मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देवद्वार छंद

धोंडोपंत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लोकहो, वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्‍या आहेत. सर्वप्रथम १) छंदांवर प्रभुत्व मिळवावे. त्यानंतर २) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी. आणि शेवटी ३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे. एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल. म्हणून पायरीपायरीने वृत्तबद्ध काव्य लिहिण्याचा सराव करावा. वर उल्लेख केलेला छंद म्हणजे नेमके काय? छंद म्हणजे अक्षरांच्या संख्येचे वृत्त. एका ओळीत किती अक्षरे यावीत? याचे विविध नियम बनवून वेगवेगळे छंद निर्माण झाले आहेत. यामध्ये केवळ अक्षरांच्या संख्येला महत्व आहे. लघुगुरू क्रम किंवा मात्रा छंदात विचारात घेतल्या जात नाहीत. केवळ अक्षरसंख्या. छंदातील प्रत्येक अक्षर हे गुरू समजले जाते. त्याचे उच्चारण साधारणपणे दीर्घ असते. या विविध छंदांपैकी एक अत्यंत सोपा आणि अत्यंत मधुर छंद म्हणजे देवद्वार छंद. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात हा छंद आहे. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाची सुरूवात "देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी' अशी आहे. त्यामुळे या छंदाला "देवद्वार छंद" असे नाव आहे. या छंदाच्या रचनेत प्रत्येक चरण म्हणजे ओळ ही सहा अक्षरांची असते. पहिल्या तीन ओळी सहा अक्षरांच्या आणि चौथी ओळ ही चार अक्षरांची. म्हणजे देवद्वार छंदाचे नोटेशन असे लिहावे लागेल. ६....६.....६.....४ यात दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळीचा यमक असतो. हे नीट लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ हरिपाठाचा अभंग पहा देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या || काही ठिकाणी पहिल्या तीन ओळीचे यमक जुळवले जाते. जसे ज्ञानेश्वर महाराजांनी वरच्या चरणात केले आहे. आमचे स्नेही श्री. इलाही जमादार यांनीही पहिल्या तीन ओळींचा यमक त्यांच्या कवितेत घेतला आहे. उदाहरणार्थ चंदनाची काया सुगंधाची छाया अत्तराचा फाया माझी प्रिया || पण या छंदात लिहितांना तसे करणे आवश्यक नाही हे लक्षात ठेवावे. केवळ दोन व तीन या ओळींचा यमक पुरेसा आहे. कवीने त्याची हौस म्हणून पहिल्या तीन ओळींचा यमक जुळविल्यास उत्तम. पण ते अपरिहार्य नाही. दुसर्‍या व तिसर्‍या ओळीचा यमक अपरिहार्य आहे. ग्रेसची देवद्वार छंदातली ही कविता पहा. उठा दयाघना लावा निरांजने देहातले सोने काय झाले? झोपेतले जीव झोपेतच मेले आभाळची गेले पंखापाशी इथे नागव्याने शोधावा आचार जैसा व्यभिचार जोगिणीचा गोंजारून घे ना माझे हे लांछन रक्ताला दूषण देण्यासाठी हा अत्यंत सोपा छंद आहे. विलक्षण गोड आणि मोहक आहे. वृत्तबद्ध लेखनाचा अभ्यास या छंदापासून केल्यास उत्तम पकड काव्यावर यायला मदत होईल. या छंदातील आमच्या एका शृंगारिक कवितेतील दोन कडवी :- मीलनाचा मंत्र जपे सांजवेळ प्रीतिचे मोहोळ उठलेले देही चमकते वासनेची वीज सुनी सुनी शेज तुझ्याविना निर्दोष काव्यलेखनासाठी शुभेच्छा. धोंडोपंत

वाचन 10897 प्रतिक्रिया 38