शरदातला स्वित्झर्लंड : ०३ : झ्युरिक ते क्लायनं शायडेक्
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
शेवटी, कालच्या प्रवासातल्या झोपेच्या अभावाचा प्रभाव सुरू झाला. एका रेस्तराँमध्ये काही खाऊन घेतलं, टेक्नोपार्ककडे जाणारी रेल्वे पकडली आणि हॉटेलवर परतलो. दुपारी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल हॉटेलच्या स्वागतकाला धन्यवाद देऊन उद्यापासून पुढचे तीन दिवस फिरायला जाणार आहे असे सांगितले. मात्र परतण्याच्या दिवसापासून पुढचे आरक्षण कायम ठेवायला सांगितले. रूमवर गेलो आणि ताणून दिली.
दुसऱ्या दिवशी ६ वाजता युंगफ्राउयोखकडे जाणारी रेल्वेगाडी पकडायला झ्युरिक HB वर पकडायची होती. लवकर उठून सगळे आवरून सामानाची मोठी बॅग ठेवली हॉटेलच्या लगेज रूममध्ये ठेवली. तीन दिवसांना पुरेसे कपडे वगैरे जुजुबी सामान एका छोट्या बॅगेत घेऊन सव्वापाचालाच बाहेर पडलो. प्रवासाचे छापील वेळापत्रक बरोबर होतेच त्यामुळे योग्य त्या प्लॅटफॉर्मवरची योग्य ती गाडी पकडण्यात काही समस्या न येता... उलट, गाडी सुटण्याच्या वेळेच्या चक्क १० मिनिटे अगोदर पोहोचल्याने एक सोईस्कर खिडकीच्या बाजूची खुर्ची पकडून बसलो.
युंगफ्राउयोख (Jungfraujoch)
(Jung = युंग = तरूण, frau = फ्राउ = स्त्री, joch = योख = घाट; Jungfraujoch = तरुणी / कुमारिका घाट. हे नाव या घाटाला का पडले याचा काही शोध लागला नाही.)
युंगफ्राउ, आयगर आणि म्योंख ही स्विस आल्प्सची तीन शिखरे एका सलग महाकाय भिंतीसारखी उभी आहेत. त्यांतील युंगफ्राउ आणि म्योंख या शिखरांमध्ये युंगफ्राउयोख ही घोड्याच्या पाठीवर ठेवायच्या खोगिरासारखी जागा आहे. ही जागा म्हणजे ३,४५४ मीटर उंचीवर बारमाही बर्फाने भरलेली हिमनदी आहे. त्यामुळे काही धाडसी आप्ल्पाईन गिर्यारोहक सोडले तर या घाटातून इतर वाहतूक कधीच झाली नाही. किंबहुना जोआन मेयर, हिरोनिमुस मेयर आणि जोआनच्या दोन मुलांनी १८११ मध्ये ह्या जागेवर पोहोचल्याच्या केलेल्या दाव्यावरही विश्वास ठेवला गेला नाही. पण यामुळे खचून न जाता, जोआनच्या दोन मुलांनी १८१२ मध्ये परत एक मोहीम काढून खराब हवामान आणि अनेक फसलेल्या प्रयत्नांना तोंड देत युंगफ्राउयोख पुराव्यासह परत काबीज करून दाखविले.
१९१२ सालामध्ये रेल्वेने जायची सोय झाल्यापासून मात्र हे दुर्गम ठिकाण आल्प्समधले सर्वात मोठे पर्यटक आकर्षण झाले आहे. हे आल्प्समधले सर्वात उंचीवरचे रेल्वेस्टेशन आणि दळणवळण अभियांत्रिकीचा एक अभिमानास्पद प्रकल्प समजला जातो. तेथे जाणारी रेल्वे आल्प्सच्या नयनमनोहर भागातून आणि बारमाही बर्फाच्छादित असलेल्या युंगफ्राउ आणि म्योंख या शिखरांमधील बोगद्यांतून प्रवास करते. त्यामुळे, युंगफ्राउयोख तर अत्यंत आकर्षक आहेच, परंतू तेथे पोहोचण्यासाठी केल्या जाणार्या प्रवासाचा अनुभवही अविस्मरणीय असतो.
चला तर मग युंगफ्राऊयोखवर स्वारी करायला...
झ्युरिकच्या बाहेर पडल्या पडल्या आपला प्रवास स्विस निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरातून होतो. त्या निसर्गात मधे मधे जणू सणसमारंभासाठी नीटनेटक्या केलेल्या व घासूनपुसून ठेवल्यासारख्या दिसणार्या घरांचे वसलेले गामीण आणि शहरी परिसर पाहत असताना इंटरलाकनला केव्हा पोहोचलो हे ध्यानातच येत नाही. आतापर्यंत जर एखादा अस्वच्छ अथवा गबाळा परिसर दिसला तर त्याच्या खरेपणाची खात्री करण्यासाठी स्वतःलाच चिमटा काढावा इतपत आपली मन:स्थिती बदललेली असते.
रेल्वे इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् (Kleine Scheidegg उर्फ छोटा पाणलोट) या वाटेवर गाडी धावू लागल्यावर स्विस निसर्ग आपल्या सौंदर्याचे खास पदर उलगडून दाखवू लागतो. रेल्वेच्या डब्यात खेचाखेच होईल इतकी गर्दी नव्हती, बहुदा तशी ती कधीच नसते. त्यामुळे सर्व प्रवासभर मी आलटून पालटून दोन्ही बाजूच्या खिडक्यांजवळ बसत निसर्ग जमेल तितका डोळ्यास साठवत होतो आणि कॅमेर्याचा सढळ वापर करत होतो. प्रवासात असे केले की काही सहप्रवाशांच्या नजरा विचित्र होतात. अश्या 'वाईट' नजरांचा आपल्यावर प्रभाव पडू नये यासाठी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा उतारा काढण्यात मी फार पूर्वीच पीएचडी केलेली आहे :) हा निसर्ग इतका मनमोहक आहे की इतर काही जणांनी माझे अनुकरण सुरू केले आणि त्या विचित्र नजरा लवकरच बर्यापैकी मावळल्या. इतकेच नव्हे तर त्यातल्या काही नजराही आमच्या कंपूत सामील झाल्या !
या प्रवासाच्या सुरुवातीला डोंगरांच्या रांगांतून जाताना मधूनच दूरवरची हिमशिखरे डोकावत असतात. स्विस निसर्गाच्या चित्रातली हिरवाई कायमच असते. त्यात मधून मधून शरदाने उधळलेले लाल-नारिंगी-पिवळा-तपकिरी रंग जगावेगळी अनुभूती देत असतात...
इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् ०१
इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् ०२
क्लायनं शायडेक् ०१ : हॉटेल आयगर टेर्रासं
क्लायनं शायडेक् ०२ : हॉटेल आयगर टेर्रासं
क्लायनं शायडेक् ०३
क्लायनं शायडेक् ०४
क्लायनं शायडेक् ०५ : युंगफ्राऊयोखचे प्रथमदर्शन
क्लायनं शायडेक् ०६
क्लायनं शायडेक् ०७ : विहंगम दर्शन (जालावरून साभार)
वाचन
7788
प्रतिक्रिया
0