकटलेली भटकंती

हृषीकेश पालोदकर · · भटकंती
खंडाळयाच्या घाटातील राजमाची किल्ला तसा ब-याच जणांच्या परिचयाचा आहे. राजमाची किल्ला हा श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन वेगळ्या दुर्गांचा मिळून बनलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार हा किल्ला अजूनही मजबुतीने उभा आहे . घनदाट जंगलात वसलेल हे ठिकाण एकदा अवश्य भेट देण्यासारख आहे. दुरून ही जोडगोळी जितकी आक्राळ विक्राळ वाटते तितकी मात्र ती नाही. एखाद्या धष्टपुष्ट पाहिलवानाने अदबीने आणि नम्रतेने मृदु आवाजात बोलल्यास आपल्याला त्याच्याबद्दल जो आदर निर्माण होतो तोच अनुभव गडाजवळ गेल्यावर येतो. राजमाची सर करायला आम्ही चौघा मित्रांनी सायंकाळी सात वाजता लोणावळयातुन सुरुवात केली. २००५ चा मार्च महिना होता. वन्य प्राणी पाहायला मिळावे म्हणून अंधाराची वेळ मुकरर केली होती. पोर्णिमा दोन तीन दिवसांवर होती, तसा चंद्रप्रकाश भरपुर होता त्यामुळे बॅटरी घेतली नव्हती. आणि त्याकाळी आमच्यापर्यंत मोबाईल पण पोहोचले नव्हते.आमची सहल वेळेवर ठरल्याममुळे मावळे कसेबसे कॉलेज उरकून हाताला येईल ते सामान आणि कपडे घेउन आले होते. लोणावळा स्टेशन वरून काही अंतर चालून तुंगार्ली धरणा नंतर एक घळ आहे तिथून खरा जंगल प्रवास सुरु होतो. घळीत जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा डोळे उघडे आहे हे पाहायला डोळ्यात बोट घालून पाहाव लागाव इतका काळाकुट्ट अंधार होता. दाट झाडी होती. हे अंतर कसंबसं धडपडत पार पडलं. पुढे दोन तीन तास आंधळी कोशिंबीर खेळत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करत रात्री एक वाजता आम्ही उधेवाडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. कुत्र्यांच्या संरक्षक टोळीने आमचं धडाक्यात स्वागत केल. सुदैवाने गावातली एक व्यक्ती जागी होती.त्यामुळे एका घरात पथारी टाकायला जागा आणि प्यायला पाणी मिळाले. सकाळी मावळे निवांत उठले. रात्रीच्या प्रवासाच्या गप्पा मारत मारत चहा नाश्ता झाला मग श्रीवर्धन आणि मनोरंजन च्या देशेने कूच केल. गडांवरून सभोवतालचा परिसर खूप सुंदर दिसतो . खंडाळ्याच्या घाटातली रेल्वे तर खेळण्या सारखीच दिसते. गडावरील वास्तू पाहत आणि वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग आठवत वेळ कसा जातो कळत नाही. श्रीवर्धन गडावर एक विस्तीर्ण गुफा आहे त्यासमोर मोठा पाण्याचा हौद आहे. चांगला दोन तीन पुरूस खोल. त्यात दोन तोफा पडलेल्या आहेत. या गुहेत बरेच ट्रेकर्स मुक्काम करतात. बाले किल्ल्यावरून पूर्वेला ढाकचा बहिरी दक्षिणेला लोहगड आणि विसापूर किल्ले दिसतात. ढाकचा बहिरी त्यामानाने जवळ वाटतो. आमच्यातल्या एका मावळ्याने ताबडतोब ढाकच्या स्वारीचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते संमत झाला. त्यानंतर एक तासाच्या आत जेवणाच्या भाकरी घेऊन आम्ही ढाकसाठी निघालो. उन चांगलच तापल होत. चार पाच तासांची पायपीट करून दाट जंगलात हा किल्ला आहे . वाचून या गडाबद्दल थोडीफार माहिती होती. वरवंड गावातुन पुढील वाटेची खातरजमा केली. “वाट चांगली हाय पण जंगलात चुकू नका अन गडाच्या टाक्याशिवाय रस्त्यात कुठंच पाणी गावायच नाय “ असा मोलाचा सल्ला एका गावकरीने दिला. कसला गड आणि कसली गुफा. तीन एक तासाची पायपीट बाकी होती. सहयाद्रीच रौद्र रूप,घनदाट जंगल, ती सगळी निरव शांतता, किडयांचा विचित्र आवाज, चढ उतारांची ती वाट, कुठल्या तरी नवीन जगात आल्यासारखं वाटत होत . मधुनच कुठल्यातरी जंगली वनस्पतीचा सुगंध दरवळुन जायचा. तो आजही आठवल कि नाकात दरवळतो. संध्याकाळ जवळजवळ झालीच होती. साक्षात शिवरायांनी दोनदा भेट दिलेल्या जांबोली गावाजवळ असलेल्या कुंडेश्वर शिव मंदिरात आम्ही पोहचलो. आधी विचार होता मंदिरातच मुक्काम करावा परंतु तिथे थांबायची कुणाची हिम्मत होत नव्हती. सोमवार असल्याने पूजा वगैरे कुणीतरी करून गेलेले होते पण बाकी भयाण वाटत होते. इथुन दोन तीन वाटा फुटतात नशिबाने आम्ही जी पकडली तीच वाट बरोबर होती. थोडा वेळ चालल्यावर ढाकच्या डोंगराच्या अलीकडे एक दरी पार करावी लागते.संपुर्ण पश्चिम दिशा हया डोंगराने अडवल्यामुळे सुर्यनारायणाने आम्हाला तासभर आधीच निरोप दिला होता. त्या दरीत खुप दाट झाडी होती. हळु हळु अंधार पडायला लागला आणि पक्षांचे विचित्र आवाज यायला लागले.वाटेत एखादा वाटसरू भेटेल हा आमचा अंदाज साफ चुकला.राजमाची किल्ला आणि ढाक यात खुप जास्त फरक आहे हे कळायला आम्हाला फार उशीर लागला. ढाकचा किल्ला म्हणजे एक महाकाय डोंगर.सभोवती घनदाट जंगल आणि नसल्यात जमा असलेली मानव वस्ती. गडाचा एकीकडचा संपुर्ण भाग म्हणजे केक कापल्याप्रमाणे सरळसोट कातळकडा ज्यात बहिरोबाची गुफा आहे आणि दुसरीकडे नावापुरती वाट असलेला पण त्यामानाने जरा बरा डोंगराचा भाग. दोन पावलांपुरतीच जागा असलेली ही वाट सरळ गडावर जाते. आजमितीस गडावर किल्याचा एकही अवशेष शिल्लक नाही. बहिरोबाच्या गुफेकडे जाण्यासाठी घळी उतरल्यावर पाउलवाटेने एका गुफेपर्यंत जाता येते.ती पण नावापुरतीच गुफा आहे. इथुन झाडाच्या मुळा टांगलेल्या आहेत. त्यांना पकडुन अंदाजे पन्नास साठ फुट चढल्यावर एक दुसरी मोठी गुफा आहे हेच आहे भैरोबाचे मंदीर. हया मंदीरावरूनच गडाला ढाकचा बहीरी हे नाव पडले आहे. हय गुफेतच कधीही न आटणारी पाण्याचे दोन टाके आहेत. अर्थात हि सगळी माहिती नंतर कळाली. आम्ही जिथे उभे होतो तिथून एक वाट दरीत आणि दुसरी वाट डोंगरावर जात होती . दरीतल्या वाटेने थोड पुढे जाऊन पहिल पण पावलागणिक ती अवघड होत होती त्यामुळे ती फसवी वाट असावी म्हणून दुसऱ्या वाटेने गडावर चढायला सुरुवात केली . सुरुवातीला मोठी वाटणारी ती वाट हळूहळू खूप निसरडी आणि अदृश्य व्हायला लागली . पुढे तर एक पाय ठेवण्य पुरती पण जागा नव्हती . आम्ही गडबडलो . आपण चुकलो हे लक्षात आलं. सगळा धीर सुटला . दुरून आकर्षक वाटणाऱ्या ह्या जंगलात संध्याकाळ इतकी भयाण असते अस कधी वाटल नव्हत . अंगातले त्राण गेले . आता कुठलीही वाट पकडणे म्हणजे आत्महत्या करण्यासारख होत . तिथे थांबणे म्हणजे वन्य प्राण्यांची भीती . कसबस धीर एकवटून रात्र इथेच घालवायची अस मावळ्यांनी ठरवलं . दाट झाडी पासून दूर डोंगराच्या एका कड्यावर जागा शोधली. आम्ही जिथे बसलो होतो तिथून समोर तीन चार फुटाचं अंतर होतं व पुढे खोल दरी. बसायला आणि टेकायला त्यातल्या त्यात ही बरी जागा होती. आसपास झाडी नसल्यामुळे प्राण्यांची भीती नव्हती. जंगलातुन चित्रविचित्र आवाज येत होते.सभोवतालचं भयानक जंगल, आक्राळ विक्राळ डोंगर , नजर न पुरणारी दरी आणि विचित्र आवाजांचं पार्श्वसंगीत असा डोळयासमोर हॉलीवूड पिक्चरचा खराखुरा सेट तयार झाला. पुण्यावरून निघाल्यापासून आम्ही मित्र एकमेकांशी ऐतिहासिक भाषेतच बोलत होतो. अविश्रांत बडबड करणार आमचं सैन्य आता मात्र केंव्हाचं चिडीचूप होत. आसपासच्या वाळलेल्या काड्या ,गवत गोळा करून आग पेटवली. प्रकाशाने धीर वाटला. आता एकाच गोष्टीची फिकीर होती ती म्हणजे आमच्याकडे फक्त अर्धी बाटली पाणी,दीड नाचणीची भाकरी आणि दोन बिस्किटचे पुडे एवढंच सामान शिल्लक होते. दिवसभराच्या चालण्याने खूप भुका लागल्या होत्या. उपाय म्हणून दर एक दीड तासाने प्रत्येकाने अर्धा अर्धा बिस्किट खायचं असा इर्मजन्सी प्लान ठरला. रात्रभर सगळयांनी जे जे येईल ते सांगायचं , गायचं आणि जागत राहायचं. प्राणी आल्यास कुठल्या बाजुला पळायच , ओरडायच कसं हयावर चर्चा करून आम्ही एक दोन तास अजुन ढकलले. मधुनच चंद्र आमची थट्टा करायला यायचा आणि परत ढगामध्ये लपून जायचा. कुणीतरी खटयाळपणे जोक करायचे. कुणी डुलक्या मारत होते.कुणी झोपेत बोलत होते,असं वाटत होतं की आडवं पडायला तरी मिळावं किंवा निदान पाय पसरावे पण समोर मोठी दरी.त्यातच दुर कुठल्यातरी डोंगरात वणवा पेटला होता.त्यामुळे ती पण भीती मनात घर करायला लागली होती. एक दोनदा प्राण्यांचे भास झाले. ती भयाण रात्र आपला एक एक डाव मांडत होती. सुर्यनारायणा च्या स्वागताची रांगोळी पूर्वेला क्षितिजावर दिसू लागली . मोरांचे आवाज यायला लागले आणि जीव भांड्यात पडला. सकाळी येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिल आवाज आणि रात्रीच्या पक्ष्यांचा भेसूर आवाज यात जीवन आणि मृत्यूचे सूर आहेत अस त्यादिवशी जाणवल. वेळ न घालवता सगळयांनी आधी शेकोटी नीट विझवली ,चतकोर भाकरी आणि पाण्याचा घोट घेऊन परतीच्या वाटेला लागलो. किल्ला बघण्याचा विचार देखील कुणी केला नाही. उन लगेच चढायला लागले होते. प्रचंड तहान लागत होती.बाटलीत फक्त चार घोट पाणी शि ल्लक होत आणि तेही जर कुणाला फारच त्रास झाला तर देण्यासाठी. कण्हतं कुथत पावलं मोजत आम्ही चालत होतो पण पाण्याविना चालवत नव्हत. कधी आपण पोटभर पाणी प्यू अस वाटत होत. निर्जळी चे संकट सोसायची ताकद उरली नव्हती. एक दोन ठिकाणी वाळूत झीरे उकरण्याचा प्रयत्न केला पण जमल नाही. पुढे एका ठिकाणी सुकलेला ओढा होता. त्यात एक घाण पाण्याचे डबके होते. जेमतेम टोपल्यात मावेल एवढे पाणी .त्या पाण्याची अवस्था वेगळी सांगायला नको , पण ती काही आम्हाला ते हिरवेगार पाणी पिण्यापासुन थांबवु शकली नाही.त्या पाण्याचा दुष्परिणाम नंतर बरेच दिवस जाणवला पण त्यावेळी आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम त्या पाण्याने केलं. सगळे निमुटपणे चालत होते. काही वेळाने एकदाच वरवंड गाव आलं. गावातल्या एका घरात भरपेट पाणी प्यालो.तिथल्याच एका दुकानातुन बिस्किटचे पुडे मागवले आणि उन शांत होईपर्यंत तसेच बसुन राहिलो. मजल दरमजल करत कसेबसे मावळे एकदाचे घरी पोहोचले आणि आमची भरकटलेली भटकंती संपली. लोक नियोजन करून अविस्मरणीय ठिकाणी फिरायला जात असतात पण विना नियोजनाची आमची ट्रीप अविस्मरणीय झाली . आजही कुणी ढाक चे नाव काढल्यास आम्हाला आधी पाणी आठवतं आणि मग ढाकचा किल्ला. टीप : फोटो उपलब्ध नाहीत.

वाचन 15081 प्रतिक्रिया 39