योद्धा
लेखनविषय:
काव्यरस
एक योद्धा होता तो
शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा
जो हात तो धरायचा
त्या मनगटांमधे जोर यायचा
जो माणूस तो जोडायचा
तो पोलादी होऊन जायचा
हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला
ईतकं की पुढे दोनेक पिढ्या
पेटत राहिले होते ते निखारे
त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ
त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे
त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले
उलट जे हात पसरत होते
त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं
की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही
त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं
त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं
आणि त्याची माणसं ? काय कमी पराक्रमी होती ती ?
त्याच्या एका शब्दावर वाटेल तिथे झोकून देत होती स्वतःला
एकएक माणूस म्हणजे आख्खं सैन्यच जणू
अहर्निश कष्ट करून त्याने घडवली होती ती कणखर मने
फार नाही, तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच केली होती त्याने ही मशागत
तो असा काही भरून राहिलाय ईथल्या द-याखो-यात, दगडामातीत
की त्याच्या नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरतात आमचे
आमचा आहे तो...सांगताना छाती फुगते अभिमानाने आमची
.
.
.
.
.
.
काल आम्ही म्हणे शिवनेरीवर त्याची जयंती साजरी केली
काल आम्ही म्हणे त्याच्या मावळ्यांना आरक्षण देऊ केलं
वाचन
4097
प्रतिक्रिया
20