अतिंद्रिय शक्ती
लेखनप्रकार
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का? माझा आहे. माझ्या आईला अतिंद्रिय शक्ती होती.
मी सहावीत होतो. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्याची बातमी सकाळी घरी आली. फोन नव्हाता घरी. वहिनीने उत्साहाने तयार करुन ठेवलेली दुपट्याची पिशवी काढली. आईच्या हातात सुपुर्द केली. घरातुन बाहेर पडताना ती पिशवी आईने बरोबर न घेतल्याचे बघुन वहिनीने ती पिशवी माझ्या हातात दिली. " त्या पिशवी चा आता काही एक उपयोग नाही" असे म्हणुन आईने पिशवी मला परत ठेवायला लावली. हाताने इशारा करुन वहिनीला गप्प बसायला सांगितले. मला तेंव्हा हा प्रकार नेमका काय ते कळाले नाही. पण दादरला हॉस्पिटल मधे गेल्यावर उलगडा झाला. जन्माला आल्यावर सुमारे एक तासातच मुल वारलेले होते. ह्याला प्रिमॉनिशन (भविष्याची चाहुल) म्हणावे तर एकदा मामाची चोरीला गेलेली गाडी नेमकी कुठे मिळेल हे पण आईने नेमके सांगितलेले होते. तसेच बहिणीला एकदा साधा ताप आला होता. पण नेहेमीच्या शिरस्याप्रमाणे फॅमिली डॉक्टर कडे न नेता एकदम के.ई.एम. मधे नेण्याचा आईचा आग्रह त्यावेळी सगळ्याना बुच़ळ्यात टाकणारा होता. पण हॉस्पिटलला पोचल्यानंतर प्रकरण जीवावरचे होते हे लक्षात आले. असे अनेक आठवणी.
ह्या सर्व गोष्टीना वैज्ञानिक खुलासा माझ्याकडे नाही. आणि त्याचा विचार कधी केला नाही. फक्त अशा गोष्टी सांगताना आई ट्रांस मधे असायची हे पक्के आठवते. ह्याला अतिंद्रिय शक्ती म्हणावे काय.? भविष्यात येणा-या संकटाची चाहुल लागते? मग लिहुन ठेवलेले प्राक्तन म्हणजे काय.? मी ह्या न उलगडणा-या प्रष्नापासुन सहसा लांब रहातो. असतात हे त्या न दिसणा-या वर बसलेल्या 'जोकर' चे खेळ असे म्हणतो आणि पळुन जातो.
जाता जाता: आई जायच्या आधी चार दिवस मी तिच्या जवळ बसलेलो होतो. तेंव्हा तीचे एक वाक्य आजही आठवते. " गुरुदक्षिणा विसरु नकोस. आता कळणार नाही. योग्य वेळ येईल तेंव्हा माझे वाक्य लक्षात ठेव.."
मी साहेबांबरोबरचे काम सोडलेलेल्या जवळ जवळ २० वर्षे झाली होती. एकदा दुपारी अचानक साहेब घरी आले. आणि मला म्हणाले, "तुझी खुर्ची तुला परत बोलवते आहे."
मी माझे इतर काम संभाळुन सुमारे दिवसाला ६ तास नविन स्टाफ ला ट्रेनींग द्यायचे काम वर्षभर केले.
मी कुठलेही भाकीत करायचे टाळतो.
वाचन
25896
प्रतिक्रिया
84