मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

संताजी धनाजी · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला. वाटले की हो म्हणाला, म्हणुन बाहेरची गम्मत जम्मत पहात बसलो. एक अर्ध्या तासाने भाऊंना विचारले तर म्हणतात बस दोन तीन थांबे पुढे आली. मुंबईत वाहक बस थांबा आल्यावर सांगत नाहीत का हो? असल्या शिव्या घातल्या त्याला [मनातल्या मनात हो] आणि खाली उतरलो. आधीच आम्हाला मुंबई नवीन, त्यात भलत्याच ठिकाणी उतरुन एका न पाहिलेल्या स्थळाचा शोध चालु झाला. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला... नाही नाही, चुकलेच. दुष्काळात तेरावा महीना म्हणायचे होते. सासरेबुवांनी "६६ नंबर", "कांदेवाडी", "मीरबत लेन", "साहित्य संघ" वगैरे कळीचे शब्द सांगुन ठेवले होते. आणि आमच्या स्मरणशक्तिवर आगाध विश्वास असल्याकारणाने बायकोने कागदावर सगळे लिहुन पण दिले होते. नवरा मुंबईत हरवायला नको हा विचार! [आणि आमच्या मते] चांगले नवरे परत परत मिळत नाहीत हा दुसरा असावा. मी मुंबईत एकटा फिरुच शकत नाही असे तीची ठाम समजुत आहे. असो. बसच्या रस्त्यावरुन उलटा मागे मागे सर्वभाषिक लोकांजवळ चौकशी करत मीरबत लेन जवळ आलो [एकदाचा]. मग तसेच पुढे येवुन एका काकांना विचारले तर त्यांनी व्यक्तिगत चौकशी वगैरे करुन मार्गदर्शन केले आणि वर समर्थ भोजनालयात अतिशय उत्तम जेवण मिळते हे ही सांगितले. मनात म्हटले वा! बाकी गिरगाव एकदम छान वाटले. मग पुढे गेल्यावर सापडले एकदाचे समर्थ भोजनालय! भोजनालय कसले? घरच होते ते. पहिल्या खोलीत रामभाऊंच्या तसबीरीला नमस्कार केला. अ काय हवे ते सुची पाहुन एक जागा रीकामी होण्याची वाट पहात पहील्या खोलीत बसलो होतो. सुचीमध्ये खालील पदार्थ होते [सगळे आठवत नाहीत]: १. कोळंबी फ्राय २. सुरमई फ्राय ३. पापलेट फ्राय ४. मांदेली फ्राय ५. बांगडा ६. फिश मसाला [का असेच काहीतरी] अजुन बरेच काही... पाणी सुटले ना, तोंडाला? :D आत मध्ये डोकावले तर फक्त सहा बाके होती. एका बाकावर तीन जण; तेही फक्त भींतीच्या बाजुला. त्यामुळे एकूण १८ लोक बसू शकतील एव्हढीच जागा. a खोलीत एक जण "डोके गमावलेल्या मुरारबाजीसारखा" ताटे वाढत आणि काय हवे नको ते पहात होता. त्याचे नाव "नाथा" :) [हे नंतर कळले]. बाहेर लोकांची संख्या वाढत होती. काही वेळाने एक जण उठला हे पाहील्यावर मी तेथे जाउन बसलो. नाथा थोडया वेळाने भिरभिरत आला. त्याला एक मांदेली फ्राय आणि सुरमई फ्राय ची ऑर्डर दिली आणि [परत] वाट पहात बसलो. लोक फार मन लावून जेवत होते आणि माझी भूक वाढत होती. तेव्हढ्या वेळात स्वतःचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला a आणि आला! नाथा आला! सुरमई आणि मांदेली घेउन आला! वा! काय तो नजारा होता. वासानेच अर्धमेला झालो. दोन्ही थाळ्या समोर स्थानापन्न झाल्या. हात मांदेलीकडे गेला आणि पुढच्या क्षणी तोंडात :D वा, काय सुंदर चव. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत! सुरमईचे पण तसेच. अजिबात तेलकट नाही. अतिशय ताजे मासे. सोबतीला सोलकढी होतीच. मजा आली. सर्व ताट कसे संपले ते कळलेच नाही. मला ताटाचे एक छान छायाचित्र काढायचे होते पण लोकलज्जास्तव नाही काढले. माफ करा मला :( नाथाला माझे जेवतानाचे छायाचित्र काढायची विनंती केली पण गडबडीत तेही बरोबर नाही आले. :( जेवण झाल्यावर हात धुताना खास पुणेरीपणा द्रुष्टिस पडला. बेसिनच्या आरश्याखाली खालील सुचना होती: "क्रुपया तोंड धूताना किळसवाणे आवाज करु नयेत" a म्हटले, वा इकडेपण का? [जरा गडबडीत छायाचित्र काढल्यामुळे नीट आले नाही]. आणि सर्वात कडी म्हणजे जेवणाचे बिल फक्त मोजुन ७३ रुपये झाले. पैसे देताना नाथाला सांगितले की तात्या अभ्यंकरांनी पाठवले आहे. बर बर म्हणाला :) काहीही असो मित्रांनो आणि मैत्रीणींनो, एक गोष्ट ठरवली: ह्या पुढे मुंबईला आलो की एक चक्कर गिरगावात.

वाचन 11923 प्रतिक्रिया 34