मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निकाल (शतशब्दकथा )

खेडूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली. दिला पाट्वून. - धाव्वीचा फॉर्म भरायच्या आदुगर दाखल्यावर नाव बदलूनबी आलं ! आईच्या मनाजोगतं नाव - स्मिता !

वाचन 11181 प्रतिक्रिया 59