मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम सेवा शरण.

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रात्रभर तुझ्या आठवणीनी शिणलो. पहाटे पहाटे मी पारीजातकाचे झाड झालो. बरसत राहीलो तुझ्या अंगणात एकेका फुलातून.तुझी पावलं लालसर दिसतायेत ती प्राजक्ताची फुलं तू तुडवून गेलीस म्हणून. माझ्याशी न बोलता निघून गेलीस .मला माहीती आहे तू असशील त्या बटबटीत भडक कर्दळीच्या फुलाशी बोलत परसदारी. मग मी सकाळच्या कोवळ्या उन्हात मिसळून उंबरा ओलांडून घरात आलो.तू कुठे दिसलीच नाहीस. जुन्या घड्याळाच्या हलणार्‍या टोल्यासोबत माझा जीव पुढे पाठी होत राहीला. हातात वाढलेले पान घेऊन तू अंगणात आलीस तेव्हा मी मोठा ढग झालो आणि माझ्या सावलीत मी तुझ्याकडे बघत राहीलो. कुठूनतरी एका अगाऊ कावळ्याने तुझ्या हातावर झडप घातली आणि तू घाबरून घरात गेलीस.मी पुन्हा रागाने ऊन झालो. तू आरशासमोर उभी राहून कुंकू लावलस तेव्हा थोडसं सांडलं तुझ्या नाकाच्या शेंड्यावर . त्या सांडलेल्या कुंकवात मी होतोच. तू जा कुठेही मी असतोच तिथे. काल दुपारी कशीदा करताना टचकन् लागलेल्या सुईमुळे तुझ्या बोटातून रक्त आले.त्या लालबुंद थेंबातही मी होतो. तू देवापुढे हात जोडतेस तेव्हा एक हात माझा असतो. दुसरा हात माझ्या हातात आहे असे मी मला समजावतो. तू भेटत नाहीस मग मी रागावतो आणि भरदुपारी पळ्स होऊन माळावर फुलत राहतो. क्रमशा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हे असं छान छान लिहीलं .एका कागदावर सुंदर हस्ताक्षरात.वाळवलेली फुलं पण आणून ठेवली होती.थोडी हारातली आणि थोडी एक गजरा आणून वाळवळेली होती.एका पाकीटात व्यवस्थीत टाकून केमेस्ट्रीच्या लॅब मध्ये गेलो. निलीमा होती. मनाचा पक्का धीर करून गेले होतो. मला पाहिल्यावर ती हसली. "इकडे कुठे आज? कवि वगैरे तर कँटीन मध्ये असतात."ती म्हणाली. "मी तुलाच भेटायला आलो होतो."मी इरादा पटकन सांगून टाकला. "अय्या , हो? मंडळाची वर्गणी तर मी कधीच दिलेय." "नाही वर्गणी नाही. मी तुला एक पत्र लिहीलंय." मी आता मरणाला पण तयार झालो होतो. तिच्या दोन्ही हातात काचेच्या नळ्या होत्या. 'तुमचं आर्टस् वाल्यांच बरं आहे हो. तुम्हाला बरा वेळ मिळतो पत्र लिहायला.आमचं सायन्स वाल्यांच बघा." म्हणजे प्रकरण या मुलीला काही कळलं नव्हतं. 'बघा ना दोन तास झाले ,हवा तो रंगच येत नाही." (हा हवा तो रंग येण्यावर एकदा नंतर गजल लिहीण्याचं मी पक्क केलं) मी ते पत्र दाखवलं." हे वाचून नंतर मला सांग ." हिचं सगळं लक्ष त्या नळीत. पत्र ठेवून मी बाहेर पडलो. आता प्रतीक्षा. प्रतीक्षा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आलं आलं चार दिवसानी उत्तर आलं. "वाचलं बाई पत्र तुमचं .कित्ती कचरा त्या पाकीटात.मला तर एव्हढी ऍलर्जी आहे . मी शिंकतच बसले. तंबाखूची फक्की टाकून उरलेली तंबाखू तर नव्हती ना ती?असं माझी पार्टनर म्हणाली. आपल्या होस्टेलची मुलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तंबाखू खातात म्हणे.असं पण ती म्हणाली. मला तर पत्र कळलंच नाही काही. आमच्या कडे झाडंच नाहीयेत कसली कसली ती. मी बाबांना पत्र वाचून दाखवलं .त्यांनी तुमची जात विचारली आहे. होस्टेलला राहून एमे मराठी करताय असं सांगीतल्यावर म्हणाले घरचं बरं दिसतंय.पण जातीचं काय ते कळवा म्हणाले. आई म्हणाली की "प्रेमं वगैरे प्रकरण दिसतंय हे.तुला आवडला का मुलगा?" "प्रेमं नंतर करता येतात. लग्न एत्या वैशाखात करणार आहे का?" नलूमावशीसारखं नको . . "नलूमावशीला लग्नासाठी चार वेळा प्रेम करावं लागलं.चौथ्यांदा केलं तेव्हा झालं .नस्ता घोर जिवाला." "बाबा येउ देत का ?"असंही विचारलं आहे. मला सरळ सरळ सांगा ना. आपण फक्त प्रेम करायचंय की डायरेक लग्न.? माझ्या कवितांचे मोहर गळून पडले. मी काही बोलूच शकलो नाही.आता दुसरं लग्न करायचं कसं? सेकंड टर्मला लग्नाची प्रत्रीका पण आली. अशा रीतीने साठापेक्षा जास्तीत जास्त शब्दात पत्र लिहून आणखी लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न फसला.

वाचन 12641 प्रतिक्रिया 29